आंग्रे, सेखोजी कान्होजी : (१७०५-२८ ऑगस्ट १७३३). आंग्रे घराण्यातील एक कर्तबगार पुरुष आणि मराठा आरमाराचे सरखेल. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र म्हणजे सेखोजी आंग्रे उर्फ जयसिंगराव आंग्रे होत. सेखोजींचा कार्यकाळ जरी अवघा चार वर्षांचा (१७२९-१७३३) राहिला असला, तरी त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरमाराने जंजिरेकर सिद्दी आणि यूरोपीय सत्तांशी दिलेला लढा लष्करी रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सेखोजींचा जन्म कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या प्रथम पत्नी मथुराबाई उर्फ राजुबाई यांच्या पोटी झाला. कान्होजींस सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसजी व धोंडजी असे सहा पुत्र झाले. सेखोजी हे या भावंडांमध्ये ज्येष्ठ असल्याने, त्यांना लहानपणापासूनच प्रशासकीय आणि लष्करी शिक्षणाचे बाळकडू मिळाले. कान्होजी आंग्रे यांच्या कारकिर्दीत सेखोजी यांनी सागरी किल्ले, जहाजांची बांधणी आणि शत्रूच्या हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण केले होते, ज्याचा उपयोग त्यांना पुढे सरखेल म्हणून जबाबदारी सांभाळताना झाला.

कान्होजी आंग्रे यांच्या हयातीतच त्यांच्या पुत्रांमध्ये वैचारिक मतभेद आणि कलह निर्माण होऊ लागला होता. मार्च १७२५ मधील एका पत्रावरून असे दिसून येते की, संभाजी आंग्रे कोणत्यातरी कारणावरून कुलाब्यास आले असता, ज्येष्ठ बंधू सेखोजींनी त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा सुवर्णदुर्गावर रवाना केले होते. आपल्या पश्चात पुत्रांमधील या भांडणांमुळे स्वराज्याचे आणि आरमाराचे नुकसान होऊ नये, याची दूरदृष्टी ठेवून कान्होजी आंग्रे यांनी आपल्या हयातीतच राज्याची सुव्यवस्थित विभागणी करून दिली. त्यांच्या योजनेनुसार, ज्येष्ठ पुत्र सेखोजी यांनी सरखेल पद स्वीकारून कुलाबा येथून मुख्य प्रशासकीय धुरा सांभाळायची होती, तर संभाजींकडे बाणकोट, सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्गपर्यंतच्या प्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या कार्यात मदत म्हणून तुळाजींनी संभाजींसोबत आणि मानाजींनी सेखोजींसोबत राहण्याचे ठरले होते. तसेच, येसजी आणि धोंडजी यांनी कुलाब्यात राहून राज्याच्या महसुली कामात (जमाबंदी) लक्ष द्यावे, अशी चोख व्यवस्था कान्होजी आंग्रे यांनी लावून दिली होती. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर छत्रपती शाहू महाराजांनी कान्होजींचीच प्रशासकीय व्यवस्था कायम ठेवली. २१ जुलै १७२९ रोजी छत्रपती शाहूंनी सेखोजींना अधिकृतपणे सरखेल पदाची वस्त्रे बहाल केली. त्या वेळी सेखोजींचे वय अवघे चोवीस वर्षे होते.

