(स्कॉर्पिओ). एक परभक्षी प्राणी. संधिपाद (सांधेयुक्त पाय असलेल्या प्राण्यांच्या) संघातील ॲरॅक्निडा (अष्टपाद) वर्गाच्या स्कॉर्पिओनेस गणातील प्राण्यांना विंचू म्हणतात. जगात विंचवाच्या सु. १,७५० जाती असून त्यांचे वर्गीकरण १३ कुलांमध्ये केलेले आहे. अंटार्क्टिका वगळता विंचू सर्वत्र आढळतात. वाळवंटात ते विपुल, तर समशीतोष्ण प्रदेशांत ते कमी संख्येने आढळतात. विंचवाला पायांच्या चार जोड्या (आठ पाय) असतात. शीर्षवक्षापासून बाहेर आलेले स्पर्शपाद (पेडिपाल्प) व अरुंद होत गेलेली खंडमय शेपटी आणि तिच्या टोकाला असलेली विषारी नांगी यांवरून तो ओळखता येतो. विंचवांच्या आकारमानात विविधता असते; त्यांची सर्वांत लहान जाती टायफ्लोशॅक्टस मिशेली फक्त ९ मिमी. लांब, तर सर्वांत मोठी जाती हेटरोमेट्रस स्वामर्डामी सु. २३ सेंमी. लांब असते.
विंचवाच्या शरीराचे शीर्षवक्ष (डोके) आणि उदर (पश्चकाय) असे दोन भाग असतात; उदराचे मध्यकाय (पूर्वउदर / पोटाच्या वरचा भाग) आणि पश्चकाय (शेपटीकडील भाग) असे दोन भाग असतात. शीर्षवक्षाचे पृष्ठवर्म, नखरिका (तोंडाचे भाग), स्पर्शपाद (पादमृश) आणि पायांच्या चार जोड्या हे भाग असतात. विंचवाचा बहि:कंकाल जाड, टिकाऊ असल्याने त्याला भक्षकांपासून संरक्षण मिळते. शीर्षवक्षाच्या वरच्या भागात दोन मुख्य डोळे असून पुढच्या कडांवर डोळ्यांच्या आणखी दोन ते पाच जोड्या असतात. विंचवाच्या डोळ्यातील प्रतिमा सुस्पष्ट नसल्या, तरी त्यांचे मुख्य डोळे प्राणिसृष्टीत सर्वांत संवेदी मानली जातात. त्यांचे डोळे अतिमंद प्रकाशालाही संवेदी असतात; काही निशाचर जातींसाठी हे डोळे रात्रीच्या काळोखात ताऱ्यांच्या प्रकाशात चलनवलनासाठी मदतकारक ठरतात. डोळ्यांची शीर्षवक्षावरील स्थान विंचू जेथे राहतात, ती जमीन किती कठीण किंवा मऊ आहे यांनुसार ठरते.
विंचवाच्या नखरिका लहान असतात, त्यांचा उपयोग भक्ष्य फाडण्यासाठी होतो. स्पर्शपाद मोठे असून त्यांच्या टोकाशी नख्यांसारखे बळकट चिमटे असतात. हे चिमटे समोरच्या बाजूस क्षितिजसमांतर असून भक्ष्य पकडणे, स्पर्श करणे यांसाठी त्यांचा उपयोग होतो. विंचवांच्या पायांचा उपयोग चालण्यासाठी होतो. नखरिका, स्पर्शपाद आणि पाय या तीन उपांगांशिवाय विंचवामध्ये पेक्टिन या चौथ्या उपांगाची जोडी असते. ही फणीसारख्या उपांगाची जोडी विंचवाच्या पोटाकडच्या बाजूवर असते. या उपांगांच्या जोडीचे कार्य संवेदी असते, तर विंचवाच्या पेक्टिनचा उपयोग समागमासाठी योग्य जागा शोधण्यासाठी होतो.
