इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन : (स्थापना – १९९२-९३) इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन (IISA) ही संस्था १९९२-९३ मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थेची प्रमुख उद्दिष्टे अशी आहेत: १) संख्याशास्त्र व संभाव्यता यामधील शिक्षण व संशोधनास जगभरात, विशेषत: भारतीय उपखंडात प्रोत्साहन देणे; २) विविध देशांतील तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील माहिती व ज्ञान यांचे संख्याशास्त्राच्या जोपासनेसाठी आदानप्रदान करणे; ३) तरूण संख्याशास्त्रज्ञांच्या गरजा पूर्ण करणे आणि ४) शिक्षण, संशोधन, उद्योगधंदे, व्यापार व व्यवसाय यात सभासदांच्या संयुक्त प्रयत्नांना प्रोत्साहन देणे.
संख्याशास्त्रीय पद्धती ही आयआयएसएची अधिकृत ज्ञानपत्रिका आहे. त्यात स्वीकारलेले लेख तज्ञांच्या टिपणीसह प्रसिद्ध केले जातात. त्याचसोबत संस्था संख्याशास्त्र आणि डेटा सायन्स या विषयांवर प्रगत पुस्तक मालिका प्रकाशित करत आहे. नियमितपणे वृत्तपत्रिका आणि वार्षिक परिषद आयोजित करून संस्था तिच्या सभासदांना संख्याशास्त्रातील नवीन घडामोडीवर चर्चा करण्यास प्रोत्साहन व व्यासपीठ देते.
आयआयएसए तर्फे दिले जाणारे पुरस्कार असे आहेत:
- आयआयएसए जीवनगौरव पुरस्कार: संख्याशास्त्र विषयात असामान्य योगदान (संशोधन, मार्गदर्शन आणि सेवा) देणाऱ्या संस्थेच्या सभासदास दिला जातो.
- आयआयएसए सेवा पुरस्कार: आयआयएसए संस्थेच्या सभासदांसाठी अनन्य सेवा देणाऱ्या संस्थेच्या सभासदास दिला जातो. मात्र ही संख्या प्रतिवर्षी दोनपर्यंत मर्यादित आहे.
- तरूण संख्याशास्त्रातील संशोधक पुरस्कार: संख्याशास्त्र विषयात सिद्धांत, पद्धती, उपयोजन आणि संख्याशास्त्रीय व्यवसाय यांतील प्रत्येक बाबीत असामान्य योगदान देणाऱ्या तीन तरूण सभासदांना हा पुरस्कार दिला जातो. २०१८ पासून उद्योगक्षेत्र व सरकारी संस्था यामध्ये संख्याशास्त्रीय व्यवसाय करताना योगदान देणाऱ्या पण वयाने लहान असणाऱ्या संख्याशास्त्रातील संशोधकास हा पुरस्कार दिला जाईल असा त्यात बदल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांसाठी शोधनिबंध स्पर्धा घेतली जाते. यात दोन पारितोषिके असतात. एक सैद्धांतिक आणि दुसरे उपयोजनावरील शोधनिबंधासाठी असते.
संदर्भ :
- https://www.intindstat.org/
- https://www.niss.org/…/international-indian-statistical-association-annual-conferenc
- https://uia.org/s/or/en/1100049943
- http://www.intindstat.org
समीक्षक : विवेक पाटकर