परशुरामभाऊ पटवर्धन या उत्तरपेशवाई कालखंडातील एका मातब्बर मराठी सरदाराने कर्नाटकाच्या वायव्य भागावर इ. स. १७९१-९२ मध्ये केलेली स्वारी. त्या वेळी म्हैसूर राज्याचा अधिपती टिपू सुलतानाविरुद्ध मराठे, निजाम आणि इंग्रज या तिघांच्या एकत्रितपणे स्वाऱ्या सुरू होत्या. यात मराठ्यांचा, विशेषत: पेशव्यांचा सहभाग मुख्य असून सरदार हरिपंत फडके हे लॉर्ड चार्ल्स कॉर्नवॉलिस या इंग्रज सेनापतीसोबत दक्षिण कर्नाटकात मोहिमेवर होते, तर परशुरामभाऊ हे वायव्य भागावर मधूनमधून हल्ले करत होते. इ. स. १७९१ च्या एप्रिल महिन्यात धारवाडचा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर बिदनूर (बेदनूर) च्या प्रदेशावर हल्ला चढवला. यात घाटावरच्या प्रदेशासह किनारी भागावरही हल्ले करण्यात आले.

ही मोहीम झाली तो बहुतांश प्रदेश म्हैसूरच्या आधी सोंधे आणि बिदनूर या दोन राज्यांच्या अंमलाखाली होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून यांचा मराठेशाहीशी घनिष्ठ संबंध होता. पुढे इ. स. १७३१ मधील वारणेच्या तहान्वये छत्रपती शाहू महाराज (सातारा) यांनी येथील खंडणीचा हक्क कोल्हापूरकरांकडे सुपुर्द केला. परंतु अपुऱ्या सैन्यबळामुळे कोल्हापूरकरांना खंडणीची वसुली करणे जमले नाही व परिणामी नंतर यात पेशव्यांनी छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्या वतीने शिरकाव केला. इ. स. १७५२ नंतर नानासाहेब पेशव्यांकडे राज्याची सर्व सूत्रे आल्यानंतर त्यांनी या राज्यांकडून नियमितपणे खंडणी वसूल करण्यास सुरुवात केली. बिदनूरकडून दरवर्षी खंडणीद्वारे बारा लाख रुपये येत असत. बुडी बसप्पा नायक या तेथील शेवटच्या कार्यक्षम शासकाच्या मृत्यूनंतर त्याची राणी वीरम्माजी हिने प्रथम तिचा पुत्र चन्नबसप्पा याच्यासह व त्याच्या आत्महत्येनंतर स्वत: असा एकूण दशकभर राज्यकारभार पाहिला. इ. स. १७६३ मध्ये हैदरने बिदनूरवर स्वारी केली तेव्हा वीरम्मा व तिचा दत्तक पुत्र सोमशेखर नायक या दोघांनाही कैद करून मदगिरीच्या किल्ल्यात ठेवले. इ. स. १७६७ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांनी मदगिरीच्या किल्ल्यावर स्वारी करून तो ताब्यात घेतला तेव्हा या दोघांची सन्मानपूर्वक मुक्तता केली व त्यांना पुण्यास पाठविले. या प्रवासादरम्यान वाटेत वीरम्माचा मृत्यू झाला, तर पुण्याला पोचल्यानंतर काही काळाने सोमशेखरही लग्नाशिवाय मरण पावला. अशाप्रकारे बिदनूरच्या नायक राजवंशाचा अंत होऊन हा प्रदेश हैदरअलीच्या ताब्यात गेला. पुढे इ. स. १७७१ मध्ये जमीनमार्गे त्रिंबकराव पेठे व सागरी मार्गे विसाजी केशव यांनी हल्ला करून हा प्रदेश जवळपास ताब्यात घेतलाच होता. परंतु थोरल्या माधवराव पेशव्यांच्या अकाली निधनामुळे त्यांना मागे फिरावे लागले.

तत्कालीन अस्सल पत्रांत या मोहिमेचे प्रत्यक्षदर्शी उल्लेख सापडतात. कोकण किनारपट्टीवरील विजयदुर्ग येथे असलेल्या पेशव्यांच्या आरमाराने गोव्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील ठाणी ताब्यात घेतली. जेव्हा पावसाळ्याकरिता म्हणून मुख्य आरमार विजयदुर्गास परतले, तेव्हा टिपूने मिरजनपर्यंतची किनारी ठाणी पुन्हा ताब्यात घेतली. त्यानंतर काही थोड्या जहाजांनिशी तिथल्या उर्वरित ठाण्यांची व्यवस्था पाहणारा मुख्य अधिकारी बाबूराव साळोखे याने परशुरामभाऊंना मदतीकरिता सैन्य पाठवण्यास सांगणारे पत्र लिहिले. त्यानंतर नरसिंगराव देवाजी नामक भाऊंचा एक सरदार काही सैन्यानिशी तेथे आला व पूर्ण किनारपट्टी त्याने ताब्यात घेतली. धारवाडचा वेढा चालू असतानाच त्याला तिकडे पाठवण्यात आले होते. सिद्दापूरच्या पश्चिमेस घाटमाथ्यावरील बिळगी गावच्या अधिपतीला त्याच्या शत्रूंनी बंदिवासात टाकल्यानंतर त्याने मराठ्यांशी संधान बांधले व त्यांच्या मदतीने स्वत:ची मुक्तता करून घेतली. हा प्रदेश पादाक्रांत करण्यात मराठ्यांना बिळगीच्या अधिपतीची मोठी मदत झाली. पाचशे प्रशिक्षित सैनिक आणि तीन हजार स्थानिक शिलेदारांच्या मदतीने तेथील प्रदेशात मराठ्यांचा अंमल बसवण्यात आला. यानंतर घाट ओलांडून मराठ्यांचे सैन्य किनारपट्टीवर उतरले. म्हैसूरच्या सैन्याचा पराभव करून तेथील सैन्यप्रमुख व त्याच्या सरदारांना ठार मारल्यानंतर उर्वरित सैन्याने पलायन केले. यानंतर नरसिंगराव देवाजीने चंदावर, होनावर, गिरसप्पा, धारेश्वर, मुर्डेश्वर, शिराळे, भटकळ इ. ठाणी ताब्यात घेतली. तोवर इ. स. १७९१ चा ऑगस्ट महिना उजाडला व मुसळधार पावसामुळे काही काळ कोणतीही हालचाल न करता भटकळलाच थांबावे लागले. पाऊस ओसरल्यानंतर नरसिंगरावाने भटकळच्या दक्षिणेकडील बैंदूर, किरिमंजेश्वर, गांगोली ही ठाणी ताब्यात घेतली व पूर्वेस होसनगडी मार्गे बिदनूरच्या दिशेने निघाला. बिदनूरपासून अदमासे दहा मैल अंतरावर असताना टिपू सुलतानाच्या दोन हजार पायदळ व एक हजार घोडदळाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला व खूप सैनिक मारले. यानंतर टिपू सुलतानाच्या सैन्याने घाट उतरून गनिमी काव्याने मराठ्यांच्या सैन्याला त्रास देण्यास सुरुवात केली. त्या वेळी नरसिंगराव गांगोलीजवळून कुंदापूरच्या किल्ल्यावर हल्ला करण्याच्या बेतात होता. टिपू सुलतानाच्या अचानक हल्ल्यानंतर त्याला होनावरला जाणे भाग पडले. असे करताना त्याला तब्बल सात खाड्या ओलांडाव्या लागल्या. खाडीलगतच्या प्रदेशात घोडदळाला विशेष वाव नव्हता. होनावरला त्याने सैनिक आणि दारूगोळ्याची जमवाजमव केली आणि इ. स.१७९१ च्या नोव्हेंबर महिन्यात कुंदापूरवर हल्ला चढवला. याकरिता त्याला पुन्हा सात खाड्या ओलांडाव्या लागल्या. या कामी त्यांना बाबूराव साळोखेच्या आरमाराची मदत झाली, शिवाय काही इंग्रजांनीही तोफची आणि खलाशी म्हणून मदत केल्याचे दिसून येते. या मोहिमेमागील मुख्य हेतू टिपू सुलतानाचा किनारपट्टीशी संपर्क तोडून बिदनूरला एकटे पाडणे हा होता. त्यामुळे घाटमाथ्यावरून परशुरामभाऊंना ते काबीज करणे सहज शक्य झाले असते. कॅप्टन लिटल या इंग्रज सरदाराच्या हाताखालील बटालियनच्या मदतीने परशुरामभाऊंनी रेझासाहेब या त्यांवर पाठवलेल्या म्हैसूरच्या सरदाराला मागे हटवण्यात यश मिळवले होते. परंतु पूर्वी ठरल्याप्रमाणे त्यांनी श्रीरंगपट्टणच्या वेढ्यात भाग घेण्याकरिता अचानक तिथून प्रस्थान केल्यामुळे सदर मोहीम पूर्णत्वास गेली नाही. इ. स. १७९२ मधील श्रीरंगपट्टणच्या तहानुसार नरसिंगराव देवाजीला आपल्या विजयावर पाणी सोडावे लागले. सदर स्वारी ही या प्रदेशाच्या स्वामित्वाकरिता मराठ्यांनी केलेली शेवटचीच स्वारी होय.

संदर्भ :

  • Shejwalkar, T. S. ‘AN UNRECORDED KANARA CAMPAIGN BY THE MARATHAS’, Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, Vol. 4, No. 3, pp. 204-207, March 1943.
  • खरे, वासुदेव वामन, ‘ऐतिहासिक लेखसंग्रह’, भाग ९, १९१६.

समीक्षक : राहुल मगर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.