रज्जुमान (Chordata) संघातील (समपृष्ठरज्जू किंवा पृष्ठवंशरज्जू असलेल्या) पृष्ठवंशी उपसंघात पाठीचा कणा (मेरुदंड) असलेल्या प्राण्यांचा समावेश होतो. पाठीचा कणा असणाऱ्या, क्लोमांद्वारे श्वसन करणाऱ्या व परांच्या साहाय्याने हालचाल करणाऱ्या शीतरक्ताच्या जलचर प्राण्यांचा समावेश मत्स्य अधिवर्गात होतो. पृष्ठवंशी प्राण्यांच्या उत्क्रांती प्रक्रियेतील मासा हा एक महत्त्वाचा दुवा आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत माशांचे अनेक प्रकार निर्माण झाले. त्याचप्रमाणे चतुष्पाद, उभयचर प्राण्यांची निर्मितीही मांसलपर असणाऱ्या माशांपासून झाली असेही आता अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.
माशाचे शरीर साधारणपणे लांबट, दोन्ही टोकांना निमुळते, प्रवाहरोधी व पोहताना कमी रोध होईल असे असते. बहुतेक माशांमध्ये वाताशय असते. त्याद्वारे ते पाण्यात वेगवेगळ्या पातळीवर तरंगतात. ध्वनी निर्माण करणे तसेच तो ग्रहण करणे यासाठीही त्याचा उपयोग होतो. साधारणपणे माशांचा रंग रेती, शेवाळे किंवा पोवळे यांसारखा असतो. माशाच्या शरीराचा आकार, शरीररचना, अंतर्गत अवयव, बाह्यांगे, खवल्यांची रचना व आकार यांवर आधारित त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. रज्जुमान संघाच्या वर्गीकरणाबाबत वैज्ञानिकांमध्ये मतभिन्नता आहे. वर्गीकरणाच्या एका पद्धतीनुसार रज्जुमान संघाच्या पृष्ठवंशी (Vertebrata) उपसंघाचे जंभहीन (Agnatha) व जंभयुक्त (Gnathostomata) असे दोन विभाग केले आहेत.
(I) जंभहीन विभाग : या विभागामध्ये पुढील दोन वर्गांचा समावेश होतो.
(अ) ऑस्ट्रॅकोडर्मी (Ostracodermi) : यामध्ये शरीरावर कठीण कवचयुक्त आवरण असणाऱ्या प्राण्यांचा समावेश होता. या वर्गातील सर्व प्राणी विलुप्त (नामशेष) झाले आहेत. उदा., ड्रेपॅनॅस्पिस (Drepanaspis), हेमिसायक्लॅप्सिस (Hemicyclaspis).
(आ) गोलमुखी (Cyclostomata) : यामध्ये जबडा नसलेले, डोक्यावर एकच नासाद्वार असलेले आणि कूर्चायुक्त सांगाडा असलेल्या प्राण्यांचा समावेश होतो. याचे पुढील उपवर्ग आहेत.
(i) मिक्सिनॉयडिया (Myxinoidea) : उदा., हॅगफिश.
(ii) पेट्रोमायझोन्टीडा (Petromyzontida) : उदा., लॅम्प्री.
(II) जंभयुक्त विभाग : यामध्ये मत्स्य (Pisces / Fish) व चतुष्पाद (Tetrapoda) अशा दोन अधिवर्गांचा समावेश होतो. मत्स्य अधिवर्गात (१) प्लॅकोडर्मी (Placodermi), (२) कास्थिमत्स्य/कूर्चामीन (Chondrictyes) आणि (३) अस्थिमत्स्य /अस्थिमीन (Osteichthyes) या वर्गांचा समावेश होतो.
(१) वर्ग – प्लॅकोडर्मी : यातील प्राणी सध्या विलुप्त झाले असले तरी उत्क्रांती अभ्यासात महत्त्वाचे आहेत. प्लॅकोडर्मी म्हणजे त्वचेवर चकती किंवा चिलखत असलेला मासा. याच्या बाह्यकंकालावर (Exoskeleton) संरक्षक ढालीसारखे कवच, तर अंत:कंकाल (Endoskeleton) अस्थींपासून बनलेला असतो. हे सुरुवातीचे जंभ असलेले प्राणी सिल्युरियन काळात उदयास आले. त्यानंतर डेव्होनियन व कार्बोनिफेरस काळात त्यांची जोमाने वाढ झाली. त्यानंतर पर्मियन काळात ते नामशेष (निर्वंश) झाले. त्यांच्यात युग्मित (Paired) व अयुग्मित (Unpaired) पर होते. पुच्छपर द्विविभाजी व असममित होता. उदा., डंक्लिऑस्टिअस (Dunkleosteus) प्रजाती.
(२) वर्ग – कास्थिमत्स्य / कूर्चामीन : यामध्ये पुढील उपवर्गांचा समावेश होतो.
(अ) इलॅस्मोब्रांकी (Elasmobranchii) : यातील माशांचे कल्ले सरळ घशातून बाहेर उघडणारे असतात. उदा., मुशी (Shark), पाकट (Ray fish), रांजा (Skate), करवत मासा (Sawfish).
