जेकबसन, जेरोम : (१३ जून १९३० – २१ ऑगस्ट २०२०). दक्षिण आशियाई पुरातत्त्व आणि विशेषतः भारतीय प्रागैतिहासिक पुरातत्त्वाच्या क्षेत्रात योगदान देणारे अमेरिकन पुरातत्त्वज्ञ. जेरोम (जेरी) जेकबसन यांचा जन्म न्यूयॉर्कच्या ब्राँक्स भागात एका कनिष्ठ मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे वडील बर्नार्ड व आई ज्युलिया पोलंडहून स्थलांतरित झाले होते. जेकबसननी न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले (१९५१) आणि त्यानंतर दोन वर्षे लष्करात सेवा बजावली. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची लहानमोठी कामे केली. त्यांची पत्रकारिता आणि जनसंपर्क क्षेत्रातली आवड पाहून कोरियामध्ये त्यांना लष्कराच्या प्रसिद्धी विभागात काम देण्यात आले होते. त्यांनी या काळात केलेल्या उत्कृष्ट कामासाठी त्यांना ब्राँझ स्टार हा सन्मान मिळाला होता.

कोरियातून परतल्यावर जेकबसन यांनी काही वर्षे न्यूयॉर्कमध्ये हॉटेल, पत्रकारिता व इतर अनेक कामे केली आणि १९६३ मध्ये कोलंबिया विद्यापीठात मानवशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण सुरू केले. या ठिकाणी त्यांची डोरोथी ॲन डोरेन विल्सन यांच्याशी परिचय झाला आणि पुढे ते विवाहबद्ध झाले. दोघांनी आयुष्यभर एकत्र काम केले. जेकबसन समानतेचे सक्रिय पुरस्कर्ते होते. सर्वांना समान हक्क मिळावेत मार्टिन ल्यूथर किंग यांच्या भव्य मोर्चात जेकबसन आणि डोरेन सहभागी झाले होते (वॉशिंग्टन, १९६३). तथापि लवकरच जेकबसन अध्ययनाकडे परतले आणि त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण (१९६४) केले. या काळात त्यांनी डिकसन माउंड (इलिनॉय) येथील उत्खननात सहभाग घेतला आणि न्यूयॉर्क शहराजवळील स्टॅटन आयलंड येथील टोटेनव्हील या प्रागैतिहासिक स्थळाच्या उत्खननाचे नेतृत्व केले. त्यांचा एम. ए. पदवीचा प्रबंध या उत्खननावर आधारित होता.

जेकबसन कोलंबिया विद्यापीठातील प्रा. राल्फ सोलेकी यांच्या अलास्कातील ब्रुक्स रेंज येथील प्रागैतिहासिक स्थळांच्या शोधमोहिमेत सहभागी झाले. जुन्या जगातील प्रागैतिहासिक पुरातत्त्वाचे अग्रणी असलेल्या सोलेकी यांनी इराकमधील प्रसिद्ध शानिदार गुहेचे (Shanidar Cave) उत्खनन केले होते. त्यांच्या सल्ल्यानुसार प्रा. ह. धी. सांकलिया यांच्याशी संपर्क साधल्यावर जेकबसन यांनी डॉक्टरेटसाठीच्या संशोधनासाठी भारतातील आणि त्यातही प्रागैतिहासिक पुरातत्त्व हा विषय निवडला.

जेकबसन आणि डोरेन यांनी तीन वर्षे भारतात (१९६४-१९६७) राहून मध्य प्रदेशातील रायसेन व सिहोर या जिल्ह्यांमध्ये सखोल पुरातत्त्वीय संशोधन केले. पायी फिरून केलेल्या सखोल क्षेत्रीय सर्वेक्षणांमुळे भरपूर लाभ झाला. एकट्या रायसेन तालुक्यात सु. ५० चौ. किमी. इतक्या लहान भागात ६८ प्रागैतिहासिक स्थळांचा शोध लागला. या स्थळांपैकी ४६ स्थळांवर फक्त सूक्ष्मास्त्रे आढळली होती. हजारो सूक्ष्मास्त्रांचा अभ्यास करून जेकबसननी काढलेले निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले. सूक्ष्मास्त्रे पाहून ती मध्याश्मयुगीन असावीत, असे प्रथमदर्शनी कोणालाही वाटले असते; तथापि जेकबसननी सरसकट तसे केले नाही. अन्न उत्पादन करणाऱ्या लोकांना समकालीन अशा मैदानी प्रदेशातील शिकारी मानव समूहांची सूक्ष्मास्त्रे ऐतिहासिक काळातीलही असू शकतात, हे त्यांचे निरीक्षण त्यांचे वेगळेपण दाखवते. जेकबसननी नंतर भीमबेटका आणि पुतलीकरार सारख्या दहा प्रमुख शैलाश्रय गटांचे अन्वेषण केले. त्यांनी २०० पेक्षा जास्त शैलाश्रयांचा शोध लावला आणि २० शैलाश्रयांमध्ये चाचणी उत्खनन केले. त्यांच्या या संशोधनाचे महत्त्व अशासाठी आहे की, भारतात अश्मयुगीन मानव फक्त नदीच्या काठांवर राहात होता, या समजाला त्यांच्या संशोधनाने छेद दिला. जेकबसन यांनी सावरा व इतर आदिवासी लोकांवर लोकजीवशास्त्रीय निरीक्षणे नोंदवली. या काळात सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञ असलेल्या डोरेन यांनी ग्रामीण जीवन आणि स्त्रियांचा अभ्यास केला. भारतातील वास्तव्यात जेकबसन पतीपत्नींनी निर्माण केलेले स्नेहसंबंध पुढे दीर्घकाळ टिकून राहिले. ते अनेकदा प्रागैतिहासिक संशोधनासाठी भारतात येत असत.

