केरळमधील मेरीटाइम पुरातत्त्वीय स्थळ. कोट्टापुरमचा किल्ला केरळमधील त्रिसूर जिल्ह्यात कोडुंगलूर गावाच्या पूर्वेस ५ किमी. अंतरावर पेरियार नदीच्या मुखाजवळ उत्तर तीरावर मेथाला गावाजवळ आहे. या किल्ल्याला क्रांगनोर (Cranganore) असेही नाव आहे.

कोट्टापुरम किल्ला

कोट्टापुरमचा किल्ला मध्ययुगीन असून तो पोर्तुगीजांनी बांधला (१५२३). पुढे तो डचांनी जिंकला (१६६२), पण लगेचच पोर्तुगीजांनी जिंकून घेतला. पुन्हा १६६३ मध्ये डचांनी किल्ल्यावर ताबा मिळवला. १७८९ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संमतीने त्रावणकोरच्या राजाने तो डचांकडून खरेदी केला, पण पुढील वर्षी म्हैसूरच्या टिपू सुलतानाने तो जिंकला आणि उद्ध्वस्त केला.

कोट्टापुरमचे उत्खनन.

सन २००८-२००९ मध्ये केरळ कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चने त्यांच्या पट्टणम येथील उत्खननाच्या संदर्भात प्रारंभिक ऐतिहासिक स्थळांचा शोध घेतला आणि कोट्टापुरम किल्ल्यापाशी पाण्यात बुडलेल्या अवशेषांचा डिजिटल साइड स्कॅनर सोनार उपकरण वापरून शोध घेतला; तथापि त्यात काहीही मिळाले नाही.

केरळ सरकारच्या पुरातत्त्व विभागाने २०१०-२०११ मध्ये किल्ल्याचे उत्खनन केले. अपेक्षेप्रमाणे तेथे सोळाव्या ते अठराव्या शतकातील विविध इमारतींचे व तेथील दैनंदिन वापरातल्या वस्तूंचे अवशेष मिळाले. तसेच येथे झालेल्या संघर्षाच्या खुणा आढळल्या. सध्या दिसणाऱ्या डच कोटाच्या खाली व बुरुजांखाली पोर्तुगीज काळातील बुरूज व कोटाचे बांधकाम मिळाले. काही ठिकाणी डचांनी मूळ रचना तशीच ठेवून केलेले बदल दिसून आले. या बदलांबद्दल लिखित पुरावे नसल्याने किल्ल्याच्या अंतर्गत जागेच्या वापरासंबधी पुरातत्त्वीय उत्खननातून नवीन माहिती प्राप्त झाली. उत्खननात विविध नाणी, दरवाजांचे कडीकोयंडे, बिजागऱ्या, खिळे, मातीची भांडी, धातूच्या वस्तू, लोखंडी व दगडी तोफगोळे, प्राण्यांची हाडे, कौले व विटा इत्यादी वस्तू मिळाल्या. कौले व विटा यूरोपीय धाटणीच्या होत्या. टिपू सुलतानाने किल्ला उद्ध्वस्त करताना केलेल्या जाळपोळीच्या खाणाखुणा दिसून आल्या.

संदर्भ :

  • Abhayan, G. S.; Mungur-Medhi, Jayshree; Joglekar, P. P. & Hemachandran, S. ‘Animal Remains from Kottapuram Fort Excavation, Thrissur District, Keralaʼ, Journal of Indian Ocean Archaeology, 9: 13-22, 2013.
  • Cherian, P. J. Ed., William Logan’s Malabar Manual, Kerala Gazetteers Department, Trivandrum, 2000.
  • IAR: Indian Archaeology – A Review 2008-2009, Archaeological Survey of India, New Delhi.

                                                                                                                                                                                     समीक्षक : सचिन जोशी