मध्यकाय हा उदराचा सर्वांत रुंद भाग असतो. हा भाग सात खंडांनी बनलेला असतो. या सर्व खंडांवर पाठीच्या बाजूने दृढपट्टिका असतात. त्यांना पृष्ठकखंड म्हणतात. पोटाकडच्या बाजूना ३ ते ७ या खंडांवरून दृढपट्टिका असतात. त्यांना अधरक खंड म्हणतात. पोटाच्या बाजूने खंड १ आणि २ यांची रचना जटिल असते, खंड १ चे रूपांतर जननरंध्रे झाकून टाकणाऱ्या प्रच्छदांच्या जोडीत झालेले असते. खंड २ चे रूपांतर पेक्टिन उपांगांच्या जोडीत झालेले असते. खंड ३ ते ६ वर श्वासरंध्रे म्हणजे पुस्तक–फुप्फुसे असतात; ती विंचवाच्या श्वसन इंद्रियांसाठी हवा आत घेण्याचे कार्य करतात. श्वासरंध्रे वर्तुळाकार, अंडाकार किंवा खाचेसारखी असू शकतात. सातव्या अधरक खंडावर कसलीही उपांगे नसतात.
पश्चकाय या भागाला विंचवाची ‘शेपटी’ म्हणतात. परंतु असे म्हणणे संयुक्तिक नाही. कारण पश्चकाय हे विंचवाचे उपांग किंवा प्रवर्ध नाही. पश्चकाय पाच खंडांनी बनलेला असतो. पाचव्या खंडानंतरच्या भागाला अंत्यखंड किंवा पुच्छखंड म्हणतात. पाचव्या खंडावर त्याच्याशी जेथे अंत्यखंड जोडलेले असते तेथे गुदद्वाऱ असते. अंत्यखंडास नांगी म्हणण्याची पद्धत आहे. नांगीचे टोक वळलेले असते. पश्चकाय वळलेले असल्याने विंचवाचे गुदद्वार बहुधा आकाशाकडे उघडते. नांगीच्या आत दोन मोठ्या विषग्रंथी असतात आणि दोन सूक्ष्म नलिकांनी नांगीच्या टोकावर असलेल्या छिद्राला त्या जोडलेल्या असतात. नांगीचे टोक तीक्ष्ण असून त्याद्वारे विंचू भक्ष्याच्या शरीरात विष अंत:क्षेपित करतो. विंचवाच्या नांगीवर संवेदी रोम (ब्रिसल) असतात. त्यांना स्पर्श झाला की विंचू नांगीने दंश करतो आणि त्याचे विष भक्ष्याच्या शरीरात अंत:क्षेपित होते.
विंचू निशाचर असतात. दिवसा ते बिळांमध्ये, फटींमध्ये, दगडाखाली लपून बसतात. संध्याकाळी ते बाहेर पडतात व पहाट होण्यापूर्वी पुन्हा लपतात. भक्ष्य पकडण्यासाठी ते बराच वेळ दबा धरून बसतात. लहानमोठे कीटक, कोळी व इतर लहान अष्टपाद हे त्यांचे भक्ष्य. काही वेळा ते गोगलगायी खातात. स्पर्शपादांनी ते भक्ष्य पकडतात आणि सावकाश खातात. भक्ष्य मोठे असल्यास त्याला पहिल्यांदा दंश करून बेशुद्ध करतात आणि नंतर नखरिकांनी फाडून त्याचे तुकडे करून खातात. ते एका वेळी खूप अन्न खातात. त्यांच्या चयापचयाचा दर मंद असल्याने ते सहा महिने अन्नाशिवाय राहू शकतात. विंचू समाजप्रिय नसल्याने एकेकटे राहतात; परंतु जन्म, प्रणयाराधन अशा वेळी एकत्र येतात. पक्षी खासकरून घुबडे, सरडे, लहान साप, मांसाहारी सस्तन प्राणी, बेडूक, भेक इत्यादी विंचवाचे भक्षण करतात. काही विंचूही विंचवांना खातात (स्वजातिभक्षण). त्यामुळे त्यांची संख्या मर्यादित असते.
