(स्नेक). सरीसृप वर्गाच्या स्क्वॅमेटा गणाच्या सर्पेंटिस उपगणात सापांचा समावेश केला जातो. साप हे दोरासारखे लांब शरीर असलेले, बिनपायाचे आणि मांसाहारी प्राणी असतात. ते उल्बी असतात, म्हणजे त्यांचे भ्रूण एका विशिष्ट आवरणाने, उल्बाने, आच्छादलेले असतात आणि ते जमिनीवर अंडी घालतात. साप बाह्यतापी असतात, म्हणजे त्यांच्या शरीराचे तापमान पर्यावरणावर अवलंबून असते. शरीर अरुंद असल्याने शरीरात जोडीने असलेली इंद्रिये (उदा., वृक्क) शेजारीशेजारी असण्याऐवजी ओळीने असतात. काही सापांमध्ये फुप्फुस एकच असते.
सापांची उत्क्रांती जुरासिक कालखंडात बिळात राहणाऱ्या किंवा पाण्यात राहणाऱ्या सरड्यासदृश्य प्राण्यांपासून झाली असावी, असे मानतात. अशा प्राण्यांची सर्वांत जुनी, १४ कोटी ते १६ कोटी वर्षांपूर्वीची जीवाश्मे सापडली आहेत. सरड्यांपासून उत्क्रांत झाल्याने अजगरासारख्या काही सापांमध्ये काही अवशेष उदा., श्रोणि मेखला (कमरेच्या हाडांचे वर्तुळ), अवस्कराच्या दोन्ही बाजूंस असलेल्या अवशेषी नख्या अवशेषांगाच्या स्वरूपात असतात. सापांच्या अनेक जातींमध्ये डोक्याची कवटी, सरड्यासारख्या त्यांच्या पूर्वजांच्या तुलनेत, बऱ्याच जास्त सांध्यांपासून बनलेली असते. त्यामुळे त्यांच्या जबड्याची हालचाल कशीही होते आणि ते त्यांच्या डोक्याच्या आकारापेक्षा मोठे भक्ष्य गिळू शकतात.
अंटार्क्टिका खंड वगळता, साप सर्वत्र आढळतात. ग्रीनलंड, आईसलंड, आयर्लंड, हवाई बेटे आणि न्यूझीलंड जवळील काही बेटे सोडून ते सर्व बेटांवरही सापडतात. हिंदी महासागरात तसेच पॅसिफिक महासागरात सागरी सर्प आढळतात. सापांची २० कुले, सु. ५२० प्रजाती असून सु. ३,६०० जाती आहेत. त्यांच्या आकारमानात विविधता आहे. सापांची सर्वसाधारण लांबी सु. १ मी. असते. आता विलुप्त झालेला टिटानोबोआ सेरेजोनेन्सिस जातीचा साप सु. १२.४ मी. लांब होता. सध्या अस्तित्वात असलेल्या सापांमध्ये अजगर सर्वांत लांब असून त्याची लांबी सु. ६.९५ मी.पर्यंत आढळली आहे. ॲनॅकाँडा जातीचे साप सु. ५.२ मी. लांब असतात आणि त्यांचे वजन सापांमध्ये सर्वाधिक सु. ९७.५ किग्रॅ. असते. सर्वांत लहान सापाची लांबी सु. १०.४ सेंमी. असल्याची आढळून आली आहे.
