(गोट). स्तनी वर्गाच्या समखुरी गणातील बोव्हिडी कुलाच्या कॅप्रिनी उपकुलातील शेळी हा एक रवंथ करणारा प्राणी आहे. शेळी हा मेंढीच्या जवळचा प्राणी आहे. शेळी सु. ९,००० वर्षांपूर्वी नैर्ऋत्य आशियामध्ये माणसाळली गेली आणि तेथूनच तिचा प्रसार इतरत्र झाला. सद्यस्थितीत आढळणाऱ्या सर्व शेळ्या इराण व टर्की येथील झाग्रोस पर्वतांमध्ये आढळणाऱ्या कॅप्रा इग्रॅगस या वन्य जातींपासून उत्पन्न झालेल्या आहेत. पाळीव शेळीचे शास्त्रीय नाव कॅप्रा इग्रॅगस हिरकस आहे. जगात शेळ्यांचे सु. ३०० संकर विकसित झालेले आहेत.
शेळ्यांच्या प्रत्येक संकरानुसार त्यांच्या शरीरात, वजनात आणि आकारमानात बदल दिसून येतात. शेळीच्या बोएर या संकरित वाणाचे वजन सु. १४० किग्रॅ. असते, तर सर्वांत कमी वजनाची शेळी २०–२७ किग्रॅ. असते. आफ्रिकन पिग्मी या वाणाची शेळी सर्वांत लहान असून तिची उंची ४१–५८ सेंमी. असते. शेळीला एकूण ३२ दात असतात. तिच्या वरच्या जबड्यात गायीप्रमाणे कुरतडणारे (कृंतक) दात आणि सुळे नसतात. शेळीचे दंतसूत्र (कृंतक दात ०/३, सुळे ०/१, उपदाढा ३/३, दाढा ३/३) असे असते. त्यांच्या अनेक संकरांमध्ये मानेपासून निघालेले कल्ले असतात. शेळीला दोन शिंगे असून ती हाडांनी बनलेली असतात; त्यांभोवती केराटीन आणि अन्य प्रथिनांचे आवरण असते. शिंगांचा वापर संरक्षणासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी करतात. नर आणि मादी दोघांनाही दाढी असते. मादीच्या आचळाला दोन स्तनाग्रे असतात. अन्य रवंथी प्राण्यांप्रमाणेच शेळीचे जठर चार कप्प्यांचे बनलेले असते.
शेळीच्या खुरांचे तळ मध्यभागी खोलगट असून त्यांच्या कडा धारदार असतात, त्यामुळे त्यांना जमिनीवर चांगली पकड मिळते. त्या चपळतेने हालचाल करतात आणि धोकादायक ठिकाणी चढू शकतात, तसेच तोल सांभाळू शकतात. रवंथी प्राण्यांमधील शेळी हा झाडावर चढून पाने खाणारा एकमेव प्राणी आहे. शेळ्या डोंगराळ प्रदेशांत सहजपणे वावरतात, उंच आणि अवघड जागी उगवलेल्या लहान झाडाझुडपांची पानेही खातात. वरच्या ओठांची स्वैर हालचाल, पकड घेणारी जीभ आणि पायांतील चपळाई यांमुळे त्यांच्यात आखूड पाने आणि गवत खुडून खाण्याची क्षमता असते.
शेळ्यांच्या वर्तनात स्वाभाविक उत्सुकता दिसून येते. त्यांच्या परिसरात दिसलेली एखादी नवीन वस्तू त्या वरचे ओठ आणि जीभेने कुरतडून किंवा खाऊन पाहतात. कळपात असल्या तरी एकमेकांपासून दूर राहतात, अन्न मिळवित असताना शक्यतोवर चारी बाजूला मैदानात पांगतात. त्यांच्या कळपात कोणी घुसखोरी केल्यास शेळ्या घुसखोराला सामोरे जातात आणि खासकरून समोर आलेल्या व्यक्तीला डोक्याने धडक देतात.