(आ) होलोसिफॅली (Holocephali) : शरीररचना शार्क माशासारखी असून डोके मोठे व चपटे असते, तर मुख लहान असते. उदा., मूषक मासा (Rat fish).
(इ) अकॅन्थोडी (Acanthodii) : यातील प्राण्यांमध्ये कास्थिमत्स्य व अस्थिमत्स्य वर्गातील प्राण्यांची काही लक्षणे आढळतात. यामधील प्राण्यांची शरीरचना आधुनिक शार्कसारखी असून त्यांची बाह्यत्वचा होलोस्टिआय गटातील माशांसारखी समचतुर्भुज खवल्यांप्रमाणे असते. तसेच या प्राण्यांमध्ये तीन अर्धवर्तुळाकृती नलिकांपासून तयार झालेले अंत:कर्ण असतात. या उपवर्गातील सर्व मासे विलुप्त (नामशेष) झाले आहेत. उदा., काटेरी शार्क (Spiny shark).
कास्थिमत्स्य माशांचा सांगाडा लवचिक कास्थींचा बनलेला असतो. जबडा पूर्ण विकसित असतो. मुख अधर पृष्ठावर असून त्याभोवती संवेदके असतात. शरीरावर त्वचादंतिका किंवा पट्टिकाभ खवले असतात. मणके देखील कास्थिंचे बनलेले असून एकमेकांपासून वेगळे असतात. श्वसनासाठी कल्ल्यांच्या ५ किंवा ७ जोड्या असतात. कल्ल्यांवर आवरण नसते. पुच्छपर द्विविभाजीत व असममित असतो. यामध्ये लिंग भिन्नता असून शरीरात वाताशय नसते. श्रोणिपर शरीराच्या पार्श्व भागात असून नरांमध्ये त्यांचे रूपांतर दंडासारख्या आलिंगकात झालेले असते. त्यांचा उपयोग मिलनाच्या वेळी होतो. बहुसंख्य कास्थिमत्स्य जरायुज किंवा अंडज असतात. यातील बहुसंख्य मासे खाऱ्या पाण्यात राहतात.
(३) वर्ग – अस्थिमत्स्य / अस्थिमीन : याचे पुढील दोन उपवर्गांत विभाजन होते.
(अ) उपवर्ग – ॲक्टिनोप्टेरिजी (Actinopterygii) : यांत परांमध्ये अस्थिशलाका असणाऱ्या (Ray finned) माशांचा समावेश होतो. अस्थिशलाकांमुळे पर बळकट बनतात. याचे पुढील तीन अंतर्वर्गात / गटात / गणांत विभाजन होते.
(i) काँड्रास्टिआय (Chondrosti) : यातील माशांचे मुख व डोळे मोठे असतात. शरीरावरील खवले समचतुर्भुजी असतात. उदा., स्टर्जन मासे.
(ii) होलोस्टिआय (Holostei) : यातील माशांचे मुख लहान असते. उदा., एमिया (Amia).
(iii) टेलिऑस्टिआय (Teleostei) : यातील माशांचे डोळे मोठे व मुख लहान असून ते अग्र टोकास असते. जवळपास ९५% माशांचा समावेश यामध्ये होतो. उदा., कॉड, सामन, हेरिंग, कार्प, ट्यूना, ईल, पापलेट, सुरमई, बांगडा, बोंबिल इत्यादी.
(आ) उपवर्ग – सार्कोप्टेरिजी (Sarcopterygii) : यामध्ये जाड व मांसल पर असणाऱ्या माशांचा समावेश होतो. यामधील माशांच्या परांच्या मध्यभागी अस्थी आणि स्नायू यांची शृंखला असते. दातांवर कठीण कवच असते. याचे पुढील दोन अंतर्वर्गात / गटात / गणांत विभागणी केली आहे.
(i) क्रॉसोप्टेरिजी (Crossopterygii) : चतुष्पाद प्राण्यांचा उगम या गटातील जलचरांपासून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील बहुतेक सर्व मासे नामशेष झाले असून फक्त सीलॅकँथ (Coelacanth) अस्तित्वात आहेत.
(ii) डिप्नोई (Dipnoi) : यामध्ये फुप्फुस असलेल्या माशांचा समावेश होतो. यातील माशांना फुप्फुसमीन म्हणतात. त्यांना क्लोम (कल्ले) व फुप्फुसासारखे कार्य करणारा वायुकोश असल्यामुळे ते पाण्यात व हवेतही श्वसन करू शकतात. यांच्यात वाताशय फुप्फुसाप्रमाणे काम करते. तसेच कल्ल्यांद्वारेही श्वसन होते. उदा., प्रोटोप्टेरस (Protopterus), लेपिडोसायरन (Lepidosiren).
पहा : अस्थिमत्स्य उपवर्ग, कास्थिमत्स्य उपवर्ग, पृष्ठवंशी उपसंघ, रज्जुमान संघ.
संदर्भ :
- https://www.britannica.com/animal/bony-fish https://www.britannica.com/place/Pisces
- https://www.ucl.ac.uk/museums-static/obl4he/vertebratediversity/rayfinned_fishes.html
समीक्षक : नंदिनी देशमुख