छद्मपुरातत्त्व अथवा भ्रामक पुरातत्त्व ही पुरातत्त्वविद्येची अधिकृत शाखा नसून हा एक वैचारिक गैरप्रकार अथवा खोटेपणा आहे. विश्वसनीय पुरातत्त्वीय माहितीचा चुकीचा वापर करणे ते अस्तित्वातच नसलेली माहिती खरी असल्याचे भासवणे अशा सर्व गैरप्रकारांचा त्यात समावेश होतो. एखाद्या संकुचित अथवा अवैज्ञानिक विचारसरणीचे समर्थन करण्यासाठी पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक पुराव्यांची मोडमोड करण्याच्या गैरप्रकारांना उद्देशून ही संज्ञा वापरली जाते. पुरातत्त्वीय मांडणीचा आभास निर्माण करणाऱ्या अशा गैरप्रकारांना सांप्रदायिक पुरातत्त्व (Cult Archaeology) असेही म्हटले जाते. कारण यात भ्रामक कल्पनांवर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या कडव्या लोकांचे संप्रदाय तयार झालेले दिसतात. मुख्य पुरातत्त्वापेक्षा निराळ्या भ्रामक अशा या प्रवाहांना त्यांचे समर्थक ‘पर्यायी पुरातत्त्व’ (Alternative Archaeology) असे म्हणून तो पुरातत्त्वाचाच एक भाग असल्याचे व आपण फक्त पर्यायी अनुमाने देतो आहोत, असे भासवतात.

छद्मपुरातत्त्वामध्ये अनेक तथाकथित सिद्धांतांचा समावेश असतो. प्रत्यक्षात हे कसलेही वैज्ञानिक सिद्धांत नसून निरनिराळ्या लोकांनी पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक तथ्ये जाणूनबुजून दडवून ठेवून मुद्दाम पसरवलेले भ्रम असतात. काही वेळा हे निव्वळ कल्पनेचे खेळ असतात. पुरातत्त्वामधले निष्कर्ष एक प्रकारे शुष्क व वैज्ञानिक शैलीत मांडले जातात. याउलट छद्मपुरातत्त्वात सांगितलेल्या कथाकहाण्या विस्मयजनक आणि गूढ असतात. लहानथोर अशा सर्वांनाच काहीतरी रहस्यमय व विलक्षण ऐकायला, वाचायला आणि बघायला आवडते. म्हणूनच ‘नष्ट झालेल्या प्राचीन संस्कृती’, ‘समुद्रात बुडलेले अटलांटिस खंड’, ‘राक्षसी आकाराची टेकाडे बनवणारे प्राचीन लोक’ (Ancient Mound Builders), ‘इस्टर आयलंडवरील राक्षसी पुतळे’, ‘अमेरिकेतील बिगफूट लोक’ (Bigfoot People of America), ‘नष्ट झालेले प्रगत तंत्रज्ञान’, ‘प्राचीन खजिने’, ‘प्राचीन विमाने व अंतराळयाने’, ‘ममींचा शाप’ आणि ‘प्राचीन काळातील अण्वस्त्रे’ (उदा., ‘महाभारता’तील युद्धात वापरलेली) अशा अनेक कल्पना छद्मपुरातत्त्वात आढळतात. पुराखगोलशास्त्र (Archaeoastronomy) या नावाखाली केले जाणारे लेखन हा छद्मपुरातत्त्वाचाच एक प्रकार आहे. शैलचित्रे व मोठ्या पाषाणांच्या रचना बघून (उदा., इंग्लंडमधील स्टोनहेंज) त्या प्राचीन संस्कृतींमधील वेधशाळा होत्या व त्या लोकांना खगोलशास्त्राचे अतिप्रगत ज्ञान होते, असा दावा यात केला जातो.

गूढरम्यपणामुळे सर्व वयाचे व समाजातल्या सर्व थरांमधले लोक छद्मपुरातत्त्वाकडे ओढले जातात. अनेकदा असे चमत्कृतींनी भरलेले व पुरातत्त्वीय अथवा ऐतिहासिक भासणारे लेखन मुख्य पुरातत्त्वीय विचारधारांपेक्षा जास्त प्रसिद्ध होऊन ते प्रचंड लोकप्रिय झालेले दिसते. त्याचप्रमाणे खोट्या आणि भ्रामक पुरातत्त्वीय सामग्रीवर आधारलेले चित्रपट व दूरचित्रवाणीवरील मालिका हा छद्मपुरातत्त्वाकडे लोकांना आकृष्ट करणारा एक महत्त्वाचा स्रोत आहे. ‘इंडियाना जोन्स’ मालिकेतील ‘द रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क’ (१९८१), ‘इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रूसेड’ (१९८९), ‘एन्शन्ट एलियन्स’ (२००९) आणि ‘ॲज अबव्ह सो बिलो (२०१४) ही अशा चित्रपटांची उदाहरणे आहेत. छद्मपुरातत्त्वावर आधारलेल्या पुस्तकांची आणि चित्रपटांची अतिप्रचंड अशी जागतिक बाजारपेठ आहे.

मानवी संस्कृतीच्या इतिहासात ज्या काही भव्य कलाकृती अथवा रचना निर्माण झाल्या त्या तशा करण्याची माणसांची कुवत नव्हती आणि म्हणून त्या कोणा परग्रहवासींनी तयार केल्या या कल्पनेभोवती मोठ्या प्रमाणात छद्मपुरातत्त्वीय लेखन झालेले आहे. प्राचीन काळात तथाकथित ‘प्रगत’ परग्रहवासी (एलियन्स) पृथ्वीवर आले होते. त्यांनी इजिप्तमधील पिरॅमिड बांधले आणि दिल्लीचा लोहस्तंभ उभारला वगैरे ‘सिद्धांत’ मांडणारे, एरिक फॉन डेनिकेन या स्वीस लेखकाचे ‘चॅरिअट्स ऑफ द गॉड्स’ (१९६८) हे पुस्तक छद्मपुरातत्त्वाचे सर्व पैलू दिसणारा एक उत्कृष्ट नमुना आहे. या पुस्तकाचे जगातल्या बत्तीस भाषांमध्ये अनुवाद झालेले असून त्याच्या सात कोटींपेक्षा जास्त प्रती खपल्या आहेत. या लेखनाच्या आधारे अनेक लेखकांनीही पुस्तके लिहिली आहेत. मराठीतील ‘पृथ्वीवर माणूस  उपराच’ हे याचे महत्त्वाचे उदाहरण आहे. फॉन डेनिकेन यांच्या पद्धतीची मांडणी ब्रिटिश पत्रकार ग्रॅहम हँकॉक यांच्या ‘फिंगरप्रिंट्स ऑफ द गॉड्स’ (१९९५) आणि ‘मॅजिशियन्स ऑफ द गॉड्स’ (२०१५) या पुस्तकांमध्ये दिसते.

छद्मपुरातत्त्वीय लेखन आणि त्यांच्यावर आधारलेल्या चित्रपटांकडे कसे बघावे याबद्दल पुरातत्त्वज्ञांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. अनेक पुरातत्त्वज्ञ छद्मपुरातत्त्वीय लेखनातील बालिशपणावर आपला वेळ वाया घालवणे योग्य नाही असे मानून तिकडे दुर्लक्ष करतात. तथापि छद्मपुरातत्त्वामुळे लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी प्रचलित होऊन समाजाची वैचारिक हानी होते म्हणून छद्मपुरातत्त्वाकडे गंभीरपणे बघितले पाहिजे आणि त्याचा प्रतिवाद केला पाहिजे, अशी भूमिका काही पुरातत्त्वज्ञ घेतात. क्लिफर्ड विल्सन यांचे ‘द चॅरिअट्स स्टिल क्रॅश’ (१९७५) व रोनाल्ड स्टोरी यांचे ‘द स्पेस गॉड्स रिव्हील्ड’ (१९७६) ही पुस्तके गंभीर स्वरूपाच्या प्रतिवादाची उदाहरणे आहेत.

स्फटिकाची कवटी.

तथाकथित जादुई शक्ती असलेल्या ‘स्फटिकाच्या कवट्या’ (Crystal Skulls) हे छद्मपुरातत्त्वाकडे गंभीरपणे बघून त्यातील बनावटगिरी सिद्ध केली जाण्याचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. मानवी कवट्यांच्या आकाराच्या स्फटिकाच्या कवट्या जगभरात अनेक संग्रहालयात आहेत. त्यांच्यात अतिमानवी शक्ती असून त्या दक्षिण अमेरिकेतील माया अथवा अॅझटेक संस्कृतीमधील असल्याचे व त्यांचा संबंध परग्रहवासींच्या ‘प्रगत’ शक्तीशी असल्याचे सांगणारे छद्मपुरातत्त्वीय लेखन भरपूर झाले आहे. काही जणांनी स्फटिकाच्या या कवट्या म्हणजे पृथ्वीबाह्य लोकांचे ‘महासंगणक’ असल्याचे मत मांडले. ‘इंडियाना जोन्स अँड द किंगडम ऑफ क्रिस्टल स्कल्स’ (२००८) या चित्रपटाचा हाच विषय होता. ब्रिटिश म्यूझीअम व स्मिस्थसोनियन म्यूझीअमधील पुरातत्त्वीय वैज्ञानिकांनी १९९२ ते २००८ या दरम्यान विविध वैज्ञानिक पद्धती वापरून या कवट्या एकोणिसाव्या शतकात जर्मनी व पूर्व यूरोपात बनवल्या गेल्या असल्याचे सिद्ध केले आहे. त्याप्रमाणे आजवर जगात कुठेही एकाही पुरातत्त्वीय उत्खननात अशी एकही स्फटिकाची कवटी सापडलेली नाही, हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

छद्मपुरातत्त्वीय लेखन कितीही आकर्षक असले तरी अशा लेखनातील फसवाफसवी आणि माहितीमधला खोटेपणा समजण्यासाठी पुरातत्त्वातील तांत्रिक माहितीची आवश्यकता नसते. जगातल्या सर्व पुरातत्त्वीय स्थळांची पुरेशी माहिती नसल्याने छद्मपुरातत्त्वीय मांडणी वरवर बघता पटू शकणारी असते आणि यामुळेच छद्मपुरातत्त्व प्रचंड लोकप्रिय झालेले आहे. योग्य तर्कशास्त्र वापरल्यास सामान्य माणसांनाही निव्वळ सामान्यज्ञानामुळे त्यातील फोलपणा सहज कळू शकतो. उदा., दिल्लीचा लोहस्तंभ कधीही गंजत नाही व तो कोणी उभारला हे अज्ञात आहे असे फॉन डेनिकेन म्हणतात. परंतु हे खरे नसून हा स्तंभ सम्राट द्वितीय चंद्रगुप्ताच्या काळातील आहे व तो थोडा गंजलेला असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्याचप्रमाणे पेरू देशातील वाळवंटात दिसणाऱ्या नाझका रेषा (Nazca Lines) यांचा संबंध फॉन डेनिकेन यांनी प्राचीन काळातील परग्रहवासींच्या अंतराळयानांच्या तळांशी लावला. प्रत्यक्षात त्या उथळ रेषा दक्षिण अमेरिकेतील कोलंबसपूर्व काळात (इ. स. पू. ५०० ते इ. स. ५००) आदिवासींनी त्यांच्या धार्मिक कल्पनांसाठी खोदल्या होत्या.

अमेरिकेतील ओरेगन राज्यात  खोदलेले श्रीयंत्र.

सन १९९० मध्ये अमेरिकेतील ओरेगन राज्यात अलव्हर्ड वाळवंटात (Alvord Desert) प्रचंड आकाराचे (सु. ४०० मी. व्यासाचे) श्रीयंत्र खोदल्याचे दिसून आले. छद्मपुरातत्त्वाच्या समर्थकांनी ते प्राचीन असल्याचे ठरवून ताबडतोब त्याचा संबंध फॉन डेनिकेनच्या पद्धतीने देवांनी प्राचीन काळात भेट देण्याशी लावला. तर काहींनी प्राचीन अमेरिकेत हिंदू धर्माच्या अस्तित्वाचा हा पुरावा असल्याचे सांगून टाकले. तथापि सन २००५ मध्ये बिल विदरस्पून या आयोवा राज्यामधील कलाकाराने आपण आपल्या मुलांच्या व मित्रांच्या मदतीने साधे नांगर वापरून ही ‘कलाकृती’ निर्माण केल्याचे कबूल केले. अनेकदा छद्मपुरातत्त्वातील तथाकथित ‘पुरावा’ हा किती बनावट असू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

छद्मपुरातत्त्वात अनेकदा पुरावा अस्सल वाटावा म्हणून छायाचित्रात फेरफार केले जातात. उदा., फॉन डेनिकेन यांनी ‘द गोल्ड ऑफ द गॉड्स’ (१९७४) या पुस्तकात आपण इक्वेडोर (एक्वादोर) देशातील कुव्ही डी लोस टायोस (Cueva de los Tayos) या गुहांमध्ये सोन्याचा प्रचंड खजिना पाहिल्याचे सांगून त्यातल्या काही वस्तूंची छायाचित्रे दिली. प्रत्यक्षात या गुहा नैसर्गिक असल्या तरी फॉन डेनिकेन यांनी त्या मानवनिर्मित असल्याचे म्हटले होते. त्यांनी दिलेली छायाचित्रे चलाखी करून तयार केल्याचे नंतर सिद्ध झाले. सांप्रत मॉर्फिंग तंत्रज्ञान वापरून असे करणे सहज शक्य झाले आहे. म्हणूनच समाजमाध्यमांमध्ये असे फेरफार केलेले असंख्य ‘डीपफेक’ (बनावट) छद्मपुरातत्त्वीय छायाचित्रे  सहजपणे फिरताना दिसतात.

छद्मपुरातत्त्वीय लेखनात अनेक ठिकाणी कटकारस्थान सिद्धांताचा आधार घेतला जातो. विशेषतः पुरातत्त्वज्ञांनी विशिष्ट युक्तिवादाचे समर्थन करणारे पुरावे मागितल्यानंतर ही पळवाट काढली जाते. आपण सांगतो ते पुरावे अथवा पुरातत्त्वीय वस्तू अस्तित्वात आहेत, परंतु ‘सरकार’ अथवा शासन यंत्रणा ते जाणूनबुजून लोकांपासून दडवते आहे असे म्हणले जाते. उदा., फॉन डेनिकेन यांना कुव्ही डी लोस टायोस गुहांमध्ये दिसलेला तथाकथित सोन्याचा खजिना बघण्यासाठी नेमके कसे जायचे हे विचारल्यावर त्यांनी ‘सरकारने गुहेत जायची वाट कायमची बंद करून टाकली आहे’ असे उत्तर दिले होते. छद्मपुरातत्त्वाचे नेमके ‘छद्म’ स्वरूप यातून स्पष्ट दिसून येते.

सांप्रतच्या ‘सत्योत्तर’(Post-Truth) जगात प्रत्यक्ष पुरावे न बघता भावनिक व वैयक्तिक मते हीच सत्याचे निकष मानण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. म्हणूनच छद्मपुरातत्त्वाकडे निव्वळ दुर्लक्ष न करता त्यामधील युक्तिवाद कसे निरर्थक आहेत हे विद्यार्थ्यांना कळावे यासाठी यूरोपातील अनेक विद्यापीठांमध्ये छद्मपुरातत्त्वाचा भाग शिकवला जातो. तथापि भारतात छद्मपुरातत्त्व आणि त्याच्या फोलपणाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी याच्याकडे फारसे लक्ष दिले गेलेले नसल्याने हा विषय इतिहास व पुरातत्त्वाच्या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट झालेला नाही.

संदर्भ :

  • Fagan, Garrett G. ‘Diagnosing Psuedoarchaeology’, ‘Archaeological Fantasies: How Pseudoarchaeology Misrepresents the Past and Misleads the Public’ (Ed., Fagan, G. G.), pp. 23-46, Routledge, London, 2006.
  • Feder, Kenneth L. ‘Frauds, Myths, and Mysteries: Science and Pseudoscience in Archaeology’. ‘McGraw-Hill’, New York, 2014.
  • Jordan, Alexis, ‘Dealing with Electric Pandas: Why it’s Worth Trying to Explain the Difference between Archaeology and Pseudoarchaeology’, ‘Field Notes: A Journal of Collegiate Anthropology’, 5 (1) : 66-75, 2013.
  • Lilienfeld, S. O. ‘Foreword: Navigating a Post-Truth World: Ten Enduring Lessons from the Study of Pseudoscience’, ‘Pseudoscience: The Conspiracy against Scienc’e (Eds., Kaufman, A. B. & Kaufman, J. C.), pp. xi-xvii, Mass: The MIT Press, Cambridge, 2018.
  • Witherspoon, Bill, ‘Art as Technology: Oregon Desert Sri Yantra’, Leonardo, 38 (1): 12-13, Project MUSE muse.jhu.edu/article/178426, 2005.

छायाचित्रे स्रोत  :

१. स्फटिकाची कवटी  (स्रोतः  https://www.smithsonianmag.com/history/the-smithsonians-crystal-skull-51638609/)

२. अमेरिकेतील ओरेगन राज्यात  खोदलेले श्रीयंत्र  (स्रोतः  https://www.iowasource.com/2019/05/07/sri-yantra-mystery-an-interview-with-bill-witherspoon/)

समीक्षक : श्रीनंद बापट