आशियायी अर्थव्यवस्थांच्या सखोल अभ्यासावर आधारित एक प्रसिद्ध अर्थशास्त्रीय ग्रंथ. या ग्रंथाचे लेखन १९६८ मध्ये ख्यातनाम स्वीडिश अर्थतज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञ कार्ल गन्नार मीर्दाल यांनी केले. हा ग्रंथ मीर्दाल आणि त्यांचे सहकारी यांनी प्रदीर्घ काळ केलेल्या आशियायी अर्थव्यवस्थांच्या सखोल अभ्यासावर आधारित आहे. मीर्दाल हे प्रामुख्याने त्यांच्या मौद्रिक समतोल, घटनापूर्व वर्तुळाकार संचयित कारण, परंपरा अशा क्षेत्रांतील मूलभूत योगदानाविषयी प्रसिद्ध आहेत. मीर्दाल हे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्या सुरुवातीच्या समर्थकांपैकी होते; मात्र त्यांचा असाही दावा होता की, केन्स यांच्या जनरल थिअरी या पुस्तकापूर्वी चार वर्षे त्यांनी आपल्या मोनेटरी इकॉनॉमिक्स या पुस्तकात राज्यवित्तीय धोरण आणि अंदाजपत्रकाचे अर्थव्यवस्थेला गतिमान किंवा मंद करण्यासाठी असलेले महत्त्व मांडले होते. या संदर्भात विल्यम बार्बर यांनी असे म्हटले होते की, ‘जर मीर्दाल यांचे लेखन इ. स. १९३६ पूर्वी इंग्रजी भाषेत उपलब्ध झाले असते, तर ज्याला आपण ‘केन्सवादी क्रांती’ म्हणतो, त्यालाच ‘मीर्दालीय क्रांती’ असे म्हटले गेले असते.’

अमेरिकेतील ‘दी ट्वेंटीथ सेंच्युरी फंड’ नावाच्या ट्रस्टने आग्नेय आशियातील स्वातंत्र्य पर्वात सुरू झालेल्या विकासकार्याचा आढावा घेण्याचे काम मीर्दाल आणि सहा विख्यात अर्थतज्ज्ञांच्या समितीवर सोपविले. या समितीने हे काम १९५३ मध्ये आरंभ केले आणि जवळजवळ पंधरा वर्षे सातत्याने निरीक्षण-अभ्यास करून १९६७ मध्ये संपवून हा बृहद्ग्रंथ हातावेगळा केला. ‘आग्नेय आशियातील विकासपर्व’ हे या अभ्यासाचे क्षेत्र असले, तरी पंचवार्षीकीय योजनांचा पद्धतशीर उपक्रम केवळ भारतानेच सातत्याने केलेला असल्यामुळे या ग्रंथातील निरूपण बहुतांशी भारतासंबंधीच आहे. मूलग्राही प्रश्न सामंजसपणे विचारल्यानेच सिद्धांत तयार होण्यास मदत होते, अशी मीर्दाल यांची भूमिका होती.

एशियन ड्रामा हा ग्रंथ दक्षिण आशियातील काही प्रमुख देशांच्या अभ्यास पाहणीवर आधारित आहे. ही पाहणी १९५८ ते १९६८ या दहा वर्षांच्या कालखंडात केली गेली. हा ग्रंथ एकूण तीन खंडात विभागलेला असून सुमारे २,२८४ पृष्ठे त्यात आहे. त्याची प्रस्तावना ७० पृष्ठांची आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर पाश्चिमात्य देशांमध्ये अस्वस्थकारी, तर पौर्वात्य विकसनशील देशांमध्ये भयमिश्रित आणि निराशाजनक खळबळ निर्माण झाली. पाश्चात्त्य देशांनी गेल्या दोन दशकांत विकासनिधीच्या नावाखाली जे अब्जावधी रकमेचे साह्य आशियायी देशांना केले होते, ते वाया गेले. त्यामुळे पाश्चात्त्य देश अस्वस्थ झाले; तर मीर्दाल यांनी आशियायी देशांतील आर्थिक आणि सामाजिक गोंधळाचे खापर खुद्द त्याच देशांवर फोडल्यामुळे आशियात दु:खमिश्रित भीती होती. मीर्दाल यांच्या या पुस्तकातून भांडवलशाही आणि साम्यवाद या दोहोंऐवजी एका मधल्या मार्गाचा पुरस्कार केला गेला आहे, ज्यात या दोन्ही पद्धतींच्या काही बाबींचा समावेश आहे. त्यांचा भर विचारांच्या आणि अभिव्यक्तीच्या स्पष्टतेवर आहे, तर त्यांचा शोध पूर्वग्रहविरहित खऱ्याखुऱ्या शास्त्रशुद्ध स्वातंत्र्यासाठी आहे.

एशियन ड्रामा या पुस्तकासाठी मीर्दाल यांना आपल्या अगोदरच्या अमेरीकन डायलेमा या पुस्तकाच्या लेखनाचा आणि तिसऱ्या जगातील अनेक राजधुरीणांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचे साह्य झाले. या पुस्तकाद्वारे त्यांनी दुर्लक्षित असलेल्या पूर्वीच्या वसाहती देशांना जगाच्या पृष्ठभूमीवर येण्यास आणि अवलंबिताऐवजी बरोबरीने सहभाग घेण्यास महत्त्वपूर्ण मदत केली आहे. अतीविकसित पश्चिम राष्ट्रे आणि गरीब परंतु निश्चयी पूर्वेकडील देशांमधील दुवा म्हणून काम करण्याची भूमिका या पुस्तकाने साधली आहे.

खंड एक : एशियन ड्रामा या ग्रंथाच्या पहिल्या खंडामध्ये तीन प्रकरणे आहेत. त्यांत प्रदीर्घ प्रस्तावना; अभ्यासाची व्याप्ती आणि दिशा; निवडलेली गृहीत मूल्ये आणि मूल्यांकनाचे विस्तारित क्षेत्र; राजकीय समस्या; स्वातंत्र्यप्राप्ती; स्वातंत्र्याचे कळीचे घटक; वसाहतिक भारताची फाळणी आणि त्यांचे परिणाम; पाकिस्तान, श्रीलंका आणि आग्नेय आशिया यांचे आर्थिक वास्तव; लोकसंख्या आणि विकास संसाधने; राष्ट्रीय उत्पादन आणि अर्थव्यवस्थेची संरचना; राहणीमानाच्या पातळी आणि विषमता; आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल प्रवाह; प्रारंभीच्या स्थितीतील फरक इत्यादी घटकांचा समावेश आहे.

एशियन ड्रामा या ग्रंथाचे प्रारंभीचे लेखन पाश्चात्त्य आर्थिक विचारांमधील पूर्वग्रहयुक्त मूल्यांच्या समस्येवर प्रकाश टाकणारे आहे. शिवाय, ज्या समाजात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कृती व वातावरणाची परस्परांमध्ये सरमिसळ झालेली असते, अशा ठिकाणी अमूर्त आर्थिक सिद्धांत व्यवहार्य ठरत नाहीत, हे प्रतिपादनही या ग्रंथात ठळकपणे व्यक्त झाले आहे; परंतु ते वास्तवाला धरून असले, तरी मीर्दाल यांचे हे अपारंपरिक विचार आता बहुतेक सर्वच व्यावहारिक तज्ज्ञांमध्ये प्रचलित झालेले आहेत. या विचारसरणीच्या पायावर त्यांनी या ग्रंथात दक्षिण आशियातील प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका, फिलिपीन्स, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांवर आधारित चर्चा केली आहे. त्यांचा प्रदीर्घ राजकीय इतिहास दिलेला आहे. यात प्रामुख्याने त्या देशांचा स्वातंत्र्याकडे होणारा प्रवास आणि त्याची प्रक्रिया विशद केली आहे; परंतु यातील माहितीचे स्रोत सर्वच ठिकाणी योग्य पद्धतीचे आहेत, असे नाही. जे. पी. नेटल आणि टीकाकारांच्या मते, पुस्तकातील माहितीचे स्रोत हे विषयाला धरून नाहीत. या विश्लेषणात एखाद्या देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळविताना मानवी शक्यता, अपेक्षा, स्वघोषित उद्दिष्टे आणि वास्तवातील परिस्थिती यांच्यातील प्रचंड मोठ्या तफावतीला तोंड द्यावे लागते. या समस्येचा उल्लेख मीर्दाल यांनी आपल्या ग्रंथात केला नाही.

खंड दोन : दुसऱ्या खंडात एकूण चार प्रकरणे आहेत. त्यांत नियोजनाच्या विचारसरणीचा प्रसार आणि परिणाम; समता आणि लोकशाही; समाजवादाची संकल्पना आणि व्यवहार; लोकशाही नियोजनाची संकल्पना आणि व्यवहार; खासगी क्षेत्रांवरील कार्यात्मक नियंत्रणे; भ्रष्टाचाराची कारणे आणि परिणाम; बेरोजगार आणि अर्धरोजगार; पारंपरिक शेतीमध्ये आणि इतर क्षेत्रांतील श्रम विनियोग; औद्योगिकीकरणाच्या समस्या; हस्तकला आणि लघुउद्योग; कृषी धोरण; लोकसंख्येचे भवितव्य आणि लोकसंख्या धोरण इत्यादी मुद्दे आहेत.

ग्रंथातील पहिल्या खंडाच्या तिसऱ्या भागात आणि संपूर्ण दुसऱ्या खंडात दक्षिण आशियाचे सविस्तर आर्थिक आणि लोकसंख्याविषयक विश्लेषण केले आहे. सदर विश्लेषण अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना महत्त्वपूर्ण आहे. ग्रंथात विशेषतः बेरोजगारीच्या संकल्पना आणि अतिरिक्त ग्रामीण लोकसंख्येवरील रामबाण उपाय म्हणून शहरीकरणाचा पुरस्कार अशा लोकप्रिय संकल्पनांचे चिकित्सक विश्लेषण केले आहे. या संकल्पना अव्यवहार्य असल्याचे या विश्लेषणातून दिसून येते. मीर्दाल यांनी ग्रंथात लोकसंख्येतील बदल आणि आर्थिक वृद्धी यांच्यातील परस्परसंबंधांवर सविस्तर चर्चा केली आहे. तसेच सामाजिक खर्च आणि मानव संसाधनांमधील गुंतवणुकीचे आर्थिक लाभ अशा घटकांवरही सदर ग्रंथात विस्तृत स्पष्टीकरण आहे.

आशियायी देशांतील परिस्थितीचे मोजमाप करताना रोजगार, अर्धरोजगार या आर्थिक संज्ञांचा वापर करणे चुकीचे आहे, असे मीर्दाल निक्षून सांगतात. पारंपरिक शेतीमध्ये होणारा श्रमशक्तीचा वापर, उद्योगधंद्यात होणारा श्रमशक्तीचा वापर, औद्योगिक प्रश्न, लहान आणि ग्रामीण धंद्यांचे स्थान, शेतीधोरण व लोकसंख्येची समस्या या विषयांची सविस्तर मांडणी ग्रंथात दिसून येते.

खंड तीन : या खंडात लोकसंख्या गुणवत्तेच्या समस्या आहेत. त्यात मनुष्य संसाधनातील गुंतवणूक;  आरोग्य; शिक्षण वारसा, साक्षरता आणि प्रौढ शिक्षण; शालेय शिक्षणव्यवस्था या मुद्द्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त राजनय संकल्पना; अल्पविकसित देशांतील नियोजनाचा प्राथमिक सिद्धांत; आग्नेय आशियातील आर्थिक प्रारूपे आणि त्यांची उपयुक्तता; नियोजनाची संरचना; नियोजनातील किंमत यंत्रणेची भूमिका; अर्ध रोजगाराच्या संकल्पनेचे टीकात्मक मूल्यमापन; लोकसंख्या बदलाच्या आर्थिक परिणामांवरील योग्य दृष्टीकोन; सकारात्मक कार्यात्मक नियंत्रणे; आग्नेय आशिया आणि यूरोपातील राष्ट्रवादाची तुलना, स्थलांतर; भारतातील कुटुंब नियोजन धोरण; दरडोई उत्पन्नाची मोजणी; उत्पन्न विषमतेचा अंदाज; निर्यात उत्पन्नातील अस्थिरता व बेरोजगारी आणि अर्धरोजगारावरील निवडक अभ्यास यांचे टीकात्मक मूल्यमापन या ग्रंथात दिसून येते.

या खंडात प्रामुख्याने विविध समस्यांवर आधारित विश्लेषणाची पुरवणी पत्रके आहेत. त्यांतील ‘मागासलेपणा व विकासाची यंत्रणा आणि विकासासाठीच्या नियोजनाचा आराखडा’ या लेखातून मीर्दाल यांचे मूलभूत विचार प्रकट होताना दिसतात. यात नियोजन हे आर्थिक स्वरूपाचे हत्यार नसून राजकीय हत्यार आहे, हे वास्तव राजकीय नियंत्रण आणि सामाजिक बदलांद्वारे आर्थिक नियोजनाच्या समन्वयाची गरज, गरीब देशातील उपभोग आणि उत्पादकता यांच्यातील थेट संबंध या आणि अशा अनेक बाबींची चिकित्सा केलेली आहे.

एशियन ड्रामा या पुस्तकामध्ये प्रामुख्याने तार्किकता; भविष्याचे नियोजन; उत्पादकता व राहणीमान पातळीतील वाढ; सामाजिक व आर्थिक समानता; राष्ट्रीय स्वातंत्र्य; राजकीय लोकशाही; सामाजिक शिस्त व सुधारित संस्था आणि प्रवृत्ती या घटकांचा उघड उघड पुरस्कार आढळतो. तसेच मीर्दाल यांनी देशांच्या किंवा प्रदेशांच्या विकासाच्या विविध पातळीवरील बदल आणि परिणामांचे विश्लेषण देण्यासाठी आपल्या ‘प्रतिगामी आणि विस्तारक परिणाम’ या संकल्पनाचे विवेचन या ग्रंथात दिले आहे.

यूरोपियन सामाजिक प्रश्नांची जशी सामूहिक दृष्टीने चिकित्सा करतात, तशीच आशियायी देशात केली जाते; याला मीर्दाल यांनी ‘पाश्चात्त्य धर्तीवरचे समग्र प्रारूप निर्मिती’ असे नाव दिले आहे. अर्थशास्त्राची मोजमापे, कोष्टके ही आशिया खंडातील सामाजिक परिस्थितीमध्ये आर्थिक विकास योजनांची आखणी वा मापन करताना मुळीच उपयोगाचे नाहीत; त्यांचा आशिया खंडात वापर करणे भ्रामक, अशास्त्रीय असून ते हानीकारक ठरेल, हे त्यांनी आपल्या एशियन ड्रामा या ग्रंथात आग्रहपूर्वक प्रतिपादन केले आहे.

मीर्दाल यांना टोकाचा साम्यवाद आणि अनियंत्रित निर्हस्तक्षेपवाद अमान्य असल्याने त्यांनी अर्थव्यवस्थेच्या समस्यांवर उपाय म्हणून कर सवलती किंवा करवाढ, नियंत्रित जमीन सुधारणा आणि माहितीचा तार्किक पातळीवरील वापर हे मार्ग वापरणे योग्य असल्याचे प्रतिपादन केले. तसेच आदर्श गरीब देशाने शासनाच्या थेट निर्देशनाखालील बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेचे प्रारूप निवडावे. याद्वारेच त्यांचा विकास होऊ शकेल असा उल्लेख केला. हा दृष्टीकोन पूर्णपणे पाश्चात्त्य सामाजिक लोकशाहीयुक्त दृष्टीकोन आहे. एकंदरीत, त्यांचा कल पूर्णतः पाश्चात्त्य मार्गाकडे नसला, तरी पाश्चात्त्य धर्तीच्या आदर्श राज्यव्यवस्थेकडे ते झुकलेले आहे. पाश्चात्त्य प्रारूपांना कितीही नाकारले, तरी त्याच प्रकारची उद्दिष्टे या ग्रंथात दिसून येते. हा एक प्रकारे मीर्दाल यांचा अर्थशास्त्रीय पेच म्हणता येईल.

भारतासारख्या देशात शासनाकडे प्रचलित प्रवृत्ती आणि संस्था बदलून टाकण्याचा निर्धार होता आणि त्या दृष्टीने योग्य पावले उचलण्याची व त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही होती. या उपाययोजनांमध्ये राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे प्रभावी जाती निर्मूलन, कुळकायद्यासारख्या जमीनसुधारणा, तर्कनिष्ठ पशुसंवर्धन धोरण (यात अर्धपोटी पशूंची हत्या करणे संमत होते), सर्व पल्ल्यावरील भ्रष्टाचार निर्मूलन, सुशिक्षित बेरोजगारीची समस्या घालविण्यासाठीच्या प्रभावी योजना अशा अनेक धोरणांचा समावेश होता. हे या ग्रंथात नमुद आहे; मात्र मीर्दाल यांच्या मते, तत्कालीन भारतीय शासनाला हे सर्व उपाय अमलात आणता आले असते, तर एशियन ड्रामा या पुस्तकाची गरजच भासली नसती. यालाच तिसऱ्या जगातील ‘धोरण तफावत’ असे संबोधले जाते. प्रचलित ‘आशियायी नाट्याची’ अखेर दीर्घ आणि दुःखद अंताकडे होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मीर्दाल यांनी या ग्रंथात म्हटले आहे.

एशियन ड्रामा या पुस्तकात कोणतेही क्रांतीकारक निष्कर्ष मांडलेले नाहीत; परंतु त्यात सर्वमान्य असलेल्या शक्यतांवर भर दिलेला आहे. एकीकडे स्वयंविकासासाठी आवश्यक आधुनिकतेचे आदर्श आणि दुसरीकडे श्रेयस असणारी उद्दिष्टे आणि कृती यांच्यातील कठीण अशा निवडीचे पुरेपूर दर्शन हे पुस्तकात दिसून येते. आर्थिक समस्या, वांशिक संबंध आणि जागतिक गरिबी यांवर वास्तववादी आणि व्यावहारिक संशोधनाद्वारे पूर्वग्रहयुक्त, प्रचलित आर्थिक विचारसरणीला पर्यायी मते मांडण्याची अभ्यासपद्धती सामाईक आहे, असे ग्रंथात आढळून येते. तसेच या ग्रंथाद्वारे आदर्श मूल्ये आणि वास्तव यांच्यातील द्वंद्वाचे चित्रण आढळते.

रावसाहेब पटवर्धन यांनी एशियन ड्रामा या ग्रंथाबाबत म्हणतात की, ‘डोंगर पोखरून उंदीर काढावा त्याप्रमाणे पंधरा वर्षे अध्ययन-संशोधन करून लिहिलेल्या २,५०० पृष्ठांमध्ये मीर्दाल आणि त्यांच्या सहकारी वर्गाने काढलेले निष्कर्ष भारतातील प्रचलित विचारवंतांच्या मतापेक्षा निराळे नाहीत. व्यवहारज्ञानाने जे साधारणपणे आकलन करणे शक्य आहे, त्यापेक्षा या ग्रंथातून काही नवा प्रकाश मिळत नाही’. तसेच ग्रंथाच्या विस्तृत व्याप्तीमुळे निरूपणामध्ये आवश्यक असा बांधेसूदपणा आलेला नाही. निरूपण पाल्हाळीक आणि पुनरुक्तीपूर्ण झाले आहे, असेही मत त्यांनी नोंदविले आहे.

गोखले अर्थशास्त्र संस्थेचे वि. म. दांडेकर यांनी या ग्रंथाचे परीक्षण करताना आपल्या खास शैलीत असे मत व्यक्त केले की, ‘हे तीनही खंड दप्तरजमा करून मीर्दाल यांनी आपले निष्कर्ष सुटसुटीत आणि बांधेसूदपणे छोटा एखादा ग्रंथ लिहून व्यक्त केले असते, तर अभ्यासकांवर उपकार झाले असते’. एकंदरीत, ग्रंथाच्या तिनही खंडांत मुद्देसूद आणि ठसठशीत चर्चेचा अभाव आढळतो, ही सार्वत्रिक टीका केली जाते.

मीर्दाल यांनी एशियन ड्रामा या ग्रंथाला ‘आशियायी नाट्य’ म्हटले आहे; कारण आशिया खंडातील आधुनिक आणि पारंपरिक मूल्यांचा नाट्यमय संघर्ष या ग्रंथातून व्यक्त होतो. विविध आर्थिक व्यूहरचनांच्या परस्परविरोधी स्वरूपातून निर्माण होणारा संघर्षही यात आढळतो. विशेषतः भारत आणि इंडोनेशिया यांसारख्या लोकसंख्या बहुल देशांमध्ये १९६० नंतरच्या तीन दशकांमधील आणखीही काही नाट्यमय घटनांचे सूतोवाच यात आढळते. त्यामुळे आज एकविसाव्या शतकात या पुस्तकाचे विस्मरण झाले असले, तरी त्यातील विचारांचा मूलभूत गाभा आजही उपयुक्त ठरतो.

संदर्भ :  

  • पटवर्धन, रावसाहेब, आशिया खंडातील आधुनिक महाभारत, पुणे, १९६९.
  • Myrdal, Gunnar, Asian Drama : An Inquiry into the Poverty of Nations, Vol – I, II, III, London.
  • The New Palgrave Dictionary of Economics, 1987.

समीक्षक : अनिल पडोशी