परमेश्वर पिता, प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा व येशू ख्रिस्त यांची माता पवित्र मरिया यांच्याबरोबरच ख्रिस्ती भक्तजन अनेक संतांचाही सन्मान करतात. बऱ्याचशा कुटुंबांचा एखादा रक्षक संतही (Patron Saint) असतो. आज जगभर अनेक संतांच्या नावाने ख्रिस्तमंदिरे उभारलेली आहेत व त्या संतांच्या नावाने प्रार्थना केल्या जातात, गाऱ्हाणी मांडली जातात. संतांच्या वार्षिक स्मृतिदिनी अनेक ठिकाणी मोठमोठ्या जत्रा भरतात. संत गोन्सालो गार्सिया हे भारतातील पहिले ख्रिस्ती संत होत. एखाद्या व्यक्तीला हा संतपदाचा सर्वोच्च सन्मान कसा प्राप्त होतो? या संदर्भात सदर नोंदीत ऊहापोह करण्यात आले आहे.
असा एक समज प्रचलित आहे की, संत कोण हे व्हॅटिकन ठरविते. उलटपक्षी, कोट्यवधी ख्रिस्तीजनांतून संत कोण हे व्हॅटिकन फक्त निवडत असते. एखाद्याला ‘संत’ ठरविण्याची अथवा संतत्व बहाल करण्याची प्रक्रिया अतिशय लांबलचक, किचकट, सावधानतेची; परंतु तितकीच सुविहित आहे. या प्रक्रियेची पाळेमुळे प्रारंभीच्या ख्रिस्ती जनसमूहात सापडतात. त्या काळी ख्रिस्तासाठी प्राणार्पण केलेल्यांचा ख्रिस्तसभा सन्मान करीत असे.
संत पॉल यांनी समकालीन सर्व ख्रिस्ती व्यक्तींना ‘ख्रिस्ताच्या नावाने परमेश्वराच्या व मानवाच्या सेवेला वाहून घेणारे’ म्हणून संत असे संबोधिले. यामागे त्यांचा उद्देश ख्रिस्ताच्या अनुयायांनी संताला शोभेल असे वागावे, हा होता. अर्थातच आरंभी ‘संत’ ही संज्ञा ख्रिस्ती समुदायाला उद्देशून वापरण्यास सुरुवात झाली. नंतर येशू ख्रिस्त यांच्यावरील त्यांच्या विश्वासासाठी ज्या व्यक्तींना छळ सोसावा लागला आणि हौतात्म्य पतकरावे लागले, तसेच ज्यांचे चारित्र्य संपूर्णपणे पवित्र असल्याचा त्यांच्या अनुयायांना अनुभव आला, अशा व्यक्तींना अनुलक्षूनही, बहुधा त्यांच्या मृत्यूनंतर, ख्रिस्ती चर्चने ही संज्ञा त्यांना विधिपूर्वक बहाल करण्यास सुरुवात केली.
संत उदलरिकस या संताची सर्वांत प्रथम अधिकृत नोंद केलेली आढळते. त्या वेळी बेनेडिक्ट सहावे हे पोप होते. त्यानंतर १५८८ मध्ये पोप सिक्सट्स पाचवे यांनी संतीकरणाचे कार्य पाहण्यासाठी व्हॅटिकनला एक आयोग स्थापन केला. संतीकरणाच्या प्रक्रियेतील सर्वांत प्रथम पायरी म्हणजे त्या व्यक्तीची जनप्रियता, पावित्र्य अन् शुचितेसाठी ती व्यक्ती प्रसिद्ध आहे का, लोकांना ती प्रार्थनीय वाटते का याचा स्थानिक बिशप आढावा घेतात व नंतरच संतीकरणाची प्रक्रिया चालू करतात.
व्यक्ती सच्छील व विशेष पवित्र जीवन जगलेली असेल व ती व्यक्ती निवर्तून पाच वर्षे उलटली असतील, तर मग बिशप त्या व्यक्तीचा अनुभव असलेल्या साक्षीदारांच्या साक्षी गोळा करतात. त्या व्यक्तीचे गुणदोष दाखविणाऱ्या कागदपत्रांचीही जमवाजमव करण्यात येते व त्या व्यक्तीचे सविस्तर अन् अचूक जीवनचरित्र तयार केले जाते.
हे लांबलचक काम स्थानिक पातळीवर पूर्ण झाल्यावर ती सर्व माहिती व्हॅटिकनकडे पाठविली जाते. व्हॅटिकनमध्ये त्या व्यक्तीच्या अप्रतिम कार्याचा, लोकसेवेचा, चमत्काराचा, आत्मबलिदानाचा अभ्यास केला जातो. हे सर्व कागदपत्र लाल पुठ्ठ्याच्या वेष्टणात बांधले जातात. काही वेळेस शेकडो, हजारो पानांचे ते खंड असतात. सर्वप्रथम ती व्यक्ती लोकांनी अनुकरण करावे अशा ख्रिस्ती मूल्यांचे आचरण करीत होती का, याचा आढावा घेतला जातो. या पाहणीचे निष्कर्ष होकारार्थी आले, तर मग त्या व्यक्तीला ‘वंदनीय’ असे जाहीर केले जाते. त्यांनतरची पायरी म्हणजे वेदीचा मान. संतपदाच्या आधीची ही पायरी प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीच्या नावे ख्रिस्तसभेला मान्य असा एकतरी चमत्कार झालेला असणे आवश्यक असते.
