चर्च (ख्रिस्तसभे)चा अंतर्गत इतिहास समजण्यासाठी, त्याचप्रमाणे कॅथलिक चर्च समजून घेण्यासाठी आणि ख्रिस्ती माणूस नक्की कुठल्या संदर्भात स्वत:ला समजून वागतो, हे ध्यानात घेण्यासाठी इ.स. १ ते १९६५ या वीस शतकांत संपन्न झालेल्या एकवीस परिषदा अपरिहार्य ठरतात. या परिषदांना ‘ऐक्य जपून ठेवण्यासाठी एकत्र येत राहणे’ अशा संबोधनाने (‘ऑयकेमेन’ या मूळ ग्रीक शब्दातून आलेला एक्युमेनिकल) ओखळले जाते.
प्रभू येशू ख्रिस्त यांनी स्थापन केलेल्या चर्चमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे संत पीटर व त्यानंतर चर्चमध्ये नव्याने सामील झालेले संत पॉल या दोघांमधील मतभेत सुरुवातीलाच पुढे येतात. संत पॉल हे अंत्युखियामध्ये असताना यहूदियाहून काही माणसे तेथे आली व नव्याने ख्रिस्ती धर्मात प्रवेश केलेल्यांना शिकवू लागली की, जोपर्यंत ते सुंतेच्या प्राचीन यहुदी परिपाठाचे पालन करीत नाहीत, तोपर्यंत त्यांचे तारण होऊ शकणार नाही. संत पॉल यांचा त्यांच्याशी या विषयावर बराच वादविवाद झाला. शेवटी जेरूसलेम (येरूशलेम) येथे संत पीटर व प्रेषित यांचे मत घेण्यासाठी संत पॉल यांना काही ख्रिस्ती लोकांबरोबर पाठविण्याचे ठरले. संत पॉल यांच्याकडून देव कोणकोणत्या गोष्टी करीत आहे, याची सविस्तर हकिगत संत पीटर यांना सांगण्यात आली, तेव्हा या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी येशू ख्रिस्त यांच्या प्रेषितांनी एक सभा (Council) घेण्याचे ठरविले. त्या सभेत ठरले की, ‘जे विदेशी (यहुदीतेतर) लोक येशू ख्रिस्त यांच्याकडे वळत आहेत, त्यांनी आपले यहुदी नियम पाळलेच पाहिजेत असा आग्रह आपण धरू नये’. वाद सुटला; एकजुटीने सर्व पुढे जात राहिले. अशी संपन्न झाली ‘जेरूसलेम धर्मपरिषद’. ती परिषद होती; पण विश्वपरिषद नव्हती.
संत पॉल यांच्या दौऱ्यांमुळे व इतर प्रेषितांच्या व त्यांच्या अनुयायांच्या अथक मेहनतींमुळे चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्म संपूर्ण भूमध्य समुद्रकिनारी (खोऱ्यात) पसरला. रोम हे शहर संत पीटर यांच्या धार्मिक आधिपत्याखाली आले. तेथे ख्रिस्ती धर्माची पाळेमुळे सखोल पसरली. ते चर्चचे नवे केंद्र बनले. जेरूसलेम ते रोमन साम्राज्याच्या राजधानीत आता ख्रिस्ती श्रद्धा मजबूत बनायला लागली होती. पूर्वेलादेखील ख्रिस्तीजनांची संख्या वाढत होती; पण त्याचबरोबर ख्रिस्ती धर्माची शिकवण नक्की काय सांगते, हा प्रश्न ऐरणीवर येत होता. नव्याने जन्माला आलेले चर्च तत्त्वप्रणालीत दोषयुक्त बनत होते; कारण पुरोगामी व प्रतिगामी आपापली स्वतंत्र मते पुढे मांडत होते. ऐक्याचा आग्रह धरणारे चर्च रोमन सम्राटांना त्यांचे राजकीय हेतू साधण्यासाठी सोयीचे वाटत होते, म्हणून तेही या वादात सक्रिय भाग घेत होते. ‘येशू ख्रिस्त नक्की कोण? ते फक्त देव होते की, फक्त मनुष्य होते?’ अशा प्रश्नांभोवती चर्चा सुरू होती व निरनिराळी विचारवंत मंडळी परस्परविरोधी मते मांडत होती. ‘परमेश्वर एकच असेल, तर मग ते तीन जणांचे एक परमेश्वर कसे’ हादेखील मुद्दा चर्चिला जात होता. या वादाला खीळ बसावी म्हणून इ.स. ३२५ साली आशिया मायनरमधील नायसिया येथे पहिली एक्युमेनिकल विश्वपरिषद संपन्न झाली. त्यात एरियनवादाचा जाहीरपणे निषेध झाला. अधिकृत ‘श्रद्धा प्रकटन’ चर्चने मान्य केले. धर्मपंडितांनी खुलासा करून पटवून दिले की, देवाचे एकमेव पुत्र येशू ख्रिस्त यांच्यात ‘दैवी’ व ‘मानवी’ हे दोन स्वभाव एकाच वेळी गोंधळाविना समाविष्ट होतात; कारण येशू ख्रिस्त हे परमपित्याचा शाश्वत शब्द आहे. येशू ख्रिस्त हे परमपित्याबरोबर त्याच्याच सत्त्वाचे आहेत व कोणताही गोंधळ न होता ते दोघे स्पष्टपणे एकरूप आहेत. देवपणात येशू ख्रिस्त हे परमपित्यासमान आहेत व त्यांच्या मानवीपणात ते परमपित्यापेक्षा कनिष्ठ आहेत. पवित्र आत्म्याच्या शक्तीने कुमारी मेरी (मरिया) यांच्यापासून येशू ख्रिस्त हे देहधारी झाले व ते मनुष्य बनले.
इसवी सन ३८१ साली कॉन्स्टँटिनोपलची पहिली परिषद व चर्चची दुसरी एक्युमेनिकल परिषद पार पडली. पूर्वेकडील प्रदेशात एरियनवादाचा निषेध होऊन तो संपुष्टात आला, तरी पश्चिमेकडील प्रदेशांत मात्र हा वाद वाढतच होता. यासाठी ही परिषद जरुरीची भासली; पवित्र आत्मा हा त्रैक्यमय एकाच परमेश्वराचा अविभाज्य भाग आहे, हे सदर विश्वपरिषेमध्ये पटवून सांगण्यात आले. तरी परमपुत्र व पवित्र आत्मा यांमधील संबंध स्पष्ट नसल्यामुळे तो वाद पुढील परिषदांचा विषय बनणार होता.
इसवी सन ४३१ मध्ये एफेसस (एफिस) येथे विश्वपरिषद संपन्न झाली. येशू ख्रिस्त यांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट व निश्चित शब्दांत निर्णायक व्याख्येने स्पष्ट करण्यात ही परिषद यशस्वी ठरली. कृपा आणि सत्य यांच्या पूर्ततेत येशू ख्रिस्त हे आम्हांमध्ये राहिले. त्यांनी परमेश्वराचे राज्य स्थापिले व ते तत्त्वत: घोषित केले. त्यांच्याशी तादात्म्य पावून आम्ही परमपित्याला जाणावे असे केले. याच परिषदेत पवित्र मरिया यांना ‘देवाची आई’ (Theotokos) म्हणून गौरविण्यात आले. खरा देव असून येशू ख्रिस्त यांनी माता मरिया यांच्या पोटी पवित्र आत्म्याद्वारे जन्म घेतला, म्हणून येशू ख्रिस्त यांची माता ही ‘देवाची माता’ बनली. मात्र कॉन्स्टँटिनोपलचा बिशप नेस्टोरिअस यांनी ‘देवाची माता’ या मतप्रणालीला कसून विरोध केला. त्यांच्या मते मरिया या केवळ येशू ख्रिस्त या ‘मानवा’च्या माता होत्या, त्यांच्यातील ‘दैवी अंशा’च्या माता नव्हत्या. तसेच त्यांनी मोनोफिजाईट्स पंथाला एवढा प्रखर विरोध केला की, येशू ख्रिस्त या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत असे ते शिकवितात, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे या परिषदेत नेस्टोरिअस यांचा निषेध करण्यात येऊन त्यांना अधिकारपदावरून दूर करण्यात आले.
इसवी सन ४५१ मध्ये कॅल्सिडॉन येथे धर्मपरिषद पार पडली. या परिषदेत रोम व कॉन्स्टँटिनोपल येथील बिशपचा दर्जा समान राहील, पूर्व व पश्चिमेकडील सर्व बिशप अनुक्रमे कॉन्स्टँटिनोपल व रोम येथील बिशपला आपला प्रमुख मानतील, अशी तडजोड झाली; मात्र रोमच्या बिशपने हा निर्णय मानण्यास नकार दिला. कालांतराने दोन्ही पीठांत तात्त्विक मतभेद होऊन कॉन्स्टँटिनोपलचे सनातनी धर्मपीठ व रोमचे विश्वव्यापी उदारमतवादी धर्मपीठ असे दोन प्रमुख गट निर्माण झाले. कॉन्स्टँटिनोपल येथील पीठाला ग्रीक व रोमन पीठाला ‘लॅटिन चर्च’ असेही संबोधण्यात येऊ लागले. संपन्न होणाऱ्या प्रत्येक परिषदेत ‘अस्सल व परंपरानिष्ठ श्रद्धेचे’ जोमाने समर्थन करण्यात येत असे व त्यामुळे फुटीरवादी प्रवृत्तींना आळा बसत असे.
त्यानंतर शंभर वर्षांनी इ.स. ५५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपल येथे दुसरी विश्वपरिषद झाली. या अगोदरच्या परिषदेचे पडसाद अद्याप सुरूच होते. ख्रिस्ती जग दुभंगले होते. सम्राटांचे फतवे जुमानले जात नव्हते. बारा पदरी निषेध जाहीर करून ही परिषद संपली. बाराही निषेध अगोदरच्या परिषदेत संमत झालेल्या ठरावांची पुनरावृत्ती होती; कारण ठरवूनदेखील दोषयुक्त मुद्द्यांवर वाद चालूच राहिला होता. नवीन, हुशार धर्मपंडित ख्रिस्ती शिकवण अजून स्पष्ट करून देण्यात यशस्वी होत होते.
परत एकदा कॉन्स्टँटिनोपलमध्ये इ.स. ६८०-८१ मध्ये तिसरी विश्वपरिषद झाली. ख्रिस्ती रहस्याभोवती परत एकदा गैरसमजूतींना ऊत आला होता. नवीन वाद निर्माण झाला. जर येशू ख्रिस्त यांचे ‘दैवी’ व ‘मानवी’ असे दोन स्वभाव आहेत, तर परमपित्याची इच्छा आज्ञाधारकपणे पाळण्यासाठी त्यांचे दोन वेगवेगळे संकल्प आहेत काय? अशाप्रकारे एकेश्वरवाद (Monothelitism) आणि द्वैतवाद (Dyothelitism) असे परस्परविरोधी दोन वाद मांडण्यात आले व ते विनातडजोड सोडविण्यासाठी ही परिषद संपन्न झाली.
इसवी सन ७८७ साली नायसियाची दुसरी परिषद पार पडली. येशू ख्रिस्त यांच्या स्वभावधर्माधर्माभोवती चालू झालेला वाद संपुष्टात आला होता. या सातव्या एक्युमेनिकल परिषदेचा हेतू एका नवीन सुरू झालेल्या वादाभोवती केंद्रित झाला. तो वाद मूर्तीसंबंधात निर्माण झाला होता. ‘आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको’ ही देवाने मोझेस (मोशे) यांना दिलेल्या दहा आज्ञांपैकी एक आज्ञा. विखुरलेल्या चर्चमध्ये हा वाद शिगेस पोचला. आठव्या शतकात ख्रिस्तमंदिरात मूर्ती किंवा चित्र सर्रास दिसत होती. अदृश्य देवाकडे आपले लक्ष लावण्यासाठी भाविक दृश्य अशा मूर्तीचा किंवा चित्रांचा वापर करीत असत. या संदर्भात विचारवंतांनी अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण दिले होते; परंतु राज्यकर्ते धार्मिक प्रश्नांमध्ये पडल्याने वाद हिंसक बनला होता. या परिषदेने अगोदरच्या सहा परिषदांची मान्य शिकवण ठासून सांगितली व आदेश दिला की, येशू ख्रिस्त यांची क्रूसावरील मूर्ती, मरिया यांची मूर्ती व संतांची मूर्ती भक्त वापरू शकतात; परंतु पूजा फक्त अदृश्य देवासाठीच असावी व मूर्तिपूजा पूर्ण टाळावी.
इसवी सन ८६९-७० साली कॉन्स्टँटिनोपलची चौथी परिषद संपन्न झाली. रोम आणि बायझंटिनमध्ये चर्च विभक्त होण्याची वेळ आली होती. बोलणी चालू होती. ऑर्थोडॉक्स चर्च मूर्तीच्या आवश्यकतेसाठी आग्रही होते. संमत झालेल्या काही ठरावांनी या परिषदेची सांगता झाली.
