भारतीय कॅथलिक बिशपांची परिषद (Catholic Bishops’ Conference of India) ही एक कायमस्वरूपी संघटना असून भारतातील सर्व कॅथलिक बिशप या संघटनेचे कायदेशीर सभासद असतात. बिशपांची नेमणूक पोपमहोदय ठरावीक पद्धतीने करतात व ते बिशप पारंपरिक रीत्या चालत आलेल्या चर्चचे धार्मिक अधिकारी बनतात. या परिषदेची स्थापना १९४४ साली मद्रास (चेन्नई) येथे भारतातील सरधर्मप्रांतांच्या आर्चबिशपांच्या सभेद्वारे झाली. १९६२ पर्यंत या संघटनेचा मध्यवर्ती कारभार बेंगळुरू येथून होत होता व तदनंतर तो नवी दिल्ली येथे हलविण्यात आला. अशा बिशपांच्या राष्ट्रीय संघटना वैश्विक चर्चच्या रचनेत अधिकृत रीत्या मोडतात. म्हणून या संघटनेचे मूळ व्यापक संदर्भात शोधणे महत्त्वाचे ठरते.
जगातील सर्व कॅथलिक बिशप एकमेकांशी परस्परसंबंधाने गुंफले गेले आहेत. हे परस्परसंबंध फक्त मानवी आणि औपचारिक स्वरूपाचेच नसतात, तर त्या संबंधांच्या मुळाशी चर्चची मूलभूत दैवी शिकवण ध्यानात घेतलेली असते. प्रभू येशू ख्रिस्त यांनी एकच एक चर्च स्थापित केले. जगात विखुरलेल्या सर्व स्थानिक चर्चमध्ये त्या एकच एक चर्चचा समावेश असतो. निरनिराळ्या स्थळी, निरनिराळ्या संस्कृतीत, मातीत आणि परिस्थितीत रुजलेले हे चर्च स्वयंसिद्धपूर्ण असते व तसे ते जगते. त्या स्थानिक चर्चमध्ये संपूर्ण एकच एक चर्च वसते. संत पीटर हे बारा प्रेषितांपैकी येशू ख्रिस्त यांनी जाणीवपूर्वक निवडलेले नेते होत. इतर प्रेषितांना एकोप्यात ठेवण्याची मुख्य जबाबदारी येशू ख्रिस्त यांच्याकडून त्यांच्यावर सोपविली गेली, म्हणून रोमचे बिशप म्हणून संत पीटर यांचे वारस त्या ऐक्याचा पाया गणले जातात. संत पीटर हे पहिले पोप मानले जातात. आजपर्यंत झालेले २६६ पोप संत पीटर यांचे वारस म्हणून समजले जातात. या रोमच्या बिशपांमुळेच (पोप) चर्चमधील वैश्विक एकोपा टिकून आहे; त्यांच्यामुळे ते ऐक्य वाढते व बळकट होत राहते. प्रत्येक बिशपांची नेमणूक स्थानिक चर्चचे अत्युच्च धार्मिक अधिकारी म्हणून झाली असली, तरी ते त्याचवेळी पोपमहोदयांबरोबर व त्यांच्या आधिपत्याखाली असतात; म्हणून मग ते जगातील इतर बिशपांच्या परस्परसंबंधात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असतात. प्रत्येक बिशप आपल्या स्वाधीन केलेल्या स्थानिक चर्चचे ऐक्य टिकवून धरण्यास, ते बळकट करण्यास व वाढविण्यास कारण ठरावेत, ही आज्ञा त्यांना असते. अशाप्रकारे संपूर्ण वैश्विक चर्चमध्ये व स्थानिक चर्चमध्ये घनिष्ठ व अंतर्गत संबंध चालू राहतो; तो संबंध एक दुसऱ्याविना असू शकत नाही. किंबहुना, एक दुसऱ्याला जगविण्यास कारणीभूत ठरतो.
स्थानिक चर्चचे बेरीज किंवा गुणाकार करून मिळालेले उत्तर म्हणजे वैश्विक चर्च नव्हे. जशी वैश्विक चर्चमध्ये स्थानिक चर्चेस, तसे स्थानिक चर्चेसमध्ये एकमेव वैश्विक चर्च. नियंत्रण व तिच्यावर अधिकार चालविणारे बिशप हे त्याचवेळी पोपमहोदयांच्या आधिपत्याखाली, पोपमहोदयांबरोबर व जगातील सर्व बिशपांसमवेत घनिष्ट एकोप्याने दिलेले कार्य करतात.
पोपमहोदय म्हणजे बिशपांच्या वरचे बिशप (Super Bishop) नव्हेत. पोपमहोदय रोमचे बिशप व येशू ख्रिस्त यांच्या योजनेप्रमाणे चर्चची रचना मूळ सुरुवातीच्या बारा प्रेषितांवर आधारित केली आहे. जसे संत पीटर प्रेषितांमध्ये, तसे पोपमहोदय सर्व बिशपांमध्ये गणले जातात. संत पीटर इतर शिष्यांसमान होते; पण विशिष्ट जबाबदारीने ते सर्व शिष्यांचे नेते होते.
परंपरेनुसार पोपमहोदयांना ‘रोमन पॉन्टिफ’ हा किताब बहाल करण्यात आला आहे. लॅटिनमधल्या ‘पोन्स’ (पूल) या शब्दातून ‘पॉन्टिफ’ म्हणजे पूल बांधणारा, सर्वांना ऐक्यात जोडणारा व ठेवणारा असा शब्द तयार होतो. येशू ख्रिस्त यांनी बाराही प्रेषितांना दिलेला अधिकार एकच आहे. तो एकच अधिकार संत पीटर यांच्या हाती (एकाच्या हाती) सुपूर्द करून इतर सर्वांना एकत्र मिळून दिला गेला आहे. या अत्युच्च अधिकारामुळे पोपमहोदयांना ‘सुप्रीम पॉन्टिफ’ म्हणून गणले जाते. पूल बांधणे ही जबाबदारी सर्व बिशपांची आहे, म्हणून स्थानिक बिशपांच्या हाती स्वाधीन केलेल्या स्थानिक चर्चचा कारभार पाहताना प्रत्येक बिशप उपरनिर्दिष्ट सत्य विसरू शकत नाहीत. प्रत्येक बिशपांनी स्वत:च्या स्थानिक चर्चचा विचार करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी त्यांनी नेहमी पोपमहोदयांच्याबरोबर व त्यांच्या आधिपत्याखाली राहणे आवश्यक आहे. म्हणून हे ऐक्य अधिक अर्थपूर्ण व बळकट करण्यासाठी सर्व बिशपांनी एकमेकांच्या परस्परसंबंधात राहून एकमेकांना आध्यात्मिक, आर्थिक आणि नीतिधैर्याचे सहकार्य दिले पाहिजे. अशाप्रकारचे सहकार्य खंड, राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक पातळ्यांवर अतिसमयोचित ठरते. या मूळातूनच भारतीय पातळीवर ‘भारतीय कॅथलिक बिशपांची परिषद’ अमलात आली आहे.
भारतीय कॅथलिक चर्च जरी २.५ टक्के घटकांचे बनले असले, तरी संपूर्ण चर्च संघटितपणे भारतमातेसाठी एका ध्येयाने (with common interest) चांगले नागरिक घडविण्याचे प्रयत्न करते. सर्व नागरिकांमध्ये सहिष्णुतेचे, सौख्याचे व मैत्रीचे संबंध बांधते; आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रांत सेवेद्वारे अनेक उपक्रम राबविते; देशाच्या प्रगतीत भर पडावी म्हणून नवीन पिढी घडविते; देशाच्या घटनेला धरून व त्या घटनेच्या मर्यादा राखून कॅथलिक चर्चची अस्मिता रुजवून, टिकवून व व्यापक करून सर्व कॅथलिकांना देशाचा रास्त अभिमान बाळगावयास शिकविते. भारतातील सर्व कॅथलिक बिशप एकमेकांच्या ऐक्यात आणि बंधुत्वाच्या नात्याने त्यांना दिलेले पवित्र कार्य देशातील सर्वांच्या उत्कर्षासाठी पुढे नेण्यासाठी झटतात. सांप्रत काळाची चिन्हे ओळखून व हल्लीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो प्रतिसाद शोधण्यात व कृतीत आणण्यास बिशपांची संघटना नेहमी सज्ज राहते.
संपूर्ण भारतात १७४ धर्मप्रांत (Dioceses) आहेत. पैकी ३१ सिरो-मलबार चर्चचे, ११ सिरो-मलंकार चर्चचे व १३२ लॅटिन किंवा रोमन चर्चचे धर्मप्रांत आहेत. ३० विभाग पाडून (इक्लेझिॲस्टिकल प्रॉव्हिन्स) प्रत्येक विभाग ‘महानगरीय प्रमुखा’च्या (आर्चबिशप) आधिपत्याखाली येतो. उदा., मुंबई सरधर्मप्रांतामध्ये पुणे, नाशिक, कल्याण, खडकी आणि वसई हे धर्मप्रांत सामावितात; नागपूर सरधर्मप्रांतामध्ये अमरावती, औरंगाबाद आणि चंद्रपूर (चांदा) हे धर्मप्रांत येतात. ही तरतूद फक्त संघटित राहून सर्वांनी सक्रिय योगदान देत राहण्यासाठी आहे. मुंबई सरधर्मप्रांताच्या बिशपांना इतर धर्मप्रांतावर तसा काहीही अधिकार गाजविता येत नाही. प्रत्येक धर्मप्रांताचा प्रत्येक बिशपांकडून पोपबरोबर व पोपच्या आधिपत्याखाली कारभार पार पाडला जातो. व्यावहारिक स्वरूपी असे विभाग परिणामकारक रीत्या संघटित राहण्यासाठी व दिलेले कार्य जोमाने व एकजुटीने पार पाडण्यासाठी खूपच लाभदायक ठरतात.
