लिमये, आनंदराव रामचंद्र : (२९ नोव्हेंबर १९२७—२५ मे १९९४). जयपूर घराण्याचे महाराष्ट्रातील एक थोर गायक. त्यांचा जन्म कोल्हापूरात झाला. आनंदरावांचे वडील रामचंद्र ऊर्फ भाऊसाहेब यांना गाण्याची विशेष आवड होती. या आवडीतून त्यांनी आणि त्यांच्या स्नेह्यांनी मिळून ‘करवीर गायन समाज’ या संस्थेची कोल्हापूरात स्थापना केली. याचेच पुढे गायन समाज देवल क्लब या प्रथितयश संस्थेत रूपांतर झाले. आनंदरावांच्या लहानपणी त्यांच्या घरात अल्लादियाखाँ, गोविंदराव टेंबे यांसारखे दिग्गज कलाकार येत असत. त्यांच्या संगीतविषयक चर्चा आनंदरावांच्या कानावर पडायच्या. त्यांना लहानपणापासून गाण्याची आवड तर होतीच, ती घरामधील अशा सुसंस्कृत वातावरणामुळे अधिकच वाढीला लागली. पण कोवळ्या वयात झालेल्या अपघातामुळे आनंदरावांना दृष्टीदोष निर्माण झाला आणि त्यांचा शालेय शिक्षणाकडील ओढा कमी झाला. त्यामुळे त्यांचे संगीतशिक्षण मात्र जोमाने सुरू झाले. तरीही त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर दहा वर्षे ते कोल्हापूरातील मेन राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर त्यांनी संगीत विशारद व संगीत प्रवीण या पदव्याही घेतल्या.
संगीताची प्रारंभिक तालीम घेण्यासाठी वडिलांनी आनंदरावांना ग्वाल्हेर घराण्याचे गायक वामनराव पाध्ये यांच्याकडे सोपवले. माधवराव जोशी यांच्याकडून देखील त्यांना मार्गदर्शन प्राप्त झाले. त्यानंतर जयपूर घराण्याचे थोर गायक गोविंदबुवा शाळिग्राम यांच्याकडून त्यांना जयपूर घराण्याची नियमित आणि दीर्घ तालीम मिळाली. विविध राग, वैविध्यपूर्ण ताना, आलापी करताना घ्यावयाची काळजी, चीजेचे बोल कसे घ्यावे इत्यादींची मोठी समज यामुळे त्यांना आली. गोविंदराव टेंबे यांचेदेखील मोलाचे मार्गदर्शन या संदर्भात त्यांना मिळाले. काही काळानंतर अल्लादियाखाँचे नातू अझीझुद्दीनखाँ (बाबा) यांचे लिमयेबुवा गंडाबंद शागीर्द झाले आणि जयपूर घराण्याची गायकी त्यांना आणखी जवळून शिकता आली. त्यांच्या सादरीकरणात ग्वाल्हेर आणि जयपूर या दोन्ही घराण्यांतील शिकवणीचा ते वापर करीत. अझीझुद्दीनखाँसाहेबांच्या तालमीमुळे सुरुवातीच्या जलद तानबाजीकडून ते संथ दमदार आलापीकडे वळले. तसेच त्यांच्याकडून धृपदाची तालीमही आनंदरावांना मिळाली. त्याचा उपयोग त्यांचे गाणे अधिक परिपक्व आणि भारदस्त होण्यात झाला.
गमक युक्त आलापी, ताना, आकर्षक बोलतान, विलक्षण चपळाईची वजनदार तान आणि कुशलतेने गाठलेली सम ही आनंदरावांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होत. कानडा प्रकार, साख प्रकार, नट प्रकार हे ते अत्यंत कुशलतेने सादर करून जाणकारांची वाहवा मिळवीत. लोकानुनय न करता संपूर्ण मैफलभर रागदारी संगीतच सादर करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी ते होते. गौड मल्हार आणि अरवी रागाचे मिश्रण करून त्यांनी कुन्दावती या रागाची निर्मिती केली. याशिवाय सुमंगला हाही राग निर्मिला. जयपूर घराण्याचे अनेक अनवट राग ते सौंदर्यपूर्णरीतीने सादर करीत. चेंबूरला अल्लादियाखाँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या त्यांच्या विद्वत्तापूर्ण व रंगतदार गायनाने त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. १९८७ मध्ये औंध येथे झालेल्या संगीत महोत्सवात त्यांनी अतिशय तयारीने गायलेल्या हुसैनी कानडा रागाच्या आणि ‘कैसे कटे दिन रैन’ या बंदिशीच्या सादरीकरणामुळे त्यांना तेथे खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्यांना अनेक मैफलींची आमंत्रणे मिळाली. दिल्ली, कानपूर, बनारस, कोलकाता, अमेरिका इत्यादी ठिकाणी देशविदेशात त्यांच्या गाण्याच्या मैफली झाल्या.
आनंदरावांच्या सुधीर पोटे, अरुण कुलकर्णी, वासंती टेंबे, एम. जी. पटवर्धन, सुखदा काणे, विश्वास शिरगावकर आदी शिष्यमंडळींनी त्यांचा संगीताचा वारसा पुढे सुरू ठेवला. जयपूर घराण्याचा बोज कायम ठेवून परिणामकारक रीतीने लालित्यपूर्ण प्रस्तुती करण्याची मोठी क्षमता लाभलेल्या आनंदरावांचे कर्करोगामुळे कोल्हापूर येथे निधन झाले.
आनंदरावांच्या पंचविसाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत ‘आनंद-पर्व’ हा कार्यक्रम गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने घेण्यात आला (२०१८). या कार्यक्रमात जयपूर-अत्रौली घराण्यातील मान्यवर गायकांनी जयपूर गायकीचा आकृतिबंध गायन आणि चर्चेच्या माध्यमातून उलगडून दाखविला. लिमयेबुवांच्या स्मरणार्थ ‘आनंद-पर्व’ ही स्मरणिकाही संस्थेकडून काढण्यात आली आहे.
समीक्षक : सुधीर पोटे