आयुर्वेदातील एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना. याला रसायनी, नाडी, पंथ, मार्ग, शरीर छिद्र, संवृत, असंवृत, स्थान, आशय आणि निकेत असे पर्यायी शब्द देखील आहेत. मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी तयार झालेले आहे. त्यातील स्त्रोतस हा एक आकाशीय भाव आहे. स्त्रोतस म्हणजे ‘पोकळी’ असे त्याचे विवेचन करता येईल.
ज्या शरीरभावांना स्वत:चे रंग, रूप, गुण आहेत, त्यांना मूर्तभाव असे संबोधले जाते. शरीरामध्ये जे मूर्त स्वरूपातील भाव आहेत, त्या प्रत्येकाचे स्वत:चे स्त्रोतस असते. या स्त्रोतसांमध्ये शरीरभावांची उत्पत्ती होत असते. क्रोध, शोक, भय, मोह, लोभ, मत्सर, द्वेष, इच्छा अशा अनेक भावांची निर्मिती शरीरात होत असते. हे भाव शरीरात उत्पन्न होत असेल तरी त्यांना स्वत:चे रंग, रूप, गुण नाहीत. म्हणजेच त्यांना मूर्तीमत्व नाही, म्हणून या मानसभावांचे स्त्रोतस शरीरात नाहीत. परंतु, मन हे मूर्त आहे. कारण अणुत्व व एकत्व हे मनाचे गुण आहेत. परिणामी मनाचे वेगळे स्त्रोतस आहे.
काही आचार्यांच्या मते स्त्रोतसांची संख्या खूपच असल्याने त्यांची गणना होऊ शकत नाही, तर काहींच्या मते स्त्रोतसांची गणना होऊ शकते. चरकांच्या मते शरीरात असंख्य भावपदार्थ आहेत. त्या सर्वांचे स्वतंत्र स्त्रोतस असल्याने ती असंख्य आहेत. तरी महत्त्वाच्या १३ स्त्रोतसांचे त्यांनी वर्णन केले आहे. सुश्रुतांनी मात्र स्त्रोतसांच्या ११ जोड्या म्हणजे २२ स्त्रोतसांचे वर्णन केले आहे.
स्त्रोतसांमध्ये परिणमन घडते आणि नवीन भावपदार्थांची निर्मिती होते. परिणमनासाठी आवश्यक असा पोषकांश त्यातून वाहत असतो. या पोषकांशावर त्या त्या अग्नीची प्रक्रिया होऊन पोष्य अथवा स्थायी भाव पदार्थ उत्पन्न होतात. स्त्रोतसांमधून जे वहन होते ते पोषकांशाचे. पोष्य भावपदार्थांचे वहन करतात, त्या सिरा आणि धमनी इ. नावांनी ओळखल्या जातात.
स्त्रोतसांचे बहिर्मुख स्त्रोतस आणि अंतर्मुख स्त्रोतस असे दोन प्रकार पडतात. बहिर्मुख स्त्रोतसांचे मुख हे शरीराच्या बाह्य भागात उघडते, तर अंतर्मुख स्त्रोतसे संपूर्णत: शरीराच्या आत असतात. बहिर्मुख स्त्रोतसांची संख्या ९ आहे — नेत्र २, नाक २, कान २, मुख १, मेहन (मूत्रमार्ग/शिश्न) १ आणि गुद १. नेत्र, नाक, मुख, कर्ण हे शिर प्रदेशी, तर मेहन आणि गुद अधोभागी असतात. स्त्रियांमध्ये याव्यतिरिक्त स्तन्यवह २ आणि योनिमार्ग १ अशी ३ स्त्रोतसे अधिक असतात. यांशिवाय त्वचेवरील असंख्य छिद्रंना ‘सूक्ष्म स्त्रोतस’ असे म्हटले जाते.
चरकांच्यानुसार अंतर्मुख स्त्रोतसे पुढीलप्रमाणे आहेत — (१) प्राणवह, (२) उदकवह, (३) अन्नवह, (४) रसवह, (५) रक्तवह, (६) मांसवह, (७) मेदोवह, (८) अस्थिवह, (९) मज्जावह, (१०) शुक्रवह, (११) मूत्रवह, (१२) पुरीषवह आणि (१३) स्वेदवह.
वात, पित्त आणि कफ यांची देखील स्त्रोतसे असतात परंतु, ते सर्व शरीरव्यापी असल्याने त्यांची गणना येथे केलेली नाही. तसेच मन देखील सर्व शरीरव्यापी असल्याने त्याचीही गणना येथे नाही. जेव्हा सर्व स्त्रोतसे आपल्या स्वाभाविक स्थितीत असतात, त्यावेळी शरीरात कोणताही रोग असत नाही.
चरकाचार्यांनी कायचिकित्सेच्या दृष्टिकोणातून स्त्रोतसांचे वर्णन केले आहे, म्हणून चरकसंहितेमध्ये प्रत्येक स्त्रोतसाची मूलस्थाने, त्यांच्या दुष्टीची कारणे आणि दुष्टीची लक्षणे सांगितली आहेत. स्त्रोतोमूल हा स्त्रोतसाचाच एक भाग आहे. साहजिकच येथे भावपदार्थांची निर्मिती होते. या कार्याचे नियमन स्त्रोतोमूलाकडून होते, म्हणूनच त्यास प्रभवस्थान देखील म्हटले आहे. या स्थानाकडून सर्व स्त्रोतसाचे नियमन होत असल्याने मूलस्थानाची दुष्टी झाल्यास सर्व स्त्रोतसाची दुष्टि होते. चिकित्सासुद्धा त्यांचा विचार करूनच करावी लागते.
