(स्विचिंग हब, ब्रिजिंग हब, मॅक ब्रिज; Swiching hub, bridging hub, MAC bridge). संगणक जालकातील हार्डवेअरचा एक प्रकार. संगणक जालकाला विविध उपकरणे जोडण्याकरता त्याची मदत होते. अंतिम ठिकाणाकडून माहिती ही संगणक–ऐवजाच्या (packet swiching) रूपात मिळविण्याकरता किंवा पुढे अग्रेषित करण्याकरता त्याचा उपयोग करतात.
लोकल एरिया नेटवर्कमध्ये (LAN; स्थानिक क्षेत्र जालक) स्विच सर्व संगणकांचा भौतिक पत्ता (Physical Address) ज्याला मॅक पत्ता (MAC Address) असे देखील म्हणतात, एका सारणीमध्ये साठवून ठेवतो व माहिती पाठविताना या सारणीमधून ज्या संगणकाला माहिती पाठवायची आहे, त्याचा पत्त्यावर पाठविली जाते. मुख्यतः स्विचचे दोन प्रकार पडतात : आभासी स्विच (Virtual Switch) आणि मार्गक स्विच (Routing Switch).
जालक स्विच हे बहु-थांबे (multiport) जालक पूल आहे. यामध्ये मॅक पत्त्यांचा वापर करून माहिती ओपन सिस्टम इंटरकनेक्शन प्रतिकृतीच्या डेटा लिंक लेअरवर (लेअर २; स्तर २) अग्रेषित केली जाते. काही स्विच अतिरिक्त राउटिंग कार्यक्षम सुविधा समाविष्ट करून नेटवर्क स्तरावर (लेयर 3; स्तर ३) माहिती अग्रेषित करू शकतात. अशा स्विच सामान्यतः स्तर ३ स्विच किंवा बहुस्तरीय स्विच म्हणून ओळखल्या जातात.
ईथरनेट स्विच हे जालक स्विचचे सर्वात सामान्य प्रकार आहे. डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनच्या नेटवर्किंग प्रगत विकास गटातील अभियंता मार्क केम्फ यांनी 1983 मध्ये पहिल्यांदा मॅक-ब्रिज याचा शोध लावला. दोन थांबे असणारे उत्पादन (LANBridge 100) कंपनीने लवकरच सादर केले. कंपनीने नंतर ईथरनेट आणि एफडीडीआय या दोन्हींसाठी गिगास्विच सारख्या बहु-थांबे स्विचची निर्मिती केली.
डिजिटल या कंपनीने त्याच्या मॅक-ब्रिज एकस्वाला स्वामित्व-मुक्त, भेदभावरहित आधारावर परवाना देण्याचा निर्णय घेतला, त्याला आयईईई (IEEE) मानकास परवानगी दिली. यामुळे इतर अनेक कंपन्यांना बहु-थांबे स्विचचे उत्पादन करण्याची परवानगी मिळाली. ईथरनेट हे सुरुवातीला सामायिक-प्रवेश माध्यम होते, परंतु मॅक ब्रिजच्या परिचयाने कोणत्याही अधिक्षेत्रात प्रवेश न करता सर्वात सामान्य बिंदू-ते-बिंदू (पॉइंट-टू-पॉइंट; Point-to-point) रचनेमध्ये त्याचे परिवर्तन करणे शक्य झाले. इतर प्रकारच्या जालकांसाठी सुद्धा स्विच अस्तित्वात आहेत.
प्रत्येक थांब्यातून समान डेटा प्रसारित करणारे आणि उपकरणांना त्यांना संबोधित केलेला डेटा निवडू देणारे पुनरावर्तक हब याऐवजी जालक स्विच जोडणी केलेल्या उपकरणांची ओळख जाणून घेतो आणि नंतर फक्त त्या उपकरणाशी जोडणी केलेल्या थांब्यावर डेटा अग्रेषित करतो.
स्विचचे फायदे : स्विच हे आंतरजालाची माहिती वाहून नेण्याची क्षमता (Bandwidth) वाढवते, स्विच हे संगणक वापरकर्त्याचे काम कमी करते, स्विच आंतरजालाची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते.
स्विचचे तोटे : स्विच हे इतर आंतरजाल साधनापेक्षा महाग असतात, स्विचचा उपयोग करून आंतरजाल मधल्या समस्या सोडवणे थोडे अवघड जाते.
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Network_switch
- http://csc.columbusstate.edu/summers/NOTES/cs458/chap02/sld018.htm
- https://searchnetworking.techtarget.com/definition/switch
समीक्षक : विजयकुमार नायक