कास्थिमत्स्य हा मत्स्य अधिवर्गाचा एक वर्ग आहे. ज्या माशांच्या शरीराचा अंत:कंकाल कूर्चेपासून (कास्थिंपासून) बनलेला असतो, त्यांना कास्थिमत्स्य म्हणतात. ग्रीक भाषेतील chondra (cartilage; कूर्चा/कास्थी) व ichthys (fish; मत्स्य/मासा) अशा दोन शब्दांच्या संयोगातून Chondrichthyes (कास्थिमत्स्य) हा शब्द बनलेला आहे. या वर्गातील मासे सागरी पाण्यात अधिक प्रमाणात, तर गोड्या पाण्यात तुरळक प्रमाणात आढळतात. जगभरात एकूण ७०० कास्थिमत्स्यांची नोंद झाली आहे. उत्क्रांतीच्या प्रवाहात कास्थिमत्स्य हे पृष्ठवंशी प्राण्यांतील आरंभीचे जीव असावेत, असे मानले जाते. यामध्ये शार्क, रे, कायमिरा इ. माशांचा समावेश होतो.

कास्थिमत्स्य : वर्गीकरण

कास्थिमत्स्य वर्गाचे इलॅस्मोब्रांकी (Elasmobranchii) आणि होलोसिफॅली (Holocephali) या दोन उपवर्गांमध्ये वर्गीकरण केले जाते.

(अ) इलॅस्मोब्रांकी (Elasmobranchii) : या उपवर्गातील माशांचे शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असून त्यांचा आकार साधारण लांबट व दोन्ही टोकांस निमुळता असतो; उदा., मुशी, शार्क. तर काही मासे आकाराने पसरट असून तबकडीप्रमाणे चपटे असतात; उदा., लांजा, पाकट. यातील बहुतेक मासे जरायुज (पिलांना जन्म देणारे), तर काही अंडज असून ते आपली अंडी एका पिशवीसारख्या कोशात घालून भक्षकांपासून वाचवण्यासाठी हे कोश पाणवनस्पती किंवा खडकांच्या फटीत दडवून ठेवतात.

(आ) होलोसिफॅली (Holocephali) : या उपवर्गातील मासे समुद्रतळाशी वास्तव्य करतात. काळपट राखाडी किंवा चंदेरी त्वचेवर ठिपके किंवा पट्टे असतात. या माशांमध्ये कल्लाविदराची एक जोडी असते. डोके मोठे असून अंसपक्ष पंख्यासारखे असतात. बहुसंख्य प्रजातीत पहिल्या पृष्ठपराशी विषारी कंटक असतो. शेपूट उंदराच्या शेपटीसारखे असते. नराला श्रोणिपरापाशी व एक मस्तकावर अशा दोन ठिकाणी आलिंगके असतात. यामध्ये उंदीर मासा (Chimaera), ससा मासा (Hydrolagus), हत्ती मासा (Callorhynchus) यांचा समावेश होतो.

कास्थिमत्स्य सजीवांची शारीरिक वैशिष्ट्ये : या प्राण्यांचे मुख अधर पृष्ठावर असते. मुखाभोवती संवेदके असतात. दात पुष्कळ असून त्यांच्या टोकांवर दंतवल्काचे टोपण असते. त्यांच्यात खालचा व वरचा असे दोन्ही जबडे असतात. तसेच त्यांच्यात परांची जोडी, मोठे डोळे, विशेष क्षमता असलेली नासारंध्रांची जोडी, कप्पे असलेले हृदय, कार्यक्षम गंधसंवेदी अवयव (Olfactory organ) अशी शरीररचनात्मक वैशिष्ट्ये आढळतात.

कास्थिमत्स्य वर्गातील काही मासे

पाण्यातील हालचालींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अवयवांमध्ये अंसपक्ष (Pectoral fin), श्रोणीपक्ष (Pelvic fin), पृष्ठपक्ष (Dorsal fin) व पुच्छपक्ष (Caudal fin) यांचा समावेश होत असून प्रजातीनिहाय यांच्या आकार आणि आकारमान यांमध्ये भिन्नता आढळते. पुच्छपक्ष असममित असतो. अंसपक्ष व श्रोणिपक्ष जोडीने, तर पृष्ठपक्ष व पुच्छपक्ष एकेरी असतात. बहुतांश कास्थिमत्स्यांमध्ये अंसपक्षाची जोडी आकारमानाने लहान असते. पाकट माशांमध्ये अंसपक्ष मोठे, लवचिक व पुढील  दिशेने वाढलेले असून डोक्याच्या बाजूस जोडलेले असतात. बहुधा मुशी माशामध्ये ऊर्ध्व (वरच्या) बाजूला मोठे व अधर (खालच्या) बाजूस लहान अशा अनियमित आकाराचे पक्ष/पर आढळतात. पाण्यासारख्या आधारहीन अधिवासात शरीराचे संतुलन शेपटी व पुच्छ परांद्वारे साधले जाते.

होलोसिफॅली प्राण्यांचा अपवाद वगळता वाढीच्या काळात पृष्ठरज्जूचे (Notochord) रूपांतर मणके असलेल्या पाठीच्या कण्यात होते. काही शार्क माशांमध्ये पाठीचा कणा अल्प विकसित व लहान आकाराचा असतो. कास्थिमत्स्यांमध्ये वाताशय (Air bladder) नसते; परंतु, यकृतात असलेल्या कमी घनतेच्या मेद साठ्यामुळे उत्प्लावन (पाण्यावर तरंगणे) क्षमता साधली जाते.

कास्थिमत्स्यांची त्वचा सूक्ष्म दंताभ खवलांनी (Placoid scales) आच्छादलेली असल्यामुळे ती  खरखरीत असते. बहुतांश कास्थिमत्स्यांच्या त्वचेतील दंताभ खवले एकाच दिशेने संरचित असतात. पट्टीकाभ शल्क व दंताभ खवले यांमुळे कास्थिमत्स्यांना संरक्षण मिळते आणि शरीरास वैशिष्ट्यपूर्ण निमुळता आकार देखील लाभतो. कास्थिमत्स्यांच्या काही  जातीत त्वचेमध्ये श्लेष्मल ग्रंथी (Mucous gland) असतात. त्यांच्या स्त्रावामुळे त्वचेचे संरक्षण होते व त्वचा चकाकते. पाण्याचा प्रतिकार कमी होतो. पोहण्यासाठी ही अनुकुलने आवश्यक असतात. त्यामुळे माशांना गतिमान हालचाली करता येतात. शरीरात ट्रायमिथाईल अमाइन ऑक्साईड या रासायनिक संयुगाचा संचय असल्याने त्यांच्यात उत्तम रीतीने परासरण-नियमन (Osmoregulation) होते.

कास्थिमत्स्यांमध्ये तांबड्या रक्त पेशींची निर्मिती प्लीहा (Spleen), अधिजनन ग्रंथी (Epigonal glands) व लेडिग्ज अवयव (Leydig’s organ) यांमध्ये होते. जनन ग्रंथींभोवती असणाऱ्या अधिजनन ग्रंथी रोगप्रतिकाराचे कार्य करतात. काही कास्थिमत्स्य प्रजातींमध्ये लेडिग्ज अवयव आढळतात. परंतु,  होलोसिफॅली उपवर्गीय कास्थिमत्स्यांमध्ये अधिजनन ग्रंथी व लेडिग्ज अवयव नसतात. सर्व कास्थिमत्स्यांमध्ये ५–७ कल्ल्यांच्या जोड्या असून त्यांद्वारे श्वसन घडून येते. कल्ल्यांवर प्रच्छद पटल (Operculum) नसते.

जलपृष्ठीय (Pelagic) मासे सतत पोहत असल्यामुळे त्यांच्या कल्ल्यांना निरंतर ऑक्सिजनयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. परंतु, पाण्याच्या तळाशी राहणारे (Demersal) मासे डोळ्यांशेजारील श्वासरंध्रांमधून (Spiracle) पाणी घेऊन कल्ल्यांमधून बाहेर सोडतात; उदा., नर्स शार्क (Nurse shark). श्वासरंध्राचा  आकार व आकारमान यांत जातीनुसार फरक आढळतो.

कास्थिमत्स्यांमध्ये मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System) असते. मेंदूची रचना अत्यंत साधी असून अग्रमेंदू (Forebrain) तुलनेने लहान असतो. तसेच ८–१० जोड्या कर्पर चेताच्या (Cranial nerves) असून मज्जारज्जू मज्जातंतूसहित असतो. यांच्या चेतासंस्थेमध्ये आढळून येणाऱ्या वसावरणाची (Myelin) रचना चतुष्पाद प्राण्यांतील वसावरणाशी मिळतीजुळती आहे. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळेच जैवशास्त्रज्ञ कास्थिमत्स्य हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या उत्क्रांतीच्या कालप्रवाहातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मानतात.

कास्थिमत्स्यांमध्ये संवेदनग्रहण संस्था विकसित असून अनेक संवेदी अवयव (Sensory organs) असतात. संवेदी अवयवांमध्ये त्वचेखालच्या जेलीद्रव्याने भरलेले सूक्ष्म छिद्रांचे जाळे म्हणजेच लॉरेंझिनी तुंबिका (Ampullae of Lorenzini), पार्श्वरेखा संस्था (Lateral Line System), अंत:कर्णामध्ये अर्धवर्तुळाकार नलिका (Semicircular canal), विद्युत अवयव (Electric organs) आणि ध्वनिसंवेदी अवयव (Sound detecting organs) असतात. पाण्यात अचूकपणे विहार करणे, विद्युत कंपने ग्रहण करणे, दूर अंतरावरील भक्ष्याचा शोध घेणे, तापमापन करणे ही कार्ये लॉरेंझिनी तुंबिका करतात. याशिवाय तीन अर्धवर्तुळाकृती नालांपासून तयार झालेल्या अंतर्कर्णामुळे संतुलन आणि हालचाल साधली जाते. ध्वनिसंवेदी अवयव मर्यादित क्षमतेचे असले तरी सामान्यत: कमी कंपन ध्वनीलहरी ओळखता येतात. निशाचर प्राण्यांप्रमाणे डोळ्याच्या आत परावर्तक चकास स्तर (Tapetum lucidum) असतो, त्यामुळे खोल पाण्यात व मंद प्रकाशात त्यांना स्पष्ट दिसते. पाकटसारख्या माशांमध्ये सुविकसित विद्युत अवयवांचा संरक्षण आणि भक्ष्य पकडण्यासाठी उपयोग केला जातो.

कास्थिमत्स्यांमध्ये प्रजननाचा ठराविक कालावधी नसतो. समागमासाठी नर माशाला श्रोणी आलिंगक (Pelvic clasper) या वैशिष्ट्यपूर्ण अवयवाची जोडी असते. श्रोणी आलिंगकामुळे मादीच्या शरीरात जननपेशी सहजपणे स्थानांतरीत केल्या जातात. अशा रीतीने या माशांत अंतरफलन घडून येते. प्रजनन अंडज (Oviparous) पद्धतीने होते, तर क्वचित काही जातींच्या माशांमध्ये अंडजरायुज (Ovoviviparous) पद्धतीने होते. अंडजरायुज पद्धतीमध्ये फलनानंतर बऱ्याच काळासाठी अंडी मादीच्या शरीरात राहत असल्यामुळे अंड्यातच काही प्रमाणात भ्रूणाची (Embryo) वाढ होते. पूर्ण भ्रूण विकास झाल्यावर त्यातून मासे बाहेर पडतात. गर्भधारणा कालावधी ११ महिन्यांचा असतो. अंड्यांचे आकारमान मोठे असते.  साधारणता २१०–२८० मिमी. लांब व ११०–१८० मिमी. रुंद असणारी अंडी गुळगुळीत असून त्यांना बाह्य तंतुमय आवरण नसते. समुद्रकिनारी आढळणाऱ्या कास्थिमत्स्यांच्या अंड्यांचे संरक्षक आवरण (कवच) ‘मरमेड पर्स’ (Mermaid’s purse) या नावाने ओळखले जाते. काही अंडज आणि जरायुज कास्थिमत्स्य आपल्या अंड्यांची प्रारंभी देखभाल करीत असले तरी नवजात पिलांचे संगोपन मात्र करीत नाहीत.

कास्थिमत्स्य प्रजातींना व्यापारी मूल्य असते. त्यामुळे यांची मासेमारी केली जाते. मोरी, मुशी आणि पाकट माशांचा खाद्य प्रजाती म्हणून वापर होतो. कास्थिमत्स्य माशांच्या यकृतापासून मोठ्या प्रमाणात तेल मिळवले जाते.

पहा : अस्थिमत्स्य, मत्स्य अधिवर्ग : वर्गीकरण.

संदर्भ :

  • https://www.encyclopedia.com/plants-and-animals/animals/vertebrate-zoology/cartilaginous-fishes
  • https://academic.oup.com/icb/article/17/2/379/163593

                                                                        समीक्षक : नंदिनी देशमुख