संपूर्ण भारतीय बिशपांची परिषद १४ प्रादेशिक गटांत वाटून संघटनेला तळागाळात सक्रिय व सतर्क ठेवते. प्रत्येक प्रादेशिक गट सर्वसाधारणपणे सांस्कृतिक, आर्थिक व भौगोलिकदृष्ट्या एकजिनसी स्वभावाचा असतो. संपूर्ण संघटना एक सामान्य विषय घेते. उदा., १४ प्रादेशिक गटांच्या विभागणीमुळे एखादा विषय संपूर्ण देशभरात राबविण्यासाठी संघटनेची कार्यक्षमता वाढते. प्रत्येक प्रादेशिक गटात तेथील सर्व बिशप एका परिषदेद्वारे संघटित रीत्या काम करतात. वर्षातून दोन वेळा, दोन-तीन दिवस एकत्र भेटून त्या प्रादेशिक गटांतील धर्मप्रांतांना उजाळा व प्रोत्साहन प्रादेशिक गटांतील बिशप्स देतात.
वर उल्लेखिल्याप्रमाणे संपूर्ण भारतीय बिशपांची परिषद तीन मुख्य चर्चेसची बनली आहे. सिरो-मलबार, सिरो-मलंकार आणि लॅटिन. १९८७ पासून तिन्ही चर्चेस आपापल्या हक्कानुसार आणि आपापल्या चर्च कायद्यानुसार आपला कारभार पोपमहोदयांबरोबर व पोपमहोदयांच्या आधिपत्याखाली स्वतंत्र रीत्या चालवितात. तिन्ही चर्चेसच्या अधिकृत रीत्या स्वतंत्र परिषदा किंवा धर्मसभा (Synod) आहेत. उदा., सीबीसीआय, एसएमबीएस, इएसएमसी.
सीबीसीआय ही एका दृष्टीने भारतीय जनतेला बघावयास मिळणारा जणू कॅथलिक चर्चचा चेहरा आहे. जेव्हा तिन्ही चर्चच्या बाबतीत भारत राष्ट्रबांधणीसाठी घेतलेला उपक्रम किंवा निर्माण झालेला एखादा प्रश्न किंवा पेचप्रसंग सोडविण्यासाठी किंवा तिन्ही चर्चेसने सामान्य मार्गाने एखादी तिन्ही चर्चेसना वाटणारी बाब भारत सरकारकडे चर्चेसाठी न्यायची असेल, तर सीबीसीआय खूप महत्त्वाची ठरते. उदा., भारत हा बहुसंस्कृतीचा व बहुधर्मीय लोकांचा देश आहे. सर्वधर्मीयांशी सहिष्णूतेने, मैत्रीने राहून व देशबांधणीसाठी विधायक कार्य करण्यासाठी तिन्ही कॅथलिक चर्चेस इतर धर्मीयांबरोबर देशाला प्रगत, मोठे आणि भक्कम राष्ट्र बनविण्यासाठी सहकार्य करतात. तिन्ही कॅथलिक चर्चेसमध्ये बंधुत्वाचे, ऐक्याचे व एकजूटीचे संबंध ठेवण्यासाठी सीबीसीआय खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकते. ते सीबीसीआयचे आद्य व पवित्र कर्तव्य ठरते.
दर दोन वर्षांनी एकदा संपूर्ण सीबीसीआयचे सभासद सर्वसाधारण सभेसाठी एकत्र जमतात. त्याव्यतिरिक्त ३० विभागीय आर्चबिशप्स, त्याचप्रमाणे ११ कमिशनचे दोन वर्षांकरिता निवडलेले अध्यक्ष व काही विशिष्ट संस्थांचे कार्यभार वाहणारे यांची रचलेली समिती प्रतीवर्षी दोन वेळा भेटते व नित्याचा कारभार पुढे नेण्यासाठी तातडीने निर्णय घेते. संपूर्ण सीबीसीआयसाठी गुप्त मतदानाने अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष व एक महासचिव यांची दोन वर्षांसाठी निवड होते. ही पदे अधिक दोन वर्षांसाठी पुन्हा नियमित करण्याची तरतूद संघटनेच्या घटनेत केली आहे. मात्र चार वर्षांनी पद बदलणे अनिवार्य ठरते.
संदर्भ :
- Benny, Fr. Aguiar, Ed., The Catholic Directory of India, Bengaluru, 2011.
- Dias, Fr. Mario Saturnino, Ed., Evangelization in the light of Ecclesia In Asia, Bangalore, 2003.
- Flanery, Austin, Vatican Council II : More Post Conciliar Documents, Vol. 2, Mumbai, 2014.
- Soares, Aloysius, Catholic Church in India, Nagpur, 1964.
- https://www.cbci.in/
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया