पाली मध्ये ब्रह्मांड तसेच त्यासंबंधीच्या विषयाचे लेखन त्रिपिटक व इतर  संबंधित साहित्यात केल्याचे आढळून येते.पाली ब्रह्मांडीय ग्रंथांच्या यादीमध्ये खालील ग्रंथांचा समावेश आहे.१.अरुणवतीसत्थु २. ओकसालोकदीपनी ३ चक्कवल्दीपनी ४.पञ्चगतिदीपनी आणि पञ्चगतिदीपनी-टीका ५.महाकप्पलोकसण्ठानपञ्ञत्ति ६.लोकदीपकसारा ७.लोकसण्ठानजोतरतनगण्ठी  ८.लोकपञ्ञत्ति ९. लोकुप्पत्ति १०.चन्दसुरियगतिदीपनी. पञ्चगतिदीपनी हा पाली ब्रह्मांडीय साहित्यातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. मुळात पञ्चगतिदीपनी हा ग्रंथ बौद्धसंस्कृत ग्रंथ षड्गतिकारिकाचे पाली भाषांतर आहे. बौद्धसाहित्य परंपरेनुसार अश्वघोषाला षड्गतिकारिकाचे रचनाकार मानतात तसेच या ग्रंथाचा संबंध वात्सीयपुत्रीय –सम्मितीय संप्रदायशी होता.कालांतराने नवव्या ते बाराव्या शतकाच्या मध्ये षड्गतिकारिकाचे चीनी,तिबेटी व पालीमध्ये भाषांतरे झाली. पालीमध्ये षड्गतिकारिकाचे छगतिदीपनी या नावाने बाराव्या शतकात म्यानमार येथे भाषांतर झाले (पगान शिलालेख; न्येन 1899: 43).याच काळात या ग्रंथावर म्यानमार व कंबोडियामध्ये संशोधन होत असताना छगतिदीपनी या ग्रंथाचे नाव पञ्चगतिदीपनी असे करण्यात आले व त्यानंतर या ग्रंथाचा समावेश थेरवाद परंपरेतील ग्रंथ साहित्यात करण्यात आला.या ठिकाणी असा प्रश्न पडतो की,छगतिदीपनीचे पञ्चगतिदीपनी असे नाव का करण्यात आले? याचे कारण असे की,थेरवादपरंपरेमध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याला कोणत्या गतीची प्राप्ती होते हे सांगताना गतींची संख्या पाच सांगितलीआहे.

उदा.मज्झिमनिकायातील महासीहनाद सुत्तामध्ये बुद्ध सारिपुत्ताला उपदेश देताना सांगतात की, “पञ्च खोइमा,सारिपुत्त,गतियो। कतमापञ्च? निरयो,तिरच्छानयोनी, पेत्तिविसयो,मनुस्सा,देव।”

“या पाच,सारिपुत्र, गति आहेत. कोणत्या पाच? नरक,तिर्यक (पशु-पक्षी), प्रेत,मनुष्य आणि देव.”

या बरोबरच पाली त्रिपिटकामध्ये गति हा शब्द अभिसम्पराय या शब्दासमवेत प्रश्नार्थक स्वरुपात विचारला गेला आहे. जसे की, “तस्स का गति अभिसम्परायोति?” याचा अर्थ मृत्यूनंतर प्राप्त होणारी परलौकिक अवस्था. थोडक्यात मृत्यूनंतरचे जीवाचे अस्तित्व या अर्थाने हा शब्द पाली त्रिपिटकामध्ये आढळतो.

अशा प्रकारे थेरवाद परंपरेमध्ये गतिंची संख्या ही पाच असल्याचे जेंव्हा अनुवादकर्त्याच्या लक्षात आले तेंव्हा त्यांनी मूळ बौद्ध संकृतषड्गतिकारिका ग्रंथावरून करण्यात आलेल्या छगतिदीपनीचे नाव पञ्चगतिदीपनी असे केले. हे करीत असताना छगतिदीपनीतील असुरगतिचा जो सहावा कण्ड आहे याचा समावेश अनुवादकर्त्याने पञ्चगतिदीपनीतील पेतकण्डमध्ये केला. त्यामुळे गतींच्या विभाजनाला अनुसरून ग्रंथाचे नाव पञ्चगतिदीपनी असे करण्यात आले. या झालेल्या बदलांची माहिती आपल्याला पञ्चगतिदीपनी-अट्ठकथेत देखील सांगण्यात आली आहे.

पञ्चगतिदीपनी याग्रंथाची सुरुवात चार मंगलाचरणगाथाने होते. या ग्रंथात ऐकून ११४ गाथा आहेत ज्या पाच भागांमध्ये (पाचकण्ड) विभागल्या आहेत त्यापुढील प्रमाणे:

  • नरककण्ड (४०गाथा),
  • तिरच्छानकण्ड (७ गाथा) अ.अट्ठमहानरक(१७ गाथा) ब.निरयुस्सदा(२३ गाथा)
  • तिरच्छानकण्ड (७ गाथा)
  • पेतकण्ड(८गाथा): अ.पेत(८) ब.कुम्भण्ड (८) क.असुर (२)
  • मनुस्सकण्ड (३३गाथा)
  • देवकण्ड(१२ गाथा)

या ग्रंथाचा मुख्य विषय नरक,पशु-पक्षी,प्रेत,मनुष्य व देव या पाच गतिंवर आधारित आहे.या गति मनुष्याच्या कर्मावर कशा आधारित आहेत हे सांगताना तुम्ही ज्या गतीत जन्म घेता त्यावर तुमचे सुख व दु:ख तसेच पारलौकिक अवस्था अवलंबून असते, हे सांगण्याचा प्रयत्न या ग्रंथात करण्यात आला आहे.तसेच गतीची संकल्पना सांगताना स्वर्ग आणि नरकात उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांचे वर्णन सर्वसाधारण उदाहरणे देऊन सोप्या भाषेत केलेले आहे.उदा.मनुष्यांमध्ये जो विश्वासघातकी असतो त्याला तलवारीसारखे पाते असलेल्या जंगलामध्ये त्याचे टुकडे करून फेकले जाते, तो रडत असला तरी त्याला कुत्रे,गिधाड,घुबड खात राहतात (नरककण्ड, ३२).या ग्रंथात अशाप्रकारची वर्णने करण्याचा अनुवादकाचा हाच हेतू आहे की, यामुळे लोक अनैतिक कर्म करणार नाहीत ते भितील व वाईट कर्मापासून दूर राहतील. याच उद्देशाने या ग्रंथामध्ये पाच गतींचे सखोल विवेचन करण्यात आले आहे.बौद्ध धम्मानुसार वर्तमान किंवा मागील जन्मातील केलेल्या कृत्यानुसारच प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असतो.पाली साहित्यामध्ये स्वर्ग आणि नरकही संकल्पना दैवीशक्ती नाकारून स्वतःद्वारे केलेले चांगले वा वाईट कार्य हे कर्म –फलाच्या सिद्धांतावर अवलंबून आहे हे सांगितले आहे.

पञ्चगतिदीपनीवर पुढील भाषिक आवृत्यांमध्ये काम झाले आहे: रोमन(फीर १८८४),देवनागरी(जैन १९८३), थाई (पिरोमनुकुल २००७), बंगला लिप्यंतरण व अनुवाद(दास १९९४),इ. तसेच या ग्रंथाचे फ्रेंच: (फीर १८८३),इंग्रजी: हेज़लवड (१९८३), हिंदी: (शाक्य २०१६) मराठी (भेले,२००८-०९)व बांगला: (दास १९९४) मध्ये सुद्धा अनुवाद झाले आहेत. भाषिक आवृत्या व अनुवादाबद्दलचे सखोल विवेचन उज्ज्वलकुमार यांनी त्यांच्या पञ्चगतिदीपनी (मूल पालि, हिन्दी अनुवाद एवं व्याख्या) २०२५, या ग्रंथात केले आहे.

संदर्भ :

  • उपाध्याय, भरतसिंह, पाली साहित्य का इतिहास, प्रयाग:हिन्दी साहित्य संमेलन,१९९४
  • कुमार उज्ज्वल, पञ्चगतिदीपनी(मूल पालि, हिन्दी अनुवाद एवं व्याख्या), दिल्ली: डी.के.प्रिंटवर्ल्ड(प्रा.)लिमिटेड,२०२५
  • Feer, M. Lé Pañcagatidīpana, London: Journal of Pali Text society,1884,
  • von Hinüber, Oskar. A Handbook of Pāli Literature, Berlin, New York: Walter de Gruyter.1996

समीक्षक : नीरज बोधी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.