अल्चिन, फ्रँक रेमंड : (९ जुलै १९२३–४ जून २०१०). विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म लंडनच्या हॅरो या उपनगरात झाला. रेमंड अल्चिन म्हणून परिचित. त्यांचे वडील फ्रँक मॅकडोनाल्ड अल्चिन हे डॉक्टर होते. लंडनमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर रेमंड यांनी वास्तुविशारद होण्यासाठी तीन वर्षे रिजंट स्ट्रीट पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेतले. यानंतर त्यांची सैन्यात नियुक्ती झाली. १९४४ मध्ये त्यांना भारतात पाठवण्यात आले. भारतातून परतल्यावर रेमंड यांनी स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (SOAS) या संस्थेत संस्कृत व हिंदी या विषयांत पदवी मिळवली.
रेमंड यांनी के. बी. कॉड्रिंग्टन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. साठी प्रवेश घेतला. त्यांनी रायचूर दोआबातील प्रागितिहासावर पीएच. डी. पूर्ण केली (१९५४). त्या वर्षी ते स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज या संस्थेत व्याख्याता म्हणून रुजू झाले. तत्पूर्वी ब्रिजिट गॉर्डन यांच्याशी ते विवाहबद्ध झाले (१९५१). पुढे ते केंब्रिज विद्यापीठात व्याख्याता झाले (१९५९). ‘सुप्रतिष्ठित प्रपाठकʼ (Reader Emeritus) या पदावरून ते केंब्रिज विद्यापीठातून निवृत्त झाले (१९८९).
रेमंड यांच्या दक्षिण आशियातील पुरातत्त्वीय संशोधनाचा प्रारंभ अफगाणिस्तानातील बामियान येथे झाला (१९५१). त्यांनी शहर-इ-झोआक या पुरातत्त्वीय स्थळाचा अभ्यास केला. नंतर दक्षिण भारतातील नवाश्मयुगाच्या संशोधनाकडे ते वळले. ताम्रपाषाणयुग आणि सिंधू संस्कृतीच्या तुलनेत या कालखंडाकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नव्हते आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक कालक्रम नीटपणे समोर आलेला नव्हता. दक्षिण भारतात कर्नाटक व आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अशी राखेची टेकाडे (Ash mounds) आहेत. ही टेकाडे मध्ययुगातील असून ही राख लोखंड बनवण्याच्या प्रक्रियेतील असल्याचे मानले जात होते. रेमंड यांनी अगोदर पिकलिहाळ (१९५२) आणि मग उतनूर (१९५७) या ठिकाणी उत्खनन केले. राखेची टेकाडे नवाश्मयुगातील (इ.स.पू. ३०००) असून त्यांच्यावरच्या भागात लोहयुगातील वसाहतीचे पुरावे असल्याचे त्यांनी दाखवून दिले. नवाश्मयुगातील कृषी-पशुपालक दरवर्षी एकत्र येत असत व त्यांच्या गाईगुरांच्या शेणाचे थर साठून नंतर ते जळून त्यांची राख झाली, असे प्रतिपादन त्यांनी निओलिथिक कॅटल कीपर्स ऑफ साउथ इंडिया (१९६३) या पुस्तकात केले.
केंब्रिजमध्ये आल्यानंतर रेमंड यांना ऐतिहासिक पुरातत्त्वात रस निर्माण झाला. सर मॉर्टिमर व्हीलर यांनी असे सुचवले होते की, दक्षिण आशियातील शहरांची सुरुवात पर्शियन साम्राज्याच्या काळात इ.स.पू. सहाव्या शतकात झाली. ही कल्पना तपासून बघण्यासाठी रेमंड यांनी पेशावर विद्यापीठातील अहमद हसन दाणी यांच्या सहकार्याने १९६३ व १९६४ मध्ये पाकिस्तानातील शाइखान ढेरी (प्राचीन गांधारची राजधानी पुष्कळावती) या ठिकाणी संशोधन केले. तसेच त्यांनी स्वात, डिर व चित्रळ या खोऱ्यांमधील गांधार दफन संस्कृती (Gandhar Grave Culture) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महापाषाणयुगीन अवशेषांवरही लक्ष केंद्रित केले. प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ पत्नी ब्रिजिट अल्चिन यांच्यासह संशोधन करून त्यांनी तक्षशीला येथे पर्शियन साम्राज्याच्या कितीतरी अगोदर ताम्रपाषाणयुग आणि लोहयुगातच नागरी वसाहत झाली असल्याचे मत मांडले. स्वतः रेमंड यांनी प्रत्यक्ष उत्खनन करून हे सिद्ध केले नसले, तरी पुढे त्यांचे एक विद्यार्थी रॉबिन कनिंगहॅम आणि पेशावर विद्यापीठातील एहसान अली यांनी स्वात व काबूल नदीच्या संगमाजवळ असलेल्या चारसद्दा (पाकिस्तान) येथे नागरी वसाहतीचा काळ इ.स.पू. १३०० इतका मागे जात असल्याचे निर्विवादपणे दाखवून दिले. तक्षशीला येथे मिळालेले गोलाकार कुंभ पाण्याचे असल्याचे सर जॉन मार्शल यांनी नमूद केले होते. परंतु लोकजीवन शास्त्रीय निरीक्षणे व वैदिक साहित्यातील उल्लेख यांचा वापर करून रेमंड यांनी ते ऊर्ध्वपातनाने अल्कोहोल बनवण्यासाठीचे आहेत, असे दाखवले.
रेमंड पुन्हा एकदा भारताकडे वळले (१९६७). ते आणि ब्रिजिट यांनी मिळून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे जगतपती जोशी यांच्या सहकार्याने गुजरातमध्ये किनारी भागात सर्वेक्षण केले. याच कामाचा भाग म्हणून त्यांनी १९६८ मध्ये तापी नदीच्या किनाऱ्यावरील मालवण (जिल्हा वलसाड) या स्थळावर उत्खनन केले. या ठिकाणी त्यांना सिंधू संस्कृतीच्या उतरत्या काळातील (Degenerative phase) अवशेष मिळाले.
रेमंड यांनी १९८९ मध्ये श्रीलंकेत अनुराधपूर या स्थळाच्या उत्खननाचा प्रकल्प त्यांचे एक विद्यार्थी व तत्कालीन श्रीलंका सरकारचे सल्लागार सिरान देरेयानिगला यांच्या मदतीने सुरू केला. या प्रकल्पाचे क्षेत्रीय कार्य रॉबिन कनिंगहॅम यांनी केले. रेमंड यांच्या मार्गदर्शनाखाली १९९३ पर्यंत झालेल्या उत्खननात इ.स.पू. नवव्या शतकापासून ते इ. स. दहाव्या शतकापर्यंतचा कालक्रम मिळाला. तसेच इ.स.पू. चौथ्या शतकातच नागरीकरण झाले असल्याचे दिसले.
अल्चिन दाम्पत्य संस्थांच्या उभारणीत अग्रेसर होते. त्यांनी यूरोपातील इतर समविचारी पुरातत्त्वज्ञांच्या मदतीने १९७१ मध्ये ‘यूरोपियन असोसिएशन ऑफ साउथ एशियन आर्किऑलॉलिस्टʼ ही संस्था स्थापन केली व त्याचवर्षी केंब्रिजमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली. तेव्हापासून दर दोन वर्षांनी अखंडपणे ही परिषद आयोजित होते. दक्षिण आशिया आणि मध्य आशिया यांच्यातील पुरातत्त्वीय संशोधनासाठी निधी व संधींची कमतरता आहे, हे जाणवून पुढे त्यांनी हॅरोल्ड बेली व इतरांच्या मदतीने केंब्रिज येथे ‘एन्शंट इंडिया अँड इराण ट्रस्टʼ ही संस्था स्थापन केली (१९७८). या संस्थेने दीर्घकाळ मध्य आशिया आणि दक्षिण आशियातील (प्रस्तुत लेखकासह) अनेक तरुण पुरातत्त्वज्ञांना शिष्यवृत्ती देऊन अभ्यासाच्या नवीन संधी मिळवून दिल्या.
रेमंड यांना अनेक मानसन्मान मिळाले. ते रॉयल एशियाटिक सोसायटी (१९५३), सोसायटी ऑफ अँटिक्वेरीज (१९५७), चर्चिल कॉलेज (१९६३), रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स (१९७४) आणि ब्रिटिश अॅकॅडमी (१९८१) यांचे सन्माननीय सदस्य (फेलो) होते. भारतीय पुरातत्त्वातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन डेक्कन कॉलेज, पुणे यांनी त्यांना मानद डी. लिट. पदवीने सन्मानित केले (२००७).
रेमंड हे हिंदीचे जाणकार होते. त्यांनी तुलसीदासांच्या अनेक रचनांचे इंग्रजीत उत्कृष्ट अनुवाद केले आहेत.
केंब्रिज (इंग्लंड) येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Allchin, F. Raymond & Allchin, Bridget, From the Oxus to Mysore in 1951: The start of a great partnership in Indian Archaeology, Hardinge Simpole, Kilkerran, 2012.
- Coningham, R. A. E. ‘Frank Raymond Allchin (1923–2010)ʼ, Biographical Memoirs of Fellows of the British Academy, Oxford University Press, XI: 3-23, 2012.
- Misra, V. N. ‘Obituary : F. R. Allchinʼ, Man and Environment, 35(1): 128-130, 2010.
- https://www.theguardian.com/science/2010/jul/28/raymond-allchin-obituary
समीक्षक : शंतनू वैद्य