पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेला खोदलेले महत्त्वाचे बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. जुन्नरपासून जुन्नर-कुसूर या रस्त्याने या लेणींकडे जाता येते. या टेकडीवर पूर्ण-अपूर्ण मिळून ८४ लेणी, ६० पोढी (पाण्याची टाकी) व ९ ब्राह्मी शिलालेख आहेत. यांपैकी शिवनेरी पूर्व समूहात ५५ लेणी (२ चैत्यगृहे), ४० पाण्याची टाकी व ६ शिलालेख आहेत. शिवनेरी दक्षिण समूहात २३ लेणी (१ चैत्यगृह), १४ पाण्याची टाकी व ३ शिलालेख आहेत, तर शिवनेरी पश्चिम समूहात ६ लेणी व ६ पाण्याची टाकी आहेत. यांतील महत्त्वाच्या लेणींना विद्वानांनी १ ते ८१ क्रम दिले आहेत. यांतील बरीच लेणी सामान्य असली तरी काही महत्त्वाची आहेत.

शिवनेरी पूर्व लेणी-समूह, जुन्नर.

शिवनेरी-पूर्व : जुन्नर गावातून शिवनेरी किल्ल्याकडे जातेवेळी समोरच लेणी दिसायला लागतात. किल्ल्याच्या पूर्वेस, थोडेसे डाव्या बाजूस, पायथ्यापासून हा क्रम सुरू होतो. यातील वरच्या बाजूस असलेल्या कपारीतील काही लेण्यांचे मार्ग पूर्णतः तुटलेले आहेत; त्यामुळे तेथे जाणे अवघड आहे.

लेणे क्र. २ हे एक चैत्यगृह असून याचा प्रकार इतर चैत्यगृहांपेक्षा वेगळा आहे. याच्या दर्शनीभागी कलश असलेले स्तंभ असून मागे अरुंद ओसरी आहे. याचा दरवाजा बराच रुंद असून दाराची चौकट बसविण्यास वरच्या आणि खालील कोपऱ्यात खूप मोठे चौरस खड्डे आहेत. आत चौरस मंडप असून मध्यभागी एक खंडित स्तूप आहे. वरील छत सपाट असून त्यात कसलीच कलाकुसर नाही.

लेणे क्र. ३ ते ५ या एकाला एक लागून असलेल्या चौरस खोल्या असून त्यांच्या उजव्या बाजूस पाण्याचे मोठे टाके आहे. लेणे क्र. ४ मधील शिलालेखात ‘भूतेनक’ नावाच्या व्यक्तीने हे पाण्याचे टाके व लेणे दान दिल्याचे म्हटले आहे.

क्र. ६ ते १५ या सामान्य एक खोलीवजा लेणी असून त्यांस बाहेर ओसरी आहेत. लेणे क्र. १६ व १७ ही दोन मजली असून खालच्या मजल्यास छोटेसे अंगण आहे. मधल्या रुंद दरवाजाच्या दोन्ही बाजूंस खिडक्या असून आत चौरस मंडप व मागील भिंतीत सात खोल्या आहेत. उजवीकडील कोपऱ्यातून वरच्या मजल्यावर जाण्यास जिना आहे. वरती छोटासा मंडप असून, दर्शनी उघडा; परंतु लहानसा कठडा जमिनीवर कोरला आहे. या लेण्यातील शिलालेखानुसार या उपस्थानासाठी ‘मुधकिय मल’ (मूर्धकीय मल्ल) व ‘गोलिकीय (गवळी) आनंद’ (गौल्लिकीय आनंद) यांनी दान दिले.

लेणे क्र. २१ व २२ एकाला एक लागून दोन मोठे मंडप असून आत दोन्ही खोल्यांच्याच चौरस आकारांचे खड्डे आहेत. येथील भिंतींवर हनुमान, दुर्गा इ. देव-देवतांची लहानशी मध्ययुगीन शिल्पे कोरली आहेत. या लेण्यांच्या जवळून, शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या असणारी चोरवाट आहे. लेणे क्र. २५ हे बराच मोठा काटकोनी मंडप असून आतील तिन्ही भिंतींत प्रमाणशीर दगडी बाक कोरला आहे.

लेणे क्र. २७ हे बरेच मोठे असून यास प्रशस्त अंगण आहे. परंतु सुमारे १२-१३व्या शतकांत याचा उपयोग देवालय म्हणून केला गेला असावा, असे दिसते. आतमध्ये काटकोनात मोठा मंडप असून काही खोल्या आहेत. या लेण्यातील खंडित शिलालेखात फक्त ‘यवन’ हा शब्द वाचनीय आहे.