जेकबसन यांचा भारतीय पुरातत्त्वक्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध एका दशक (१९६४–१९७५) कालावधीपुरता मर्यादित होता, परंतु त्यांच्या क्षेत्रीय संशोधनामुळे देशातील अश्मयुगाच्या अभ्यासात लक्षणीय गुणात्मक बदल झाला.  जेकबसन यांना १९७० ते १९८५ दरम्यान पृष्ठभागावर असलेली अश्युलियन संस्कृतीशी संबंधित पुरास्थळे मोठ्या संख्येने आढळली. ही स्थळे तुलनेने अलीकडच्या अश्युलियन काळातील असावीत, असे अनुमान त्यांनी काढले. त्यांना १७५ चौ. किलो. एवढ्या छोट्या क्षेत्रात ९० पेक्षा जास्त पुरापुराश्मयुगीन स्थळे सापडली. पुरापुराश्मयुगीन स्थळांची ही घनता जगात सर्वाधिक असावी, असे मत त्यांनी मांडले. मध्य प्रदेशातील टिकोदा येथील उत्खननांमध्ये जेकबसन यांच्या निरीक्षणाप्रमाणेच आठ ते वीस मी. जाडीच्या निक्षेपात अश्युलियन अवजारांची प्रचंड घनता आढळली. जेकबसन यांच्या भारतीय प्रागैतिहासिक पुरातत्त्वावरील प्रभावाची योग्य दखल अभ्यासकांनी घेतलेली आहे.

जेकबसन यांनी मायक्रोलिथिक काँटेक्टस् इन द विंध्यन हिल्स ऑफ सेंट्रल इंडिया हा प्रबंध पूर्ण केला (१९७०). डॉक्टरेटचा प्रबंध पूर्ण झाल्यानंतर लगेचच जेकबसन यांची ते जेथे शिकले त्या न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर नियुक्ती झाली. मानवशास्त्र विभागातील या पदावर ते अकरा वर्षे होते. जेकबसन यांनी काही काळ इलिनॉय राज्यातील स्प्रिंगफील्ड येथे इलिनॉय स्टेट म्युझियममध्ये काम केले (१९८०) आणि त्यानंतर त्यांनी इलिनॉय राज्याच्या परिवहन विभागाच्या सांस्कृतिक संसाधन व्यवस्थापन (Cultural Resources Management) विभागात पद स्वीकारले. या पदावर दोन दशके असताना त्यांनी इलिनॉय राज्यातील अनेक पुरातत्त्वीय स्थळांवर आपद्-मुक्ती पुनर्वसन प्रकारची उत्खनने आणि संवर्धनाची कामे केली [आपद्-मुक्ती पुनर्वसन पुरातत्त्व]. ते २००२ मध्ये या कामामधून निवृत्त झाले. या काळात त्यांनी वारसा जतन व संवर्धन नियमांमध्ये अनेक महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणल्या होत्या.

निवृत्तीनंतरही जेकबसन खेळ, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक कार्यात क्रियाशील होते. त्यांनी २००२ मध्ये स्प्रिंगफील्ड येथे झालेल्या युद्धविरोधी निदर्शनांमध्ये त्यांनी भाग घेतला होता (२००२).

स्प्रिंगफील्ड येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Ota, S. B.  ‘Dr. Jarome Jacobsonʼ, Puratattva, 50: xvii-xviii, 2020.
  • Paddayya, K. ‘Obituary- Jarome Jacobsonʼ, Man and Environment, XLV (2): 101-103, 2020.
  • https://www.tributearchive.com/obituaries/18055788/Jerome-Jerry-Jacobson

                                                                                                                                                                                       समीक्षक : शंतनू वैद्य