अघीओन, फिलीप (Aghion, Philippe) : (१७ ऑगस्ट १९५६). प्रसिद्ध फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि २०२५ च्या अर्थशास्त्र विषयातील नोबेल पुरस्काराचे संयुक्त मानकरी. फिलीप यांचा जन्म फ्रान्समधील पॅरिस शहरामध्ये झाला. त्यांची आई गॅब्रिएल उर्फ ग्याबी या फ्रान्समधील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर व फ्रेंच फॅशन हाऊसच्या संस्थापक होत; तर वडील रेमंड यांचे एक कला दालन होते. त्यांचे आई-वडील हे मूळचे अलेक्झांड्रीया (ईजिप्त) येथील ज्यूविश कुटुंबातील होत. नंतर ते पॅरिस येथे स्थलांतरित झाले.

फिलीप यांचे शिक्षण फ्रांस आणि अमेरिका येथे झाले. त्यांनी १९७६ – १९८० याकाळात पॅरिस विद्यापीठाच्या गणित विषयाची पदवी आणि १९८१ मध्ये गणित व अर्थशास्त्र या विषयांत पदविका प्राप्त केली. पुढे त्यांनी १९८३ मध्ये तेथूनच तृतीय फेरीद्वारे गणित या विषयात विद्यावाचस्पती (पीएच. डी.) संपादन केली; तर १९८७ मध्ये हार्डवर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयामध्ये विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केली.

फिलीप यांनी त्यांच्या व्यावसायिक कार्याची सुरुवात १९८७ मध्ये मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून सहायक प्राध्यापक पद धारण करून केली. ते १९८९ मध्ये पुन्हा फ्रांस येथे परत येऊन फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च या संस्थेत संशोधक म्हणून रुजू झाले. न्यूफिल्ड कॉलेज, ऑक्सफर्ड आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे १९९६ मध्ये जाण्यापूर्वी १९९० मध्ये त्यांची यूरोपिअन बँक पुनर्बांधणी व विकास (यूरोपिअन बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेन्ट) या संस्थेत डेप्युटी चीफ इकॉनॉमिस्ट पदी नियुक्ती करण्यात आली. ते पुन्हा २००२ मध्ये हार्व्हर्ड येथे आले आणि रॉबर्ट व्हेगेनर (वॅगनर) प्राध्यापक बनले.

फिलीप यांनी अर्थशास्त्र विषयामध्ये केलेल्या ‘सर्जनशील विनाश’ (क्रिएटिव्ह डिस्ट्रक्सन) या सिद्धांतावर आधारित शाश्वत आर्थिक विकासाचे गणितीय प्रारूप (मॉडेल) विकसित करून नवीन तंत्रज्ञान जुन्या उद्योगांची जागा घेऊन आर्थिक प्रगती कशी घडवून आणते, हे आपल्या संशोधनातून स्पष्ट केले आहे. त्यांच्या या सिद्धांतानुसार जेव्हा एखादे नवीन आणि अधिक चांगले उत्पादन किंवा तंत्रज्ञान बाजारात येते, तेव्हा ते जुन्या उत्पादनांची आणि कंपन्यांची जागा घेते. हा ‘विनाश’ आर्थिक विकास घडून येण्याकरिता आवश्यक असणारे ‘सर्जनशील’ यामध्ये बदल घडवून आणत असतो. या संशोधनासाठी त्यांना प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पीटर हॉविट आणि जोएल मोकीर यांच्या समवेत हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. फिलीप यांच्या संशोधनाने स्पर्धा आणि नाविन्य यांच्यातील संबंध शोधून काढला आहे. म्हणजे, जेव्हा बाजारात मध्यम स्वरूपाची स्पर्धा असते, तेव्हा कंपन्या नवनवीन शोध लावण्यासाठी सर्वांत जास्त प्रयत्न करत असतात. त्यांच्या नवोन्मेष, स्पर्धा, आणि आर्थिक विकास यांवरील कार्यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासात दीर्घकाळात तांत्रिक बदलांची भूमिका पुनर्परीभाषित करण्यास मदत झाली आहे.

फिलीप यांनी १९९२ मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ योझेफ आलोईस शुंपेटर यांच्या विचारांवर आधारित एक गणितीय प्रारूप विकसित केले. या प्रारूपानुसार आर्थिक वाढ ही केवळ भांडवल साठवण्यामुळे होत नाही, तर ती सतत होणाऱ्या नाविन्यपूर्ण संशोधनामुळे होत असते. त्यांच्या या सिद्धांतामुळे शासनांना आर्थिक धोरण आखताना आणि नाविन्यपूर्ण बदलांचा (इनोव्हेशन) अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम समजून घेताना मोठी मदत होत आहे. फिलीप यांनी पर्यावरणाचे रक्षण करत आर्थिक विकास कसा साधता येईल, यावरही कार्य केले आहे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून उत्सर्जन कमी करत विकास सुरू ठेवणे हेही त्यांच्या संशोधनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उत्पादकता, रोजगार आणि आर्थिक विकास यांवर काय परिणाम होतो, याचाही अभ्यास केला आहे.

फिलीप यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांमध्ये इंडोजिनिअस ग्रोथ थिअरी, १९९७; ग्रोथ, इनइक्विलिटी अँड ग्लोबलायझेशन, १९९८; व्होलॅटिलिटी अँड ग्रोथ, २००४; कॉम्पिटेशन अँड ग्रोथ, २००५; द इकॉनॉमिक्स अँड ग्रोथ, २००८; द पॉवर ऑफ क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन, २०२१; फेअर अँड इन्क्ल्यूसिव्ह मार्केट, २०२१ इत्यादी ग्रथ लेखन केले. तसेच त्यांनी वेगवेगळ्या नियतकालिकांत अनेक शोधनिबंध लिहिले आहेत.

फिलीप यांना मेदिल्ले दी ब्राँझ दु इकॉनॉमी, १९९५; प्रिक्स दी ला रेव्ह्यू फ्रान्सीसी द इकॉनॉमी, २००१; यर्जो जाह्न्सोन अवार्ड ऑफ दी यूरोपिअन इकॉनॉमिक असोसिअशन, २००२; बिबिविये फ़्रन्तिअर ऑफ नॉलेज अवार्ड, २०२० इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

फिलीप यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करते वेळी ते कॉलेज दी फ्रांस आणि इन्सिड या संस्थांत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते; तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स लंडन (यू. के.) येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच नवोन्मेष आणि विकासाचे अर्थशास्त्र या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

संदर्भ : NobelPrize.org.

समीक्षक : संतोष दास्ताने


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.