छायाचित्र संदर्भ 

कॅच–२२ (१९६१) आधुनिक इंग्रजी साहित्यातील महत्त्वपूर्ण कादंबरी. अमेरिकन लेखक जोसेफ हेलर (१९२३-१९९९) यांची ही उपरोधिक स्वरूपाची युद्धकादंबरी आहे. ही कादंबरी युद्धाची शौर्यगाथा सांगत नाही; उलट युद्धात अडकलेल्या माणसांच्या मनात चाललेल्या घालमेलीकडे यामध्ये लक्ष वेधले आहे. विनोद, उपहास आणि विडंबन यांचा वापर करून लेखक वाचकाला हसवतो, पण त्या हास्यामागे भीती, मृत्यू आणि असुरक्षिततेची खोल जाणीव सतत होत राहते.

कादंबरीची पार्श्वभूमी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील भूमध्य समुद्राजवळील पियानोसा या काल्पनिक बेटावर आहे. येथे अमेरिकन हवाई दलाचा तळ असून तरुण वैमानिक रोज मृत्यूशी सामना करत असतात. या सैनिकांचे जग आदेशांनी, अहवालांनी आणि नियमांनी बांधलेले आहे. युद्धकाळातील सैनिकी शिस्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाकांक्षा आणि सामान्य सैनिकांचे असाहाय्य जीवन यांचे चित्रण यात सहज, पण तीव्रतेने केले आहे. हेलर स्वतः युद्धात सहभागी झाला होता. त्यामुळे युद्धामध्ये जाणवणारी सततची भीती, मित्रांच्या मृत्यूची जाणीव आणि मानसिक ताण यांचे  कादंबरीतील चित्रण कृत्रिम वाटत नाही, तर ते अनुभवातून आलेले आहे.

‘कॅच–२२’ हा एक युद्धातील सैन‍िकी नियम आहे. जो या कादंबरीचा गाभा आहे. मानसिकदृष्ट्या जो सैनिक अस्वस्थ आहे, तो युद्धउड्डाणांसाठी अपात्र ठरू शकतो, असा या नियमाचा अर्थ आहे. तथापि, जेव्हा एखादा सैनिक स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम नाही असे प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज करतो, तेव्हा तो आपले जीवन वाचवू इच्छितो, असे मानले जाते. यावरून तो शहाणा किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम आहे असे समजले जाते. अशा सैन‍िकाला युद्धापासून सूट मिळण्याऐवजी तो युद्धासाठी पूर्णपणे पात्र ठरतो. अशा प्रकारचा ‘कॅच–२२’ हा विरोधाभासी नियम आहे.ज्यामध्ये माणसाने कोणतीही निवड केली तरी, तो त्यामध्येच अडकतो. हा नियम केवळ कादंबरीतील एक प्रशासकीय कलम न राहता आधुनिक प्रशासकीय व्यवस्थेतील सर्वच प्रकारच्या नोकरशाही अडचणींचे प्रतीक बनतो. त्यामुळे ‘कॅच–२२’ हा शब्दप्रयोग इंग्रजी भाषेतच नव्हे, तर जागतिक पातळीवर ‘अडकल्याची, सुटकेचा मार्ग नसलेली परिस्थिती’ या अर्थाने रूढ झाला आहे.

कथानकाच्या केंद्रस्थानी कॅप्टन जॉन योसॅरियन हा वैमान‍िक आहे. त्याच्या दृष्टीने युद्ध हे देशभक्तीचे, गौरवाचे किंवा शौर्याचे प्रतीक नसून एक सतत चालणारा मृत्यूचा धंदा आहे. शत्रूकडून मरण्याचा जसा त्याला धोका वाटतो, तसाच धोका त्याला स्वतःच्या लष्करी व्यवस्थेकडूनही वाटतो. कारण नियम, आदेश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्णय हे मानवी जीवनापेक्षा पदोन्नती, आकडेवारी आणि प्रतिमेला अधिक महत्त्व देणारे आहेत असे त्याला वाटते. युद्ध जसजसे पुढे सरकते, तसतसे त्याच्यावर अधिकाधिक मोहिमांचा भार टाकला जातो. प्रत्येक मोहिम म्हणजे मृत्यू जवळ येत असल्याची चाहूल आहे असे त्याला वाटत असते. युद्धातील निरर्थकता योसॅरियनच्या लक्षात येते आणि त्यातून सुटका मिळवण्यासाठी तो वेगवेगळे मार्ग शोधतो. कधी आजारपणाचे नाटक करतो, कधी नियमांचा आधार घेण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी ‘कॅच–२२’ नियम त्याच्या वाटेत आडवा येतो.