सेखोजी आंग्रे यांच्यासमोर पदभार स्वीकारताच अनेक गंभीर आव्हाने उभी होती. कान्होजींच्या निधनामुळे आंग्र्यांची शक्ती क्षीण झाली आहे, असे मानून मुंबईकर इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि जंजिरेकर सिद्दी यांनी पुन्हा उपद्रव वाढविला. विशेषतः इंग्रजांनी कान्होजींच्या काळात झालेली मानहानी धुवून काढण्यासाठी आंग्र्यांविरुद्ध गुप्त हालचाली सुरू केल्या होत्या. ३० जानेवारी १७३० रोजी मुंबईकर इंग्रजांनी वाडीकर सावंतांशी एक संरक्षण आणि आक्रमक युतीचा तह केला. या तहाचा मुख्य उद्देश आंग्रे घराण्याचा नायनाट करणे हाच होता. या तहातील कलमांनुसार कान्होजी आंग्रे यांचे पुत्र हे कंपनीचे शत्रू मानले गेले आणि आंग्र्यांचे किल्ले जिंकल्यास ते सावंतांना देण्याचे ठरले, मात्र विजयदुर्ग आणि खांदेरी हे मोक्याचे तळ इंग्रजांनी स्वतःकडे ठेवण्याचे निश्चित केले. या राजकीय पेचप्रसंगात सेखोजींनी अत्यंत मुत्सद्दीपणे पावले उचलली. त्यांनी पहिल्यांदा आपल्या भावंडांना विश्वासात घेतले. त्यांनी मानाजीला आपल्या देखरेखीखाली कुलाब्यास ठेवले आणि संभाजीला सुवर्णदुर्गावर रवाना केले, जेणेकरून त्यांच्यातील वैयक्तिक वाद राज्याच्या हिताच्या आड येणार नाहीत.

मराठ्यांच्या इतिहासात जंजिऱ्याचा सिद्दी हा पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत प्रबळ आणि त्रासदायक शत्रू राहिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते कान्होजी आंग्र्यांपर्यंत सर्वांनीच सिद्दीचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न केले, परंतु जंजिऱ्याचे अभेद्यत्व आणि सिद्दीला मिळणारी परकीयांची मदत यांमुळे हा प्रश्न रेंगाळत होता. १७३३ मध्ये जंजिऱ्याचा मुख्य अधिकारी सिद्दी रसूल याच्या निधनानंतर त्याच्या वारसांमध्ये गादीसाठी संघर्ष सुरू झाला. ही राजकीय अस्थिरता मराठ्यांसाठी सुवर्णसंधी होती. याच काळात ब्रह्मेंद्र स्वामींचे हत्ती प्रकरण उद्भवले होते. छत्रपती शाहू महाराजांनी या संधीचा फायदा घेऊन सिद्दीचा कायमचा नायनाट करण्यासाठी थोरले बाजीराव पेशवे आणि सरखेल सेखोजी आंग्रे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली एक मोठी मोहीम उघडली. ही मोहीम लष्करी रणनीतीनुसार तीन प्रमुख आघाड्यांवर विभागली गेली होती : १. उत्तरेकडील आघाडी. या आघाडीची संपूर्ण जबाबदारी सरखेल सेखोजी आंग्रे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. सिद्दीला मुंबईकर इंग्रजांकडून होणारा रसदपुरवठा रोखणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. सेखोजींनी आपल्या आरमारासह उंदेरी, थळ आणि रेवस यांसारख्या मोक्याच्या ठाण्यांवर हल्ला चढवला. त्यांनी केवळ ही ठाणी काबीज केली नाहीत, तर सिद्दीला मदत करण्यासाठी येणाऱ्या इंग्रजांच्या ‘रोझ’ नावाच्या जहाजाला पकडून त्यांच्याकडून ७,६०३ रुपये दंड वसूल केला. सेखोजींच्या या धडाकेबाज कारवाईमुळे सिद्दीची उत्तरेकडील नाकेबंदी झाली. २. दक्षिणेकडील आघाडी. या आघाडीचे नेतृत्व सेखोजींचे विश्वासू सरदार बांकाजी नाईक महाडिक आणि सेखोजींच्या मातोश्री मथुराबाई (राजुबाई) यांनी केले. त्यांनी दक्षिण कोकणातील बाणकोट आणि मंडणगड या भागांत सिद्दीच्या वर्चस्वाला धक्का लावला. २५ मे १७३३ रोजी मराठ्यांनी मंडणगड किल्ला जिंकून सिद्दीच्या सत्तेला मोठे खिंडार पाडले. या विजयामुळे सिद्दीची दक्षिणेकडून येणारी रसद पूर्णपणे तुटली. आणि ३. तिसरी मध्यवर्ती आघाडी. या आघाडीचे नेतृत्व खुद्द पेशवे बाजीराव आणि फत्तेसिंग भोसले करत होते. त्यांनी जमिनीवरून दंडाराजपुरीला वेढा घातला. बाजीरावांनी रायगड किल्ला, जो सिद्दीच्या ताब्यात होता, तो परत मिळवण्यासाठी प्राधान्य दिले. सेखोजींनी बाजीरावांना आरमाराच्या माध्यमातून समुद्रमार्गे रसद आणि तोफगोळ्यांची मदत पुरवली.