लाट्रान, रोम येथे इ.स. ११२३ साली पहिली परिषद संपन्न झाली. चर्चमधील नेतृत्वाचा प्रश्न चर्चिला जात होता. कॉन्स्टँटिनोपल व रोम ही दोन शहरे व तेथील प्रमुख हे जगात पसरलेल्या चर्चच्या नेतृत्वाविषयी भांडत होते. प्रमुख नेतृत्व कोणाकडे आहे, हा प्रश्न होता. प्रमुख मान्य होत नव्हता म्हणून सर्व धर्मसेवक (Clergy) मन मानेल तसे वागत होते. या एक्युमेनिकल नवव्या परिषदेत काही नियम चर्चमधील नेत्यांसाठी घालून देण्याचे ठरले. पोप सातवे ग्रेगरी व दुसरे अर्बन यांनी धर्मसेवकांच्या सुधारणेबाबत केलेले कार्य पुढे नेण्याविषयी ठराव झाला.
इसवी सन ११३९ साली लाट्रानची दुसरी एक्युमेनिकल परिषद संपन्न झाली. पसरत चाललेले चर्च, रचनाबद्ध होत असलेली प्रगती, मठांची व त्यात सामील होणाऱ्यांची वाढती संख्या यांमुळे आपसात चर्च काय व कसे असावे, याविषयी चर्चा व वाद चालू होता. या विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी ही परिषद संपन्न झाली.
लाट्रान येथे तिसरी परिषद इ.स. ११७९ मध्ये पार पडली. पोपविषयी संशय व शंका निर्माण होत होत्या व त्या संदर्भात ही परिषद भरली. जागतिक प्रतिनिधित्व वाढत होते. ऐक्याला तडा जायला व चर्चचे तुकडे व्हायला सुरुवात झाली होती. बिशपांचे व धर्मगुरूंचे अधिकार चर्चिले जाण्याची गरज भासत होती. मुस्लिमांकडून पवित्र भूमी (पॅलेस्टाइन) हातात घेण्यासाठी चाललेली मोहीम (Crusades) वाढत होती. पोपच्या निवडीबद्दल काही नियम (निवडप्रक्रिया) ठरत होते.
इसवी सन १२१५ मध्ये लाट्रानची चौथी परिषद भरली. राजकारण व चर्च यांमधील संबंध स्पष्ट करण्याचे प्रयत्न या परिषदेमध्ये झाले. बिशपांच्या निवडीबद्दलसुद्धा काही नियम ठरविण्यात आले. व्हॅटिकनचा अधिकार मान्य झाला, हे या परिषदेचे मुख्य यश म्हणावे लागेल.
इसवी सन १२४५ मध्ये तेरावी परिषद व फ्रान्समधील लीऑन शहरी संपन्न झालेली पहिली परिषद. असिसीचे संत फ्रान्सिस यांसारखे महान संत लोकप्रिय बनत होते. त्या संदर्भात ही परिषद महत्त्वाची ठरते. ईजिप्तच्या सुलतानाने जेरूसलेम काबीज केले होते. हा चर्चचा पराभव मानला जात होता. सम्राटाविरुद्ध ठराव जारी केला जात होता. थोड्या अवधीतच ही परिषद संपली.
थोड्याच अवधीत, म्हणजे इ.स. १२७४ मध्ये लीऑनची दुसरी परिषद संपन्न झाली. तदनंतर इ.स. १३११-१२ मध्ये दौफिने-व्हिएन्ना येथे पंधरावी परिषद पार पडली. अत्यंत कठीण परिस्थितीतून चर्च जात होते. इ.स. १४१७ मध्ये कॉन्स्टन्स येथे सोळावी परिषद पार पडली. पोप इटलीहून निघून फ्रान्समधील आविग्नोन येथे राहू लागल्याची खंत खूप लोकांना होती. चर्च आता पश्चिमेतसुद्धा दुभंगण्याचे वारे वाहू लागले होते. तत्कालिन पोपने परिषदेची जागा रोमला हलविली; परंतु तेथे पोपचे कायदेशीर अस्तित्व नसल्याने ही परिषद वादाची ठरली. तरीही सत्यासाठी आवाज उठविणाऱ्यांनी सूत्रे आपल्या हातांत घेऊन ही परिषद संपन्न करून दाखविली. तीन पोप एकाच वेळी एकमेकांशी भांडत होते. बारावे ग्रेगरी कायदेशीर पोप होते. शेवटी या परिषदेमुळे दुभंगलेले चर्च पुन्हा शांतीने एकत्र आले. इ.स. १४३८-३९ साली सतरावी परिषद इटलीमधील फ्लॉरेन्स येथे संपन्न झाली. ख्रिस्ती अधिकृत शिकवणुकीबद्दल चर्चा होऊन ती स्पष्ट मांडण्यात आली. या परिषदेचा शेवटचा भाग रोम येथे पार पडला.
