वस्तूचे उत्पादन, तिची किंमत, तिचा साठा इत्यादींबाबत स्वनिर्णय घेण्याची मक्तेदाराची शक्ती. उत्पादन आणि किमतीबाबत धोरण ठरविण्याकरिता उपयोगात येणाऱ्या स्पर्धेच्या तीव्रतेला मक्तेदारी शक्ती म्हणतात. स्पर्धेचा पूर्ण अभाव असण्याच्या स्थितीला मक्तेदारी असे म्हणतात.

मक्तेदारी शक्ती केवळ विशुद्ध किंवा पूर्ण मक्तेदाराकडेच असते असे नाही, तर ती कमी वा अधिक प्रमाणात वर्तमान उत्पादक किंवा विक्रेत्यांनासुद्धा प्राप्त होते. म्हणजेच वास्तवात मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि अल्पाधिकारामध्ये कार्यरत उत्पादक आणि विक्रेत्यांनासुद्धा कमी-अधिक प्रमाणात मक्तेदारी शक्ती प्राप्त होते. याठिकाणी पेढी ही पूर्णपणे किंमत स्वीकारणारी नसते, तर आपला नफा अधिकतम करण्याकरिता तिला काही प्रमाणात स्वातंत्र्य असते. विशुद्ध मक्तेदारीमध्ये पेढीची मक्तेदारी शक्ती ही निरपेक्ष असते. सामान्यत꞉ जागतिक बाजारपेठेमध्ये जेथे अपूर्ण स्पर्धा असते, तेथे मक्तेदारी शक्तीचे विविध प्रकार आढळून येतात. अशा प्रकारच्या बाजारपेठांमध्ये मक्तेदारी शक्ती ही निरपेक्षतेपेक्षा कमी असते आणि क्वचितच दोन पेढ्यांना एकसारखी शक्ती उपभोगण्याचा आनंद मिळू शकतो. त्यामुळे मक्तेदारी शक्ती मोजायची कशी असा प्रश्न निर्माण होतो.

मक्तेदारी शक्ती मोजण्याची मापे ꞉ मक्तेदारी शक्तीचे मापन करण्याकरिता वेगवेगळ्या पद्धती आहेत.

(१) मागणीची लवचिकता ꞉ मागणीची लवचिकता हे मक्तेदारी शक्ती मोजण्याचे एक महत्त्वाचे माप आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूच्या मागणीची किंमत लवचिकता ही परिपूर्ण लवचिक असते. त्यामुळे येथे मक्तेदारी शक्तीचा निरपेक्षपणे अभाव असतो. म्हणजेच जशी जशी वस्तूची किंमत लवचिकता कमी कमी होत जाते, तशी तशी मक्तेदारी शक्तीसुद्धा वाढत जाते. मक्तेदारी शक्ती ही वस्तूच्या किंमत लवचिकतेच्या व्यस्त प्रमाणत असते आणि ती पुढील सूत्राद्वारे काढता येते.

                                                                 १

मक्तेदारी शक्तीची श्रेणी = ———————————–

                                          किंमत लवचिकतेचे निरपेक्ष मूल्य

 

(२) किंमत सिमांत खर्च ꞉ ए. पी. लर्नर यांच्या मते, मक्तेदारी स्पर्धा ही पूर्ण स्पर्धेपासून बऱ्याच बाबतींत वेगळी असल्याने मक्तेदारी शक्तीचे मापन हे मक्तेदारी किंमत आणि पूर्ण स्पर्धेतील किंमत यांतील फरकाने केले जाते. पूर्ण स्पर्धेत पेढीच्या संतुलनाच्या अवस्थेत वस्तूची किंमत ही नेहमीच सीमांत खर्चाबरोबर असते; तर मक्तेदारी स्पर्धेमध्ये पेढीचा सीमांत खर्च हा घटत्या सीमांत प्राप्तीबरोबर असतो. संतुलनावस्थेत मक्तेदारी किंमत ही नेहमीच पेढीच्या सीमांत खर्चापेक्षा जास्त असते. त्यामुळेच किंमत आणि सीमांत खर्चामधील फरक हे मक्तेदारी शक्तीचे सूचक मानल्या जाते. लर्नरचे मक्तेदारी शक्तीचे माप हे पेढीच्या संतुलनावस्थेत किंमत लवचिकतेच्या व्यस्त प्रमाणात असते आणि ते पुढील सूत्राद्वारे काढल्या जाते.