सेखोजी आंग्रे यांनी आपल्या पित्याकडून मिळालेल्या आरमाराचे आधुनिकीकरण केले. मराठा आरमारातील जहाजांची रचना यूरोपीय जहाजांच्या तुलनेत वेगळी आणि कोकणच्या किनाऱ्याला साजेशी होती. ही जहाजे उथळ पाण्यातही वेगाने हालचाल करू शकत असत. सेखोजींनी जहाजांच्या देखभालीसाठी कडक नियम लावले होते. प्रत्येक मोहिमेनंतर जहाजांना किनाऱ्यावर ओढून त्यांना तेल आणि डांबर लावले जाई, ज्यामुळे लाकूड दीर्घकाळ टिकून राही. त्यांच्या आरमारात कोळी, भंडारी आणि यूरोपीय तोफचींचाही समावेश होता.

सेखोजी आंग्रे यांनी केवळ युद्धावरच लक्ष दिले नाही, तर स्वराज्याची तिजोरी कशी भरेल याकडेही लक्ष दिले. त्यांनी ‘दस्तक’ देण्याची पद्धत अधिक कडक केली. अरबी समुद्रातून प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यापारी जहाजाला आंग्र्यांकडून परवाना घेणे अनिवार्य होते. सेखोजींच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठे दुःख म्हणजे त्यांच्या घरात माजलेला कलह. संभाजी आणि मानाजी या दोन भावांमधील वितुष्ट स्वराज्याच्या कामात अडथळे आणत होते. जंजिरा मोहिमेच्या काळातच मानाजीने कुलाब्यावर स्वतःचा अधिकार सांगण्यास सुरुवात केली. जंजिरा मोहीम निर्णायक टप्प्यावर आलेली असतानाच, ऑगस्ट १७३३ मध्ये सेखोजींना तीव्र ज्वराने (ताप) गाठले. सततची दगदग, मोहिमेचे नियोजन आणि घरगुती ताणतणाव यामुळे त्यांची प्रकृती वेगाने खालावली. अखेर कुलाबा (रायगड) येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • ढबू. दा. गो. ‘कुलाबकर आंग्रे सरखेल’, अलिबाग, १९३९.
  • पिसुर्लेकर, पांडुरंग, ‘पोर्तुगीज मराठा संबंध’, पुणे विद्यापीठ, पुणे, १९६७.
  • पुराणिक, श. श्री., ‘तुळाजी एक विजयदुर्ग’, पार्श्व पब्लिकेशन, कोल्हापूर, २०२०.
  • पेंडसे, सचिन, ‘मराठा आरमार’, मर्वेन टेक्नॉलॉजीज, पुणे, २०१७.
  • शिखरे, सु. व., ‘मराठ्यांच्या आरमाराचा इतिहास’, अप्रकाशित पीएच. डी. प्रबंध, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, २०१७.
  • सरदेसाई, गो. स., ‘पेशवे दप्तर’, खंड ३, गव्हर्नमेंट सेन्ट्रल प्रेस, मुंबई,

समीक्षक : संदीप परांजपे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.