मात्र येशू ख्रिस्त यांवरील श्रद्धेपोटी एखाद्या व्यक्तीला ठार मारले गेले असेल, तर कोणत्याही चमत्काराशिवाय त्या व्यक्तीला हुतात्मा म्हणून जाहीर केले जाते व रक्तसाक्षी म्हणून वेदीचा मान दिला जातो. उदा., ज्यू धर्मातून ख्रिस्ती धर्मात आलेल्या एडिथ स्टाईन या जोगिणीला नाझींनी ठार मारले होते. तिला हुतात्मा म्हणून वेदीचा बहुमान दिलेला आहे. या पुढची पायरी म्हणजे त्या व्यक्तीला वेदीचा मान मिळाल्यानंतर तिच्या नावे एकतरी चमत्कार झाला असला पाहिजे व तो ख्रिस्तसभेच्या नियमानुसार ‘चमत्कार’ म्हणून सिद्ध झाला असला पाहिजे.
पूर्वी व्हॅटिकन या संतीकरणाच्या प्रक्रियेत ‘सैतानाचे वकील’ (The Devils Advocate) म्हणून एका पक्षकाराची नेमणूक करून त्या व्यक्तीच्या जीवनाची विरुद्ध बाजू उजेडात आणण्याचा प्रयत्न करी; परंतु आता ही पद्धत बंद करण्यात आली असून ‘हिस्टॉरिकल क्रिटिकल थेअरी’ या पद्धतीचा अवलंब करून संबंधित पुराव्यांचे विश्लेषण व छाननी केली जाते.
त्या व्यक्तीची माहिती देणारे कोणी साक्षीदार हयात नसतील, तर इतिहासतज्ज्ञांच्या एका समितीद्वारे सर्व माहितीचा पडताळा घेतला जाते. त्यानंतर नेमलेली एक समिती पुराव्यांचा अभ्यास करते व ती व्यक्ती ख्रिस्ती तत्त्वानुसार जीवन जगली होती की तिच्या श्रद्धेमुळे द्वेषाने तिचे प्राण घेण्यात आले, हे ठरविते. हे झाल्यानंतर कार्डिनल्स व बिशप या वरिष्ठ धर्माधिकाऱ्यांची एक समिती या साऱ्या प्रकरणाचा पुनर्विचार करते. या दीर्घ प्रक्रियेत उद्भविणाऱ्या विविध वादग्रस्त मुद्द्यांवर पोपचा निर्णय हा अखेरचा असतो. चमत्काराने रोगमुक्ती झाल्याच्या प्रकरणात नेहमीची प्रक्रिया होण्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचे एक मंडळ त्या चमत्काराचा अभ्यास करून ती रोगमुक्ती ‘ताबडतोब झालेली, कायमची अन् आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने स्पष्टीकरण न होणारी’ आहे का, याची खात्री करून घेते. संतीकरणाच्या प्रक्रियेतील ही अंतिम पायरी आहे. या वेळी रोममध्ये राहणारे कार्डिनल्स व बिशप एकत्र येऊन चर्चाविनिमय करतात व ते प्रकरण पोपकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवितात.
पवित्र वेदीचा मान मिळालेल्या व्यक्तींना उपासनाविधीचा सन्मान काही मर्यादित बाबतींत प्राप्त होतो. उदा., त्यांच्या विशिष्ट संघाला (Order) किंवा त्यांच्या देशात त्यांच्या सन्मानार्थ मिस्साबली अर्पण करता येतो.
संतीकरणानंतर त्या व्यक्तीला उपासनाविधीचा वैश्विक सन्मान प्राप्त होतो; कारण आता ती व्यक्ती स्वर्गात आहे व सर्व सन्मानास पात्र आहे, याची पूर्ण खात्री ख्रिस्तसभेने अखिल जगातील श्रद्धावंतांस दिलेली असते.
ही प्रक्रिया पूर्ण होण्यास कित्येकदा काही दशकांचा कालावधी लागतो. साहजिकच इतक्या वर्षांच्या कठोर अग्निपरीक्षेनंतर कसोटीस उतरलेल्या त्या व्यक्तीस संतपदाचा मान मिळणे, ही साऱ्या ख्रिस्ती विश्वाला मिळालेली मोठी देणगीच असते.
संत हे कोणी आकाशातून अवतरत नाहीत. तेही आपल्यासारखे हाडामांसाचे मानव असतात. फरक इतकाच की, ख्रिस्ती श्रद्धा, मूल्ये व विश्वास यांचा त्यांनी आपल्या जीवनात पुरेपूर अंगीकार केलेला असतो आणि हे करताना प्रसंगी प्राणाचीही बाजी लावून आपल्या श्रद्धेची पाठराखण केलेली असते. ख्रिस्ताचे अनुकरण करीत त्यांनी आयुष्यात कालवारीचा डोंगर सर केलेला असतो. म्हणूनच हे संत साऱ्या जगाला वंदनीय वाटतात. त्यांचे विचार कोणत्याही देशात, कोणत्याही काळात प्रेरणादायी ठरतात.
थोडक्यात, चारचौघे एकत्र येऊन ‘संत’ म्हणून मानवंदना देतात म्हणून कॅथलिक परंपरेप्रमाणे एखादी व्यक्ती संत ठरत नसून त्या व्यक्तीला ती उपाधी अधिकृत रीत्या चर्चच्या अत्युच्च पदाधिकाऱ्यांनी दिलेली असली पाहिजे व त्यावर शिक्कामोर्तब झाला असला पाहिजे.
संदर्भ :
- Glarier, Michael ; Helwiig, Monika, The Modern Catholic Encyclopedia, Bangluru, 1994.
- वाझ, फिलीप, संपा., कॅथलिक ख्रिस्तसभेचा नवा श्रद्धाग्रंथ, वसई, १९९८.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया