गणितज्ज्ञ आणि तत्त्वज्ञान-तर्कशास्त्रातील तज्ज्ञ यांची आंतरराष्ट्रीय संस्था.

असोसिएशन फॉर सिम्बॉलिक लॉजिक (एएसएल) ही गणितज्ज्ञ आणि तत्त्वज्ञान-तर्कशास्त्रातील तज्ज्ञ यांची सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. तिची स्थापना १९३६ मध्ये झाली. ॲलोन्झो चर्च हे संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. तिचे मुख्यालय अमेरिकेत न्यूयॉर्क येथे आहे.

प्रतीकात्मक तर्कशास्त्र (Symbolic Logic) या गणिताच्या पायाभरणीला पोषक अशा विषयात संशोधन करण्याकरिता एएसएल ही संस्था अनेक उपक्रम राबविते. या संदर्भात संस्थेतर्फे खालील तीन अतिशय दर्जेदार नियतकालिकांचे प्रकाशन होते :

१) जर्नल ऑफ सिम्बॉलिक लॉजिक : या नियतकालिकाच्या प्रकाशनाची सुरुवात १९३६ मध्ये  झाली. गणितीय तर्कशास्त्रातील सर्व प्रकारचे संशोधनपर लेख यात प्रसिद्ध होतात.

२) बुलेटीन ऑफ सिम्बॉलिक लॉजिक : या नियतकालिकाच्या प्रकाशनाची सुरुवात १९९५ मध्ये झाली. यात मुख्यत: परिचयात्मक लेख आणि टीका प्रसिद्ध होतात.

३) रिव्ह्यू ऑफ सिम्बॉलिक लॉजिक : या नियतकालिकाच्या प्रकाशनाची सुरुवात २००८ मध्ये झाली. यात गणित, तर्कशास्त्र आणि विज्ञानाला एकत्र गुंफणारे साहित्य प्रसिद्ध केले जाते.

वरील तीन नियतकालिकांशिवाय एएसएल संस्था जर्नल ऑफ लॉजिक अँड अॅनालिसिस या नियतकालिकाच्या प्रकाशनाकरिता अर्थसाहाय्य पुरविते. कुर्ट गोडेल या जगप्रसिद्ध गणितीय तर्कशास्त्रज्ञाचे लेखन प्रसिद्ध करण्यातही या संस्थेचा मोठा सहभाग आहे. पर्स्पेक्टिव्हस् इन लॉजिक या प्रसिद्ध पुस्तकमालिकेच्या संपादनाची जबाबदारीही एएसएल संस्थेकडे आहे.

एएसएल या संस्थेच्या दरवर्षी दोन मुख्य सभा होतात. त्यातील एक अमेरिकेत आणि दुसरी यूरोपमध्ये आयोजित केली जाते. याशिवाय अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल असोसिएशन यांच्यासोबतही ही संस्था नियमितपणे कार्यक्रम घेत असते.

एएसएल या संस्थेतर्फे सातत्याने खालील पारितोषिके देऊन गणितीय तर्कशास्त्राला प्रोत्साहन दिले जाते.

(१) कार्प प्राईझ : हे पारितोषिक १९७३ सालापासून, दर पाच वर्षांनी सिम्बॉलिक लॉजिकमधील महत्त्वपूर्ण शोधलेख किंवा पुस्तकाला देण्यात येते.

(२) सॅक्स प्राईझ : हे पारितोषिक १९९९ सालापासून, गणितीय तर्कशास्त्रातील प्रबंध, महत्त्वपूर्ण शोधलेख किंवा पुस्तकाला देण्यात येते.

(३) शोएनफील्ड प्राईझ : हे पारितोषिक तर्कशास्त्रावरील सर्वोत्कृष्ट परिचयात्मक लेखनासाठी देण्यात येते.

 

संदर्भ:

समीक्षक – विवेक पाटकर

प्रतिक्रिया व्यक्त करा