लेणे क्र. ३५ व ३६ ही लहान परंतु शिलालेखामुळे महत्त्व प्राप्त झालेली लेणी आहेत. यांस लागूनच एका ओळीत क्र. ३७ ते ४० या एक-खोलीवजा लेणी आहेत. क्र. ३६ ला छोटीशी ओसरी असून डाव्या बाजूस उठावदार स्तूप कोरला आहे. त्याचा काही भाग तुटलेला असून खालच्या बाजूस पाण्याचे टाके आहे. ओसरीत दरवाजाच्या डाव्या बाजूस भिंतीवर पाच ओळींत खंडित लेख आहे. यानुसार अपगुरिय सवगिरिय याचा पुत्र ‘पतिबधक गिरिभूति’ याने हे लेणे व बाजूचे टाके दान दिले. तसेच या लेण्यास व टाक्यास आणि गावातील धर्मोत्तरीयांच्या भिक्षुणी-संघास कार्षापणांची एक कायम ठेव दिली. या लेखात तत्कालीन जुन्नर नगरीतील भिक्षुणी-संघाचा आलेला उल्लेख महत्त्वाचा आहे. दुसरा महत्त्वाचा उल्लेख ‘धर्मोत्तरीय’ संघाचा आहे. जुन्नर गावात धर्मोत्तरीय संघाचे भिक्षू राहत असावेत, हे यावरून स्पष्ट होते. तिसरा महत्त्वाचा उल्लेख या भिक्षुणी-संघाची मुख्य ही एक स्त्री होती व तिच्या नावावरून (सिवपालितनिका) तो संघ ओळखला जात असे, हे विशेष.

लेणे क्र. ४२ हे या समूहातील मोठे लेणे असून आतमध्ये असलेल्या बारा खोल्यांमुळे यास स्थानिक लोक ‘बारा गडद’ किंवा ‘बारा कोठडी’ असे म्हणतात. लेणे क्र. ४७ हे एक लहानसे विहार असून प्रवेशाजवळ ओसरी तर आतमध्ये चौरस मंडप व पाच खोल्या आहेत. मागील दोन खोल्यांच्या मधील भिंतीवर कोनाड्यात उठावात एक स्तूप कोरलेला असून त्यावर हर्मिका (स्तूपाच्या अंडावरील चौकोनी कठडा) व छत आहेत. बाजूच्या भिंती व छतावर मातीचा गिलावा लावून त्यावर चित्रे काढली होती. छतावर चौरसात वर्तुळे व कमळाची फुले दिसतात.

लेणे क्र. ४८ हे एक चैत्यगृह आहे. त्याचे छत दर्शनी भागाच्या बरेच पुढे असून त्यावर मातीचा गिलावा व रंगकाम केल्याचे दिसते. प्रवेशाजवळ पायऱ्या आणि त्याला लागूनच दगडी बाक कोरला आहे. प्रवेशद्वार प्रशस्त असून त्याच्या दोन्ही बाजूंस खिडक्या आहेत. आतील भागात काटकोनात भव्य मंडप असून समोर दोन कलश, अष्टकोन, उपडा कलश अशा रचनेचे स्तंभ व बाजूंस अर्धस्तंभ दिसतात. मंडपाच्या मागे मागील भिंतीपासून वेगळा असलेला स्तूप अत्यंत सुंदरपणे कोरला आहे. त्यास वेदिकापट्टी व हर्मिका असून त्याची सुबक छत्री दगडी छतात कोरली आहे. सपाट छत, काटकोनात मंडप व स्तूपाची छत्री छतात कोरणे, तसेच याचे स्तंभ आत आडव्या ओळीत कोरणे, हे या चैत्यगृहाचे खास वैशिष्ट्य आहे. या लेण्यातील लेखात गृहपतिप्रमुख व व्यापारी असणाऱ्या ‘वीरसेन’ याने या चैत्यगृहासाठी दान दिले आणि ते सर्व लोकांच्या कल्याणासाठी व सुखासाठी अर्पण केले, असा उल्लेख आहे.

लेणे क्र. ४९ ते ५३ सामान्य प्रकारची लेणी असून येथील पाण्याच्या दोन टाक्यांवर शिलालेख आहेत. त्यांतील पहिल्या लेखानुसार ‘गता’ देशाचा यवन (ग्रीक) ‘इरिल’ याने पाण्याची दोन टाकी दान दिली, तर दुसऱ्या टाकीवरील लेखानुसार उपगुरिय सवगिरिय याचा पुत्र पतिबधक, गिरिभूति व त्याची पत्नी शिवपालनिका यांनी लेणे व टाक्यांस कायम निधी दिला असल्याचे म्हटले आहे.

