फुले, सावित्रीबाई : (३ जानेवारी १८३१—१० मार्च १८९७). भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही मराठी कवयित्री. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. वडील खंडोजी नेवसे पाटील, आई लक्ष्मीबाई आणि सिंधुजी, सखाराम व श्रीपती या तीन भावंडांसह सावित्रीबाईंचे बालपण आनंदात व्यतीत झाले. त्यांचा विवाह १८४० मध्ये जोतीराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला. लग्नानंतर जोतीरावांनी त्यांना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांनी घेतली. पुढे सावित्रीबाईंनी अहमदनगर येथे फॅरारबाई आणि पुण्यात मिचेलबाई यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले.
१ जानेवारी १८४८ रोजी जोतीरावांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मागासवर्गीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई वयाच्या १७ व्या वर्षापासून त्या शाळेत विनावेतन शिकवू लागल्या. त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. सुरुवातीस अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी कर्डिले अशा सहा ब्राह्मण-धनगर-मराठा जातींतील मुलींनी या शाळेत प्रवेश घेतला. काही धर्ममार्तंडांनी ‘धर्म बुडाला’ अशी ओरड केली व ते सावित्रीबाईंवर ‘धर्मबुडवी’ म्हणून शेणमाती फेकू लागले. तरीसुद्धा त्या मागे हटल्या नाहीत. सर्व विरोधाला धैर्याने तोंड देत त्यांनी आपली आगेकूच चालूच ठेवली.
१८५१ मध्ये फुले दांपत्याने चिपळूणकरांच्या वाड्यातील आणि रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना केली. १० सप्टेंबर १८५३ या दिवशी जोतीरावांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह ‘महार मांग इ. लोकांस विद्या शिकविण्याकरिता मंडळी’ या नावाची संस्था स्थापन केली. या कामात त्यांना मातृवत असणाऱ्या सगुणाबाई क्षीरसागर यांची मोलाची मदत झाली. सावित्रीबाईंसह सगुणाबाई आणि फातिमा शेख याही मुलींच्या शाळांमध्ये शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. शिवाय विष्णुपंत थत्ते व वामनराव खराडकर हे ब्राह्मण मित्रही या शाळेत शिक्षक म्हणून काम करत. जोतीरावांचे एक जिवलग मित्र उस्मान शेख यांच्या फातिमा या भगिनी होत. १८४९ साली जेव्हा फुले दांपत्याला गृहत्याग करावा लागला, तेव्हा त्यांना उस्मान शेख यांनी मदत केली. आपल्या राहत्या घरातील जागा त्यांनी या दांपत्यास राहायला दिली.
त्यांच्या शाळांमध्ये सर्व जातींच्या मुलामुलींना प्रवेश होता. त्यांच्या एका शाळेतील मातंग समाजातील विद्यार्थिनी मुक्ता साळवे या १४ वर्षीय मुलीने लिहिलेला ‘मांग महारांच्या दु:खाविषयी निबंध’ (फेब्रु.-मार्च, १८५५) हा लेख ‘ज्ञानोदय’ वृत्तपत्रात प्रकाशित झाला. त्यात तिने ‘वेद किंवा धार्मिक पुस्तके वाचण्याचा अधिकार नाही, तर मग आमचा धर्म कोणता?’ असा प्रश्न उपस्थित केला. तसेच जातीनिहाय स्त्रीविषयक भीषण वास्तव कसे वेगळे असते तेही त्यातून मांडले. या निबंधाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने तो मुंबई प्रांताच्या शैक्षणिक अहवालामध्ये छापला. फुले दांपत्याने पुण्यामध्ये १८५६ साली पहिले देशी (नेटिव्ह) ग्रंथालय सुरू केले. फुले दांपत्याच्या विचारांनी प्रभावित झालेल्या ताराबाई शिंदे यांनी १८८२ साली ‘स्त्रीपुरुषतुलना’ या ग्रंथातून स्त्रियांची शोचनीय परिस्थिती मांडली. यावरून फुले दांपत्याच्या शाळांद्वारे स्त्रीवर्गात होऊ लागलेल्या जागृतीची कल्पना येऊ शकते. त्यातून आधुनिक महाराष्ट्रातील स्त्रीची जडणघडण होण्यास मदत झाली.
१८६३ साली जोतीराव-सावित्रीबाईंनी गंजपेठेतील राहत्या घरात विधवा स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. १८८४ पर्यंत अनेक भागांतून सु. ३५ असहाय स्त्रिया तेथे आल्या. अशा स्त्रियांची बाळंतपणे सावित्रीबाई स्वतः करीत. त्यांतीलच एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा यशवंत नामक मुलगा फुले दांपत्याने दत्तक घेतला. पुढे तो वैद्यकीय शिक्षण घेऊन वैद्य (डॉक्टर) बनला आणि या दांपत्याचे समाजसेवेचे कार्य त्याने पुढे नेले. या दांपत्याच्या कार्यामुळे प्रेरित होऊन १८७५ साली पंढरपूरला तेथील दुय्यम न्यायाधीश लालशंकर उमियाशंकर यांनी बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली.
समता, स्वातंत्र्य आणि विवेकनिष्ठा या तत्त्वांवर आधारित नवा आधुनिक समाज निर्माण करण्याचे जोतीरावांचे ध्येय होते. त्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. अशा सर्वच कार्यात सावित्रीबाईंची खंबीर साथ त्यांना लाभली. सत्यशोधक जलसे, साहित्य, भाषणे, वृत्तपत्रे अशा विविध माध्यमांतून त्यांनी जनजागृती केली. या चळवळीचे लोण महाराष्ट्रात पसरले. सत्यशोधक विवाहपद्धतीद्वारे त्यांनी ब्राह्मण पुरोहिताशिवाय आणि हुंडा न देता साध्या पद्धतीने विवाह करण्याचा पर्याय समाजाला दिला. सावित्रीबाईंची मैत्रीण बजूबाई ज्ञानोबा निंबणकर यांची कन्या राधा आणि सत्यशोधक कार्यकर्ते सीताराम जवाजी आल्हाट यांचा अशा पद्धतीचा पहिला विवाह सावित्रीबाईंनी स्वखर्चाने घडवून आणला. या विवाहामुळे त्यांना अनेक खटल्यांना सामोरे जावे लागले. ४ फेब्रुवारी १८८९ साली त्यांचा पुत्र यशवंत आणि सत्यशोधक समाजाचे नेते ग्यानोबा ससाणे यांची कन्या राधा उर्फ लक्ष्मी यांचा विवाहही याच पद्धतीने संपन्न झाला. हा आंतरजातीय विवाह होता. विधवांचे केशवपन ही त्या काळातील एक दुष्ट प्रथा होती. जोतीरावांचे सहकारी आणि ‘दीनबंधू’चे संपादक नारायण मेघाजी लोखंडे यांनी नाभिकांना एकत्र आणले आणि त्यांना विधवांचे केशवपन न करण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देऊन सु. एक हजार नाभिकांनी संप केला. या आंदोलनाला सावित्रीबाईंची प्रेरणा होती. याचा वृत्तांत लंडनच्या ‘दि टाईम्स’ या वृत्तपत्रात ९ एप्रिल १८९० च्या अंकात छापून आला. तसेच इंग्लडमधील सुधारक चळवळीतील स्त्रियांनी त्यांना अभिनंदनाचे पत्रही पाठवले.
२८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतीरावांचा मृत्यू झाला. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास यशवंत या त्यांच्या दत्तकपुत्रास नातेवाईकांनी विरोध केला, तेव्हा सावित्रीबाईंनी न डगमगता जोतीरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. हे एक क्रांतिकारक पाऊल होते. जोतीरावांनंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती अखेरपर्यंत सांभाळली. १८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
१८७६-७७ आणि १८९६ या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. त्या वेळी सावित्रीबाईंनी गोरगरिबांना खूप मदत केली. सत्यशोधक समाजाद्वारे ठिकठिकाणी अन्नछत्रे उघडून सु. २००० मुलामुलींची भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. १८९७ पासून पुण्यात प्लेगची साथ आली, तेव्हा मृत्यूला न घाबरता सावित्रीबाईंनी प्लेगबाधित रुग्णांची सेवाशुश्रूषा केली; पण अखेर त्यांना प्लेगची बाधा होऊन त्यातच त्यांचे दुर्देवी निधन झाले.
