महासागरांच्या तळभागापासून वर उंचावलेले ज्वालामुखी पर्वत, मध्य महासागरी पर्वतरांगा व सागरी पठार (गुयोट) यांचा समावेश सागरांतर्गत पर्वतांमध्ये केला जातो. याला जलमग्न पर्वत असेही म्हणतात. आकाराने बरेच मोठे असणारे सागरांतर्गत पर्वत ही एक भूशास्त्रीय रचना आहे. या पर्वतांची निर्मिती तत्कालिन सागरांतर्गत जागृत ज्वालामुखींच्या उद्रेकातून झालेली असली, तरी त्यातील काही ज्वालामुखी आज मृत आहेत, तर काही पर्वत आजही जागृत ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण होत आहेत. सामान्यपणे हे पर्वत अगाधीय सागरी मैदानातील खोल सागरी तळापासून किमान १,००० मी. वर उंचावलेले असतात; परंतु बेट, द्वीपक किंवा कड्यांच्या स्वरूपात ते समुद्राच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचलेले नसतात. सर्वसाधारणपणे या पर्वतांची उंची १,००० ते ४,००० मी. च्या दरम्यान आढळते. खोल सागरात असल्यामुळे या पर्वतांची शिखरे सागरपृष्ठापासून शेकडो ते हजारो मीटर खोलीवर असतात. शंक्वाकृती शिखरे, तीव्र उतार, सपाट माथ्याचे पठार, रेखीय (रेषाकृती) कटक, ज्वालामुखी कुंड ही या पर्वतांची वैशिष्ट्ये आहेत.

सागरी पठार व सागरी टेकाड (नॉल) : वेगवेगळ्या भूशास्त्रीय कालखंडात या पर्वतांची निर्मिती झाली असेल, तेव्हा मोठ्या पर्वतांचे माथे सागरपृष्ठाच्या वर आलेले असावेत; परंतु सागरी लाटांमुळे त्यांच्या शिखरांची झीज होत जाऊन ते सपाट माथे खोलवर गेले असावेत. अशा सपाट माथ्याच्या पठारसदृश्य पर्वतांना गुयोट असे म्हणतात; तर छोट्या सागरांतर्गत ज्वालामुखी पर्वतांना टेकाड म्हणतात. मोठ्या पर्वतांचा माथ्याच्या दिशेने बहिर्वक्र उतार असतो; परंतु छोट्या पर्वतांच्या बाबतीत हा बहिर्वक्रपणा आढळत नाही. सर्वच प्रमुख महासागरांच्या द्रोणींप्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात असे पर्वत आढळतात. या पर्वतांची निर्मिती प्रामुख्याने भूपट्टांच्या सीमारेषांजवळ, जेथे भूपट्ट एकमेकांना धडकतात किंवा एकमेकांपासून दूर जात असतात तेथे; मध्य-महासागरी कटकांजवळ, तसेच भूपट्टांच्या मधेच एकाकी प्रदेशात असलेल्या अतिसंवेदनशील (हॉटस्पॉट) क्षेत्रात (भूपट्टांतर्गत जागृत ज्वालामुखी क्षेत्र) शिलारसाचे ढीग साचून झालेली आढळते. पॅसिफिक महासागरात सर्वाधिक सागरांतर्गत पर्वत, पर्वतसाखळ्या व पठार आढळतात. काही ठिकाणी रेषाकृती दीर्घवर्तुळाकार पर्वतसमूह आढळतात. बहुदा त्यांतील अनेक पर्वतांची निर्मिती एकाच रैखिक खचदरीतून झालेल्या ज्वालामुखी क्रियेतून झालेली असावी. पॅसिफिकमधील बहुतांश पर्वत रेखीय पर्वतसाखळी स्वरूपात किंवा १० ते १०० लांबट पर्वतगटांच्या स्वरूपात निर्माण झालेले आहेत. या पर्वतसाखळीतील वेगवेगळ्या पर्वतांचे पायथे मध्य पॅसिफिकमधील पर्वतांप्रमाणे समाईक कटकांनी एकमेकांना जोडलेले आढळतात. पॅसिफिक द्रोणींमधील पर्वतसाखळ्या आग्नेय-वायव्य दिशेत पसरल्या असून त्या साखळ्या प्रामुख्याने पॅसिफिक महासागरीय भूपट्टाच्या वहनाच्या दिशेला व खडकातील विभंग क्षेत्रविभागांना अनुसरून आहेत. उदा., नैर्ऋत्य पॅसिफिकमधील एल्टॅनीन विभंग क्षेत्रविभाग. तसेच वायव्य पॅसिफिकमधील हवाई ज्वालामुखी पर्वत साखळी, एम्परर ज्वालामुखी पर्वत साखळी प्रसिद्ध आहेत. वायव्य अटलांटिक महासागरात न्यू इंग्लंड पर्वतसाखळी आहे. हिंदी महासागरात मात्र अशी पर्वतसाखळी ज्ञात नाही, कदाचित या महासागराचे विशेष सखोल सर्वेक्षण झाले नाही, हे त्याचे कारण असावे. ईशान्य अटलांटिकमध्ये सागरतळापासून सुमारे ४,००० मी. उंचीचा उल्काजन्य पठारसदृश्य पर्वत आहे. त्याच्या पायाचा व्यास सुमारे ११० किमी. आहे. सागरांतर्गत पर्वतांवरील गाळ सूक्ष्म स्फटिकमय किंवा काचेसारखा दिसतो. या पर्वताचे फाटे आणि त्यांची शिखरे सागरी गाळाच्या पातळ थरांनी आच्छादलेली आढळतात.

दोन भूसांरचनिक भूपट्ट जेव्हा एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा तेथे होणाऱ्या ज्वालामुखी क्रियांमुळे शिलारस (मॅग्मा) सागरतळाच्या वर येऊन होणाऱ्या संचयनामुळे ज्वालामुखी पर्वत किंवा कटक निर्माण होतात. अशा मध्य महासागरी कटकांजवळ किंवा भूपट्टांच्या सीमारेषांवरील अतिसंवेदनशील क्षेत्रात ज्वालामुखी क्रियेतूनच पर्वतांची निर्मिती होते. जेव्हा एका भूपट्टाचे दुसऱ्या भूपट्टाखाली अधोगमन होते; तेव्हा तेथे ज्वालामुखी उद्रेकाद्वारे लाव्हारसाचे संचयन वाढत जाऊन त्यापासून ज्वालामुखी बेटांची मालिका तयार होते, त्यातील काही सागरांतर्गत पर्वत असतात. यातील अनेक पर्वत दीर्घकालीन ज्वालामुखी उद्रेकामुळे निर्माण झाले असले, तरी आज ते पर्वत मृत ज्वालामुखींचे अवशिष्ट भाग आहेत. अलीकडच्या काळात काही सागरांतर्गत पर्वतांच्या ठिकाणी जागृत ज्वालामुखी आढळले आहेत. उदा., मध्य पॅसिफिक महासागरातील हवाई द्वीपसमूहामधील एम्परर पर्वतसाखळीत असणारा लोइही (कामाइहुआकानाओला) हा जागृत ज्वालामुखी पर्वत.

१९७० च्या दशकात सागरी तळांचे संशोधन सुरू झाल्यापासून सागरतळावर कित्येक जागी खऱ्या अर्थाने पर्वत म्हणता येतील, अशा पर्वतांच्या रांगा आढळल्या आहेत. या दशकाच्या अखेरीस एकट्या पॅसिफिक माहासागराच्या द्रोणीप्रदेशात १०,००० पेक्षा अधिक सागरांतर्गत पर्वत असल्याची नोंद झाली आहे. वास्तविक प्रत्येक महासागरवैज्ञानिक सफरीच्या वेळी नव्याने सागरांतर्गत पर्वतांचा शोध लागला असून जगातील महासागरांतील त्यांची संख्या सुमारे २०,००० पेक्षाही अधिक असल्याचा अंदाज आहे. काही तज्ज्ञांच्या मते, ही संख्या सुमारे एक लाख असावी. याशिवाय गुयोट आणि नॉल यांची संख्याही प्रचंड आहे.

मध्य महासागरी पर्वतरांगा : मध्य महासागरी पर्वतरांगा महासागराच्या मध्यातून गेल्या असून त्यांची सर्वसाधारण उंची सागरमग्न खंडभूमी (समुद्रबुड जमीन) मैदानापासून सुमारे २.३ किमी. इतकी असते. या पर्वतरांगांच्या शीर्षरेषेवर खचदरी असून तिची खोली थेट पृथ्वीच्या प्रावरणापर्यंत गेली आहे; म्हणून तिला दुपाखी पर्वतरांग असेही म्हणता यईल. मध्य महासागरी पर्वतरांगेच्या खचदरीच्या भागात पृथ्वीच्या अंतर्गत ताण निर्माणकारी शक्ती कार्यरत असल्यामुळे या खचदरीतून मोठ्या प्रमाणावर ऊष्ण प्रवाह व ज्वालामुखी क्रिया आढळून आल्या आहेत. ही खचदरी भूपट्ट सांरचनिकी सिद्धांताच्या दृष्टीने पसरणारी सीमा आहे. जगातील मध्य महासागरी पर्वतरांगांची एकूण लांबी ७५,००० किमी. असून जगात ही पर्वतप्रणाली सर्वांत जास्त लांबीची आहे. या पर्वतरांगांवरील काही शिखरांची उंची २,५०० मी. पर्यंत असून काही शिखरे समुद्र पातळीच्या वर महासागरी बेटांच्या स्वरूपात आढळतात. या पर्वतश्रेणी काही ठिकाणी पसरट असून त्यापासून जलमग्न पठारांची निर्मिती झाली आहे. काही ठिकाणी या रांगांच्या दोन्ही बाजूकडील उतार मंद होत जातो; तर काही भागांत या पर्वतरांगांच्या दोन्ही बाजूकडील उतार तीव्र स्वरूपाचा असल्यामुळे या पर्वतरांगा अरुंद व अधिक उंचीच्या बनल्या आहेत.

अटलांटिक महासागराच्या जवळजवळ मध्यावर उत्तर-दक्षिण पसरलेली मध्य अटलांटिक रिज (पर्वतश्रेणी) ही जगातील सर्वाधिक लांबीची रिज आहे. या रिजची लांबी १६,००० किमी., रुंदी १,००० ते १,६०० किमी. आणि सागरतळापासूनची उंची सुमारे ३,००० मी. असून ही पर्वतरांग उत्तरेस आर्क्टिक महासागरापासून ते दक्षिणेस थेट अंटार्क्टिकापर्यंत पसरलेली आहे. या पर्वतरांगेतील बहुतेक शिखरे पाण्याखाली एक किंवा अधिक किमी. खोलीवर असून काही तुरळक शिखरे सागरपृष्ठावर बेटांच्या स्वरूपात डोकावतात. यांपैकी सर्वांत मोठे शिखर पीकू आल्टो हे समुद्रसपाटीपासून २,२८४ मी. उंच असून त्याचा पायथा पाण्याखाली ६,००० मी. खोल आहे. सागरांतर्गत पर्वतांची संख्या खूप असल्यामुळे अजून अनेक पर्वतांचे योग्य पद्धतीने समन्वेषण, संशोधन किंवा अभ्यास झालेला नाही किंवा त्यांचे नकाशे तयार झालेले नाहीत. हिंदी महासागरात रेयून्यों बेट आणि सेशेल्स बेटे यांदरम्यान अनेक सागरांतर्गत पर्वत आढळतात. सागरी प्रवाहांच्या मार्गात असे पर्वत आल्यास त्यांचे मार्गही बदलू शकतात. या पर्वतीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भूमिपातामुळे त्सुनामी लाटांची निर्मिती होते.

प्रवाळद्वीपे व प्रवाळशैलभित्ती : सागरतळावर मृत प्रवाळ प्राण्यांच्या संचयनापासून प्रवाळद्वीपे व प्रवाळ शैलभित्ती या भूविशेषांची निर्मिती होते. प्रवाळ प्राण्यांच्या मृत शरीराच्या अवशिष्ट भागांच्या संचयनाने निर्माण झालेल्या प्रवाळ खडक (शैल) माला भित्तीच्या स्वरूपात उभ्या असतात, म्हणून त्यांना प्रवाळशैलभित्ती किंवा शैलमाला असे म्हणतात. मृत प्रवाळांच्या अवशेषांचे संचयन उष्ण कटिबंधात असलेल्या ज्वालामुखी पर्वत शिखरावर आणि पठारी भागात होत असते. हळूहळू हे संचयन वाढत जाऊन बेटाच्या स्वरूपात सागरपातळीच्या वर येते. त्यांना प्रवाळबेटे किंवा प्रवाळद्वीपे असे म्हटले जाते. कालांतराने भूभ्रंश क्रियेमुळे ज्वालामुखी पर्वत खाली खचत जातो. त्याबरोबर पर्वत शिखराचा भागही पाण्याखाली जातो; परंतु प्रवाळ बेटांची तुटक रांग भित्तीच्या स्वरूपात सागराच्या पातळीच्या वर वाढत जाते. प्रवाळभित्तीचे (१) अनुतट, (२) रोधक व (३) कंकणद्वीप प्रवाळभित्ती असे तीन प्रकार पडतात. जेव्हा रोधक प्रवाळभित्ती गोलाकार किंवा घोड्याच्या नालाच्या आकाराची असते, तेव्हा तिला कंकणद्वीप प्रवाळभित्ती असे म्हणतात. तिच्या मध्यभागी उथळ पाण्याचे खाजण किंवा सरोवर तयार होते.

सागरी परिसंस्थांच्या दृष्टीने या सागरांततर्गत पर्वतांना अनन्यसाधारण महत्त्व असते. विविध जातीचे जलचर या भागाकडे आकर्षित होत असून हा असंख्य सागरी जीवांचा प्रमुख अधिवास असतो. सपाट सागरी तळांपेक्षा या भागात विपुल जलचर आढळत असून त्यांना जीवांचे नंदनवन आणि जैवविविधतेसाठीचे अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. विविध प्रकारचे खोल सागरांतर्गत प्लवक, प्रवाळ (पोवळे), स्पंजप्राणी, मासे आणि इतर असंख्य सागरी जीवांचे हे पर्वत म्हणजे प्रमुख आश्रयस्थान असून त्यांच्या वाढीच्या दृष्टीनेही हा प्रदेश पोषक आहे. त्यामुळे या भागांत मोठ्या प्रमाणावर व्यापारी मासेमारी चालते. सागरी प्रवाह, पाण्यातील अभिसरण आणि मिश्रण क्रिया, पोषण द्रव्ये आणि सागरी जीवांचे वितरण यादृष्टीने सागरांतर्गत पर्वतांना विशेष महत्त्व आहे. त्यांतील काही जीव दुर्मिळ असतात, की जे जगात अन्यत्र कोठेच आढळत नाहीत. त्यामुळे परिस्थितीविज्ञानाच्या दृष्टीने या पर्वतांना विशेष महत्त्व असते. खोल सागरी व्यापारी मासेमारी, खाणकाम यांसारख्या क्रियांसाठी मानवाला सागरांतर्गत पर्वतीय प्रदेशातील सागरी परिसंस्थांपर्यंत सहज पोहोचता येते. अतिरिक्त खोल सागरी मासेमारीमुळे सागरांतर्गत पर्वतीय प्रदेशातील सागरी परिसंस्थांचे नुकसान होते, तसेच खाणकामामुळे खोल सागरी जीवांच्या अधिवासाची हानी होते.

संदर्भ : Monkhouse, F. J., Principles of Physical Geography, New York, 1970

समीक्षक : शंकर चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.