राष्ट्रीय भात संशोधन संस्था, कटक (स्थापना : २३ एप्रिल १९४६) १९४२ साली त्यावेळच्या बंगाल प्रांतात भाताच्या पानावर कॉक्लिओबोलस मियाबिनस कवकामुळे (बुरशी) भातावरील तांबेरा रोगामुळे भाताचे पीक नष्ट झाले. भाताचा राष्ट्रीय पातळीवर फार मोठा तुटवडा निर्माण झाला. त्याच्या जोडीला भरीस भर म्हणून त्या वेळच्या व्यवस्थापनाने अशा संकटाचा सामना करण्यासाठी योग्य ती पावले न उचलल्याने १९४३ ला त्याचे रुपांतर फार मोठ्या दुष्काळात झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १९४४ मध्ये भात पिकासंबंधी विविध दृष्टिकोनातून संशोधन करायचे ठरवले. पुढील वर्षी सरकारने भातावर संशोधन करणारी मध्यवर्ती संस्था स्थापन केली आणि त्यातूनच पुढे २३ एप्रिल १९४६ ला सी आर आर आय म्हणजेच केंद्रीय भात संशोधन संस्थेचा(Central Rice Research Institute (CRRI) उदय झाला.
ओडिशातील कटक शहरातील विद्याधरपूर भागात ओडिशा शासनाने दिलेल्या ६० हेक्टर जमिनीवर ही संस्था कार्यरत झाली. संस्थेचे पहिले संस्थापक संचालक म्हणून प्रसिद्ध भात संशोधक डॉ के रामय्या यांची नियुक्ती करण्यात आली. कालांतराने या संस्थेचे व्यवस्थापकिय नियंत्रण भारतीय कृषि संशोधन परिषदेकडे सोपवण्यात आले. २०१५ साली संस्थेचे नामकरण झाले- भा.कृ.सं. सं. राष्ट्रीय भात संशोधन संस्था. या संस्थेची तीन संशोधन केंद्रे आहेत. हजारीबाग झारखंड येथे पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या भातपिकाचे संशोधन केले जाते (rice research on rain fed upland ecologies;). गेरुआ आसाम येथे पावसाच्या पाण्यावर येणारे पिक परंतु पूररोधक भातावर संशोधन केले जाते (rice research on flood prone rain fed lowland ecologies;). तिसरे केंद्र आंध्र प्रदेशातील नायरा येथे असून किनारी परिसंस्थेतील खार जमीनीत येणाऱ्या भातावर संशोधन केले जाते (rice research on coastal saline ecologies). राष्ट्रीय भात संशोधन संस्थांतर्गत दोन कृषि विज्ञान केंद्रे कार्यरत असून ती ओडिशातील संथपूर (कटक) आणि झारखंड मधील जाइनगर (कोडर्मा) अशी आहेत.
आपल्या देशाचा न्याय्य विकास तसेच शाश्वत अन्न पुरवठा व पोषण सुरक्षितता निश्चित करणे ही संस्थेची दूरदृष्टी (vision) आहे. भात पिकवणाऱ्या व भात ग्राहकाच्या आजच्या व उद्याच्या पिढीची अन्न व पोषण सुरक्षितता सुनिश्चित करणे हे ध्येय आहे. जगातील एक तृतीयांश लोकसंख्येची भूक भात भागवते हे लक्षात घेतले तर अशा संस्थेचे महत्त्व अधोरेखित होते.
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसीत करून त्याचे वितरण करणे जेणे करून उत्पादन वाढेल भात उत्पादनातील शाश्वतता टिकवणे व उत्पादकांना अधिक मूल्य मिळेल हे संस्थेचे विशेष कार्य (मिशन) आहे.
संस्थेतील संशोधकांनी भात संशोधन संदर्भात जीवरसायन, नील-हरित शैवाल, कीटकविज्ञान, अन्नतंत्रज्ञान, कृमिविज्ञान (निमॅटोलॉजी), फिजिऑलॉजी म्हणजेच वनस्पतीतील शरीरक्रियाविज्ञान, पिकातील आंतर जनन आणि जनुकिय विज्ञान / आनुवंश विज्ञान (जेनेटिक्स), वनस्पतीतील रोगविज्ञान आणि कवकविज्ञान या विविध शाखात संशोधन केले जात आहे.
ओडिशा मधील कटक-पारदीप या राज्य महामार्गावर कटक या ठिकाणी ही संस्था असून रेल्वे स्टेशन पासून ती ७ कि.मी. तर भुवनेश्वर विमान तळापासून ती ३५ कि.मी. वर आहे. २०.५ उत्तर व ८६ पूर्व अंश तिची भौगोलिक स्थिती असून समुद्र सपाटीपासून ती २३.५ मीटर वर आहे. कटक येथे जुन ते ऑक्टोबर या काळात सुमारे १५०० मिमी पाउस पडतो जो खरीप पिकांना उपयुक्त आहे. रबीच्या मोसमात म्हणजे नोव्हेंबर-मे या काळात थोडा पाउस पडतो.
उद्देश: पिक विकासाधिष्ठीत पायाभूत, उपयोजीत आणि अनुकूली प्रकारातील संशोधन करणे, तसेच सर्व प्रकारातील पारिस्थिकीमध्ये भाताचे उत्पादन वाढावे व पावसावर अवलंबून पिक व्यवस्थापन करणे. जमिनीची उपल्ब्धता कमी होत असताना सर्वच प्रकारच्या परिस्थितीकीत उपयुक्त संशोधनातून उपयोजीत तंत्रज्ञानाच्या सहायाने भात व भात पिक पधतीतून शाश्वत उपज मूल्य मिळवणे.
भाताचे जर्मप्लाज्म गोळा करणे त्याचे मूल्यांकन, संवर्धन आणि परस्पर देवाण-घेवाण करून सुधारीत वाणांचे वितरण वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि विभागीय संशोधन केंद्रांना करणे. निरनिराळ्या पिक पद्धतीतील एकात्मिक कीड-रोग नियंत्रण तंत्रज्ञान व पोषण व्यवस्थापन विकसित करणे. भात उत्पादनातील जैविक, सामाजिक, आर्थिक आणि संस्थागत अडथळ्यांचे मूल्यमापन करून शेती व पारिस्थिकीतील विविध अवस्था आणि शेतकऱ्याची आर्थिक मानसिक स्थिती यांचा साकल्याने विचार करून सुधारणेसाठी उपाय सुचवणे. देशातील भात शेतीतील उत्पादकता आणि फायदा या संदर्भात पारिस्थिकी, परिसंस्था शेती पद्धती आणि भाताच्या जातीतील आकडेवारी एकत्रीत करून ती जतन करणे.
भात पिकवण्याच्या विविध पद्धतीच्या अनुषंगाने भात संशोधन क्षेत्रातील, शेतकरी, कामगार, संशोधक आणि प्रशिक्षक यांना प्रशिक्षण देणे. भारतातील भात पिक पद्धती तसेच भाताशी निगडीत इतर पिक पद्धतींची विविध स्वरूपातील माहिती एकत्रीत करून ती जतन करून ठेवणे इत्यादी.
2020-21 हे वर्ष राष्ट्रीय भात संशोधन केंद्राचे पंचहत्तरावे वर्ष होते.
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा