तमिळनाडूतील एक मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे तमिळनाडूतील थुथूकुडी जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर थिरूचेंदूरच्या दक्षिणेस १४ किमी. अंतरावर आहे. कुलशेखरपट्टणम हे प्राचीन बंदर असून ते करामनाइयार नदीच्या मुखापाशी उत्तर तीरावर आहे. कुलशेखरपट्टणम हे नाव पांड्य राजा मारवर्मन कुलशेखर याच्या नावावरून ठेवण्यात आल्याची आख्यायिका आहे. मार्को पोलोने कुलशेखरपट्टणम हे पांड्य राजांच्या काळातील शहर असल्याचा उल्लेख केलेला आहे.

मनप्पाडू येथील दगडी नांगर.

कुलशेखरपट्टणमच्या दक्षिणेस ४ किमी. अंतरावर करामनाइयार नदीच्या दक्षिण तीरावर मनप्पाडू हे गाव आहे. मनप्पाडू परिसरातील मौखिक परंपरेनुसार सन १५४२ मध्ये सेंट झेवियर याने कुलशेखरपट्टणम बंदरात आसरा घेतला आणि मनप्पाडू गावातून मिशनरी कार्याला सुरुवात केली. मनप्पाडू गावातील होली क्रॉस चर्च सन १५८१ मध्ये बांधलेले असून त्यात जेरूसलेममधील पवित्र क्रुसाचा तुकडा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानच्या (NIO) पुरातत्त्वज्ञांनी करामनाइयार नदीच्या मुखापाशी समुद्रात सागरी पुरातत्त्वीय सर्वेक्षण केले. तसेच त्यांनी मनप्पाडू आणि कुलशेखरपट्टणम या गावांच्या परिसरात पुरातत्त्वीय अवशेष शोधण्यासाठी विस्तृत संशोधन केले. कुलशेखरपट्टणम येथे समुद्राच्या जवळ ५०० मी. अंतरावर मध्ययुगीन खापरे व वसाहतीचे पुरावे मिळाले. कुलशेखरपट्टणमच्या जवळ एखादे जहाज फुटलेले असावे, असे दिसले. कारण या फुटलेल्या जहाजावरील कालिकत कंपनीचा शिक्का असलेली कौले आणि विटा गावकऱ्यांनी वापरलेल्या दिसल्या.

मनप्पाडू येथील दगडी नांगराची खाण.

मनप्पाडू व कुलशेखरपट्टणम या गावांच्या मधल्या भागात किनाऱ्यावर भरती-ओहोटीच्या क्षेत्रात आणि किनाऱ्यापासून एक किमी. अंतरापर्यंत समुद्रात केलेल्या सर्वेक्षणात वालुकाश्मांपासून बनवलेले अनेक दगडी नांगर मिळाले. बहुतेक नांगर दोन मीटर खोलीवर आढळले. या नांगरांची लांबी ४० ते ५८ सेंमी. असून रुंदी ३५ ते ४५ सेंमी. आहे. हे नांगर पेरीयापट्टणम या तमिळनाडूच्या किनाऱ्यावरील मध्ययुगीन बंदरात आढळलेल्या नांगरांशी साम्य असणारे आहेत.

मनप्पाडू किनाऱ्यावर भरती-ओहोटीच्या क्षेत्रात २०० मी. लांब व २५ मी. रुंद भागावर पसरलेली दगडी नांगरांसाठीची खाण मिळाली. येथील खडक नांगरांसाठी योग्य असून तेथे खडकात कापलेल्या भागांच्या मोजमापांवरून असे दिसले की, मनप्पाडू व कुलशेखरपट्टणम येथे मिळालेले नांगर बनवण्यासाठी या ठिकाणाहून खडक कापण्यात आले होते. भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावरील अनेक पुरातत्त्वीय स्थळांवर दगडी नांगर मिळाले असले, तरी अशी खाण प्रथमच आणि फक्त याच ठिकाणी आढळली आहे.

 

संदर्भ :

  • Sundaresh; Gaur, A. S. & Tripati, Sila, ‘Marine Archaeological Explorations at Kulasekharapattinam and Manapad Regions, Tamil Naduʼ, Recent Researches on Indus Civilization and Maritime Archaeology of India (Eds., Gaur, A. S. & Sundaresh), pp.  247-253, Agam Kala Prakashan, Delhi, 2015.

                                                                                                                                                                                              समीक्षक :  शंतनू वैद्य