अजगर, पीट व्हायपर, काही बोआ या जातीच्या सापांच्या मुस्कटावर असलेल्या खाचांमध्ये अवरक्त संवेदी ग्राही (इन्फ्रारेड सेंसिटिव्ह रिसेप्टर) असतात. या ग्राहींद्वारे उष्ण रक्ताच्या प्राण्यांपासून बाहेर पडलेल्या उष्णतेमुळे त्यांना ते प्राणी दिसू शकतात. भक्ष्याचा मागोवा घेण्यासाठी साप भक्ष्याच्या गंधाचा वापर करतात. हे कार्य त्यांच्या जीभेद्वारे होते. सापाची जीभ दुभंगलेली असते आणि तिच्याद्वारे गंधाची दिशा आणि चव यांचे ज्ञान होते. साप जीभ सतत आत-बाहेर काढतात आणि हवा, जमीन व पाणी यांपासून कण गोळा करतात. टाळूच्या ठिकाणी असलेल्या जॅकॉबसन इंद्रियावर जीभ घासून कणांतील रसायनांचे विश्लेषण करतात आणि परिसरातील भक्ष्य, तसेच भक्षक यांची माहिती मिळवितात. पाण्यात राहणारे ॲनॅकाँडासारखे प्राणी पाण्यातही जीभेचा वापर प्रभावीपणे करतात. सापांना बाह्यकर्ण नसतो. मात्र त्यांच्या मुस्कटात असलेल्या हाडांमधून कंपनांचे वहन होते. त्यांना बाह्यकर्ण नसला, तरी आंतरकर्णाची काही अवशेषांगे असतात आणि ती कवटीतील अस्थींना अशा रीतीने जुळलेली असतात की, त्याद्वारे जमिनीवरील तसेच हवेतील कंपनांची जाणीव त्यांना चांगल्या प्रकारे होते. या यंत्रणेद्वारे सापांना कमी कंप्रतेचा आवाज ऐकू येत असावा, असा एक अंदाज आहे.
सापांच्या दृष्टीमध्ये विविधता दिसते. त्यांना रंगदृष्टी नसते. प्रकाशात तसेच अंधारात डोळ्यांतील प्रतिमा रेखीव नसली, तरी हालचाल करणारी वस्तू त्यांना नीट दिसते. वृक्षवासी सापांची दृष्टी सर्वांत उत्तम असते, तर जमिनीत राहाणाऱ्या मांडुळासारख्या सापांची दृष्टी अधू असते. पश्चिम घाटात आढळणाऱ्या गवत्या सापाची दृष्टी द्विनेत्री असते. त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसणारी प्रतिमा एकत्र व त्रिमितीय असते. दृष्टिपटलावर प्रतिमा पाडण्यासाठी बहुतेक साप नेत्रभिंग पुढेमागे करतात. इतर प्राण्यांमध्ये नेत्रभिंग स्नायूंच्या साहाय्याने पसरट व फुगीर होऊन प्रतिमा दृष्टिपटलावर पडते. दिनचर सापाच्या डोळ्यांतील बाहुली वर्तुळाकार, तर निशाचर सापांच्या डोळ्यातील बाहुली उभी असते. सापांच्या डोळ्यांवर पापण्यांऐवजी पारदर्शक खवले असतात. त्यांद्वारे डोळ्यांचे संरक्षण होते.
सापांची पोटाकडील त्वचा कंपनांना खूप संवेदनशील असते. पावलांची कंपने, काठी आपटल्यामुळे झालेली कंपने यांची जाणीव त्याला पटकन होते आणि तो माणसापासून दूर जातो. ग्रामीण भागात काळोखात बाहेर वावरताना काठी आपटत जातात, यामागे हेच कारण आहे. सापाची त्वचा कोरडी व गुळगुळीत असून त्वचेवर खवले असतात. अधर बाजूचे खवले रुंद असून त्यांचा उपयोग सरकण्यासाठी, झाडावर चढण्यासाठी किंवा भक्ष्याला जखडण्यासाठी होतो. काही सापांच्या खवल्यावर जहाजाच्या कण्याप्रमाणे उंचवटा असतो, तर काहींचे खवले कणीदार असतात.
