पोहनेरकर, दादासाहेब : (२१ सप्टेंबर १९०८–२ सप्टेंबर १९९०). महाराष्ट्रातील विख्यात इतिहास संशोधक आणि साहित्यिक. नरहरी शेषाद्री पोहनेरकर हे त्यांचे मूळ नाव; तथापि दादासाहेब पोहनेरकर म्हणून परिचित. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अंबेजोगाई येथे झाले. लहानपणापासूनच पोहनेरकरांना मराठीसह संस्कृत, उर्दू, फार्सी, हिंदी, इंग्रजी या भाषांचा परिचय झाला. प्राथमिक शिक्षणानंतर मॅट्रिकसाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना हैदराबादेस जावे लागे. त्यानुसार त्यांनी हैदराबादमधील विवेक वर्धिनीत मॅट्रिकसाठी प्रवेश घेतला.

पोहनेरकरांना इतिहास संशोधनासह सामाजिक कार्याची आवड होती. १९३० मध्ये निजाम विजय  या साप्ताहिकात त्यांचा पहिला लेख प्रकाशित झाला. त्याचवेळी हिप्परगा येथील आश्रमीय पद्धतीच्या शाळेत त्यांना शिक्षक म्हणून काम मिळाले. येथे त्यांचा व्यंकटेशराव खेडगीकर, स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, राघवेंद्रराव दिवाण यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध आला. पुढे त्यांनी ढोकी येथे स्वतंत्र शाळा काढली (१९३३). त्यानंतर त्यांनी हैदराबाद जवळच्या संजीवनी पेठ आणि तुर्कापल्ली या दोन संस्थानांमधील ६० एकर जागेवर तुर्कापल्लीकर अनंतराव देशमुख यांच्या सहकार्याने गुरुकुल धर्तीवर शांतिसदन ही आश्रमशाळा काढली. येथे सर्व जाती-धर्मातील मुले शिकत होती. मुलांच्या भोजनाची व्यवस्था पोहनेरकर यांच्या पत्नी भागिरथीबाई पाहत. याबरोबरच पोहनेरकरांचे मराठी वाङ्मयाच्या अभ्यासाचे काम सुरूच होते. हैदराबादेत निजामाचे राज्य असल्याने तेथे उर्दू भाषेला प्राधान्य होते. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रसारासाठी हैदराबादेतील मंडळींनी प्रोफेसर नावाचे हस्तलिखित मासिक सुरू केले होते. पोहनेरकर त्याचे संपादक होते. हैदराबाद येथे मराठी भाषेच्या अभ्यासाला गती देण्यासाठी पोहनेरकर तसेच ना. गो. नांदापूरकर, भा. शं. कहाळेकर, क. ना. तडवळकर आदींच्या पुढाकारातून मराठवाडा साहित्य परिषद या नावाने मराठी मंडळ स्थापन करण्यात आले (१९३७). पुढे भाषावार प्रांतरचनेनंतर या संस्थेचे औरंगाबाद येथे स्थलांतर करण्यात आले. हैदराबाद येथेच विवेकवर्धिनीची डावरे स्कूल ही प्राथमिक शाळा सुरू करून पोहेनेरकर यांनी स्वतः मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले.

पुढे ते हैदराबादमधील ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील पुराणवस्तू संशोधन केंद्रात सहायक संशोधन अधिकारी म्हणून काम केले. या काळात त्यांनी मराठवाड्यातील खेडोपाडी दौरे करून अनेक शिलालेख, ताम्रपटांचे वाचन केले. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मराठवाडा प्राचीन संशोधन प्रकल्प स्थापन केला (१९८७). या प्रकल्पांतर्गत दासोपंत साहित्य गीतार्णव या उपप्रकल्पाचे काम सुरू केले. संत एकनाथ यांचे निकटचे सहवासी राहिलेले प्रसिद्ध कवी दासोपंत (१५५१–१६१५) यांनी एका कापडावर उपास्य देवता श्री दत्तात्रेय यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित पंचीकरण (ओव्यांचे प्रकरण) केले आहे. ४० फूट लांब आणि ५ फूट रुंद अशा कापडावरील हा लेख दासोपंतांची पासोडी म्हणून प्रसिद्ध आहे. पोहनेरकर यांनी या पासोडीचे केलेले संपादन विशेष उल्लेखनीय ठरले. पासोडीतील संगीत, कला आणि साहित्य यांची सविस्तर मांडणी त्यांनी केली. याशिवाय त्यांचे संत एकनाथ दर्शन खंड १ (१९६०), संत एकनाथकृत श्री भावार्थ रामायण खंड १ व २, प्राचीन वाङ्मय संहिता-लेखन, दासोपंत विरचित गीतार्णव आदी वाङ्मयीन कार्य प्रसिद्ध आहे. तसेच संत आणि लोकसाहित्य विषयक पोहनेरकर यांनी केलेले संशोधनपर लेखन उल्लेखनीय आहे. बागशाही (१९३१), गीतांजलीचा अनुवाद (१९३०), मराठी मातेचा दरबार (१९४०) इत्यादी काव्यलेखन आणि असिधाराव्रत (१९३३), प्रेमाच्या स्वर्गात (१९३७), चूक कोणाची (१९५३) आदी कथालेखन त्यांनी केले.

पोहनेरकर यांनी अनेक हस्तलिखिते, ताम्रपट आणि दस्तऐवज गोळा केले. त्यावर त्यांनी अभ्यासपूर्ण संशोधनविषयक लेख प्रसिद्ध करून मध्ययुगीन इतिहासातील अनेक घटनांचा उलगडा केला. ‘मराठवाड्यातील दोन अभयपत्रेʼ (१९४६), ‘जुने मोडी कागदʼ (१९६७), ‘जांबगावचा ताम्रपटʼ  (दोन भाग, १९६२), ‘औसा ताम्रपटʼ (१९६४), ‘पिंगळे घराण्याची कागदपत्रेʼ (१९७४), ‘नळराजाची बखरʼ आदी त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत.

पोहनेरकर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संमेलनाचे दोन वेळा अध्यक्ष झाले. तसेच मराठवाडा साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष झाले.

औरंगाबाद येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • जोशी, शांता, श्री. न. शे. पोहनेरकर : संशोधन आणि साहित्य, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, २००४.
  • देऊळगावकर, चंद्रकांत; मातेकर, हरिहर; मोहोळकर, एम. जी. दासोपंत कृत गीतार्णव, अध्याय १६ वा, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २००७.

                                                                                                                                                                               समीक्षक : सरोजकुमार मिठारी