चैत्यगृह, लेणे क्र. ५९, शिवनेरी दक्षिण, जुन्नर.

शिवनेरी दक्षिण : शिवनेरीच्या दक्षिणेकडील लेणीसमूहाकडे जाण्यासाठी किल्ल्यातील पाचव्या दरवाजातून उजवीकडे वळावे लागते. शिवाई मंदिराच्या खालील पाऊल वाटेने गेले असता लेणी दिसतात. या समूहातील तीन लेणी महत्त्वाची असून इतर सामान्य आहेत.

लेणे क्र. ५५ यास लांबट ओसरी असून मागे काही खोल्या व बाक आहेत. या लेण्यातील लेखानुसार उपासक उगाहचा पुत्र ‘इसिपालित’ (ऋषिपालित) व त्याच्या मुलांनी दानकर्म केले.

लेणे क्र. ५७ हे आकाराने लहान असून, यास छोटीशी ओसरी, मंडप व बाक आहेत. बाहेर उजवीकडे प्रशस्त पाण्याचे टाके खोदले असून त्यावरील लेखात गता देशाचा यवन ‘चित’ (चैत्र) याने संघास हा ‘भोजनमंडप’ दान दिल्याचे म्हटले आहे.

लेणे क्र. ५९ हे एक जोड लेणे असून त्याच्या डाव्या बाजूस चैत्यगृह व उजवीकडे भिक्षुगृह आहे. हा चैत्याचा एक नवीन प्रकार दिसून येतो. चैत्याला दर्शनी स्तंभ होते, ते सध्या खंडित झाले आहेत. दर्शनी स्तंभांच्या मागे छोटीशी ओसरी असून प्रवेशद्वारातून आत गेल्यावर काटकोन मंडप दिसतो. याचे छत सपाट आहे. तसेच मागील भिंतीपासून अलग स्तूप अखंड दगडात कोरला आहे. पण त्यावर हर्मिका व छत्र नाही. बहुतेक हे दोन्ही भाग विटांत व लाकडांत केले असण्याची शक्यता आहे. या मंडपाच्या उजव्या भिंतीत दार असून त्यातून बाजूच्या खोलीत मोठा मंडप व त्याच्या मागील भिंतीत दगडी बाक कोरला आहे. या लेण्यातील लेखातून उगाहचा पुत्र इसिपालित (ऋषिपालित) आणि त्याच्या कुटुंबीयांनी हे चैत्यगृह दान दिल्याचे समजते. या चैत्यगृहानंतर एक लेणे असून तेथे तटाच्या भिंती व बुरूज संपतो.

शिवनेरी पश्चिम : या समूहाकडे जाण्यास सोयीचा मार्ग किल्ल्याच्या उत्तरेकडील पायथ्याने आहे. जुन्नर गावातून पुढे किल्ल्याचे उत्तरेकडील टोक पार केल्यानंतर पश्चिमेच्या बाजूने एका बिकट पाऊलवाटेने वरती जाता येते. या लेणी-समूहातील दोन लेणी महत्त्वाची आहेत.

लेणे क्र. ७६ हे या समूहातील मोठे लेणे आहे. यास लांबट ओसरी असून छतावर चार उतरत्या पायऱ्यांची चौकट असून त्यास प्रत्येकी खाली एक छिद्र आहे. जमिनीवर खांबांच्या पायाचे अवशेष नाहीत. यावरून येथे घडीव दगडांचे स्तंभ उभारले असावेत, असे दिसते. ओसरीतील छतावर रंगकामाचे अवशेष दिसतात. प्रवेशद्वार रुंद असून दोन्ही बाजूंस खिडक्या आहेत. लेण्याच्या आत प्रशस्त मंडप असून त्याच्या सर्व भिंतींस दगडी बाक कोरले आहेत. संपूर्ण छत सुबकतेने चितारले असून त्यावर कमळ व वर्तुळे रंगविलेली दिसतात. शिवनेरी पूर्व व गणेश लेणी समूहांत अशाच प्रकारे छत रंगविले आहेत. त्यामुळे या लेणी समकालीन वाटतात. लेणे क्र. ८१ हे शेवटच्या टोकास असून त्यास चौरस मंडप, तीन खोल्या व डाव्या बाजूस पाण्याचे टाके आहे.

संदर्भ :

  • Jadhav, Suresh V. Rock-cut Cave Temples at Junnar-An Integrated Study, Ph.D. Thesis submitted to the University of Poona, 1980.
  • जाधव, सुरेश वसंत, जुन्नर-शिवनेरी परिसर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८२.

                                                                                                                                                                         समीक्षक : मंजिरी भालेराव