सापांचे खवले गळून पडतात; त्याला ‘कात टाकणे’ म्हणतात. साप त्याच्या जीवनकालात अनेकदा कात टाकतो. कात टाकण्यापूर्वी तो खाणे थांबवतो आणि सुरक्षित जागी आसरा घेतो. कात टाकण्यापूर्वी त्याची त्वचा सैल पडते, शुष्क होते, डोळे निळे दिसू लागतात आणि बाह्यत्वचेच्या आतील त्वचा ओलसर होते. काही दिवसांनी, डोळे स्पष्ट दिसू लागतात आणि तो जुन्या त्वचेतून बाहेर पडतो. कात टाकताना त्वचेचा बाहेरील स्तर पूर्णपणे गळून पडतो. सापांचे खवले त्याच्या त्वचेचे विस्तरण होत असल्याने सलग असतात. म्हणून साप कात टाकतो, तेव्हा पायातून मोजा बाहेर काढल्यासारखी कात दिसते. कात टाकल्यानंतर सापाची जुनी, झिजलेली त्वचा पुनर्जीवित होते व त्वचेवर असलेली वाळवी, गोचीड यांपासून सुटका होते.
सापाचे डोके, पाठ आणि पोट या भागांतील खवल्यांचा आकार जातीनुसार वेगळा असतो आणि वर्गीकरणासाठी ते उपयोगी पडतात. कोल्युब्रिडी कुलातील सापांमध्ये पोटावरचे खवले आणि पाठीवरच्या खवल्यांच्या रांगा या मणक्याशी निगडित असतात. त्यामुळे सापाचे विच्छेदन न करता मणके मोजता येतात. ज्या सापांमध्ये एरव्ही नर किंवा मादी नीट ओळखता येत नाही त्यांच्या खवल्यांच्या संख्येवरून नर किंवा मादी ओळखता येते. कातेवरच्या खवल्यांवरूनही साप कोणत्या प्रकारचा आहे, ते ओळखता येते.
सापांचा सांगाडा हा कवटी, कंठिका, पाठीचा कणा आणि बरगड्या यांनी बनलेला असतो. वरच्या आणि खालच्या जबड्यातील अस्थींना जोडणाऱ्या लवचिक अस्थिबंधांमुळे त्याला तोंड वासता येते आणि तो जबड्याच्या आकारमानापेक्षा मोठे भक्ष्य सहज गिळू शकतो. दात आतल्या बाजूस वळलेले असल्यामुळे भक्ष्य जबड्यातून बाहेर पडत नाही. त्यांचे पडलेले दात पुन्हा येत राहतात. बरगड्या आणि त्यांना जोडलेल्या स्नायूंच्या आकुंचनामुळे साप पुढे सरकतात. अवयवांचा अभाव असल्याने त्यांची चाल नागमोडी असते. त्यांना सरळ रेषेत वेगाने पुढे जाता येत नाही. भक्ष्य टप्प्यात आले की, ते वेगाने हालचाल करतात आणि भक्ष्य पकडतात. सागरी सर्प उत्तम पोहतात.
भारतात सु. ३०० जातीचे साप आढळतात. त्यांच्या बहुतेक जाती बिनविषारी असतात. ते भक्ष्य गिळतात किंवा भक्ष्याला वेढे घालून, कोंडून मारून टाकतात. जे साप विषारी असतात, ते मुख्यत: भक्ष्याला मारण्यासाठी किंवा त्याची हालचाल थांबविण्यासाठी विष वापरतात. काही सापांचे विष एवढे जहाल असते की, त्यांच्या चाव्याने मनुष्याला वेदना होतात किंवा मनुष्य मृत्युमुखी पडतो. भारतात विषारी सापांच्या सहा जाती आहेत; घोणस, नाग, फुरसे, मण्यार, नागराज (किंग कोब्रा) आणि सागरी सर्प. सापाचे विष म्हणजे विषारी घटक असलेली लाळ असते. सापाच्या लालग्रंथीचे रूपांतर विषग्रंथीत झालेले असते. या विषग्रंथी डोळ्यांच्या मागील बाजूस असतात. या विषग्रंथींपासून निघालेल्या विषनलिका सापाच्या वरच्या जबड्यात असलेल्या विषदंतात उघडतात. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे विरघळणाऱ्या पदार्थांत रूपांतर करणारी अनेक विकरे सापाच्या विषात असतात. काही पक्षी, मुंगूस यांसारखे प्राणी साप खातात. त्यांच्या शरीरात सापाचे विष निष्प्रभ करणारी प्रतिकारक्षमता तयार झालेली असल्याने त्यांच्यावर सापाच्या विषाचा परिणाम होत नाही.
