हा व्यक्तिमत्त्व मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या शाखेतील एक महत्त्वाचा गुण विशेष (trait) सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार व्यक्तिमत्त्वाचे पाच प्रमुख घटक आहेत. हे पाच घटक खालीलप्रमाणे : एक, चेतापदशिता (Neuroticism); दोन, बहिर्मुखता (Extroversion) तीन, अनुभवाचा खुलेपणा (Openness to Experiance); चार, सहमतीदर्शकता (Agreeableness); पाच, जागरुकता (Consciousness). या सिद्धांतावर अनेक संस्कृतींमध्ये संशोधन झाले आहे. हे संशोधन प्रामुख्याने घटक विश्लेषण तंत्राचा वापर करून झाले आहे. जवळपास ७० पेक्षा अधिक विविध संस्कृती, देश व भाषा यांमध्ये हे संशोधन झाले आहे. याशिवाय विकासावस्थेमध्ये या घटकांची असलेली आंतरसांस्कृतिक स्थिरता आणि विविध संस्कृतीमध्ये आढळून येणारे लिंगभेद यावर या सिद्धांताचे परीक्षण झाले आहे.

याचे विवेचन पुढीलप्रमाणे आहे. १. पाच घटकांचे वर्णन, २. पाच घटकांचे मापन, ३. सिद्धांताची आंतर सांस्कृतिक स्थिरता, ४. इतर पर्यायी सिद्धांत व ५. उपयुक्तता.

१. पाच घटकांचे वर्णन :

चेतापदशिता अधिक असलेल्या व्यक्ती संवेदनक्षम असून भावनात्मकदृष्ट्या लवचिक नसणाऱ्या नकारात्मक भावना, जसे की उदासीनता, नैराश्य आणि चिडचिड, अनुभवण्याची शक्यता जास्त असते. शांत, संकोची, स्वतःमध्ये रमणाऱ्या आणि भिडस्त स्वभावाच्या व्यक्तींपेक्षा विरुद्ध उच्च बहिर्मुखता असणाऱ्या व्यक्ती उत्साही, क्रियाशील आणि सामाजिक असतात. सहमतीदर्शक व्यक्ती सहकार्य करणाऱ्या आणि विनयशील असतात. त्या विश्वासू, समजूतदार, मदत करणाऱ्या आणि हळव्या मनाच्या असतात. याउलट असहमतीदर्शक व्यक्ती कठोर मनाच्या, अविश्वासू, मदत न करणाऱ्या, विरोध करणाऱ्या आणि उद्धट असतात. जागरूक किंवा कार्यविवेकी व्यक्ती या कार्यकेंद्रित आणि सुव्यवस्थित असतात, तर कमी जागरूक किंवा कमी कार्यविवेकी व्यक्ती विचलित आणि अव्यवस्थित असतात. अनुभवाचा खुलेपणा हा घटक असलेल्या व्यक्तींची रूची कला आणि सौंदर्य यात असून त्याच्याप्रती त्या संवेदनशील असतात आणि नियमितपणे नवतेची निवड करतात. त्यांच्यामध्ये स्वतःच्या भावनाबाबत, क्रियांबाबत आणि विचारांबाबत खुलेपणा असतो.

२. पाच घटकांचे मापन :

पंच घटक सिद्धांताचे मापन करण्याऱ्या अनेक मानसशास्त्रीय चाचण्या विकसित झाल्या आहेत.  मानसशास्त्रज्ञ बोले दि रॅडने (२००५) त्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. एक, पंच घटक सिद्धांताच्या चाचण्या; दोन, बिगफाइव्हच्या चाचण्या आणि तीन, इतर मापने. या सर्व मापनामध्ये निओ पी आय चाचणी ही सर्वात अधिक वापरली गेलेली आहे. ती कोस्टा आणि मॅक्री (१९९२) या शास्त्रज्ञांनी विकसित केली. या चाचणीची सुरुवात निओ पी आय ने झाली आणि १९९२ साली निओ पी आय सुधारित प्रकाशित झाली. त्यानंतर २००५ साली निओ पी आय-३ ही चाचणी विकसित करण्यात आली. निओ पी आय मराठीमध्ये उपलब्ध आहेत. लोधी, देव आणि बेल्हेकर (२००२) या मानस तज्ज्ञांनी निओ पी आय सुधारित मापनाची वैधता दाखवून दिली आहे; तर बेल्हेकर (२०१६) यांनी निओ पी आय ३ चाचणीचे मराठी रूपांतर केले आहे. याशिवाय फाइव्ह फॅक्टर पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी (FFPI) ही चाचणी हेन्ड्रिक्स यांनी विकसित केली आहे. याचे मराठी रूपांतर बेल्हेकर यांनी केले आहे. ओ. पी. जॉन यांनी बिग फाईव्ह इन्व्हेंटरी (BFI) प्रकाशित केली आहे. गोल्डबर्ग आणि सासींजर (१९९२) यांनी विशेषणांची निवड यादी (ACL) प्रकाशित केली आहे. यापैकी लेविस गोल्डबर्ग यांनी IPIP (International Personality Item Pool) या प्रकल्पांतर्गात अनेक मापनांना एकत्रित करण्याचे अतिशय मोठे काम केले आहे.

३. सिद्धांताची आंतरसांस्कृतिक स्थिरता :

या पाचही घटकांवर मोठ्या प्रमाणात आंतरसंस्कृतिक संशोधन झाले आहे. या संशोधनांनी पंच घटक सिद्धांताचे आंतरसांस्कृतिक घटक सिद्ध केले आहेत. ते पुढीलप्रमाणे एक, पंच घटक सिद्धांताची आंतर सांस्कृतिक घटक विश्लेषण स्थिरता; दोन, पंच घटक सिद्धांताची आंतर सांस्कृतिक वैकासिक स्थिरता; तीन, घटक सिद्धांताची आंतर सांस्कृतिक लिंगभेदामधील स्थिरता. या सिद्धांतावर ७० पेक्षा अधिक संस्कृतीमध्ये संशोधन झाले असून त्यामध्ये घटक विश्लेषण तंत्राचा वापर केला आहे. या घटक विश्लेषणांनी सर्वसामान्यपणे पंच घटक सिद्धांताला बळकटी दिली आहे. मॅक्री आणि अलिक (२००२) यांनी व्यक्तिमत्त्वाचा पंच घटक सिद्धांत आंतरसांस्कृतिक पातळीवर कसा परिपूर्ण आहे, याचे सखोल विश्लेषण केले आहे.

४. इतर पर्यायी सिद्धांत :

पंच घटक सिद्धांतावर होणारी टीका ही प्रामुख्याने त्याच्या पद्धतीच्या एकसूरीपणावर होते. घटक विश्लेषण तंत्रांचा वापर यासाठी केला आहे. परंतु आयसेंक यांच्यामते, घटक विश्लेषण ही केवळ सुरुवातीची पायरी आहे. प्रयोगात्मक यथार्थता ही अधिक महत्वाची. त्यामुळे यात पर्यायी सिद्धांतांनी आणि पद्धतींनी आपले अस्तित्व टिकविले आहे. सर्वात प्रबळ पर्यायी सिद्धांत म्हणजे बिग फाइव्ह सिद्धांत. सामान्यपणे पंच घटक सिद्धांत आणि बिग फाइव्ह हे एकच असल्याचा समज आहे. मात्र बिग फाइव्ह सिद्धांत हा मानसभाषा संशोधनांमधून येतो आणि त्यात उद्वेलन (Surgency) आणि बौद्धिकता (Intellect) हे वेगळे घटक आहेत. याशिवाय आयसेंक यांच घटक सिद्धांत महत्त्वपूर्ण आहे. मात्र त्यात बौद्धिकता (Intellect) किंवा अनुभवाचा खुलेपणा या मीतीचा अभाव आहे. हेक्साको (HEXACO) हा देखील एक वेगळा सिद्धांत आहे. त्यात सहमतीदर्शक (Agreeableness) घटकाला दोन वेगळ्या घटकात विभागले आहे. प्रामाणिकपणा-नम्रता आणि सहमतीदर्शकता हे वेगळे घटक आहेत.

५. उपयुक्तता :

हा सिद्धांत अनेक ठिकाणी वापरला जातो. समुपदेशन, अभ्यासक्षेत्राची निवड, कामगारांची निवड इत्यादी ठिकाणी या सिद्धांताचे उपयोजन झाले आहे. मानसिक आजार समजून घेण्यातही या सिद्धांताचा उपयोग आहे. व्यक्तिमत्त्व विकारांच्या वर्गीकरणातही या सिद्धांतामुळे बदल झाले आहेत. DSM ५ मध्ये व्यक्तिमत्त्व विकारांच्या वर्गीकरणात पर्यायी प्रारूप म्हणून पंच घटक सिद्धांत वापरलेला आहे.

संदर्भ :

  • McCrae, R. R. and Alik, J., The Five-Factor Model across cultures, 2002.