मायरसन, रॉजर (Mayarson, Rojer) : (२९ मार्च १९५१). अमेरिकन अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. मायरसन यांना तांत्रिक अभिकल्प प्रणाली (Mechanism Design Theory) विकसित केल्याबद्दल लिओनिड हुर्विक्झ (Leonid Hurwicz)एरिक स्टार्क मॅस्किन (Eric Stark Maskin) यांच्याबरोबरीने २००१ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला.

मायरसन यांचा जन्म बोस्टन शहरात ज्यू  कुटुंबात झाला. सुरुवातीला त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला व तेथून ए. बी. (Bachelor of Arts) व १९७३ मध्ये एस. एम. (Master of Science) या उपयोजित गणित विषयातील पदव्या मिळविल्या. १९७६ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठातू ‘ए थिअरी ऑफ को-ऑपरेटीव्ह गेम्सʼ या विषयावर प्रबंध लिहून पीएच. डी. पदवी प्राप्त केली. त्यांनी शिकागो विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयाचे ग्लेन लॉईड डिस्टिंग्यूश्ड हे प्राध्यापकाचे पद धारण केले होते.

मायरसन यांनी १९७६ – २००१ या काळात नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाच्या केलॉग, स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. त्यांचे तेथील संशोधनकार्य पुढे अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळण्यास कारणीभूत ठरले. दम्यान त्यांनी १९७८-७९ मध्ये बाइलेफेल्ड विद्यापीठात, तर १९८५-८६ आणि २०००-२००१ या कालावधीत अन्य विद्यापीठात अर्थशास्त्राचे अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही अध्यापन केले. २००१ मध्ये ते शिकागो विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रूजू झाले व आजही तेथेच मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. अर्थशास्त्राबरोबरच राज्यशास्त्र विषयातील त्यांचे योगदानही महत्त्वाचे मानले जाते. तत्पूर्वी प्रसिद्ध अर्थतज्ञ जॉन फोर्ब्स नॅश (John Forbes Nash) यांनी पाया घातलेल्या क्रीडा सिद्धांत (Game Theory) प्रणालीचे शोधन (Refinement) करून विशिष्ट खेळामधील व्यक्तींच्या माहितीचा स्तर जर भिन्न असेल, तर त्यांचा परस्परातील संवादावर परिणाम करणाऱ्या घटकांचा शोध घेण्याचे तंत्र मायरसन याने विकसित केले. अर्थविषयक संवादामधील प्रेरणावर निर्बंध घालणाऱ्या घटकांचा त्यांच्या या विश्लेषण पद्धतींचा अर्थतज्ञ मोठ्या प्रमाणावर उपयोग करताना दिसतात. मायरसन यांनी क्रीडा सिद्धांतांचा विस्तार आर्थिक प्रश्नांबरोबरच राजकीय स्वरूपांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच निवडणूक पद्धतीत विविधता आणून व घटनात्मक बदल करून राजकीय स्वरूपाच्या प्रेरणा कशा देता येतील, यांसंबंधीही मार्गदर्शन केले.

मायरसन यांनी आपल्या तांत्रिक अभिकल्प सिद्धांताचा उपयोग बाजारपेठातील परिस्थितीमध्ये सुधारणा होऊन बाजाराला चालना मिळावी यासाठी केला. तसेच संबंधित घटकांना त्यापासून मिळणाऱ्या लाभात वृद्धी कशी होईल, याबाबतचे मार्गदर्शनही केले. बाजारपेठांतील विक्रेते व ग्राहक या दोघांना परस्परांच्या प्रेरणा व अपेक्षा क्वचितच माहिती असल्याने व त्यांचा माहितीचा स्तरही भिन्न असल्याने तेथील संसाधनांचा वाजवी विनियोग होण्यात अडचणी येतात. यासाठी मायरसन यांनी साक्षात्कार (Revelation) तत्त्व प्रस्तापित केले, की ज्यामध्ये ग्राहक वस्तू व सेवांसाठी किती किंमत देण्यास तयार आहेत याविषयींची खरीखुरी माहिती पुरविल्यास ग्राहकांना प्रोत्साहन मिळते. लिओनिड हुर्विक्झ यांनी प्रामुख्याने भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थांच्या विश्लेषणासाठी जी गणिती अर्थशास्त्रीय प्रणाली विकसित केलेली होती, तिचा विस्तार पुढे मायरसन याने केला. त्यांच्या संशोधनामुळे अर्थशास्त्रातील विचारवंत तसेच शासनकर्त्यांना भिन्न स्वरूपाच्या अर्थव्यवस्थामध्ये उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त विनियोग कसा करता येईल, यासाठी मार्गदर्शन झाले. सर्वांत प्रसिद्ध अशा ऑक्शन डिझाइन या शोधनिबंधात शासनाला तसेच इतर संस्था व्यक्तींना लिलाव पद्धतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा कसा मिळविता येईल व ग्राहकांना सदर व्यवहाराबाबतची जास्तीत जास्त माहिती कशी उपलब्ध होईल यांसाठीची प्रणालीही त्यांनी विकसित केली. त्याचा लाभ गेल्या पंचवीस वर्षांत अनेक खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील पेढ्यांना झाल्याचे दिसून येते. सौदाशक्ती सिद्धांताचे सामाजिक निवड सिद्धांताशी कसे नाते असते व सामाजिक निवड प्रक्रिया राबवताना जास्तीत जास्त सत्य परिस्थिती कशी समोर येऊ शकेल यांबाबतचे त्याचे शोधनिबंधही विशेष गाजले.

मायरसन यांचे पुढील ग्रंथ प्रसिद्ध आहेत : गेम थिअरी : ॲनालिसिस ऑफ कॉन्फ्लिक्ट्स (१९९१), प्राबॅबिलिटी मॉडेल्स फॉर इकॉनॉमिक डिसिजन्स (२००५), फोर्स ॲण्ड रिस्ट्रेंट इन स्ट्रॅटेजिक डिटेरन्स (२००७), कॅपिटॅलिस्टिक इन्व्हेस्टमेंट ॲण्ड पोलिटिकल लिब्रलायझेन (२०१०).

मायरसन यांना नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्याच्या मूलभूत स्वरूपाच्या संशोधन कार्यासाठी पुढील सन्मान लाभले : अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेस-व्हाइस-प्रेसिडेंट (२०००), जीन जॅक्वीज लॅफोंट प्राइस (२००९), कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स सदस्य (२००० व २००५ नंतर), प्रेसिडेंट ऑफ इकॉनॉमेट्रिक सोसायटी (२००९), गेम थिअरी सोसायटीचे अध्यक्ष (२०१२ पासून पुढे). त्याला अनेक विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट्स देऊन सन्मानित केलेले आहे. 

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा