एक विलुप्त पुरातन मानवी जाती. केन्यातील (केनिया) कूबी फोरा या पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळावर केनियन अभ्यासक बर्नार्ड नेगीनो आणि केनियन पुरामानवशास्त्रज्ञ रिचर्ड लीकी (१९४४-२०२२) यांना १९७५ मध्ये एका वयस्क मानवसदृश स्त्रीच्या कवटीचे जीवाश्म मिळाले. या जीवाश्माला केएनएम-ईआर ३७३३ असे नाव आहे. त्याच्या अगोदर १९७१ मध्ये कूबी फोरा याच ठिकाणी बर्नार्ड नेगीनो यांना खालच्या जबड्याचा जीवाश्म (केएनएम-ईआर ९९२) मिळाला होता. त्याचे हॅबिलिस मानव असे वर्गीकरण करण्यात आले होते. तथापि १९७५ मध्ये कॉलिन ग्रोव्हज (ब्रिटिश-ऑस्ट्रेलियन) आणि व्रातिस्लाव मजॅक (चेक प्रजासत्ताक) या पुरामानववैज्ञानिकांनी कूबी फोरामधील जीवाश्मांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी एर्गास्टर मानव (होमो एर्गास्टर) ही वेगळी जात सुचवली. त्यांच्या मते, या जीवाश्मांमधील काही वैशिष्ट्ये इतर मानवी जातींमध्ये दिसत नाहीत.

मानवसदृश स्त्रीच्या कवटीचे जीवाश्म (केएनएम-ईआर ३७३३), कूबी फोरा.

दक्षिण आफ्रिकन संशोधक रोनाल्ड जॉन क्लार्क यांना १९६९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत स्वार्टक्रान्स (Swartkrans) येथे मिळालेल्या एसके ८४७ जीवाश्माचा समावेश एर्गास्टर मानव जातीत करावा, असे काही वैज्ञानिकांचे मत आहे. त्याचप्रमाणे आधीच्या काळातील इरेक्टस मानव जीवाश्मांचाही समावेश या नवीन जातीत करावा असेही त्यांनी सुचवले. ‘एर्गास्टर’ हा शब्द ‘काम’ अशा अर्थाच्या ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. ‘एर्गास्टर मानव’ याचा अर्थ ‘काम करणारा माणूस’ किंवा ‘कार्यकर्ता’ असा होतो. हे नाव देण्याचे कारण म्हणजे या जीवाश्मांबरोबर मोठ्या आकाराची दगडी अवजारे सापडली होती.

एर्गास्टर मानव तुलनेने उंच व सडपातळ असून पुरुष १८० सेंमी. तर स्त्रिया १६० सेंमी. उंच होत्या. मेंदूचा आकार सरासरी ८६० घ.सेंमी. होता व त्याचे वजन शरीराच्या १.६ टक्के एवढे होते.

पुरामानववैज्ञानिकांमध्ये एर्गास्टर मानव जीवाश्माच्या वर्गीकरणाबद्दल अनेक मतप्रवाह असल्याने त्यांचे मानवी उत्क्रांतीमधील स्थान विवादास्पद आहे. बहुतेक पुरामानववैज्ञानिक एर्गास्टर मानव ही वेगळी जात मानत नाहीत, तर काहीजण या प्रकारच्या जीवाश्मांमधील वेगळेपण मान्य करून त्यांच्यासाठी ‘इरेक्टस एर्गास्टर मानव’ अशी वेगळी उपजात सुचवतात. हे दुसरे मत ग्राह्य धरल्यास एर्गास्टर मानवांचा विस्तार केन्या ते दक्षिण आफ्रिका एवढा असल्याचे दिसते.

संदर्भ :

  • Sandrine, Prat, ‘Emergence of the genus Homo: From concept to taxonomy’, L’Anthropologie, Vol.126 (4), 2022. https://doi.org/10.1016/j.anthro.2022.103068
  • Schwartz, Jeffrey H.; Tattersall, Ian, ‘What constitutes Homo erectus’, Acta Anthropologica Sinica, 19, pp.  21-25, 2000.
  • Tattersall, Ian, ‘Homo ergaster and Its Contemporaries’, Handbook of Paleoanthropology, 2013.
  • छायाचित्र संदर्भ : मानवसदृश स्त्रीच्या कवटीचे जीवाश्म (केएनएम-ईआर ३७३३), कूबी फोरा. https://australian.museum/get-involved/staff-profiles/fran-dorey/

समीक्षक : मनीषा पोळ