१८४८ ते १८९७ या अर्धशतकाच्या कालावधीत सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षण, जातिअंताची चळवळ आणि स्त्री-सुधारणा चळवळ यांकरिता जोतीरावांसमवेत मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर जोतीरावांपासून समाज व कुटुंबीय जेव्हा दुरावले, तेव्हा सहचारिणी म्हणून त्यांना खंबीरपणे साथ दिली. सावित्रीबाईंचे साहित्य, त्यांची पत्रे आणि त्यांचे कार्य यांमधून त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जाणीव होते.
सावित्रीबाई या एक प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या. जोतीरावांसारख्या सुधारक पतीची सोबत, प्रबोधनातील नवविचारांचे संस्कार आणि आंदोलनातील अनुभव यांमुळे त्यांच्यामधील काव्यगुण बहरून आले; मात्र दीर्घकाळ त्यांचे साहित्य महाराष्ट्राला ज्ञात नव्हते. १९८८ मध्ये अभ्यासक डॉ. मा. गो. माळी यांनी ‘सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय’ या ग्रंथाद्वारे ते प्रकाशात आणले. सावित्रीबाईंच्या ‘काव्यफुले’ (१८५४) या काव्यसंग्रहात एकूण ४१ कविता आहेत. त्या स्थूलमानाने निसर्गविषयक, सामाजिक, आत्मपर, बोधपर आणि इतिहासविषयक अशा आहेत. सावित्रीबाईंच्या साहित्यावर जोतीरावांच्या विचारांचा निश्चितपणे प्रभाव होता; मात्र त्यांचे लिखाण ही एक स्वतंत्र अभिव्यक्ती आहे. त्यांच्या काव्यातून जोतीरावांविषयीचा आदरभाव; स्त्री-पुरुष नात्यातला समताभाव; निसर्गसौंदर्य पाहून पुलकित होणारे, उचंबळणारे स्त्रीमन अतिशय तरलपणे व्यक्त झाले आहे. तसेच भारतीय खेड्यांमधील कृषक संस्कृतीचे मनोहारी चित्रण, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि त्यांबद्दलचा कृतज्ञताभाव या कवितांमधून त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच या कवितांमधून स्त्री-पुरुष नात्यातील उतरंड, शोषक लिंगभावसंबंध, पुरुषाची भ्रमरवृत्ती यांविषयी स्त्रीमनाचे हुंकार व्यक्त झाले आहेत. त्यांचा मूळ पिंड समाजसुधारणावादी होता. ज्ञानाची महती, शिक्षणाचे महत्त्व, मनुष्यत्वाचे सार अशा विषयांना वाहिलेल्या कविता त्यांनी प्राधान्याने लिहिल्या. ‘स्वागतपर पद्य’ हे स्वागतगीत किंवा बाहुलीसारख्या विषयावरील कविता त्यांनी शाळेतील विद्यार्थिनींसाठी रचल्या असाव्यात. लहान मुलींना घरकामाला न जुंपता त्यांना शाळेत पाठवले पाहिजे, हा विचार त्यांनी अधोरेखित केला. ग्रामीण भागातील स्त्रीशिक्षणाविषयीची उदासीनता पाहता हा विचार आजही किती लागू पडतो, हे लक्षात घेण्याजोगे आहे.
सावित्रीबाईंचा दुसरा कवितासंग्रह ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ (१८९२) म्हणजे जोतीरावांचे काव्यमय असे आद्यचरित्रच होय. तसेच भारतातील शूद्रातिशूद्रांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेला त्यांच्या मुक्तीचा हा पहिला काव्यमय इतिहास आहे. या कवितासंग्रहामध्ये वैदिक काळ ते इंग्रजी राजवट आणि फुलेंची चळवळ असा भारतीय इतिहासाचा मोठा पट सावित्रीबाईंनी मांडला आहे. सावित्रीबाईंनी आपल्या काव्यातून अभिजन, ब्राह्मणी, वैदिक परंपरेविरुद्ध विद्रोह उभारला आणि गौतम बुद्ध, बळी राजा, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराबाई यांचे आदर्श उभे करत त्यांनी अवैदिक परंपरेशी नाते जोडले. यातील ताराबाईंवरील पोवाडा हा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीवर रचलेला पोवाडा म्हणून महत्त्वाचा आहे. तसेच एखाद्या स्त्रीने शिवाजी महाराजविषयक रचलेली कविता म्हणूनही ती लक्षणीय आहे.
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात धर्मकल्पना, अंधश्रद्धा, रूढी-परंपरा यांनी येथील बहुजनांना मानसिक गुलामगिरीत जखडले होते. त्यांविरुद्धचा विद्रोह सावित्रीबाईंच्या लेखणीतून व्यक्त होतो. अभंगासारखे लोकाभिमुख काव्यप्रकार त्यांनी हाताळले. १८५६ साली जोतीरावांची भाषणे प्रकाशित केली. यांखेरीज सावित्रीबाईंनी जोतीरावांना लिहिलेली पत्रे आणि त्यांची भाषणेही प्रकाशित झाली आहेत. त्यातून उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने व कर्ज यांसारखे विषय त्यांनी हाताळले असून खटकणाऱ्या गोष्टींचा खरमरीत शब्दांत समाचारही घेतला आहे. दारू, जुगार व वेश्यागमन या तीन गोष्टी पुरुषाला दुराचारी बनवतात आणि म्हणून त्यांपासून पुरुषांनी लांब राहिले पाहिजे, अशी पुरुषवर्गाची कानउघडणी त्यांनी केली आहे. लोकशिक्षणासाठी गोष्टी-वेल्हाळ शैलीचा उपयोग अधिक परिणामकारक आहे, हे ओळखून उदाहरणे देत उद्योग, सदाचरण व विद्यादान यांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले आहे.
सावित्रीबाईंच्या खंबीर नेतृत्वानंतर सत्यशोधक चळवळीची परंपरा सत्यशोधक विचारांचा संस्कार झालेल्या अनेक स्त्रियांनी पुढे नेली. तान्हुबाई बिर्जे (१८७६–१९१३) यांनी ‘दीनबंधू’ या नियतकालिकाच्या संपादक म्हणून काही वर्षे काम पाहिले. सावित्रीबाई रोडे (कार. १८९०–१९३०) या रामोशी समाजातील महिलेने ‘रामोशी समाचार’ या नियतकालिकातून दलितांच्या व्यथा मांडल्या. १९२५ साली विदर्भातील वर्धा येथे लक्ष्मीबाई नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्यशोधक महिला परिषदेला पाच हजार महिला हजर होत्या.
शांताबाई बनकर यांनी १९३९ मध्ये सावित्रीबाईंचे छोटे चरित्र लिहिले. सावित्रीबाईंवर आजवर जवळपास ४० छोटीमोठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या काही कवितांचा इंग्रजीत अनुवादही झाला आहे. सुषमा देशपांडे यांनी ‘व्हय मी सावित्रीबाई’ या मराठी एकपात्री नाटकाचे प्रयोग भारतभर केले आहेत. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन ‘बालिकादिन’ म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईंच्या कार्याचे क्रांतिकारी स्वरूप लक्षात घेऊन त्यांना ‘क्रांतिज्योती’ ही उपाधी दिली गेली. तसेच ९ ऑगस्ट २०१४ या दिवशी पुणे विद्यापीठाचे नामकरण ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले. १४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.
संदर्भ :
- Dhara, Lalitha (Ed.), ‘Kavy Phule : Savitri Jotirao Phule’, Dr. Ambedkar College of Com. and Eco., Mumbai, 2012.
- Mani, Braj, Ranjan, Sardar Pamela (Ed.), ‘A Forgotten Liberator, The Life and struggle of Savitribai Phule’, Mountain Peak, New Delhi, 2008.
- नरके, हरी (संपा.), ‘सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय’, महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने समिती, मुंबई, २०१८.
- माळी, मा. गो. आणि इतर (संपा.), ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले : काळ आणि कर्तृत्व’, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९९८.
- माळी, मा. गो., ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले’, मॅजेस्टिक, ठाणे, २०१२ (पहिली आवृत्ती : १९८०).
समीक्षक : श्री. म. (राजा) दीक्षित