इसवी सन १५१२–१७ मध्ये लाट्रानची पाचवी परिषद संपन्न झाली. फ्लॉरेन्सच्या व लाट्रानच्या परिषदांमध्ये तब्बल ७५ वर्षांचा काळ लोटला. या काळात चर्चचा इतिहास व जगात घडणारा कला, विद्या, विचार, शिल्प, वगैरेंचा ‘नवा अवतार’ (Renaissance) किंवा ‘विवेकबुद्धीची पहाट’ (Age of Reason) या दोहोंमध्ये संमिश्र देवाणघेवाण झाली. एका बाजूला बरेच ज्ञानदान, तर दुसऱ्या बाजूला अंधुक-अस्पष्ट स्थिती असे या काळाचे वर्णन करता येईल. चर्चमध्ये समूळ सुधारणांची गरज आता अपरिहार्य बनत होती. त्या काळातील कोणी एक पोप अशी सुधारणा करण्यास समर्थ दिसले नाहीत. बऱ्याच गोष्टींचा निषेध या परिषदेमध्ये बऱ्याच गोष्टींचा निषेध झाला. ही परिषद पाच वर्षे चालू राहिले. प्रॉटेस्टंट सुधारणावादी मते एव्हाना खोल रुजली होती. परिणामत: उत्तर देण्याऐवजी चर्च अधिक प्रतिगामी व पिछेहाटीचे पुरस्कर्ते बनले.
या संदर्भात इ.स. १५४५–४७, १५५१-५२, १५६२-६३ मध्ये ट्रेन्टची परिषद संपन्न झाली. ‘निषेधा’चे ठराव पारित करण्यापलीकडे इतर काहीही चर्चेला आले नाही. नायसिया परिषदेने कॅथलिक प्रणाली भक्कम केली. मार्टिन ल्यूथर यांच्या सुधारणावादी मताने पाश्चिमात्य चर्च पूर्ण दुभंगले. पोप दहाव्या लिओंनी ल्यूथर यांच्या विचाराची व्याप्ती ओळखलीच नाही. मूळातून उपटल्या जाणाऱ्या दुष्टपणाला थांबविण्यासाठी फार अवधी लागला व व्हायला नको ते झाले. एकोणिसावी एक्युमेनिकल परिषद ट्रेन्टला पार पडली. तिच्यामध्ये ल्यूथर यांच्या शिकवणुकीला थांबविण्यासाठी पाच चर्चपुरस्कृत कॅनन लॉ (महाकायदे) जाहीरपणे प्रसिद्ध करण्यात आले. मूळपाप, परमेश्वराच्या शब्दाचे अप्रतिम महत्त्व इत्यादी विषयांना प्राधान्य देण्यात आले; परंतु ल्यूथर यांचा निषेध हा प्रामुख्याने खरा विषय ठरला. या परिषदेचे स्थळ इटलीमधील बोलोनिया येथून रोम येथे हलविण्यात आले. पोप तिसरे पॉल यांचे निधन झाल्यावर परिषदेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींत दोन गट पडून काही प्रश्नांवर जबरदस्त तणाव निर्माण झाला. संपूर्ण नवीन मार्ग शोधण्याचा हा काळ होता.
तरी, इ.स. १८६९-७० या काळात व्हॅटिकन येथे विसावी एक्युमेनिकल परिषद पार पडली व तीसुद्धा समोर आलेल्या आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यास अपुरी पडली. पोपची शिकवण नेहमी ‘अचूक’ असते हा मुद्दा अधोरेखित करण्यात आला. हा विषय नीट न हाताळला गेल्यामुळे काही बिशप परिषदेचा समारोप होण्याअगोदर निघून गेले. फ्रान्स युद्धात अडकला होता व फ्रेंच बिशपांच्या अनुपस्थितीचे कारण अस्पष्ट होते.
इसवी सन १९६२–६५ मध्ये व्हॅटिकनची दुसरी परिषद जगभरच्या ४,००० बिशपांच्या व त्यांच्या सल्लागारांच्या उपस्थितीत भरली. जगातील कॅथलिक चर्चची आजची भूमिका, तिचे जगातील योगदान व तिची खरी अस्मिता हे या २१ व्या एक्युमेनिकल परिषदेचे फलित म्हणावे लागेल.
संदर्भ :
- Chathanatt, John, Unto the Margins : Francis and His Challenges, Banglore, 2013.
- Fink, John F., The Doctors of the Church : An Introduction to the Church’s Great Teachers, Vols. 1 & 2, New York, 2000.
- Kelly, Joseph F., The Ecumenical Councils of the Catholic Church : A History, Minnesota, 2009.
- Paul, Pope John II, Redemption Missio, Kochi, 1999.
- Thomas, P. C., A Compact History of the Popes, Mumbai, 1992.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया