ब्रेडवुड, रॉबर्ट जॉन : (२९ जुलै १९०७–१५ जानेवारी २००३). विख्यात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ व आधुनिक आंतरविद्याशाखीय पुरातत्वीय संशोधनाचे प्रणेते. त्यांचा जन्म मिशिगन राज्यातील डेट्रॉईट येथे झाला. त्यांचे आईवडील स्कॉटलंडमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. शिक्षण घेत असताना ब्रेडवुडनी अनेक कामे केली. या काळात मिळवलेली सुतारकामासारखी कौशल्ये त्यांना नंतरच्या काळात पुरातत्त्वात क्षेत्रीय संशोधनात अत्यंत उपयुक्त ठरली.

ब्रेडवुडनी मिशिगन विद्यापीठातून वास्तुविशारद ही पदवी प्राप्त केली (१९२९). तथापि जागतिक महामंदीच्या काळात केवळ या शिक्षणावर विसंबून राहू नये म्हणून ब्रेडवुड मिशिगनला परतले आणि त्यांनी मानवशास्त्र व इतिहास यांचे शिक्षण सुरू केले. या दरम्यान त्यांची  वास्तुविशारद पदवी बघून त्यांना विद्यापीठाच्या तेल उमर (Tell Umar) या बगदादजवळ असलेल्या नवाश्मयुगीन स्थळाच्या उत्खननात सर्वेक्षकाचे काम मिळाले (१९३०-३१). पुढे त्यांनी बी. ए. (१९३२) आणि एम. ए. (१९३३) या पदव्या मिळवल्या.

एम.ए. पूर्ण झाल्यानंतर ब्रेडवुडनी शिकागो विद्यापीठाच्या सीरियातील अमुक (Amuq) उत्खननात क्षेत्रीय साहाय्यक म्हणून काम केले (१९३३-३९). याच दरम्यान पुराभ्यासक लिंडा श्रायबर यांच्याशी ते विवाहबद्ध झाले (१९३६). यानंतर रॉबर्ट ब्रेडवुड आणि लिंडा ब्रेडवुड यांनी पुढील सु. ६६ वर्षे इराक, इराण, सीरिया व तुर्कस्थानात एकत्र पुरातत्त्वीय संशोधन केले आणि शोधनिबंध प्रकाशित केले.

ब्रेडवुड यांनी शिकागो विद्यापीठातूनच १९४२ मध्ये हेन्री फ्रँकफोर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. प्रबंध पूर्ण केला. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘कंपॅरिटिव्ह आर्किओलॉजी ऑफ अर्ली सीरियाʼ हा होता. त्यांची ओरिएंटल इन्स्टिट्यूट आणि मानवशास्त्र विभागात संयुक्तपणे प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ म्हणून पूर्णवेळ नेमणूक झाली. ते या पदावर १९७८ पर्यंत होते.

ब्रेडवुड यांनी त्यांच्या दीर्घ पुरातत्त्वीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच म्हणजे १९४५ मध्ये आपली पहिली महत्त्वाची सिद्धांतकल्पना मांडली. त्यांच्या अमुक येथील निरीक्षणांच्या आधारे त्यांनी ‘गॅप चार्टʼ (Gap Chart) तयार केला. शैलाश्रयांच्या जवळ राहणारे पुराश्मयुगीन लोक आणि इराकमधील हस्सुना (Hassuna) येथे आढळलेली कृषी-पशुपालकांची संस्कृती यांच्यात कित्येक हजार वर्षांचा फरक आहे. हे असे का घडले असावे आणि स्थिर अशा कृषी-पशुपालकांचा उदय नेमका कसा झाला, याबद्दल त्यांनी आपली मते मांडली. आपल्या सिद्धांतकल्पना तपासून बघण्यासाठी ब्रेडवुड दाम्पत्याने इराकमधील माटाराह, जार्मो आणि करीम शहीर येथे १९४८ ते १९५८ या काळात उत्खनन केले. या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात पहिल्यापासून प्राणिशास्त्रज्ञ, भूशास्त्रज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ, रेडिओकार्बन कालमापनतज्ज्ञ आणि इतर अनेक पुरातत्त्वज्ञांचा सक्रिय सहभाग होता. ब्रेडवुड यांच्यामुळेच पुरातत्त्वात मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्परसंबंधांच्या संशोधनाला (पर्यावरणीय पुरातत्त्व) मध्यवर्ती स्थान प्राप्त झाले. उत्खननात मिळणाऱ्या केवळ सुंदर कलात्मक वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भौतिक अवशेषांचे सर्व प्रकारे विश्लेषण करण्याचा आग्रह धरणारे ब्रेडवुड हे पहिले पुरातत्त्ववेत्ता होते. ज्या काळात एकाच मोठ्या टेकाडावर शेकडो मजूर लावून प्रचंड मोठे उत्खनन करण्याची प्रथा होती, तेव्हा ब्रेडवुड यांनी विस्तृत भूभागाचे सखोल सर्वेक्षण करून पुरापर्यावरणीय निष्कर्ष काढण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या संदर्भात ब्रेडवुड यांचे जार्मो येथील काम विशेष प्रसिद्ध आहे.

इराकमधील राजकीय परिस्थिती १९५८ मध्ये अस्थिर झाल्यामुळे ब्रेडवुड यांनी दोन वर्षे इराणमधील घर वर्वासी शैलाश्रय, टेपे असियाब आणि टेपे सेराब या स्थळांवर उत्खनन केले. तसेच त्यांनी व त्यांचे सहकारी पुरापरागशास्त्रज्ञ हर्बर्ट राइट यांनी झाग्रोस पर्वतरांगांमध्ये केलेल्या कामामुळे पुरापर्यावरणीय संशोधनाला कलाटणी मिळाली.

इराणमधील काम पूर्ण झाल्यानंतर ब्रेडवुड यांनी इस्तंबूल विद्यापीठातील प्रगितिहास विभागाच्या प्रमुख हॅलेट कँबेल यांच्या मदतीने तुर्कस्थानात पुरातत्त्वीय संशोधनाला सुरुवात केली (१९६३). या संयुक्त प्रकल्पात त्यांनी शयानू (Cayonou) आणि गिरीकिहाशिआन (Girikihaciyan) या स्थळांचे उत्खनन केले. या खेपेसही ब्रेडवुड यांच्याबरोबर आंतरविद्याशाखीय पुरातत्त्वीय संशोधनासाठी लागणारे विविध तज्ज्ञ होते. हा प्रकल्प हॅलेट कँबेल यांच्या निवृत्तीपर्यंत (१९८९) सुरू होता.

ब्रेडवुड यांचा इंडियाना विद्यापीठ (१९७१), पॅरिस विद्यापीठ (१९७५) आणि रोम विद्यापीठ (१९८२) या विद्यापीठांनी मानद डॉक्टरेटने सन्मान केला. १९७१ मध्ये आर्किओलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका या संस्थेने ब्रेडवुड यांच्या योगदानासाठी सुवर्णपदक देऊन गौरव केला (१९७१). सोसायटी  फॉर अमेरिकन आर्किओलॉजी या संस्थेने ब्रेडवुड यांच्या आंतरविद्याशाखीय कार्यासाठी त्यांना फ्रिक्सेल पदकाने सन्मानित केले (१९९५).

रॉबर्ट ब्रेडवुड यांचे इंडियाना राज्यातील ला पोर्टे येथे निधन झाले. त्यानंतर काही तासांनी लिंडा ब्रेडवुड यांचेही निधन झाले.

संदर्भ :

  • Harms, William, ‘Robert Braidwood, 1907-2003ʼ, University of Chicago News Office, 2003.
  • Mortensen, Peter, ‘Obituary : Robert J. Braidwood 1907-2003ʼ, Antiquity, 77 (295): 213-214, 2003.
  • Watson, Patty Jo, ‘Robert John Braidwoodʼ, Biographical Memoirs, 89: 22-43, 2007.

                                                                                                                                                                                         समीक्षक : शंतनू वैद्य