(स्थापना – १९६०)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (आय.आय.पी.)ही संस्था देहरादून येथे आहे. तिची स्थापना १९६०साली झाली. इंधने, वंगणे, द्रावणे इत्यादी रसायने ही हायड्रोकार्बनयुक्त असतात या क्षेत्रात संशोधन आणि विकास करण्यासाठी सदर संस्थेची स्थापना झाली. ही संशोधन संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अधिकारात कार्य करते. यूनेस्कोच्या अधिकारात १९६०–६४च्या दरम्यान उभारलेल्या फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियच्या (आय.एफ.पी.) धर्तीवर या संस्थेची उभारणी झाली.
पेट्रोलियम शुद्धीकरण कारखान्यात आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया आणि तयार होणारे पदार्थ या संस्थेत विकसित होत असतात. देशातील जवळजवळ सर्व तेलशुद्धीकरण कारखान्यात आय.आय.पी. मध्ये विकसित होणारे तंत्रज्ञान वापरले जाते. त्यांच्या ३८ तांत्रिक प्रक्रियाद्वारे वर्षाला अडीच कोटी टनाइतका माल पेट्रोलियम क्षेत्रात उत्पादित केला जातो. पेट्रोलियम क्षेत्रात काम करणाऱ्या तंत्र विभागातील कामगारवर्गाला प्रशिक्षण देण्याचे कार्य या संस्थेत चालते. नवनवी इंधने आणि वंगणे विकसित करण्यासाठी ही संशोधन संस्था साहाय्यभूत ठरते. पेट्रोलियम पदार्थांचे सुसूत्रीकरण करण्यात ही संस्था कटिबद्ध असते. संबधित पदार्थांची मानके तयार करण्यासाठी देशाच्या ‘ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डस’ या मध्यवर्ती मानकसंस्थेला आय.आय.पी. साहाय्य करते.
देशात निरनिराळया ठिकाणी सापडणाऱ्या खनिजतेलाचे व त्यातून प्राप्त होणाऱ्या विविध प्रकारच्या पदार्थांचे इथल्या प्रयोगशाळात विश्लेषण होते. त्यासंबधी तंत्रज्ञान विकसित करून ते तेलशुद्धीकरण कारखान्यांना पुरविले जाते. पेट्रोलियम पदार्थांची बाजारात होणारी उलाढाल व त्याशी निगडीत तंत्रज्ञान यांच्याशी संबधित सर्वेक्षण करण्याचे काम ही संस्था करते. पेट्रोकेमिकल उद्योगात आवश्यक असणारी रासायनिक पुरकांचा शोध इथे घेतला जातो. वंगणतेलाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा या संस्थेत काटेकोर अभ्यास केला जातो
पेट्रोलवर धावणाऱ्या अंतर्ज्वलन (इंटरनल कम्बशन) इंजिनसाठी एल.पी.जी., सी.एन.जी., प्रोपेन यांसारखी पर्यायी इंधने विकसित करण्यासाठी ही संस्था आघाडीवर आहे. वाहतूक प्रदूषणावर मात करण्याच्या क्लृप्त्या ही संस्था शोधून काढते आहे. गाड्यांच्या एंजिनरचनेत सुधारणा करून कमीत कमी प्रदूषण होईल याची दक्षता या संस्थेत घेतली जाते.
आपल्या या भरघोस संशोधनकार्यातून आय.आय.पी.ने डझनभरापेक्षा जास्त पुरस्कार आणि सन्मान पटकाविले आहेत. देशांतर्गत १८५ तर आंतरराष्ट्रीय पातळीवर २९ एकस्वे मिळविली आहेत.
संदर्भ :
समीक्षक – अ.पां. देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.