नारायणगावकर,विठाबाई भाऊमांग : (जुलै १९३५ – १५ जाने २००२) महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत . तमाशा सम्राज्ञी .महाराष्ट्रातील तमाशा परंपरेतील एक धाडसी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व .जन्म पठ्ठेबापूरावांच्या तमाशातून प्रेरणा घेतलेल्या शाहीर भाऊ-बापूमांग नारायणगावकर आणि शांताबाई या दांपत्यापोटी पंढपूर येथे . विठ्ठलाच्या कृपेने कन्यारत्न प्राप्त झाले असे मानून मुलीचे विठाबाई ठेवण्यात आले. विठा तशी दिसायला गोंडस, चुणचुणीत, गोड गळ्याची .त्यामुळे रूप, स्वरूप आणि सौंदर्य या तिन्ही गोष्टी तिला जन्मजात मिळालेल्या . लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाकडं विठाबाईंचा विशेष ओढा होता. घरी असताना तमाशातल्या लावण्या, गवळणी, भेदीक त्यांच्या कानावर आपसूक पडत होत्या. त्यांचा हा कलेकडचा ओढा बघूनच वडिलांनी शिक्षणाची सक्ती केली नाही आणि वयाच्या चौथ्या – पाचव्या वर्षीच विठाबाईंची शाळेपासून दुरावल्या आणि वडिलांच्या तमाशाबरोबर गावोगाव तमाशा सादरीकरणासाठी भटकंती करू लागल्या. तमाशाच्या कणातीत जन्माला आलेली मुलगी भाऊ बापूंच्या तमाशा बोर्डाबरेाबर गावोगावी फिरू लागली. गायकीची ढब संवादाची फेक आणि नृत्याची अदब आत्मसात करू लागली. भाऊ-बापूच्या तमाशात विठाबाई आपल्या कलेची चुणूक दाखवून जात होत्या. ही कला मामा वरेरकरांनी लक्षा आणि विठाबाईंना आपल्या कलापथकात पाठवून द्यायची विनंती त्यांनी भाऊंना केली. नंतर विठाबाई मामा वरेरकरांच्या कलापथकातून काम करू लागल्या. त्यामुळे त्यांना तमाशा सादरीकरणाचा अनुभव आणि संस्कार मिळाला . गाण्याची लय कशी असावी, आवाजाची सुरावट कशी असावी, चेहऱ्यावरचे हाववभाव त्यांच्या संगतीला असलेला पदन्यास कसा असावा हे विठाबाईने त्या काळात आत्मसात केले. नाट्याशास्त्राचे लौकिक अर्थाने कुठलेही शिक्षण न घेतलेली विठाबाई अंगीक , वाचिक, सात्विक , अभिनयाची अभिव्यक्ती करायला लागली. त्या तमाशा सादर करण्यासाठी गावोगाव फिरत तेव्हा त्यांना कुठलाही आर्थिक मोबदला म्हणजे बिदागी मिळत नसे तर केवळ खायला शिळे अन्न मिळत असे .अशा काळापासून विठाबाईनी तमाश्यात काम करत होत्या.
सन १९५७ मध्ये भाऊ नारायणगावकर यांचे निधन झाले. तमाशाच्या बोर्डाची पूर्णपणे जबाबदारी विठाबाईंवर येऊन पडली. विठाबाईंच्या फडात काम करणारे कलावंत हे विठाबाईंवर विसंबून होते. याची जाणीव मनी ठेवून न डगमगता नव्या जोमाने भाऊ-बापूमांग नारायणगावकर या नावाने तमाशा उभा केला. तमाशा परंपरेत काम करत असताना विठाबाईंनी जेवढे ऐश्वर्य पाहिले होते तेवढेच दुःख, दैन्य अनुभवले. विठ्ठलाने मला लोकांच्या मनोरंजनाबरोबर प्रबोधनासाठी पाठविले आहे. मी माझ्या कलेचा उपयोग लोकशिक्षणासाठी करेन ही खुणगाठ मनी बाळगून विठाबाईंनी महाराष्ट्रात मराठवाडा, खान्देश, विदर्भ, कोकण पट्ट्यातील गावागावात आपली कला सादर केली . महाराष्ट्रात विठाबाईच्या गायन नृत्यकलेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुकही केले. पुण्यातील मारूती सावंत यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्यानंतर तमाशाचा गाडा चालवता चालवता विठाबाईंनी संसाराचा गाडाही ओढला. विठाबाईला मंगला, विद्या, मालती, संध्या, भारती अशा पाच मुली तर विजय, कैलास आणि राजेश ही तीन मुले अशी आठ अपत्ये. कलावंताची कलेवरची निष्ठा ही त्यावर आलेल्या संकटाचा सामना करताना कशी असते हे विठाबाईकडून शिकण्यासारखे आहे.तमाशाच्या चौरंगावर काम करताना त्यांनी बाळंतपणाच्या जीवघेण्या यातनाही सहन करून रसिकांची सेवा केली आहे.विठाबाईच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. मग ते कात्रजच्या घाटात विठाबाईच्या गाडीला झालेला अपघात असेल, बाळंतपणातून सावरणं असेल, सावळा बापूबरोबर सांसारिक कलह असेल पण तिने धीर सोडला नाही. तमाशा थाटात करायचा आणि सामाजिक बांधिलकी जपायची ही तिने मनाशी खुणगाठ बांधली होती .
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची ,नेसली पितांबर जरी या त्यांच्या लोकप्रिय लावण्या आहेत.शिवाय रक्तात न्हाली कुऱ्हाड,रंगल्या रात्री अशा ,छोटा जवान ,मुंबईची केळेवाली ,मराठा सरदार , सापडला हरी नायकिणीच्या घरी ,चंद्रमोळ,शिवप्रताप आणि रायगडची राणी ही त्यांची गाजलेली वगनाट्ये आहेत.भारत-चीन युद्धाच्या दरम्यान विठाबाईंनी लष्करातील सैनिकांसाठी त्यांनी नेफा सीमेवर १९६२ तमाशा सादर केला होता . घरापासून दूर देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना तमाशा कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा बहूमान विठाबाईंनी मिळाला. तमाशा चालवत असताना सर्वाची साथ सुटलेली असताना विठाबाई वेगवेगळ्या शेठ सावकाराकडून कर्जाने घेऊन आर्थिक आपत्ती ओढवली असताना तमाशा उभा केला. श्रीमंती ही केवळ बोर्डावरची हीच मालमत्ता घेऊन वार्धक्यात विठाबाई जीवन व्यतीत करू लागल्या . विठाबाई १९६८ साली पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय तमाशा परिशदेच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी १९९० रोजी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कारही दिला. दलित नाट्यासंमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार, जागतिक महिला दिन पुरस्कार, माननीय शदर पवार, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, खासदार फुलनदेवी, खासदार रामदास आठवले, खासदार शबाना आझमी यांच्या हस्तेही विठाबाईंचा गुणगौरव करण्यात आला. भारत सरकारचा सन्मानाचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.१९९० मध्ये त्यांना कलेतील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. योगदानाबद्दल पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचा दया पवारांच्या नावे या बहुआयामी विठाबाईचा गौरव करून सन्मानही करण्यात आला.
पुण्यात एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

This Post Has 3 Comments

  1. Vikramsimh Mandlik

    नेफा सीमेवर तमाशा सादर केल्याचा उल्लेख नाही. ही गोष्ट खरी आहे किंवा कसे?

  2. जगतानंद भटकर

    नेफा सीमेवर विठाबाई यांनी कलेचे सादरीकरण केले, ही बाब त्यांच्या आत्मकथनात आली आहे.

Vikramsimh Mandlik साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.