झोरोॲस्टर (ग्रीक उच्चार) : पारशी (जरथुश्त्री) धर्माचा संस्थापक. झरथुष्ट्राच्या कालखंडाविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. तथापि अवेस्ता या धर्मग्रंथाच्या आधुनिक संशोधनावरून त्याचा काळ इ.स.पू. ६५० च्या सुमारास असावा, असे यूरोपीय विद्वान मानतात; तर काही प्राचीन ग्रीक लेखक त्याचा काळ इ.स.पू. सु. ६२०० किंवा त्या आधीचा गृहीत धरतात. अवेस्तातील ‘गाथा’ नावाचा अध्यात्मविद्यासंपन्न जो मंत्रविभाग आहे, तो ऋग्वेदातील ‘सूक्तां’च्या समकालीन असल्याचा अभिप्राय अनेक विद्वानांनी व्यक्त केला आहे. या गाथांचा झरथुष्ट्र उद्गाता आहे. त्यामुळे गाथांचा व झरथुष्ट्राचा काळ ऋग्वेदसंहिते इतका प्राचीन असल्याचे गृहीत धरले जाते. म्हणजे झरथुष्ट्राचा काळ इ.स.पू. १५०० असा ठरतो.

झरथुष्ट्र

झरथुष्ट्राचा जन्म पोउरुषस्प आणि दोग्धो (दोग्धोवा) या दांपत्यापोटी इराणच्या वायव्येस असणाऱ्या आझरबैजान प्रांतातील रे नावाच्या गावी फखरदिन महिन्यातील खोददिच्या दिवशी (पारशी नूतन वर्षदिन) झाला, ही पारंपरिक माहिती सर्वमान्य आहे. त्याच्या वैवाहिक जीवनाविषयीही फारशी प्रमाणभूत माहिती उपलब्ध नाही; तथापि तो गृहस्थाश्रमी होता आणि त्याच्या पत्नीचे नाव ‘हवोवी’ होते, असे अवेस्ता ग्रंथांतर्गत उल्लेखावरून दिसते. ‘गाथा’- यस्न २९.१ मध्ये असे म्हटले आहे की, ‘भूमातेच्या आत्म्याने (गँउश् उर्वा) आक्रंदन करून परमेश्वराकडे अशी तक्रार केली की, पृथ्वीवर पाप व अनीती प्रसृत झाली असून ह्या विनाशापासून सृष्टीचे रक्षण करण्यासाठी कोणीतरी त्राता, मुक्तिदाता पाहिजे. हे परमेश्वरा (अहुर मज्दा) तुझ्याविना आता दुसरा कुणीच नाही.’ झरथुष्ट्राच्या पूर्वी इराणी प्रजेत अंधाधुंदी असून भोळसट धार्मिक कल्पना व अंधश्रद्धामूलक तामसी विचारांना ऊत आला होता. धर्माच्या नावाखाली अधर्माचे प्राबल्य माजले होते. पुरोहित वर्गाचाच आमजनतेवर पगडा बसला होता. इराणी जनतेचे अध:पतन झाले होते. अशा वेळी झरथुष्ट्राला पुरोहितवर्गाचा विरोध सहन करून सद्धर्माचे बीजारोपण करावयाचे होते. त्यामुळे त्याचा छळ झाला, तरीही त्याने आपले व्रत सोडले नाही. इराणी प्रजेस एकेश्वरवादाची शिकवण दिली; सदाचार, सुविचार आणि सत्कृती यांचे पालन करण्याची प्रेरणा दिली. त्याने अहुर मज्द हाच सर्व शक्तिमान परमेश्वर मानला आणि त्यापासून ज्ञान व प्रेरणा घेण्यासाठी आरंभीची काही वर्षे आत्मचिंतनात व्यतीत केली. त्याची कृपा संपादन करून त्याने आत्मोद्धार साधला आणि दैवी प्रेरणेनुसार लोकोद्धाराच्या कार्यास प्रारंभ केला. त्याचे विचार ‘गाथा’ रूपात अवेस्तात आढळतात.

‘गाथा’- यस्न ४४ वरून हे स्पष्ट होते की, सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाल्यावर लोकांना आपल्या नव्या धर्माचा उपदेश करण्याची पात्रता अंगी आल्याचा आत्मविश्वास झरथुष्ट्रास वाटू लागला. मनुष्यमात्रास आत्मनिर्भर होण्यास त्याने शिकविले. अहिंसेची तत्त्वे आचरणात आणावीत म्हणून तो प्रयत्नशील होता. ईश्वरावर अढळ निष्ठा ठेऊन तो आपले विहित कार्य करीत होता. गाथोत्तर रचलेल्या अवेस्ता धर्मग्रंथात सद्विचार, सदुक्ती आणि सत्कृती याचे अधिष्ठान असलेला सत्पुरुष आद्यमानव अशी त्याची स्तुती आहे. झरथुष्ट्राच्या उपदेशाने अंतर्बाह्य निर्मल व निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा इराणी लोकांना मिळाली व त्यामुळे त्यांना उत्कर्ष व प्रगतीचा मार्ग दिसला. अवेस्तानंतरच्या पारशी साहित्यात त्याचा दिव्य जीवनाविषयी आख्यायिका प्रसृत झाल्या. त्यात त्याच्या अद्भूत चमत्कारांचेही वर्णणे आढळते.

झरथुष्ट्राने धर्मचिंतनाबरोबरच समाजसुधारणेचाही विचार केला होता. त्यानुसार त्याने समाजाला कृषी व पशुपालन यांचेही महत्त्व पटवून दिले. अवेस्तात त्याच्या निधनाचा उल्लेख नाही; पण पेहलवी ग्रंथात त्याचा मृत्यू एका अग्निमंदिरात (अग्यारीत) तुरबरातूर नावाच्या एका नराधमाच्या हातून झाला, असा उल्लेख आहे.

संदर्भ :

  • Boyce, Mary, Zoroastrians : Their Religious Beliefs and Practices, London, 1979.
  • जोशी, महादेवशास्त्री, भारतीय संस्कृतिकोश – खंड ३, पुणे, १९९९.

समीक्षक – डॉ. सिंधू डांगे

प्रतिक्रिया व्यक्त करा