बिहार राज्यातील एक महत्त्वाचे नवाश्मयुगीन पुरातत्त्वीय स्थळ. हे बिहारच्या सारण जिल्ह्यात गंगा आणि घाघरा (घागरा) नदीच्या संगमावर छपरा या ठिकाणापासून दक्षिण-पूर्वेस ११ किमी. अंतरावर आहे. बौद्ध धर्मग्रंथात भिक्षू आनंदच्या संदर्भात, हिंदू धर्मग्रंथात पौराणिक राजा मयूरध्वज याच्या संदर्भात आणि संस्कृत ग्रंथ ‘चिरांद माहात्म्य’ आदी ग्रंथांत चिरांदचा उल्लेख आढळतो. या पुरास्थळाचा शोध १८७१ मध्ये स्कॉटिश इतिहासकार विलियम विल्सन हंटर (१८४०-१९००) यांनी लावला. १८७२-८० च्या कालावधीत ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ आर्कीबाल्ड कँपबेल कार्लाईल (१८९८-१९६०) यांनी या स्थळाला भेट दिली. १९५४ मध्ये भारतीय प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर (१८९८-१९६०) यांनी छपरा पुरातत्त्वीय सोसायटीच्या विनंतीवरून येथील परिसराची पाहणी केली. तत्पूर्वी १९६० मध्ये बिहार पुरातत्त्व संचालनालयाच्या वतीने चिरांद परिसराचे सर्वेक्षण करण्यात येऊन १९६२-६३ पासून येथे उत्खननकार्य हाती घेण्यात आले. येथे ताम्रपाषाण काळापासूनच्या संस्कृतीचे अवशेष प्राप्त झाले. पुढे १९६९-७० मधील उत्खननाने या स्थळाची प्राचीनता नवपाषाण काळापर्यंत मागे गेली आहे. येथील उत्खननात नवपाषाण ते पूर्व-मध्ययुगापर्यंतच्या काळाचे अवशेष प्राप्त झाले असून येथील सांस्कृतिक स्तरक्रमाचे विस्तृत विवरण खालीलप्रमाणे आहे:

हाडांपासून निर्मित नवाश्मयुगीन अवजारे-उपकरणे, चिरांद (बिहार).

कालखंड १ : नवाश्मयुग

उत्खननातून प्राप्त खापरांच्या आधारावर उत्खननकर्त्यांनी युगाला आय ए आणि आय बी (Ia,Ib) अशा दोन भागांत   विभाजित केले. नवाश्मयुगाच्या प्रथम भागात केवळ लाल रंगाची हस्तनिर्मित मृदभांडी प्राप्त झाली आहेत. यांमध्ये मडकी, विविध आकाराची वाडगी, तोटीयुक्त भांडी इ. प्रामुख्याने आढळतात. या काळातील लोक लाकडी वासे आणि छप्पर असलेल्या कुडाच्या घरात राहत. घराच्या भिंती मातीने लिंपल्या होत्या. या स्तरातून जनावरांची, पक्ष्यांची व माशांची अनेक हाडे मिळाली. जनावरांच्या हाडांपासून निर्मित विविध वस्तू चिरांदच्या नवाश्मयुगाची विशेषता आहे. चिरांदच्या प्रथम स्तरातून प्राप्त लाल रंगाच्या खापरांची दक्षिणेतील नवपाषाण स्थळ उटनूर (उतनूर) येथील खापरांशी जवळीक असल्याने उत्खननकर्त्यांच्या मते चिरांद येथील नवाश्मयुगाची कालगणना उटनूरच्या समकक्ष म्हणजे इ. स. पू. २५०० ते इ. स. पू. २३०० इतकी निश्चित केली आहे.

नवाश्मयुगाच्या द्वितीय भागात राखाडी, काळ्या-आणि-तांबड्या रंगाची व राखाडी-आणि-तांबड्या रंगाची नवीन प्रकाराची हस्तनिर्मित खापरे प्राप्त झाली. पूर्ववर्ती काळापेक्षा या स्तराची खापरे गुणवत्तेने आणि निर्माण परंपरेने अधिक विकसित आहेत. खापराच्या बाह्य भागावर विविध प्रकारची चित्रे या काळातील मृदभांड्यांची विशेषता आहे. यांमध्ये मडकी, विविध आकाराची वाडगी, थाळ्या, लांब तोटीयुक्त भांडी प्रामुख्याने आढळतात. हत्यारांमध्ये दगडी कुऱ्हाडी, पात्या, सूक्ष्म दगडी हत्यारे, हाडांची विविध हत्यारे मिळाली आहेत. इतर पुरावशेषांमध्ये मातीचे मानवी व पशू शिल्पे, अर्धमौल्यवान दगडी माणके ज्यामध्ये स्टिॲटाइट, चाल्सिडोनी, अगेट, कार्नेलिअन प्रमुख आहेत. मागील काळाप्रमाणे हे लोक देखील लाकडी वासे आणि छप्पर असलेल्या कुडाच्या घरात राहत. घरातील जमिनी मातीने सारवलेल्या असून लहान-मोठ्या आकारांच्या चुलींवर स्वयंपाक तयार करीत. याच काळात चिरांदच्या मानवाने शेती करण्यास प्रारंभ केला होता. उत्खननांत तांदूळ, ज्वारी, मटर, मूग इत्यादी मिळाले आहेत. हा कालखंड इ. स. पू. २३०० ते इ. स. पू. १६०० इतका निर्धारित केला आहे.

उत्खनन स्तर, चिरांद (बिहार).

कालखंड २: ताम्रपाषाण आणि लोहयुग

या स्तरातून प्राप्त खापरे आणि पुरावशेषांच्या आधारावर उत्खननकर्त्यांनी या कालखंडाला आय आय ए आणि आय आय बी (IIa, IIb) अशा दोन भागांत विभाजित केले आहे. प्रथम भागाची खापरे प्रामुख्याने काळी-आणि-तांबड्या रंगाची असून उत्कृष्ट भाजणीची आहेत. या स्तरात दगडी कुऱ्हाडी, सूक्ष्म दगडी हत्यारे, हाडांची उपकरणे तसेच स्टिअॅटाइट दगडाचे अर्धमौल्यवान दगडी माणके, भाजलेल्या मातीचे मणी देखील या स्तरात मिळाले आहेत. खापराच्या आधारे ताम्रपाषाण कालखंडाची कालगणना इ. स. पू. १६०० ते इ. स. पू. १००० इतकी निर्धारित केली आहे.

चिरांदच्या दुसऱ्या कालखंडाच्या द्वितीय भागात लोखंडी उपकरणे प्राप्त झाली आहेत. काळी-आणि-तांबड्या  रंगाची खापरे या काळात देखील उपयोगात असून यांमध्ये मडकी, थाळ्या, विविध आकारचे वाडगे इ. प्रमुख आहेत. या स्तरात भाजलेल्या मातीने निर्मित, लाल रंगाची व लघु आकाराची झाकणयुक्त शवपेटिका विशेष असून त्यावर वृषभ आणि हरिणाचे अंकन आहे. पूर्ववर्ती काळाप्रमाणे या स्तरात देखील सूक्ष्म दगडी हत्यारे, हाडांची उपकरणे, भाजलेल्या मातीच्या पक्ष्यांची शिल्पे, मणी आणि तांब्याच्या बांगड्या इत्यादी मिळाली आहेत. या स्तरात श्वानाचे दफन मिळाले असून दफनात काळ्या-आणि-तांबड्या रंगाची खापरे, हाडांची उपकरणे आढळली आहेत. उत्खननकर्त्यांनी लोहयुगाचा कालावधी इ. स. पू. १००० ते इ. स. पूर्व ८०० इतका निश्चित केला आहे.

कालखंड ३ : उत्तरेकडील काळी चकाकीयुक्त मृदभांडी  (NBPW)

उत्तरेकडील काळी चकाकीयुक्त मृदभांडी (NBPW) ही या काळाची ओळख असून यासोबत काळी-आणि-तांबड्या रंगाची खापरे कमी प्रमाणात प्राप्त झाली आहेत. या काळातील लोक भाजलेल्या विटांच्या घरात राहत, तसेच विविध वस्तूंचा वापर करत होते. या स्तरात नवाश्मयुगीन काळातील एक दगडी कुऱ्हाड, तांब्याच्या वस्तू, अर्धमौल्यवान दगडी मणी, पाटे-वरवंटे, मृण्मय मणी, खेळणे आणि शिल्पे, हाडांची उपकरणे, लोखंडी वस्तू इत्यादी पुरावशेष मोठ्या संख्येने आढळल्या आहेत. शिवाय आहत आणि मुद्रित नाणीही या स्तरात मिळाली आहेत. उत्तरेकडील काळी चकाकीयुक्त मृदभांड्यांच्या आधारे हा काळ इ. स. पू. ८०० ते इ. स. पू. २०० इतका ठरविण्यात आला आहे.

कालखंड ४ : कुषाण (कुशाण) काळ

या स्तरातील उत्खननांत एका पात्रात कुषाण राजे हुविष्क आणि कनिष्क यांची एकूण ८८ तांब्याची नाणी मिळाली आहेत. यासोबत अर्धमौल्यवान दगडी मणी, कुषाणकालीन विशिष्ट पेहराव असलेले मृण्मय स्त्री-शिल्प, मृण्मय मणी व कुंडल, पक्षी आणि शिल्पे, हाडांचे पासे इतर विशेष पुरावस्तू आहेत. या काळातील लोक मृदभांड्यांचा बाह्य भाग ठप्प्याने (ठसे, मुद्रांकित) अलंकृत करीत असत. उत्खननातून प्राप्त पुरावशेषांच्या आधारे हा कालखंड इ. स. पू. २०० ते इ. स. ३०० इतका मानला जातो.

कालखंड ५ : पालकाळ

चिरांद येथील उत्खननात कुषाणकाळानंतर मानवी वसाहतीचे अवशेष पाल काळातील आहेत. या काळातील काळ्या दगडांची शिल्पे उत्खननात मिळाली आहेत. याशिवाय कलचुरी नरेश श्री गांगेयदेव याची पाच सोन्याची नाणी याच स्तरात मिळाली. या काळातील अन्य पुरावशेषांमध्ये मृण्मय शिल्पे, काचेच्या बांगड्या, हस्तिदंताचे पासे महत्त्वपूर्ण आहेत. पुरावशेषांच्या आधारे या स्तराचा कालखंड इ. स. ७०० ते इ. स. १२०० इतका निश्चित केला आहे.

चिरांद येथून मोठ्या प्रमाणात हाडांपासून निर्मित पुरावशेष प्राप्त झाले असून ते या नवपाषाण स्थळाची ओळख आहे. हाडांची हत्यारे प्रमुख असून यांमध्ये विविध आकाराच्या कुऱ्हाडी, वेधण्या, बाणाग्रे, छिन्नी आदी प्रामुख्याने प्राप्त होतात. तसेच कर्ण-कुंडले, कंगवे, बांगड्या इत्यादी आभूषणे देखील आहेत. यावरून असे निदर्शनास येते की, चिरांदचे नवपाषाण युगातील लोक हाडांच्या वस्तू निर्माण करण्यात निष्णात होते. शेती आणि लोखंडामुळे ताम्रपाषाण आणि लोहयुगात चिरांद येथील लोकांच्या जीवनात बदल दिसून येतो. उत्तरेकडील काळी चकाकीयुक्त मृदभांडी आणि कुषाण या काळात चिरांद मोठे व्यापारी केंद्र होते. चिरांदच्या नवपाषाण स्तरात मिळालेली खापरे दक्षिण भारतातील उटनूर, पिकलीहाल, टेक्कलकोटा, संगनकल्लू, ब्रह्मगिरी इत्यादी नवपाषाण स्थळांशी समरूप आहेत. तर येथील हाडांची उपकरणे काश्मीरमधील बुर्झाहोम या नवाश्मयुगीन स्थळाशी समरूप आहेत. लोहयुगीन स्तरात प्राप्त एक लघु मातीची शवपेटिका (सारकॉफॅगस) चिरांदचा दक्षिण भारतीय संस्कृतीशी संबंध दर्शविते.

संदर्भ :

  • Verma, B. S. Chirand Excavations Report (1961-1964 & 1967-1970), Directorate of Archaeology, Bihar, 2007.
  • Verma, B. S. ‘Excavations at Chirand: New Light on the Indian Neolithic Culture-Complex’, Puratattva, No. 4. 19-23, (Ed., Gupta, S.P.), 1970-71, Reprint 2005.

समीक्षक : सुषमा देव