फेयरसर्विस, वॉल्टर ॲशलिन : (१७ फेब्रुवारी १९२४–१२ जुलै १९९४). विख्यात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म न्यूयॉर्कमधील ब्रुकलीन येथे झाला. वॉल्टर यांचे जीवन अनेक वैविध्यपूर्ण घटनांनी भरलेले होते. लहानपणी पुरातत्त्वाच्या वेडापायी ते शाळेतून पळून गेले होते. अनेक हालअपेष्टा आणि प्रवास करून इजिप्तमध्ये पोहोचल्यावर एका अमेरिकन माणसाने दयनीय अवस्थेत अमेरिकन वकिलातीपाशी घुटमळणाऱ्या या पोराला घरी पाठवण्याची व्यवस्था केली. वॉल्टरची आई एडिथ येगर ही अभिनेत्री होती. तिच्याबरोबर वॉल्टरनी देशभर दौरे केले आणि शेक्सपिअरच्या काही नाटकांमध्ये कामही केले. त्यांची ही रंगमंचाची आवड पुढेही कायम राहिली.

काही काळ वॉल्टरनी शिकागो विद्यापीठात मैदानी खेळांच्या प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेतली, पण १९४१ मध्ये ती सोडून न्यूयॉर्कला परतले. या नंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठात मानवशास्त्र विषयासाठी प्रवेश घेतला व त्यांनी बी.ए. पदवी मिळवली. पदवीला असताना त्यांनी चिनी व मंगोलियन भाषा हे विषय घेतले होते. बी.ए. नंतर वॉल्टर सैन्यात भरती झाले. लष्कराच्या गुप्तचर विभागात लेफ्टनंट म्हणून त्यांनी जपानमध्ये काम केले. त्यासाठी ते जपानी भाषा शिकले. दुसरे महायुद्ध संपताना ते जनरल डग्लस मॅकॉर्थर यांच्या स्टाफमध्ये महत्त्वाच्या जबाबदारीवर होते.

सन १९४८ मध्ये पुन्हा कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेऊन वॉल्टरनी मानवशास्त्रात एम.ए. पदवी मिळवली. नंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात पीएच.डी. सुरू केली; परंतु त्यांचे प्रस्तावित क्षेत्रीय काम विभागातील काही शिक्षकांना पसंत न पडल्याने विद्यापीठातून अर्थसाहाय्य मिळणे बंद झाले. या पुढील शिक्षणासाठी वॉल्टरना न्यूयॉर्कच्या अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या संग्रहालयाने मदत केली. या संग्रहालयात त्यांनी पुरातत्त्व विषयात विशेष क्षेत्रीय साहाय्यक या पदावर काम केले. करत होते. पीएच.डी. सुरू असताना वॉल्टरनी १९४९ मध्ये लुई डुप्री या मित्राच्या मदतीने आपली पहिली पुरातत्त्वीय मोहीम अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात काढली. सन १९५० मध्ये वॉल्टरनी बलुचिस्तान आणि सिस्तान (अफगाणिस्तान) या भागात महत्त्वपूर्ण संशोधन केले. तथापि वॉल्टर यांची कामाची नवी पद्धत, वॉल्टरनी जुन्या संशोधनावर मारलेले कडक ताशेरे आणि त्यांनी काढलेले अनेक निष्कर्ष सर मॉटिमर व्हीलर यांच्यासारख्या अनेक जेष्ठ पुरातत्त्वज्ञांना रूचले नाहीत. वॉल्टरनी केलेल्या टीकांमुळे अनेक प्रस्थापित दुखावले गेले. त्यातच पीएच.डी. प्रबंध तपासण्यासाठी इतर कोणी तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने तो व्हीलर यांच्याकडेच पाठवला गेला. परिणामी पीएच.डी. पदवी १९५८ पर्यंत लांबली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘द आर्किऑलॉजी ऑफ द इंडो-इराणियन बॉर्डरलॅन्ड्सʼ असा होता.

वॉल्टर यांनी पाकिस्तानातील सिंध प्रांतात पुरातत्त्वीय संशोधन सुरू केले (१९५८). या मोहिमेत त्यांनी कुल्ली संस्कृतीच्या (इ.स.पू. २५०० ते २०००) स्थळांचे सखोल संशोधन केले. त्यांचे हे काम १९६५ पर्यंत चालू होते. १९६२ ते १९६८ या काळात ते सिएटल येथील थॉमस बर्क मेमोरिअल म्युझियमचे संचालक होते. याच काळात ते वॉशिंग्टन विद्यापीठातील मानवशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक या पदावर होते. १९६८ मध्ये ते न्यूयॉर्कमधील वासेर कॉलेजमध्ये मानवशास्त्राचे प्राध्यापक झाले. याचवेळी त्यांनी न्यूयॉर्कच्या अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या संग्रहालयात १९६८ ते १९७६ या दरम्यान मानवशास्त्राचे अभिरक्षक ही जबाबदारी सांभाळली. वॉल्टर यांनी १९७४ मध्ये पाकिस्तानातील कराची शहराजवळील अल्लाहदिनो या सिंधू संस्कृतीच्या स्थळाचे उत्खनन सुरू केले आणि १९७७ मध्ये त्याचा अहवालही प्रसिद्ध केला. या उत्खननानंतर त्यांना सिंधू संस्कृतीच्या लिपीमध्ये रस निर्माण झाला. त्यांनी या लिपीचे वाचन करण्यासाठी एक प्रारूपही तयार केले. त्यांचे या विषयावरचे ‘द हरप्पन सिव्हिलायझेशन अॅन्ड इट्स रायटिंगʼ (१९९२) हे पुस्तक महत्त्वाचे मानले जाते.

आपण केलेले संशोधनाचे काम सर्व लोकांपर्यंत जायला पाहिजे, याबद्दल वॉल्टर आग्रही असत. त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांमध्ये केव्ह पेंटिंग्ज ऑफ द ग्रेट हंटर्स (१९५९), द एन्शंट किंगडम्स ऑफ द नाईल अँड द डूम्ड मान्युमेंटस ऑफ नुबिया (१९६२), द रूट्स ऑफ एन्शन्ट इंडिया (१९६९) आणि द आर्किऑलॉजी ऑफ द सदर्न गोबी- मंगोलिया (१९९३) यांचा समावेश आहे. १९८३ मध्ये त्यांनी ‘इस्ट-वेस्ट फ्युजन थिएटरʼ स्थापन करून आपल्या रंगमंच चळवळीला प्रारंभ केला. त्यांच्या या केंद्राने शंभरापेक्षा जास्त नाटके व रंगमंच कार्यक्रम केले. स्वतः वॉल्टरनी शेरॉनमध्ये अनेक नाटकाच्या व मालिकांच्या संहिता लिहिल्या, काही नाटकांमध्ये कामे केली आणि काहींचे दिग्दर्शनही केले.

पुरातत्त्व आणि प्राचीन इतिहास हा विषय घेऊन त्यात रहस्याची भर टाकून लेखक जॉर्ज ल्युकास आणि दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी निर्माण केलेले इंडियाना जोन्स या मालिकेतील चित्रपट प्रचंड गाजले आहेत. यातील ‘इंडियाना जोन्सʼ ऊर्फ डॉ. हेन्री वॉल्टन हे पुरातत्त्वज्ञ पात्र वॉल्टर यांच्यावरून बेतलेले आहे, असे म्हटले जाते. अर्थात हे खरे नसले, तरी स्पीलबर्ग यांनी इंडियाना जोन्सच्या पोशाखाबद्दल व त्याच्या हॅटबद्दल आपल्याशी चर्चा केली होती, हे वॉल्टर यांनी स्वतःच सांगितले होते.

कनेक्टिकट राज्यातील शेरॉन येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • ‘Obituaries: Walter A. Fairservis, 73 Dies; Was Archaeologist and Author.ʼ, New York Times, http://www.nytimes.com/1994/07/16/obituaries/walter-a-fairservis-73-dies-was-archeologist-and-author.html?pagewanted=1
  • ‘Retired Professor Walter A. Fairservice Fr. Diesʼ, Vassar Newspaper & Magazine Archive,Vol. CXXVII, Number 1, 9 September 1994.
  • http://dla.library.upenn.edu/dla/ead/ead.pdf?id=EAD_upenn_museum_PUMu2012

                                                                                                                                                                                    समीक्षक : शंतनू वैद्य