विंचवांमध्ये लैंगिक प्रजनन घडून येते. नर आकाराने सडपातळ असतो; त्याची शेपटी जास्त लांब असते. प्रजननकाळात नर मादीच्या शोधात शेकडो मीटर अंतर पार करतो. मादीने सोडलेल्या फेरोमोनचा वास आणि कंपने यांच्या मदतीने नर-मादी एकमेकांना ओळखतात. मादीला आकर्षित करण्यासाठी नर प्रणयाराधन करतो. नराचे प्रणयाराधनाचे नृत्य कित्येक तास चालते. हे नृत्य चालू असताना नर त्याचे शुक्राणुधर मादीच्या शरीरात ठेवता येईल अशा जागी नेतो. मादी जननिक प्रच्छदांतून शुक्राणुधर शरीरात ढकलते. नंतर शुक्राणुधरापासून शुक्रपेशी विलग होतात आणि मादीच्या अंड्यांचे फलन करतात. एकदा मादीच्या शरीरात शुक्राणुधर शिरला की, नर तेथून शीघ्रतेने निघून जातो. अन्यथा मादी नराला खाऊन टाकू शकते.
मादी अंडी न घालता थेट पिलांना जन्म देते. याला अंडजरायुजता म्हणतात. मादीच्या जननरंध्रातून पाच ते आठ पिले बाहेर येतात आणि लगेच ती मादीच्या पाठीवर चढून बसतात. जन्मलेली पिले पांढरी असतात. पिले मादीच्या मुखगुहिकेतून अन्न शोषून घेतात आणि जगतात. चार ते पाच वेळा कात टाकल्यावर पिले प्रौढ होतात. परंतु पहिल्या दोन वेळा कात टाकेपर्यंत पिलांना शरीरातील पाण्याचा अंश टिकविण्यासाठी मादीवर अवलंबून राहावे लागते.
महाराष्ट्रात विंचवाची मधाळ तांबूस रंगाची जाती सर्वत्र आढळते. तिचे शास्त्रीय नाव होटेनटोटा टॅम्युलस (पूर्वीचे नाव ब्युथस टॅम्युलस) आहे. या विंचवाची लांबी ५–९ सेंमी. असून भारतातील सर्वांत विषारी विंचवापैकी तो एक आहे. याच्या विषातील टेमापिन नावाच्या पेप्टाइडमुळे चेतांमधील कॅल्शियम, पोटॅशियम आयन वहन यंत्रणा उत्तेजित होते. त्याच वेळी आयबेरिटॉक्सिन पेप्टाइडमुळे कॅल्शियम आयनांवर अवलंबून असणारी पोटॅशियम आयन वहन यंत्रणा बंद पडते. बालकांमधील विंचवाच्या दंशामुळे होणारे ४०–५०% मृत्यू फुप्फुसाला सूज आल्यामुळे आणि हृदय क्रिया अनियमित झाल्याने होत असत. महाड येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी हिम्मतराव बावस्कर यांच्या प्राझोसिन उपचारपद्धतीमुळे विंचवांच्या दंशामुळे बालमृत्यूचे प्रमाण १% वर आले आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई येथेही विंचवाच्या डंखावऱ प्रतिविष उपलब्ध आहे.
महाराष्ट्रात विंचवाची आणखी एक जाती आढळते. ती दिसायला भीतिदायक परंतु कमी विषारी असते. तिला ‘इंगळी’ म्हणतात. तिचे शास्त्रीय नाव हेटरोमेट्रस इंडस आहे. इंगळी १०–२० सेंमी. लांब असते. तिच्या डंखाने झालेल्या विषबाधेमुळे वेदना होतात आणि सूज येते. कालांतराने वेदना कमी होतात. इंगळीच्या दंशामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
विंचवापासून बचाव करण्यासाठी अडगळीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. विंचू निशाचर असल्याने ते बऱ्याचदा पादत्राणांमध्ये लपून बसतात. रात्री काढून ठेवलेली पादत्राणे सकाळी घालण्यापूर्वी तपासून पाहावीत. नवख्या ठिकाणी गिर्यारोहण (ट्रेकिंग) व शिबिरवास (कॅम्पिंग) करताना अंथरूण झटकून त्यावर झोपावे. विंचवाच्या विषारी गुणधर्माचा उल्लेख साहित्यामध्येसुद्धा आढळतो. याचे एक उदाहरण म्हणजे संत एकनाथ यांचे ‘विंचू’हे भारुड.