इंडोनेशियामधील एक पुरातत्त्वीय स्थळ. ते पूर्व जावा येथील सोलो नदीच्या काठावर वसले असून १९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून पुरामानवशास्त्राच्या दृष्टीने ते एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. मानव आणि वानर यांच्यातील ‘हरवलेला दुवा’ जीवाश्मरूपात उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळू शकतो, अशी खात्री असणारे डच शास्त्रज्ञ युजीन दुबॉ हे डच इस्ट इंडीज सैन्यात सामील झाले आणि त्या काळच्या डच कॉलनी म्हणजेच आजच्या इंडोनेशियामध्ये गेले.

ट्रिनिल (इंडोनेशिया) येथे युजीन दुबॉ यांना सापडलेले इरेक्टस मानवाचे जीवाश्म.

दुबॉ आणि त्यांच्या चमूने १८९१ ते १९०० दरम्यान ट्रिनिल गावाजवळ सोलो नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात उत्खनन केले. या उत्खननातून मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे जीवाश्म आणि काही मानवी जीवाश्म सापडले होते. सुरुवातीच्या उत्खननात एक मानवी कवटी, एक मांडीचे हाड, दोन मानवी दाढा आणि एक उपदाढ  सापडली. दुबॉ यांनी १८९४ मध्ये या मानवी जीवाश्मांचे नामकरण पिथेकॅन्थ्रोपस इरेक्टस असे केले. ज्याचा अर्थ इरेक्ट एप मॅन म्हणजेच ताठ उभे राहणारे मानवसदृश कपी/वानर आहे. कालांतराने अर्न्स मेयरने १९४४ मध्ये या जीवाश्मांना इरेक्टस मानव या प्रजातीमध्ये समाविष्ट केले गेले.

मानवी कवटी आणि मांडीचे हाड हे एकाच स्तरातून मिळाले असल्याने ते एकाच मानवाचे असून हाच मानव आणि वानर यांच्यातील ‘हरवलेला दुवा’ असा दावा दुबॉ यांनी केला. आकारविज्ञान पद्धतीनुसार (मॉर्फोलॉजिकल) मानवी कवटी पुरातन आहे; पण मांडीचे हाड हे मात्र आधुनिक मानवाचे (होमो सेपियन) असावे, असे मत मांडले गेले. त्यामुळे मानवी कवटी आणि मांडीचे हाड एकाच स्तरातून मिळाले या दाव्यावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. यावर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले गेले. तसेच काही संशोधकांनी पुनःसर्वेक्षण केले आणि दुबॉ यांनी गोळा केलेल्या जीवाश्मांचा आधुनिक पद्धतीने विश्लेषण केले गेले. परंतु जीवाश्मांच्या स्तरीकृत स्थितीविषयी ठोस पुरावे मिळाले नसल्याने दुबॉ यांच्या दाव्यावर आजही एकमत झालेले नाही.

ट्रिनिल येथे २०१६ ते २०१९ या काळात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नव्याने उत्खनन केले गेले. तसेच  पूर्वी केलेल्या उत्खननाविषयी लिखित पुरावे, छायाचित्रे आणि नवीन उत्खनन यांचा तौलनिक अभ्यास भौगोलिक माहिती प्रणालीचा (GIS) वापर करून काही निष्कर्ष काढले गेले. या अभ्यासानुसार ट्रिनिल येथील स्तररचना सोलो नदीने तयार केलेल्या मंचकांमुळे (रिव्हर टेरेसेस) गुंतागुंतीची आहे हे समजून घेऊन जीवाश्मयुक्त दोन थरांचे कालमापन अरगॉन-अरगॉन, पुराचुंबकीय कालमापन आणि प्रकाशउद्दीपित प्रदीपन कालमापन (तप्तदीपन कालमापन) पद्धतींचा वापर करून अनुक्रमे ८.३०-७.७३ लाख वर्षपूर्व आणि ४.५०-४.३० लाख वर्षपूर्व असे केले गेले आहे.

यावरून असे सूचित होते की, ट्रिनिल मधील दुबॉ यांनी केलेला जीवाश्मांचा संग्रह हा दोनपेक्षा अधिक स्तरातून गोळा केलेल्या जीवाश्मांचे मिश्रण असून ज्यात वेगवेगळ्या काळातील जीवाश्म एकत्र जमा झाले असण्याची शक्यता आहे. मॉर्फोलॉजीवर आधारित अभ्यास असे दर्शवितो की, ट्रिनिल कवटी ही जावामधील सांगिरान येथे सापडलेल्या इरेक्टस मानवाशी साधर्म्य दर्शविते. सांगिरान कवटीचे कालमापन १३ लाख ते ९ लाख वर्षपूर्व असे केले आहे. यामुळे ट्रिनिल कवटीचे कालमापन याचप्रमाणे मानले जाते.

दुबॉ यांनी केलेल्या जीवाश्मांच्या संग्रहामध्ये (नॅच्युरलिस संग्रहालय, लायडन, नेदरलँड्स) गोड्या पाण्यातील शेलफिशचे (कवच असलेला जलचर प्राणी) पुरावे आढळले. यात शेलफिशच्या कवचाचे पुरामानवाने बनविलेले एक हत्यार आणि एका कवचावर भौमितिक कोरीव काम आढळले. शेलफिशमध्ये अडकलेल्या मातीचे अरगॉन-अरगॉन पद्धतीने कालमापन ५.४० लाख ते ४. ४३ लाख वर्षपूर्व असे केले आहे. यावरून निःसंदिग्धपणे असे म्हणता येते की, ट्रिनिल येथील इरेक्टस मानवाने शेलफिशचा वापर केला होता.

संदर्भ :

समीक्षक : जयेंद्र जोगळेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.