शेळीच्या संकराचा प्रकार आणि मिळालेले अन्न यांनुसार शेळ्या ३–१५ महिन्यांत प्रजननक्षम होतात. मादीमध्ये सु. २१ दिवसांनंतर ऋतुकाल सुरू होतो आणि २–४८ तास टिकतो. या काळात मादी अन्न कमी खाते, दूध कमी देते आणि नराला आकर्षित करण्यासाठी अधिक आवाज करीत राहते. गर्भावधी सु. १५० दिवसांचा असतो. मादी दरवेळी दोन पिलांना जन्म देते; काही वेळा ती एक किंवा तीन पिलांना जन्म देते. पिलांना जन्म दिल्यानंतर शेळी सु. ३०५ दिवस दूध देते. या काळात ती दिवसाला ७००–१,८०० मिली. दूध देते. शेळीच्या दुधातील चरबीचे कण लहान व तरल रचनेचे आणि पायसाच्या स्वरूपात असतात. पचनक्रियेत शेळीच्या दुधाचे क्लथन होऊन झालेल्या दुधातील गुठळ्या कमी कठीण व लवकर मोडणाऱ्या असल्याने त्यातील प्रथिनांवर पाचकरसातील विकरांचा परिणाम लवकर होतो आणि प्रथिनांचे विघटन लवकर होते. त्यामुळे शेळीचे दूध पचायला हलके असते. तसेच तिच्या दुधापासून बनविलेले चीज पचायला हलके असते. शेळीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा क्षार आणि ब-समूह जीवनसत्त्वे यांचे प्रमाण जास्त असते. काही वेळा नरदेखील अत्यंत कमी प्रमाणात (त्यांच्या दुग्धग्रंथीपासून स्रवलेला द्राव) दूध देतात.
शेळी मानवासाठी एक उपयोगी प्राणी आहे. ती जिवंतपणी दूध, खत आणि धागे यांसाठी उपयोगी पडते, तर मेल्यानंतर मांस आणि कातडे देते. शस्त्रक्रियेसाठी लागणारे टाके आणि काही वाद्यांसाठी लागणारे तंतू तिच्या आतड्यापासून बनवितात. मेंढ्या तसेच अन्य जनावरे यांपेक्षा शेळ्या जीवाणू व कृमी यांना कमी बळी पडतात. शेळीचा आयु:काल १५–१८ वर्षे असतो. प्रजननाचा जास्त वेग (जुळी/तिळी होण्याचे जास्त प्रमाण), उत्तम रोगप्रतिकारकक्षमता आणि शेळीचे दूध व मांस यांना सतत असलेली मागणी यामुळे त्यांची संख्या वाढत गेली आहे. २०११ साली केलेल्या सर्वेक्षणात जगात सु. ९२.४ कोटी शेळ्या आढळून आल्या आहेत. शेळीच्या दुधाचे सर्वाधिक उत्पादन भारत, बांगला देश आणि सुदान या देशांमध्ये होते. शेळीच्या दुधापासून चीज, लोणी, आईस्क्रीम, योगर्ट इत्यादी पदार्थ तयार करतात.
शेळीचे वर्णन ‘गरीबाघरची गाय’ असेही करतात. कारण स्वस्त झाडपाला खाऊन ती कुटुंबाची दुधाची गरज भागविते. भारतात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र इत्यादी राज्यांत शेळ्या पाळल्या जातात. हरियाणा, पंजाब, राजस्थान व उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश या भागांत जमनापारी, बीटल, बारबारी, अलवरी व सिरोही या दुधाळ शेळ्या आढळतात. महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व केरळ या भागांत सुरती, दख्खनी, उस्मानाबादी व मलबारी या जातीच्या शेळ्या आढळून येतात. बंगाल, आसाम, त्रिपुरा, ओडिशा व बिहार या भागांत बंगाली शेळी आढळते. अंगोरा तसेच काश्मीरी वाणाच्या शेळ्यांची पैदास लोकरीसाठी करतात.