स्त्रोतस दुष्टीची सामान्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत – (१) दोष गुणांशी समान गुणाचा आहार विहार, (२) धातू गुणांच्या विरुद्ध गुणाचा आहार विहार.
स्त्रोतस दुष्टीची सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत – (१) रसादि धातूंचे अधिक प्रमाणात अथवा कमी प्रमाणात वहन होणे, (२) सिराग्रंथी, (३) विमार्ग गमन होणे.
स्त्रोतस दुष्टीची सामान्य चिकित्सा ही त्या त्या स्त्रोतसाच्या व्याधींप्रमाणे असावी.
सुश्रुतसंहितेमध्ये पुढील ११ जोड्या असलेल्या स्त्रोतसांचे वर्णन आले आहे – (१) प्राणवह, (२) अन्नवह, (३) उदकवह, (४) रसवह, (५) रक्तवह, (६) मांसवह, (७) मेदवह, (८) मूत्रवह, (९) मलवह, (१०) शुक्रवह, (११) आर्तववह. अशाप्रकारे सुश्रुतसंहितेमध्ये एकूण २२ स्त्रोतसांचे वर्णन आले आहे.
सुश्रुतांनी शल्यचिकित्सेच्या दृष्टिकोणातून स्त्रोतसांची विद्ध लक्षणे सांगितली आहेत. या स्त्रोतसांवर आघात झाल्यास काय लक्षणे दिसतील ती त्यांनी सांगितली आहेत. तसेच त्या स्त्रोतसांची मूलस्थाने देखील सांगितली आहेत.
अस्थिवह, मज्जावह आणि स्वेदवह स्त्रोतस अस्तित्वात असूनही सुश्रुतांनी न सांगण्याचे कारण अस्थिवह सर्व शरीरातील स्त्रोतसाचे मूल मेद धातूच आहे. मज्जावह स्त्रोतसाचे मूल सर्व शरीरातील अस्थी आहेत. ते सर्व शारिरव्यापी असल्याने शरीरातील सर्व अस्थिंचा वेध झाल्यास ते चिकित्सेच्या दृष्टीने असाध्य आहेत.
शरीरातील एखाद्या अस्थिवर आघात झाल्यास इतर अस्थिंवर त्याचा परिणाम होत नाही. ते वेगवेगळे आहेत. म्हणूनही स्त्रोतोविद्ध लक्षणे अस्थिंच्या बाबतीत देता येणार नाहीत. हीच परिस्थिती मज्जावह स्रोतसाची आहे. स्वेदवह स्त्रोतसाचे मूल मेद असून ते एका ठरावीक ठिकाणी नसून सर्व शरीरभर पसरलेले असते त्याचे विवरण आलेलेच आहे. परिणामी शल्यतंत्राच्या दृष्टीने त्याची उपयोगिता नाही म्हणून त्याचे वर्णन सुश्रुतसंहितेमध्ये मिळत नाही.
शल्यतंत्रानुसार स्त्रोतस विद्ध चिकित्सा पुढीलप्रमाणे – (१) स्त्रोतसांवर वेध झाल्यास त्याची असाध्य समजून चिकित्सा करावी. (२) तेथील शल्य काढल्यावर व्रणवत चिकित्सा करावी.
स्त्रोतसे ही ज्या धातूंनी घटित असतात, त्या समान वर्णाची असतात. ही वृत्त, अणु स्थूल, दीर्घाकृती किंवा प्रतान सदृश अशी असतात. स्त्रोतोवैगुण्याची कारणे व लक्षणे ग्रंथात कोठेही वर्णिलेली नाहीत असे असले तरी स्त्रोतोवैगुण्याविषयी अनेक उल्लेख आढळतात. स्त्रोतोवैगुण्य आणि स्त्रोतोदुष्टी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
स्त्रोतोवैगुण्य | स्त्रोतोदुष्टी |
व्याधिनिर्मितीपूर्वी शरीरात उत्पन्न असते. | व्याधिनिर्मितीतील एक अवस्था. |
कोणत्याही तऱ्हेची शारीरिक विकृती असत नाही. | द्रव्यरूप, गुणरूप, कर्मरूप विकृती आढळते. |
हे अपरिक्ष्य असते. | हे परिक्ष्य असते. |
कुलज, सहज, आघातज, दोषज आणि पूर्वोत्पन्न व्याधी हे प्रमुख हेतु. | दोषसमान व धातू विगुण अशा आहार विहाराचा उपयोग हा हेतु. |
पहा : स्रोतसे (प्रथमावृत्ती नोंद).
संदर्भ :
- चरक, चरकसंहिता, वैद्यमित्र प्रकाशन, विमान स्थान ५३८-५४७, २०१३.
- सुश्रुत, दृष्टार्थ सुश्रुत चिंतन, गोदावरी पब्लिशर, शारिरस्थान ६११-६१४, २००८.
समीक्षक : कौस्तुभ चौंडे