(मरीन इकोसिस्टम). पृथ्वीवरील जलीय परिसंस्थांपैकी सर्वांत विशाल परिसंस्था. सागरी परिसंस्थांतील पाण्यात उच्च प्रमाणात क्षार असल्याने अन्य जलीय परिसंस्थांपेक्षा त्या वेगळ्या असतात; गोड्या पाण्याच्या परिसंस्थांमध्ये क्षार कमी प्रमाणात असतात. पृथ्वीचा सु. ७०% पेक्षा जास्त पृष्ठभाग समुद्राने व्यापलेला आहे आणि पृथ्वीवर सु. ९७% पेक्षा पाणीपुरवठा समुद्राच्या पाण्यापासून होतो (पाहा : जलस्थित्यंतर चक्र) आणि समुद्रामुळे पृथ्वीवर सु. ९०% अधिवासाचे क्षेत्र उपलब्ध होते. सागरी परिसंस्थांमध्ये समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसंस्था जसे खाजण, ओहोटी-मैदान, समुद्री गवतांची कुरणे, खारफुटी, खाडी, खारकच्छ, खडकाळ समुद्रकिनारे, प्रवाळ बेटे इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यापासून दूर असलेल्या परिसंस्था जसे समुद्राचा पृष्ठभाग, खोल समुद्र, समुद्रातील उष्णजलीय निर्गममार्ग आणि समुद्रतळ या भागांतील परिसंस्थांचा समावेश होतो. प्रत्येक सागरी परिसंस्थेशी सजीवांचे विशिष्ट समूह आणि या समूहांचे भौतिक पर्यावरण निगडित असते. असे समूह व त्यांचे पर्यावरण ही त्या परिसंस्थेची ओळख असते.
खाजण : समुद्रापासून जमिनीपर्यंत जेथे गोडे पाणी आणि खारे पाणी एकत्र येते, तेथे खाऱ्या दलदलीचे म्हणजे खाजण प्रदेश असतात. खाजणाची मृदा चिखल आणि दलदलीच्या ठिकाणी ऑक्सिजनच्या अभावी मृत वनस्पतींचे अवशेष पूर्णपणे न कुजता शिल्लक राहिलेला कार्बनयुक्त जळाऊ भाग म्हणजेच पीट यांनी बनलेली असते. या स्थितीत खाजणात अशा जीवाणूंची वाढ होते की, त्यांच्यामुळे खाजणामध्ये कुजलेल्या अंड्यासारखा (गंधकासारखा) विशिष्ट वास येतो. जगात सर्वत्र खाजण प्रदेश आढळतात. हे प्रदेश भोवतालचा भाग आणि त्याची अर्थव्यवस्था निकोप राहण्याकरिता आवश्यक असतात. खाजण परिसंस्था अत्यंत उत्पादक असून जवळजवळ ७५% माशांच्या जातींच्या अस्तित्वासाठी आवश्यक सेवा पुरवतात आणि समुद्रकिनाऱ्यांचे धूप व पूर यांपासून संरक्षण करतात. जास्त दलदलीचा प्रदेश, कमी दलदलीचा प्रदेश आणि उच्चभूमी किनारा असे खाजणांचे भाग करतात. खाजणाचा जास्त दलदलीचा प्रदेश हा समुद्रालगत असतो आणि ओहोटीचा काही वेळ वगळता, पाण्याखाली असतो. कमी दलदलीचा प्रदेश हा जास्त दलदलीचा प्रदेश आणि उच्चभूमी किनारा यांच्या मध्ये असतो आणि नेहमीपेक्षा मोठी भरती येते, तेव्हा हा भाग पाण्याखाली जातो. उच्चभूमी किनारा हा दलदलीचा गोड्या पाण्याचा भाग असतो आणि कमी दलदलीच्या प्रदेशापेक्षा थोड्या उंचीवर असतो. हवामानात टोकाचे बदल झाले तरच या भागात पाणी साचते. हा भाग दलदलीच्या अन्य भागांपेक्षा कमी पाणथळ असल्याने येथे वनस्पती वाढू शकतात.
खारफुटी : उष्ण तसेच उपोष्ण प्रदेशांत सागरी किनाऱ्यालगतच्या कमी-ऑक्सिजनयुक्त जमिनीत वाढणाऱ्या वृक्षांना, झुडपांना खारफुटी म्हणतात. खारफुटी देखील महत्त्वाच्या उत्पादक आणि गुंतागुतीच्या परिसंस्था असून जमीन व समुद्र यांना जोडतात. खारफुटींमध्ये वनस्पतींच्या अशा जाती असतात, ज्यांचा एकमेकांशी संबंध असतो, असे नाही आणि ज्यांचा केवळ वरून दिसणारा सारखेपणा, जनुकीय सारखेपणा नव्हे, लक्षात घेऊन त्यांचा एकाच गटात समावेश केलेला असतो. खारफुटींची वने समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असल्याने या वनस्पतींमध्ये क्षारयुक्त व कमी-ऑक्सिजनयुक्त पाण्यात जगण्यासाठी, क्षार उत्सर्जन आणि वातवीय मुळांद्वारे श्वसन या प्रकारचे अनुकूलन घडून आलेले असते. खारफुटी प्रदेशांतील वनस्पतींची मुळे दाट वाढून त्यांची गुंतागुंत झालेली असते आणि या मुळांद्वारे वादळ, प्रवाह, तरंग, भरती-ओहोटी यांपासून जमिनीची धूप रोखली जाते. खारफुटी परिसंस्था सजीवांच्या अनेक जातींसाठी अन्नाचा स्रोत म्हणून उपयोगी पडतात. तसेच त्या वातावरणातील कार्बन डायऑक्साइड साठवून ठेवत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात.
ओहोटी-मैदाने : सामान्यपणे ओहोटी-मैदाने ओहोटी आल्यावर मैदानांसारखी खुली होतात, तर मोठी भरती आली की पाण्याखाली बुडतात. ओहोटी-मैदानांचे चार प्रकार केले जातात आणि प्रत्येक प्रकारचे ठळक वैशिष्ट्य असून तेथे विशिष्ट वन्य जीव आढळून येतात; त्यांना फवारणी प्रदेश, उंच ओहोटी-मैदाने, मध्य ओहोटी-मैदाने आणि निम्न ओहोटी-मैदाने अशी नावे आहेत. फवारणी प्रदेश हा ओलसर असून जेव्हा मोठी भरती किंवा वादळ येते, तेव्हाच येथे पाणी भरते. उंच ओहोटी-मैदानी प्रदेशात फक्त मोठी भरती येते, तेव्हा पाणी भरते आणि दोन मोठ्या भरत्या वगळता तो भाग दीर्घकाळ कोरडा असतो. या प्रदेशात मोठे पारिस्थितिक बदल होत असल्याने त्या बदलांमध्ये टिकून राहणारे वन्य जीव तेथे राहतात. उदा., बार्नेकल, सागरी गोगलगाई, कालवे, हर्मिट खेकडे इत्यादी. मध्य ओहोटी-मैदानी प्रदेशात दिवसांतून दोन वेळा पाणी भरते आणि येथे वन्य जीवांची विविधता आढळते. निम्न ओहोटी-मैदानी प्रदेश, नीचतम ओहोटी वगळता जवळजवळ सर्वकाळ पाण्याखाली असतो आणि पाण्यामुळे संरक्षण मिळत असल्याने येथे मुबलक वन्य जीव असतात.
खाडी : नदी जेथे समुद्राला मिळते, तेथे खाडी किंवा नदीमुख तयार होते. खाडीमध्ये समुद्राचे खारे पाणी आणि लगतचे गोडे पाणी एकत्र येऊन पाण्याच्या क्षारतेत लक्षणीय बदल दिसून येतात. समुद्राचे खारट आणि नदीचे गोडे पाणी यांचे मचूळ मिश्रण असलेल्या पाण्यामुळे खाड्यांतील वन्य जीवन हे अनन्य असते. खाड्या गोड्या पाण्याच्याही असू शकतात; जसे, अमेरिका आणि कॅनडा यांच्या सीमेवरील महासरोवरे (ग्रेट लेक्स) समुद्रासारखीच असली, तरी ती गोड्या पाण्याचीच आहेत. या सरोवरांना नद्या जेथे मिळतात, तेथे गोड्या पाण्याच्या खाड्या तयार झाल्या आहेत. खाडी ही एक अत्यंत उत्पादक परिसंस्था असून अनेक माणसे आणि प्राणी या परिसंस्थेवर अवलंबून असतात. जगातील सु. ३२ मोठ्या शहरांपैकी २२ शहरे वसलेली आहेत, याचे कारण खाड्यांचे अनेक पर्यावरणीय आणि आर्थिक फायदे आहेत. जसे, खाड्या सजीवांच्या अनेक जातींना योग्य अधिवास पुरवतात आणि सागरकिनारी राहणाऱ्या अनेक समुदायांसाठी आर्थिक केंद्रे ठरतात. खाड्यांमुळे पाणी गाळले जाते, अधिवासाचे संरक्षण होते, धूप नियंत्रित होते, पोषक घटकांचे वायुनियमित चक्रीभवन होते तसेच शिक्षण, मनोरंजन आणि पर्यटन इ. संधी लोकांना उपलब्ध होतात.
खारकच्छ (लगून) : पाण्याच्या मोठ्या स्रोतापासून, प्रवाळखडक किंवा वाळूच्या दांड्यासारख्या अटकावामुळे, अलग झालेल्या पट्टीला खारकच्छ (लगून) म्हणतात. याचे दोन प्रकार आहेत; किनारी खारकच्छ आणि कंकणद्वीप (ॲटॉल) खारकच्छ. किनारी खारकच्छ हा समुद्रात बंधाऱ्यासारख्या रचनेमुळे वेगळा झालेला पाण्याचा संचय असतो. महासागरी खारकच्छ प्रवाळबेटांच्या वर्तुळाकार रचनेमुळे बनतो किंवा अनेक प्रवाळबेटांनी वेढले गेल्यामुळे बनतो. महासागरी खारकच्छे किनारी खारकच्छांपेक्षा खोल असतात. बहुतेक खारकच्छ अवक्षेपण, बाष्पीभवन, वारा यांचा परिणाम झाल्याने उथळ असतात. क्षारता आणि तापमान यांच्यात बदल होत असल्याने त्यांच्यातील पाणी गोड ते अतिक्षारयुक्त असू शकते. अंटार्क्टिका खंड वगळता, जगातील प्रत्येक समुद्रकिनारी खारकच्छ असतात आणि पक्षी, मासे, खेकडे, प्लवक आणि इतर विविध जातींच्या सजीवांकरिता अधिवास उपलब्ध करून देतात. खारकच्छ परिसंस्था आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असतात; कारण मत्स्योद्योग, पोषक घटकांचे चक्रीभवन, पुरांपासून संरक्षण, पाण्याचे गाळण आणि मानवी परंपरा यांसारख्या पारिस्थितिक सेवा पुरवतात.
प्रवाळबेटे : प्रवाळबेटे ही जगातील सर्वपरिचित सागरी परिसंस्थांपैकी एक आहे. प्रवाळबेटे अनेक मोठ्या प्रवाळांच्या समूहापासून बनतात आणि सजीवांच्या विविध जाती तेथे वास्तव्य करतात. प्रवाळे आणि तेथील सजीव यांच्यात बहुविध सहजीवी संबंध तयार झालेले असतात. ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ ही जगातील प्रवाळबेटांची सर्वांत मोठी परिसंस्था आहे. या परिसंस्थेत सु. २,९०० प्रवाळरांगा आणि सु. २,३०० किमी. लांब पसरलेली सु. ९०० बेटे आहेत आणि तिने सु. ३,४४,४०० चौ किमी. क्षेत्र व्यापलेले आहे.
खोल समुद्र आणि समुद्र तळ (तलस्थ क्षेत्र) : खोल समुद्रातील सु. ९५ % जागा सजीवांनी व्यापलेली आहे. मात्र खोल समुद्र आणि समुद्र तळ या दोन्ही क्षेत्रांसंबंधी एकत्रितपणे पूर्ण माहिती उपलब्ध नाही. तसेच तेथील सर्व सजीवांची पूर्णपणे नोंद अजून केली गेलेली नाही.
सागरी परिसंस्थांद्वारे मानवाला सामाजिक, आर्थिक आणि जैविक पारिस्थितिकीय सेवा उपलब्ध होतात. खोलसागरी परिसंस्था पृथ्वीवरील तापमान नियमित राखतात, जलचक्र घडून येण्यात साहाय्य करतात, अन्न तसेच ऊर्जास्रोत पुरवतात आणि मनोरंजन, पर्यटन यांकरिता संधी निर्माण करतात. सागरी परिसंस्थांमुळे मत्स्यव्यवसाय, जलसंवर्धन, खनिज तेल आणि वायू, सागरी वाहतूक आणि व्यापार इ. माध्यमांतून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होतात.
सागरी परिसंस्थांमुळे उपयुक्त सेवा मिळत असल्या, तरी या परिसंस्था धोक्यात आल्या आहेत. जसे, जगातील सु. ४०% लोक समुद्रकिनाऱ्यापासून १०० किमी. अंतराच्या आत राहतात. त्यामुळे तेथील लोकांचा सागरी परिसंस्थांवर अवलंब वाढलेला आहे. सागरी परिसंस्थांपासून सेवा मिळवण्यासाठी लोक समुद्रकिनारी निवास करतात. उदा., खारफुटी आणि प्रवाळ बेटांच्या अधिवासाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मासे पकडले जातात, तरीही असे अधिवास संरक्षित नाहीत. १९५० पासून जगातील खारफुटींचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे, तसेच प्रवाळबेटांचे सु. ६०% क्षेत्र असुरक्षित बनलेले आहे. मोठ्या प्रमाणातील मासेपकडीमुळे खोलसागरी सागरी परिसंस्था धोक्यात आलेली आहे. सागरी प्रदूषण व हवामान बदल अशा घटकांमुळेही सागरी परिसंस्थांवर विपरित परिणाम होत आहेत. मानवाचा विकास, जलसंवर्धन आणि औद्योगिकीकरण या कारणांमुळे सागरी परिसंस्थाचा ऱ्हास, स्थित्यंतर तसेच अवनती घडून येत आहे.