स्पॉन, जेकब : (७ जानेवारी १६४७ – २५ डिसेंबर १६८५). जाक स्पॉन. पुरातत्त्वविद्येच्या उगमकाळात सर्वप्रथम भूतकाळाच्या अभ्यासासाठी ‘पुरातत्त्वʼ हा शब्द वापरणारे फ्रेंच प्रवासी, शोधक व वस्तूसंग्राहक. त्यांचा जन्म फ्रान्समधील लिआँ येथे झाला. मूळ जर्मन वंशाचे त्यांचे कुटुंब काल्विनिझम (Calvisim) या प्रॉटेस्टंट पंथाचे होते. वडील चार्ल्स हे प्रथितयश डॉक्टर होते. वडिलांनी त्यांना स्ट्रासबुर्ग (स्ट्रॅसबर्ग) येथे वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवले.

स्ट्रासबुर्ग येथे स्पॉन यांची चार्ल्स पॅटिन याच्याशी भेट झाली. त्याने स्पॉन यांना जुन्या वास्तू आणि नाणकशास्त्राची ओळख करून दिली. त्या काळात या दोन्हींचा अभ्यास प्राथमिक अवस्थेत होता. स्पॉन यांनी मोंपेलिए (Montpellier) येथून त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली (१६६८) आणि त्यानंतर लिआँमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यांचे रुग्ण श्रीमंत वर्गातील असत. त्यांनी लिआँ शहराचा ऐतिहासिक वारसा आणि पुरातन अवशेष यांच्यावर आधारलेले आपले पहिले पुस्तक Recherche des antiquités et curiosités de la ville de Lyon (१६७३) प्रकाशित केले. या काळात त्यांचा यूरोपातील नामवंत तत्त्वज्ञ, वैज्ञानिक आणि धर्म अभ्यासक यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार चालत असे.

स्पॉन यांनी इंग्लिश वनस्पतिशास्त्रज्ञ सर जॉर्ज व्हेलर (१६५०–१७२३) यांच्याबरोबर इटली, ग्रीस, कॉन्स्टँटिनोपल आणि लेव्हान्त (तुर्कस्तान) येथे प्रवास केला (१६७५-७६). व्हेलर यांनी प्रवासवर्णन स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले व त्यात वनस्पतींप्रमाणेच जुन्या नाण्यांची व वस्तूंची वर्णने होती. व्हेलर यांचा संग्रह पुढे ऑक्सफर्ड विद्यापीठाला देण्यात आला. स्पॉन यांनी प्रवासातून अनेक मौल्यवान नाणी, कोरीव लेख आणि हस्तलिखिते आणली होती. त्यांनी १६७८ मध्ये Voyage d’Italie, de Dalmatie, de Grèce et du Levant हे पुस्तक लिहिले आणि त्यांच्या या लेखनामुळे यूरोपात प्रथमच ग्रीक पुरावस्तूंची व्यवस्थित माहिती उपलब्ध झाली. पुढील दीडशे वर्षे हे पुस्तक ग्रीस व पूर्वेकडील देशांच्या इतिहासाचे एकमेव साधन मानले जाई.

स्पॉन यांनी आपल्या संशोधनावर आधारित Histoire de la république de Genève (१६८०), Récherches curieuses d’antiquité (१६८३) आणि Miscellanea eruditae antiquitatis (१६८५) अशी तीन पुस्तके प्रकाशित केली. त्यांतील शेवटचे पुस्तक रोमन काळातील पुरावस्तूंच्या व कोरीव लेखांच्या संशोधनाचे सार होते आणि या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी प्राचीन काळाच्या अभ्यासासाठी आर्किओलोगीया (archaeologia) हा ग्रीक शब्द वापरला. ही पुरातत्त्व संज्ञेची सर्वांत जुनी व्याख्या आहे.

पुरातत्त्व विषयावरील लेखनाखेरीज स्पॉन यांनी ताप आणि विशेषतः हिवताप या विषयावर विपुल अभ्यास केला होता. त्यांनी Observations sur les Fievres et les Febrifuges (१६८५) या पुस्तकात तापावरील उपचारासंबंधी लेखन केले आहे. त्यांचे Observations sur les Fievres हे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले (१६८७).

स्पॉन यांचे वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी स्वित्झर्लंडमधील वेवे येथे क्षयरोगामुळे निधन झाले.

संदर्भ :

  • Constantine, David, Early Greek Travellers and the Hellenic Ideal, Cambridge University Press, 1984.
  • Knight, Caroline, ‘The Travels of Rev. Sir George Wheler (1650-1723)ʼ, The Georgian Group Journal, X: 21-25, New York, 2000.
  • https://referenceworks.brillonline.com/entries/christian-muslim-relations-ii/jacob-spon-COM_28374
  • https://peoplepill.com/people/jacob-spon
  • https://resource.nlm.nih.gov

                                                                                                                                                                                   समीक्षक : जयेंद्र जोगळेकर