                                              किंमत सीमांत खर्च

मक्तेदारी शक्तीची श्रेणी = —————————

                                            किंमत

(३) तिरकस लवचिकता ꞉ मक्तेदारी शक्तीचे मापन करण्याकरिता निकोलस कॅल्डॉर आणि आर. ट्रिफीन यांनी आणखी एक पद्धत स्पष्ट केली. यात त्यांनी मागणीच्या तिरकस लवचिकतेच्या आधारे मक्तेदारी शक्तीचे मापन केले. मागणीची तिरकस लवचिकता म्हणजे एखद्या वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे दुसऱ्या वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण होय. यात दोन वस्तूंमधील तुलनात्मक संबंध दर्शविला जातो. जर मागणीची तिरकस लवचिकता शून्य असेल, तर ती त्या वस्तूचे उत्पादन करणारी पेढी निरपेक्ष मक्तेदारी शक्तीचा आनंद घेत असते. याउलट, जर मागणीची तिरकस लवचिकता असंख्य असेल, म्हणजेच बाजारामध्ये असंख्य पेढ्या एकसमान वस्तूंचे उत्पादन करीत असतील, तर त्या वस्तू एकमेकांना पूर्ण पर्यायी असतील आणि तेथे मक्तेदारी शक्तीचा अभाव दिसून येईल; परंतु बाजाराचे हे दोन्ही प्रकार (मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा) दोन टोके आहेत. प्रत्यक्षात अधिकतम पेढ्या दोन्ही टोकांच्या मध्ये राहून मक्तेदारी शक्तीचा लाभ घेत असतात.

(४) अतिरिक्त नफा ꞉ जे एस. बेन यांच्या मते, अतिरिक्त नफ्याद्वारे मक्तेदारी शक्तीच्या श्रेणीचे मापन होते. मक्तेदारीमध्ये पेढीची दीर्घकालीन किंमत ही नेहमीच सरासरी खर्चापेक्षा जास्त असते. त्यामुळे पेढीला अतिरिक्त नफा मिळतो. विशुद्ध मक्तेदारीमध्ये अतिरिक्त नफा हा खूप जास्त असतो; कारण या स्पर्धेत नवीन पेढ्यांचा प्रवेश पूर्णपणे बंद असतो. यामुळे मक्तेदारी शक्तीची श्रेणी ही जास्त असते. जर नफा कमी होत असेल, तर मक्तेदारी शक्तीची श्रेणीसुद्धा कमी होत जाते.

(५) मागणी वक्र ꞉ के. डब्ल्यू रोथस चाईल्ड यांच्या मते, मक्तेदारी शक्तीच्या श्रेणीचे माप हे पेढीच्या मागणी वक्राचा उतार आणि उद्योगाच्या मागणी वक्राचा उतार यांचे प्रमाण असते. मक्तेदारीमध्ये पेढीचा मागणी वक्र आणि उद्योगाचा मागणी वक्र हे एकमेकांशी तंतोतंत जुळणारे असतात. त्यामुळे त्यांच्या उताराच्या प्रमाणाद्वारे मोजलेली मक्तेदारी शक्तीची श्रेणी एक असते. पूर्ण स्पर्धेमध्ये पेढीचा मागणी वक्र हा शून्य उतारासह क्षितीज समांतर रेषा असल्यामुळे मक्तेदारी शक्तीची श्रेणी ही शून्याबरोबर असते. मक्तेदारी शक्तीची श्रेणी ही शून्य व एक यांच्या मध्ये असते.

संदर्भ ꞉

  • The Degree of Monopoly, 1942.
  • Kaldor, N., Market Imperfection and Excess Capacity, 1935.
  • The Quarterly Journal of Economics, Cambridge, 1941.
  • The Review of Economic Studies, 1934.

समीक्षक : मनिषा कर्णे