चित्रपटाचे तत्त्वज्ञान हे समकालीन कला तत्त्वज्ञानाचे उपक्षेत्र आहे. तसेच सौंदर्यशास्त्राचा एक महत्त्वपूर्ण संशोधनाचा विषय म्हणूनही त्यास ओळखले जाते.

सध्याच्या काळात चित्रपटाचे तत्त्वज्ञान ही शाखा उदयास येण्यामागे महत्त्वाचे एक कारण असे की, चित्रपटाचा प्रभाव संपूर्ण जगावर एक कला म्हणून मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. १९८० च्या दशकानंतर मानवाच्या जीवनामध्ये चित्रपट आणि इतर दृकश्राव्य संसाधनांच्या प्रभावाच्या तात्त्विक अभ्यासास गती मिळाल्यामुळे, चित्रपट तत्त्वज्ञान या विषयाचे महत्त्व वाढले आहे. सध्या चित्रपटाचा सौंदर्यशास्त्रीय अभ्यास, त्याचबरोबर चित्रपट एक कला माध्यम आणि चित्रपटाचा तात्त्विक आशय या तीन अंगानी चित्रपट तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले जाते. या संदर्भात हे ही एक महत्त्वाचे आहे की, चित्रपटाचे तत्त्वज्ञान आणि चित्रपटातील तत्त्वज्ञान हे दोन पूर्णपणे भिन्न विषय आहेत. या नोंदलेखनाचा संदर्भ चित्रपटाचे तत्त्वज्ञान यापर्यंतच सीमित आहे. हजारो वर्षांपासून रंगमंच हा नाटकांच्या माध्यमातून मानवी भावना अभिव्यक्तीकरणाचे एक उत्तम व्यासपीठ म्हणून ओळखला जातो. सु. २५०० वर्षांपूर्वी अ‍ॅरिस्टटलने आपल्या पोएटिक्स या ग्रंथातून ग्रीकमधील प्रसिद्ध असलेल्या ‘शोकांतिकां’च्या स्वभाव-स्वरूपाबद्दल तात्त्विक विश्लेषण दिले आहे. तेव्हापासून विभिन्न देशांतील तत्त्वज्ञांनी कलांचे विविध रूपांचे तात्त्विक अध्ययन प्रस्तुत केले आहे. या पार्श्वभूमीवरून चित्रपटांचे तत्त्वज्ञान सुद्धा उदयास आलेले दिसते. चित्रपट तत्त्वज्ञानामध्ये एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे – चित्रपट म्हणजे नेमके काय? आणि “चित्रपट” या शब्दाची व्याप्ती कुठपर्यंत असू शकते?, हे शोधणे. कारण, पूर्वी चित्रपट म्हणजे फक्त चित्रपटगृहात प्रक्षेपित केले जाणारे असे समजले जात होते; परंतु आजकाल सर्व प्रकारच्या डिजिटल माध्यमातून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. काही तत्त्वज्ञ चित्रपटाचे तत्त्वज्ञान या विषयामध्ये दूरदर्शनसंचाच्या समावेशाच्या विरोधात होते. परंतु, याद्वारे दाखविलेल्या मालिकांचा, उदा., रामायण, महाभारत इत्यादींचा, समाजावर असलेला प्रभाव नाकारता येत नसल्यामुळे समकालीन चित्रपट तत्त्वज्ञानात दूरदर्शनसंचाला सुद्धा जागा दिली गेली आहे.

चित्रपटाच्या तात्त्विक स्वरूपाचे विश्लेषण :

काही टीकाकारांच्या मते चित्रपटांमध्ये असलेल्या अश्लिलतेमुळे चित्रपटाला रंगमंच इत्यादी इतर कलाक्षेत्रांबरोबर बरोबरीचे स्थान देणे चुकीचे ठरेल किंवा काहींच्या म्हणण्यानुसार चित्रपटाला स्वतःचे मूल्य नाही. कारण, ते एक रंगमंचाचे मुद्रीकरण आहे; परंतु जे लोक प्रत्यक्ष रंगमंचावरील सादरीकरणाचा आस्वाद घेऊ शकले नाहीत, त्यांना त्यांच्या फावल्या वेळात विभिन्न देश, काळात बघण्याची संधी चित्रपटामुळे मिळते आहे.

तसेच चित्रपट रंगमंचाचे केवळ मुद्रीकरण नव्हे, तर यात विभिन्न तंत्रांचा अंतर्भाव असतो. उदा., एखाद्या घटनेला जवळून दाखविणे; संपादन तंत्राद्वारे एखादी घटना विभिन्न देशकालात दाखविणे; घटनेला गती देणे इत्यादी. तत्त्वज्ञांचा या संदर्भात एक प्रश्न असा की, वरील चित्रपटतंत्रांचा अभिप्रेत अर्थ दर्शकांना कसा काय अवगत होतो? अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ह्यूगो म्यून्स्टरबर्ग यांच्या मतानुसार, वरील सर्व चित्रपट तंत्रे दर्शकांना त्यांच्या मानसिक-वैचारिक प्रक्रियेमुळे अवगत होत असल्याचे संभवते. उदा., एखाद्या घटनेला जवळून दाखविणे म्हणजेच तेथे अवधानपूर्वक बघणे अपेक्षित असते. अशावेळी दर्शक आपल्या स्वतःच्या मानसिक प्रक्रियेला सुपरिचित असल्यामुळे चित्रपटात त्याच प्रकारच्या वापरलेल्या तंत्राला ओळखून तशी अपेक्षित प्रतिक्रिया देतात.

मूक चित्रपटकाळानंतर ध्वनीमुद्रित चित्रपट आले. त्या काळात रूडॉल्फ अर्नहाइम या कलामानसशास्त्रज्ञांनी, चित्रपटाला शब्द ध्वनीमुद्रित करणे म्हणजे त्याच्या वैशिष्ट्याला कमी करणे आहे, असे मत नोंदवले. त्यांच्या मते, शब्द आणि दृश्य या दोन वेगवेगळ्या कलाकृती आहेत. त्यांचा मेळ दोघांच्याही विशेषतेला तडा पोहोचवतो. चित्रपट कल्पनात्मक दृष्टिकोनाचा आविष्कार करण्यास सक्षम आहे. आंद्रे बाझॅ नामक फ्रेंच चित्रपट समीक्षक-तत्त्वज्ञांच्या मते, चित्रपटांचे विभाजन दोन मुख्य प्रकारात करता येईल. एक, जे वास्तविकतेला यथार्थ स्वरूपात दर्शविणारे आणि दुसरे, प्रतिमेवर जास्त भर देणारे. त्यांच्या मते कॅमेऱ्याचे मुख्य उद्दिष्ट वास्तविक कालखंडाला घनीभूत स्वरूपात मांडणे, हे होय आणि हेच चित्रपटांचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे.

केंडल वॉल्टन या अमेरिकन तत्त्वज्ञाच्या मते, चित्रपटाचा उगम छायाचित्रीकरणातून झालेला आहे. म्हणजे चित्रपटाचे अंतिम उद्दिष्ट वास्तविकतेला दर्शविणे हेच आहे. वास्तविकतेला प्रतिबिंबित करणे म्हणजे काय? याबाबतीत मतमतांतरे आहेत. अंकीय (डिजिटल) तंत्रज्ञानाद्वारे आजकाल वास्तविकतेचे पूर्ण स्वरूप बदलता येते म्हणून चित्रपट आणि वास्तविकता यांमध्ये संबंध आहे का आणि तो असला पाहिजे? यावर मोठ्या प्रमाणात उहापोह चालू आहे.

बऱ्याचदा चित्रपटाचा अधिष्ठाता म्हणून दिग्दर्शकाला मान देतात, जसे एखाद्या लेखनाला त्याच्या लेखकाच्या नावावरून ओळखतात. तसे चित्रपटाला दिग्दर्शकाच्या नावावरून ओळखतात; परंतु चित्रपटाच्या निर्मितीमागे अनेकांचे योगदान असते. म्हणून चित्रपटाचा नेमका अधिष्ठाता कोण? हा प्रश्न उदभवतो.

आधुनिक काळातील फ्रेंच चित्रपटांचा दिग्दर्शक फ्रांस्वा ट्रफॉन्ट यांच्या मते जे चित्रपट साहित्यक्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या कथानकांवर आधारित आहेत. ते चित्रपट गौण स्तराचे आहेत. चित्रपटाला एक कलाकृती म्हणून तेव्हाच ओळखता येईल, ज्या वेळी दिग्दर्शकाचे कथालेखन, पटकथालेखन, अभिनेत्यांचा अभिनय इत्यादी बाबींवर संपूर्ण प्रभुत्व असते. या धोरणाला पुढे नेत अमेरिकन चित्रपट समीक्षक अँड्र्यू सॅरिस यांच्या मते, उच्चदर्जाच्या दिग्दर्शकाच्या कृतीमध्ये जरी एखादी चूक किंवा कमतरता राहिली, तरी तोच चांगला ओळखला जावा. कारण, इतरांच्या कथांच्या आधारे निर्माण केलेले चित्रपट कितीही सुंदर असोत, ते गौणच आहेत.

पण या दृष्टिकोनात केवळ दिग्दर्शकाच्या कामास महत्त्व दिले गेले असून अभिनेते, पटकथालेखक, इतर तंत्रज्ञ, लेखक, गायक इत्यादींच्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेतले जात नाही. म्हणून चित्रपट समीक्षक किंवा तत्त्वज्ञ चित्रपटाच्या निर्मिती वा आविष्काराच्या दायित्वासंदर्भात भिन्न मते व्यक्त करताना दिसून येतात.

प्रेक्षकाची भावनिक तादात्म्यता :

तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता येथे एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे चित्रपट पाहताना प्रेक्षक काल्पनिक भूमिकेशी भावनात्मकतेने का जोडले जातात? एखाद्या जिवंत आणि वास्तविक व्यक्तीशी भावनात्मक आपुलकी असणे स्वाभाविक आहे; पण प्रेक्षकाला काल्पनिकतेची जाण असून सुद्धा तो का भावनिक होतो? याबाबत एक सिद्धांत असा आहे की, दर्शक स्वतःला, समोरच्या पात्रामध्ये बघतात; परंतु चित्रपटातील वेगवेगळी पात्रे अनेक गुणांनी सामान्य व्यक्ती पेक्षा अधिक समृद्ध असतात. जसे जास्त सुंदर, गुणवान, जास्त बलवान इत्यादी. मग एक सामान्य प्रेक्षक स्वतःला त्या पात्रात का बघतो? काही तज्ञांच्या मते, व्यक्तीला स्वतःपेक्षा अधिक चांगले गुण असलेल्या व्यक्तीमध्ये स्वतःला पाहणे पसंत असते. ज्यावेळी प्रेक्षक स्वतःला त्या पात्रात पाहतो, तेव्हा त्या पात्राच्या भविष्याबद्दल चिंतीत होतो. येथे संबंधित पात्र आणि प्रेक्षक यांच्यात एकरूपता येते. या एकरूपतेच्या सिद्धांतावर बरेच तज्ञ आक्षेप घेत आहेत. त्यांच्या मतानुसार, चित्रपट आपल्या कल्पनेला पंख देतात आणि हा कल्पनाविस्तार व्यक्तिला भावनिक करण्यास सक्षम आहे. यातून एक असा निष्कर्ष निघतो की, आपण जे वास्तविक जीवनात प्रत्यक्ष अनुभव करणे नाकारतो, तेच काल्पनिक जगतात बघणे आपल्याला आवडते. उदा., चित्रपटात जर भयानक घटना घडत असतील तर काहींना ते अनुभवायला आवडते, कारण ते काल्पनिक आहे, ही जाणीव त्यांना एका सुरक्षित वलयात राहून कल्पनेच्या पंखावर स्वार होण्याची एक संधी असते.

चित्रपटातील कथन :

चित्रपटाचा आशय हा प्रामुख्याने प्रेक्षकापर्यंत दृश्य, शब्द आणि संगीत यांच्या माध्यमातून पोहोचतो. काही चित्रपटांत दिग्दर्शक कथा कथन करणाऱ्याचा प्रभावीपणे वापर करतात. ही कथा कथन करणारी व्यक्ती काहीवेळा चित्रपटातील एखादी भूमिका करत असते किंवा नसते. काहीवेळा, कथा कथन पात्र चुकीचे कथन करत असतो. उदा., लेटर फ्रॉम अ‍ॅन अननोन वुमन (१९४८) या चित्रपटात प्रेयसीने आपल्या प्रियकराला पाठवलेल्या पत्राचे वाचन एक स्त्रीचा आवाज करत असतो.हे कथन ऐकताना प्रेक्षकांच्या हे समजते की, या पात्राचा दृष्टिकोन चुकीचा आहे आणि तिच्या प्रियकराबद्दल तिचा चुकीचा समज आहे. येथे प्रेक्षकांच्या ज्ञानाचा एकमात्र स्रोत कथानक असून सुद्धा त्यांना कथन करणा-या पात्राचा चुकीचा दृष्टिकोन कसा काय समजतो, हा एक गहन तात्त्विक मुद्दा आहे. कथनामधले विडंबन प्रेक्षकांपर्यंत दिग्दर्शक कौशल्याने पोहोचवतो.

चित्रपट आणि समाज :

चित्रपटासंबंधी काही सामाजिक तत्त्वज्ञांचा असा एक आरोप आहे की, चित्रपट समाजाची चुकीची प्रतिमा दाखवून समाजात चुकीच्या रूढीला टिकवून ठेवतात. उदा., चित्रपट मूलत: पुरुषप्रधान असून स्त्रीला कमजोर आणि पुरुषांना स्त्रीपेक्षा वरचढ दाखवतात. चित्रपटातील राजकीय व सामाजिक दृश्यांचा प्रभाव समाजमनावर प्रबळ असल्यामुळे काही सामाजिक चळवळीसुद्धा वास्तविक जीवनात सुरू झाल्याचे दिसते. म्हणूनच चित्रपटांचा समाजावर असणारा सकारात्मक व नकारात्मक प्रभाव याविषयी तज्ञसुद्धा संशोधन करत असतात.

चित्रपट : एक ज्ञानाचा स्रोत : 

अनेक विचारवंत आणि तत्त्ववेत्त्यांनी चित्रपट हा एक ज्ञानाचा स्रोत आहे काय? यावर साधकबाधक चर्चा केलेली आहे. कूफर, फ्रिलँड, मूलहल आणि इतर चित्रपटाचे तत्त्ववेत्ते असे मानतात की, चित्रपट हा केवळ एक ज्ञानाचा स्त्रोत नसून व्यक्तीच्या वैचारिक, मानसिक आणि भावनिक क्रियेला चालना देऊन विचार करण्यास ते प्रवृत्त करतात. चित्रपट हे तत्त्वज्ञानाला सुद्धा विशेष योगदान देऊन त्यास नवी दिशा मिळवून देऊ शकतात. चित्रपट काहीवेळा पुस्तकांपेक्षा अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतात.

या व्यतिरिक्त हॉलिवूडनिर्मित द मॅट्रिक्स (१९९९), इन्सेप्शन (२०१०) इत्यादी अनेक चित्रपटांनी तत्त्वज्ञानाचे काही मूलभूत मुद्दे उपस्थित केले आहेत. अशा प्रकारच्या चित्रपटांनी मानवाचे अस्तित्व, त्याची ओळख इतकेच नव्हे, तर  त्याच्या ख-या अस्तित्वाबद्दल सुद्धा काही मूलभूत तात्त्विक प्रश्न समोर आणून ठेवले आहेत.

अशाप्रकारे चित्रपटाचे तत्त्वज्ञान अनेक तात्त्विक विषयांवर चर्चा करते.

 

संदर्भ :

  • Arnheim, Rudolf, Film as Art, California, 1957.
  • Bazin, André, What is Cinema?, 2 volumes, California, 1971.
  • Eisenstein, Sergei, Film Form : Essays in Film Theory, New York, 1969.
  • Mulhall, Stephen, On Film, London, 2001.
  • Münsterberg, Hugo, The Photoplay : A Psychological Study, New York, 1916.लेखक : डॉ.

समीक्षक : गणेश मतकरी