असोसिएशन फॉर विमेन इन मॅथेमॅटिक्स (एडब्ल्यूएम) ही संस्था स्त्रियांना गणित शिक्षण मिळणे, तसेच त्यांना समान संधी आणि समान वागणूक मिळणे यांसाठी काम करणारी संस्था आहे. एडब्ल्यूएम या संस्थेची स्थापना १९७१ मध्ये अमेरिकेत झाली. या संस्थेच्या स्थापनेमागे अधिकाधिक स्त्रियांना गणित शिक्षणात आणि गणिती संशोधनात कृतिशील सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि गणिताच्या क्षेत्रात स्त्रियांना समान संधी आणि समान वागणूक दिली जावी याचा पुरस्कार करणे या दोन उद्देशांकरिता करण्यात आली  आहे.

एडब्ल्यूएम ही संस्था स्थापन होण्यापूर्वीच्या काळात गणितात उच्चशिक्षण घेणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण अमेरिकेतही खूप कमी होते. गणिताचे शिक्षण घेऊन प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत शिक्षक बनण्याचा बहुतेक स्त्रियांचा कल असे. उच्च पदांवरील नियुक्त्यांमध्ये किंवा गणितविषयक परिषदांमध्ये महिलांचा सहभाग नगण्य असे. हे चित्र बदलावे यासाठी ही स्वतंत्र संस्था सुरू झाली.

डॉ. मेरी ग्रे ह्या एडब्ल्यूएम संस्थेच्या संस्थापिका आणि पहिल्या अध्यक्षा होत्या. त्यांनी करणी उप-प्रवर्ग (Radical Subcategories) यासंबंधी संशोधन करून कॅनझस विद्यापीठातून पीएच्. डी. पदवी प्राप्त केली होती आणि पॅसिफिक जर्नल ऑफ मॅथेमॅटिक्स या नियतकालिकामधून करणी उप-प्रवर्ग आणि आबेलियन वस्तू (Albenian Objects) या विषयांवर शोधनिबंध प्रसिद्ध केले होते. अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या समित्यांवर आणि परिषदांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे यासाठी त्यांनी सदर संस्थेमार्फत प्रयत्न सुरू केले. गणिताचे अध्यापन आणि संशोधन यांमध्ये तळमळीने रस घेणाऱ्या स्त्रियांनी नंतरच्या काळात अध्यक्षपद भूषवून त्यांचे कार्य जोमाने पुढे चालू ठेवले. मूळच्या भारतीय असलेल्या डॉ. भामा श्रीनिवासन याही १९८१-८३ या काळात संस्थेच्या अध्यक्षपदी होत्या. विशेष म्हणजे संस्थेचे सभासदत्व केवळ महिलांसाठी सीमित नसून गणितातील उच्चस्तरीय अध्ययन, अध्यापन आणि प्रसार यात क्रियाशील असलेल्या जगातील कोणाही व्यक्तीला ते मिळू शकते.

गणिताच्या अध्ययनाकडे स्त्रियांना आकृष्ट करण्यासाठी एडब्ल्यूएम संस्थेने तिच्या पहिल्या दशकात विविध शैक्षणिक उपक्रम आखून सुरू केले. यांमध्ये शिक्षणात नवीन अध्यापन पद्धती विकसित करणे, शैक्षणिक साधने तयार करणे, गणिताच्या आधारे समस्या सोडविण्याचे कौशल्य निर्माण करणे, समूह पद्धतीने अध्ययन, गणिताच्या अध्ययनाचे भविष्यकालीन महत्त्व मुली, पालक व शिक्षक यांना पटवून देणे इत्यादी उपक्रम प्रामुख्याने होते. हळूहळू शालेय पातळीपासून पदव्युत्तर स्तरापर्यंत संस्थेने कामाची व्याप्ती वाढविली. संस्थेच्या उपक्रमांना यश येऊ लागले आणि गणित विषयात उच्च शिक्षित आणि संशोधक स्त्रियांचे प्रमाण वाढू लागले.

एडब्ल्यूएम या संस्थेचे कार्य बहुआयामी आहे. शालेय जीवनातच मुलींना गणित शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. विद्यार्थिनी आणि त्यांचे शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा, व्याख्याने व स्पर्धा आयोजित केल्या जातात. गणितात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या तरुणींसाठी संशोधन विषयक मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा घेतल्या जातात. महिला संशोधकांना त्यांच्या विषयातील परिषदांना उपस्थित राहण्यासाठी प्रवास भत्ता दिला जातो. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, तंत्रशिक्षण संस्था, संग्रहालये अशा विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या गणिताच्या अध्यापकांमध्ये परस्परसंवाद घडवून आणण्यासाठी संस्था पुढाकार घेते. इतर संस्थांच्या सहकार्यानेही कार्यशाळा व परिषदा आयोजित केल्या जातात. दर दोन महिन्यांनी संस्थेचे एक वार्तापत्र प्रसिद्ध होते. यात गणिताच्या विविध शाखांसंबंधी माहितीपूर्ण लेख, पुस्तक परीक्षणे, आगामी उपक्रमांची माहिती व रोजगार संधींसंबंधी मार्गदर्शन या गोष्टींना प्रसिद्धी दिली जाते. विविध शैक्षणिक आणि औद्योगिक संस्था योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी एडब्ल्यूएम संस्थेच्या माध्यमाचा जाहिरातीसाठी उपयोग करतात.

गणित शाखांच्या संशोधन क्षेत्रात किंवा गणित शिक्षणाच्या संदर्भात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना संस्थेतर्फे दरवर्षी तीन महिला गणितींच्या स्मरणार्थ विशेष व्याख्याने देण्यासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित केले जाते. यांपैकी एमी नोएदर व्याख्यान ही संस्था स्वतंत्रपणे आयोजित करते. तर एट्टा फाल्कनर व्याख्यान मॅथेमॅटिकल असोसिएशन ऑफ अमेरिका यांच्या सहकार्याने आणि सोनिया कोवालेव्हस्की व्याख्यान सोसायटी फॉर इंडस्ट्रिअल अॅण्ड अप्लाइड मॅथेमॅटिक्स या संस्थेच्या सहकार्याने होते. संस्थेच्या सदस्यांपैकी एक-दोन सदस्यांना संस्थेच्या कार्यासाठी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल प्रतिवर्षी पारितोषिक दिले जाते. गणित शिक्षणाच्या कार्यातील योगदानाबद्दल लुईस हे (Louise Hay) आणि गणिताचे उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला एम्. ग्वेनेथ हॅम्फ्रीस (M.Gweneth Humphreys) अशी दोन पारितोषिके संस्थेतर्फे दिली जातात.

 

संदर्भ:

समीक्षक – विवेक पाटकर

प्रतिक्रिया व्यक्त करा