दक्षिण कोकणातील सावंतवाडी व आसपासच्या काही प्रदेशांचे अधिपती सावंत यांनी इ. स. सतराव्या शतकापासून पाडलेली नाणी. सावंत हे मूळ भोसल्यांच्या कुळातीलच असून पूर्वी प्रभू नामक सत्ताधीशांच्या पदरी होते. मात्र पुढे सावंतांचा उत्कर्ष झाला व इ. स. सतराव्या शतकात आदिलशाहकडून त्यांना वतने मिळाली. हळूहळू ते तेथील सत्ताधीश बनले. इ. स.१६८९ मध्ये औरंगजेबाकडून खेम सावंत दुसरे यांना त्यांचे वतन व नव्याने मिळवलेला प्रदेश यांना मोगलांचा पाठिंबा असल्याचे फर्मान मिळाले. त्याचा फायदा घेऊन त्यांनी जहाजांचा ताफा वाढवला आणि लूटमारही सुरू केली. डिचोलीच्या मोगल सुभेदाराचा हुद्दा बरखास्त केल्यावर मोगलांनी त्यांच्याकडील सरंजाम काढून घेतला. त्यानंतर त्यांनी पोर्तुगीज राजाकडून त्यांच्या सरंजामाला मान्यता मिळवली. पुढे मोगल-मराठे संघर्षात मराठ्यांचा विजय झाल्यावर छत्रपती शाहू महाराजांशी सावंत एकनिष्ठ राहिले. अशाप्रकारे बदलत्या राजकीय परिस्थितीतही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून धरण्यात सावंतांना यश आले. पुढे इ. स. अठराव्या शतकातही सावंतांनी कोल्हापूरकर छत्रपती, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्या आक्रमणांचा सामना करून राज्य राखले. इ. स. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात महादजी शिंदे यांच्या घराण्याशी लग्नसंबंध जोडल्यामुळे मोगल बादशाहकडून राजेबहादर हा किताब व सोबतच मोर्चेल आणि पालखीचा मिळवला. यामुळे कोल्हापूरकर छत्रपतींनी सावंतांवर हल्ला केला. तो महादजींच्या मदतीने परतवतानाच पोर्तुगीजांनी काही प्रदेशावर कबजा केला. तत्कालीन खेम सावंत तिसरे यांच्या मरणानंतर त्यांना वारस नसल्याने चार पत्नींनी ज्येष्ठतेच्या क्रमाने राज्य चालवले. याच काळात ब्रिटिशांनी इ. स.१८१२ मधील कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत राज्याच्या विलीनीकरणाची धमकी देताच त्यांना ब्रिटिश वर्चस्व मान्य करणे भाग पडले. इ. स. १८१९ पासून सावंतवाडीचे राज्य हे ब्रिटिश प्रभावाखालील संस्थान बनले. ते इ. स. १९४८ मध्ये भारतात विलीन झाले.

सावंतांनी पाडलेल्या नाण्यांत तांब्याचे पैसे, चांदीचे रुपये व सोन्याचे होन यांचा समावेश होतो. डिचोली, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या त्यांच्या प्रदेशातील मुख्य टांकसाळी होत. सावंतांपैकी नाणे पाडणारे सर्वांत जुने ज्ञात शासक म्हणजे खेम सावंत दुसरे हे होत. त्यांनी डिचोली येथून औरंगजेबाच्या नावचे चांदीचे रुपये पाडले. यांपैकी सर्वांत जुना ज्ञात रुपया हा औरंगजेबाच्या जुलूस अर्थात राज्यारोहण वर्ष ३६, अर्थात इ. स. १६९१ च्या आसपास पाडलेला आहे. औरंगजेबाकडून सरंजाम मिळाल्यापासून हे रुपये पाडलेले दिसतात. या प्रकारातील शेवटचा ज्ञात रुपया हा औरंगजेबाचे जुलूस वर्ष ४६, अर्थात इ. स. १७०२ च्या आसपासचा आहे. यानंतर डिचोली पोर्तुगीजांकडे गेले. त्यामुळे ही टांकसाळ किमान दहाएक वर्षे तरी सुरू होती हे उघड आहे. पुढे इ. स. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पाडले गेलेले पीरखानी रुपये हे याच रुपयांवर बेतलेले होते.

औरंगजेबाच्या नावे पाडलेला डिचोली येथील रुपया. चित्रसंदर्भ :https://www.zeno.ru/showphoto.php?photo=14566

पीरखानी हे नाव पीरखान नामक एका मोगल सरदारावरून पडलेले आहे. हा खेम सावंत दुसरे यांच्या संपर्कात इ. स.१६९२-९३ मध्ये आला. मोगल सैन्यचमूच्या साहाय्याने त्याने सावंतांचे जुने अधिपती व तत्कालीन प्रतिस्पर्धी प्रभू यांविरुद्ध एका लढाईत भाग घेतल्याचा उल्लेख ऐतिहासिक साधनांत आढळतो. डिचोलीजवळच्या भीमगड किल्ल्याचा किल्लेदार म्हणून त्याची नेमणूक झाली व त्याच्या पाठिंब्यानेच खेम सावंतांनी स्वत:च्या नाण्यांना पाठिंबा व स्वीकृती मिळवली असावी. पीरखानी रुपयांतील चांदीची शुद्धता बरीच कमी असून, उपलब्ध नमुन्यांवरून ती क्रमाक्रमाने कमी होत गेलेली दिसते.

इ. स.१७०६ मध्ये पोर्तुगीजांनी डिचोली ताब्यात घेतल्यावर तेथील टांकसाळ सावंतवाडीला हलवण्यात आली. सावंतवाडी येथील टांकसाळ एका सोनाराला मक्त्याने चालवण्याकरिता दिलेली असून, याचा दर १०० रुपयांमागे दहा आणे असा होता. यामार्गे सावंतांना दरवर्षी जवळपास १०० रुपये मिळत. इथे पाडलेल्या रुपयांना वाडी-पीरखानी असे नाव असून, इ. स.१८४५ पर्यंत ही टांकसाळ चालू राहिली. पुढे पीरखानी रुपये इ. स. १८४८ पर्यंत चलनात राहिले.

याखेरीज वेंगुर्ल्यासही एक टांकसाळ असल्याचा उल्लेख समकालीन साधनांत येतो. दिनांक २५ मार्च १६९१ रोजीच्या एका पत्रात तत्कालीन सावंतांशी (खेम सावंत दुसरे) नारोबा नाईक वाखले, बाबशेट सोनार इ. टांकसाळ चालवणाऱ्यांनी केलेल्या करारान्वये दर एक हजार होनांमागे अर्धा होन सावंतांना देणे होते. या पत्रातील उल्लेखानुसार वेंगुर्ल्यात अगोदर एक टांकसाळ असून मध्यंतरीच्या अडथळ्यांमुळे तेथील नाणेनिर्मिती थंडावली होती. सावंतांच्या पाठिंब्याने तेथे पुन्हा नाणी पाडणे सुरू झाले. काही संशोधकांच्या मते तेथे पाडलेली नाणी ही निशाणी होन प्रकारातील होती. तेथील नाणेप्रकार समजण्यास पुरेसे पुरावे नसल्याचा आक्षेप इतर संशोधकांनी घेतला असला तरी वेंगुर्ल्यातील टांकसाळीत किमान इ. स. १६९१ च्या सुमारास सोन्याचे होन पाडले जात होते हा उल्लेख महत्त्वाचा आहे.

राजेबहादरी पैसा. चित्रसंदर्भ :https://www.zeno.ru/showphoto.php?photo=257954

सावंतवाडीत तांब्याची नाणीही पाडली जात. यांचे प्रमुख प्रकार दोन असून, दोन्हीही प्रकारांत समोरच्या बाजूस एक वैशिष्ट्यपूर्ण पाने-फांद्यांच्या नक्षीचा आकार तर मागील बाजूस एका प्रकारात मोगली नाण्यांप्रमाणे ‘जुलूस मैमनत मानुस सनह’ हा मोगल नाण्यांवरील फार्सी लिपीतील मजकूर व दुसऱ्या प्रकारात देवनागरी लिपीत ‘राजा खेम सावंत भो बहादूर’ असा मजकूर येतो. यातील ‘भो’ हा भोसले या शब्दाचा संक्षेप आहे. हे देवनागरी मजकुराचे नाणे खेम सावंत तिसरे यांच्या काळात (इ. स. १७५५-१८०३) पाडले गेले, कारण यावरील ‘राजा’ व ‘बहादूर’ या पदव्या त्यांनाच होत्या. फार्सी मजकुराचे नाणे खेम सावंत तिसरे अथवा त्यांच्या आधीच्या सावंतांनी पाडलेले असावे. याशिवाय अजून एका प्रकारचे तांब्याचे नाणे सावंतवाडीत पाडलेले आढळते. त्यावर देवनागरी लिपीत समोरच्या बाजूस ‘राजा खेम सावंत’ आणि मागील बाजूस ‘बहादूर’ हा मजकूर आढळतो. यालाच ‘राजेबहादरी पैसा’ असेही नाव आहे. पूर्वोक्त फार्सी मजकूरयुक्त पैस हा वजनाने साधारण एकचतुर्थांश पैशाइतका आहे. फार्सी मजकुराच्या तांब्याच्या पैशाचे वजन ९-१० ग्रॅम असून, राजेबहाद्दरी पैशाचे वजन १.५ ग्रॅम व ६ ग्रॅम या दोन्ही प्रकारांत आढळते. उर्वरित तांब्याची नाणी मात्र १ ते ३ ग्रॅमच्या आसपास वजनाची आहेत.

याच प्रकारात समोरच्या बाजूस पाने-फांद्यांच्या नक्षीचे आरेखन व मागील बाजूस देवनागरी लिपीत ‘शिवछत्रपती’ लिहिलेले एक दुर्मीळ नाणेही आहे. इ. स. १७६०-१८१२ मध्ये कोल्हापूरकर छत्रपती तिसरे शिवाजी महाराज यांच्या काळात हे पाडले असावे, असे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. हे नाणे राजकीय स्थित्यंतराच्या काळात पाडले गेले असावे. इ. स. १८३४ मध्ये सावंतवाडी संस्थानच्या जाहीरनाम्यानुसार, राजेबहादरी पैसा सोडल्यास बाणकोटी, छत्रपती इ. अन्य प्रकारची तांब्याची नाणी चलनातून बाहेर काढण्यात आली. राजेबहादरी पैसे यानंतर काही वर्षांनी चलनातून रद्द करण्यात आले.

संदर्भ :

  • Bhandare, S. U., ‘Maratha Coins of Sawantwadi’, Numismatic Digest, Vol. 19, pp. 157-179. IIRNS Publications, Mumbai, India. 1995.
  • Mhamai, S. K., Sawants of Wadi and the Portuguese: Coastal Politics in 18th and 19th centuries, Concept Publishing Company, New Delhi, India. 1984.
  • पिंगुळकर, वि. पु., ‘सावंतवाडी संस्थानचा इतिहास’, सावंतवाडी, १९११.

समीक्षक : अभिजित दांडेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.