विषदंतांचे स्थान व चाव्याची पद्धत यावरून विषारी सापांचे तीन गट केले जातात; इलॅपीड, व्हायपेरीड आणि कोल्युब्रिड. इलॅपीड कुलातील नाग, मण्यार, नागराज यांचे विषदंत मागच्या बाजूस व पन्हळीसारखे असतात. त्यामुळे भक्ष्याच्या शरीरात विष सोडण्यासाठी त्यास भक्ष्याला चावावे लागते. व्हायपेरीड गटात घोणस येतात. घोणस चावताना त्यांचे विषदंत सरळ होऊन सुईसारखे भक्ष्याच्या शरीरात घुसतात. कोल्युब्रिड गटात गवत्या, वृक्षसर्प यांचा समावेश होतो. या गटातील सापाचे विषदंत जबड्याच्या मागच्या भागात असल्याने ते भक्ष्य गिळताना भक्ष्याच्या शरीरात विष सोडतात.
साप भक्ष्याला चावताना त्याचा आकार व वजन यांच्या प्रमाणात विष अंत:क्षेपित करतो. सापाच्या विषाचे तंत्रिकाविषाक्त (न्यूरोटॉक्सिक) व रक्तविषाक्त (हीमोटॉक्सिक) असे दोन प्रकार आहेत. सापाच्या विषामुळे रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, स्नायू यांवर विपरित परिणाम घडून येतात. विषारी सापांच्या विषामध्ये असलेल्या हायालुरोनिडेझ या विकरामुळे विष शरीरात झपाट्याने पसरते. स्थूल वर्गीकरणाप्रमाणे इलॅपीड सापामध्ये चेताविषाचे आणि व्हायपेरीड सापामध्ये रक्तविघटक विषाचे प्रमाण अधिक असते. बिनविषारी साप चावल्यासही ऊतींना इजा होते.
सागरी सर्पाचे विष खेकड्यासारख्या सागरी प्राण्यांवर अधिक परिणामकारक असते. ते विष स्नायू विघटक असते. त्यांच्या चाव्यामुळे तीव्र वेदना होतात आणि हातापायांची हालचाल थांबते. त्यांचे विषदंत आखूड असल्यामुळे शरीरावर पोहण्याचा पोशाख असल्यास ते त्वचेपर्यंत पोहोचत नाहीत. (पाहा : सागरी सर्प).
ज्या सापाचे विषदंत पुढील बाजूस असतात, त्यांच्या विषामध्ये रक्ताचे विघटन करणारी विकरे असतात. त्यामुळे भक्ष्याच्या शरीरात ते विष त्वरित परिणाम करते. मण्याराचे विषदंत लहान असून त्याच्या विषाचा परिणाम चेतासंस्थेवर काही तासांनी होतो. त्यामुळे मण्याराच्या दंशानंतर बाधित व्यक्ती एक-दोन दिवसांनी मरण पावल्याची उदाहरणे आहेत.
भारतात दरवर्षी सु. अडीच लाख सर्पदंशाच्या घटना घडतात आणि त्यांपैकी सु. ५०,००० व्यक्ती सर्पदंशाने मरतात. विषारी साप चावलेल्या व्यक्तीस प्रतिविषाची अंत:क्षेपणे त्वरीत दिल्यास त्याचा जीव वाचू शकतो. गावठी उपायाने किंवा मंत्रोच्चाराने सापाचे विष उतरत नाही. भारतात सर्पदंशावर प्रतिविष बनविण्यासाठी घोड्याला थोड्याथोड्या प्रमाणात सापाचे विष टोचतात. त्यामुळे घोड्याच्या रक्तरसात प्रतिविष निर्माण होते. त्याची चाचणी घेऊन रक्तरसाची भुकटी कमी तापमानाला साठवून ठेवतात. सद्यस्थितीत नाग, घोणस, मण्यार व फुरसे हे साप जेथे मोठ्या प्रमाणावर आढळतात, तेथील रुग्णालयांमध्ये प्रतिविष उपलब्ध केले गेले जाते. मात्र नागराजाच्या विषावर अजूनही प्रतिविष उपलब्ध नाही.
विषारी सापाचा दंश झाल्यास ज्या जागी दंश केलेला आहे, तेथून रक्त शोषण्यासाठी चूषक उपकरणाने विषमिश्रित रक्त काढल्यास रुग्णालयात नेण्यापूर्वी उपचारांसाठी काही वेळ मिळतो.
सापांच्या प्रजननात विविधता आढळते. मीलनकाळात नर आणि मादी गंधाच्या साहाय्याने एकत्र येतात. नर सापाच्या अवस्कारात अर्धशिस्न असते. मीलनकाळात नर आणि मादी एकत्र येऊन परस्परांना विळखे घालतात. अशा स्थितीत नराची अर्धशिश्ने एकत्र येऊन मादीच्या अवस्करात प्रवेशतात. अंड्याचे फलन शरीरात होते. मादी अंडी घातल्यानंतर बहुधा त्यांची काळजी घेत नाही. नागराज या एकमेव सापाची मादी पानांचे घरटे बनवून त्यात अंडी घालते आणि पिले बाहेर येईपर्यंत अंड्यांची काळजी घेते. घोणसाची मादी फलित अंडी पिले बाहेर येईपर्यंत गर्भाशयात साठवते. पिले तिच्या अवस्करातून बाहेर येतात.
भारतात अनेकजण सापांना पकडून, टोपल्यात ठेवून गावोगावी दाखवित फिरतात. वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ नुसार साप पकडणे आणि त्याचे प्रदर्शन करणे, याला कायद्याने बंदी आहे. साप आणि मुंगूस यांची लढत दाखवण्यावरही बंदी आहे. आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यांतील मुख्यत: इरूला जमातीचे लोक साप पकडून त्याच्या कातडी विकत असत. भारतात सापाच्या कातड्याच्या व्यापारावर पूर्ण बंदी घातल्यानंतर इरूला आता विषारी सापाचे विष मिळवून प्रतिविष तयार करणाऱ्या संस्थांना विकतात. सापाचे विष बाळगणे, हा दखलपात्र गुन्हा आहे. मानवी वस्तीत चुकून आलेले साप पकडून त्यांना वन्य परिसरात सोडण्याचे कार्य काही सर्पमित्र करतात. साप पकडण्यासाठी एका टोकास व्ही (V) आकाराचा चिमटा असलेली काठी वापरतात. या काठीमुळे साप चावण्याचा धोका कमी होतो. केवळ हातांनी साप पकडणाऱ्या व्यक्तीला सर्पदंशाचा धोका अधिक असतो.
नैसर्गिक स्थितीत साप साधारणत: २५ ते ३० वर्षे जगत असावेत, असे प्राणितज्ज्ञांचे मत आहे. बंदिवासात ते ५-६ वर्षे अधिक जगतात. बहिरी ससाणा, घुबड, बगळा, करकोचा, गरुड यांसारखे पक्षी; तर मुंगूस हा प्राणी सापाचे शत्रू आहेत. साप हा अन्नसाखळीतील प्रमुख घटक आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. सापाच्या विषाचा उपयोग आयुर्वेद व होमिओपॅथीमध्ये औषधे तयार करण्याकरिता होतो. सापाच्या चरबीपासून तयार करण्यात आलेल्या तेलाचा वापर मालीश करण्यासाठी, त्वचारोग, सांधेदुखी इ.वरील उपचारांवर करतात. सापाचा अन्न म्हणूनही काही देशांत वापर केला जातो.