कथानकदृष्ट्या कादंबरीतील इतर व्यक्तिरेखा देखील‍ महत्त्वाच्या ठरतात. कर्नल कॅथकार्ट ही अधिकारी असणारी व्यक्त‍िरेखा स्वतःच्या बढतीसाठी सैनिकांचे प्राण धोक्यात घालते; त्याच्यासाठी युद्ध हे आकड्यांचे आणि अहवालांचे खेळ असते. तर डॉक्टर डॅनिका हे पात्र नियमांचे कट्टर समर्थक असून तो करुणेपेक्षा कागदोपत्री सत्याला अधिक महत्त्व देतो. माइलो मिंडरबाइंडर ही व्यक्तिरेखा नफ्याच्या हव्यासाचे प्रतीक आहे; तो युद्धालाही व्यापाराच्या संधीप्रमाणे पाहतो. मेजर हा नावापुरता अधिकारी असून अधिकाराची भीतीच त्याला अधिकार वापरण्यापासून परावृत्त करते. कादंबरीतील या सर्व व्यक्तिरेखा मिळून एक अशी व्यवस्था उभी करतात, जिथे माणूस गौण ठरतो आणि प्रशासकीय यंत्रणा श्रेष्ठ ठरते. या व्यक्त‍िरेखांमधून माणूस आण‍ि व्यवस्थेच्या पातळीवरील कार्यपद्धती यांचा उलगडा होण्यास मदत होते.

कादंबरीची रचना पारंपरिक सरळ रेषीय नाही.यामध्ये तृतीयपुरुषी (Third-Person) परंतु बहु-दृष्ट‍िकोनात्मक (Multiple Perspectives) निवेदनशैलीचा वापर केला आहे. घटनांची मांडणी विस्कळीत, पुनरावृत्तीपूर्ण आणि काळाच्या पुढे–मागे जाणारी आहे. ही अरेषीय निवेदनशैली (non-linear narration) युद्धातील मानसिक गोंधळ, स्मृतींचा तुटकपणा आणि वास्तवाचा भंग प्रतिबिंबित करते. वाचकाला सुरुवातीला गोंधळ वाटतो; परंतु हाच गोंधळ हळूहळू कादंबरीच्या आशयाचा अविभाज्य भाग बनतो. हेलर यांची ही तंत्रात्मक निवड युद्धाच्या अविवेकी आणि विसंगत स्वरूपाशी पूर्णपणे सुसंगत ठरते. ब्लॅक ह्यूमर, विडंबनात्मक संवाद आणि प्रतीकात्मक घटना वाचकाला हसवतात, पण त्या हास्यामागे असलेली भीती आणि अस्वस्थता हळूहळू अधिक तीव्रपणे जाणवू लागते.

कादंबरीचा शेवट योसॅरियनच्या वैयक्तिक निवडीवर केंद्रित आहे. तो शौर्य, सन्मान किंवा आदेश यांना न जुमानता स्वतःचे जीवन वाचवण्याचा निर्णय घेतो. हा निर्णय पलायनाचा नसून मानवी विवेकाचा आणि नैतिक स्वातंत्र्याचा ठाम स्वीकार आहे. त्यामुळे ‘कॅच-२२’ही केवळ युद्धविरोधी कादंबरी न राहता व्यक्त‍िस्वातंत्र्य, नैतिकता आणि संस्थात्मक सत्तेविरुद्धच्या संघर्षाची प्रभावी कलाकृती ठरते. पुढील काळात, विशेषतः व्हिएतनाम युद्धाच्या पार्श्वभूमीवर, ही कादंबरी अधिक लोकप्रिय झाली.

‘कॅच-२२’ही युद्धकथा माणसाच्या विवेकाचा, भीतीचा आणि व्यवस्थेशी चाललेल्या संघर्षाचा आरसा आहे. जोसेफ हेलर यांनी विनोदाच्या साहाय्याने मांडलेली ही गंभीर आणि अस्वस्थ करणारी कलाकृती आधुनिक साहित्यातील एक कालातीत मानवी दस्तऐवज म्हणून ओळखली जाते.

संदर्भ :

  • Heller, Joseph. Catch-22: A Novel. Simon & Schuster, 1961.
  • https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC4723206/
  • https://www.ebsco.com/research-starters/literature-and-writing/catch-22-illustrates-antiwar-sentiment

 

समीक्षक : सुनील सावंत


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.