पाली त्रिपिटकात सिद्धार्थ गौतम बुद्धानंतर भावी बुद्ध म्हणून मैत्तेय बुद्धांचे नाव येते. कालक्रमानुसार चोवीस बुद्धांनंतर पंचवीसवे बुद्ध गौतम बुद्ध आणि त्यांच्यानंतर सव्वीसवे बुद्ध मैत्तेय (Metteyya) बुद्ध आहेत. सध्या सुरू असलेल्या या महाभद्रकल्पातील (Mahābhaddakappa) ककुसंध, कोणागमन, कस्सप आणि गौतम बुद्ध यांच्यानंतर मैत्तेय हे पाचवे बुद्ध असतील. यांचाच संस्कृतमध्ये मैत्रेय (Maitreya) बुद्ध असा उल्लेख दिसतो. हे सध्या बोधिसत्व (Bodhisatta) रूपात तुषित लोकात (Tusita) वास्तव्य करत असून योग्य काळाची प्रतीक्षा करत आहेत. ‘मैत्तेय’ हा शब्द पालीमधील ‘मेत्ता’ (Mettā) म्हणजे ‘मैत्री’ या शब्दापासून व्युत्पन्न झाला आहे, जो त्यांच्या करुणाभावाचे प्रतीक मानला जातो.

बौद्ध शास्त्रानुसार शाक्यमुनी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या दुःख मुक्ती मार्गाचा (सद्धम्माचा) जेव्हा संपूर्ण जगातून पूर्णपणे लोप होईल, तेव्हा मैत्तेय बुद्ध उत्पन्न होतील आणि ते मनुष्य व देवलोकातील प्रजेला उपदेश करतील. ‘चक्कवत्ति-सीहनाद सुत्ता’ (Cakkavatti-sīhanāda Sutta) नुसार, त्यावेळेस मानवाचे नैतिक आचरण उच्च स्तरावर असून त्यांचे सरासरी वय ऐंशी हजार वर्षे असेल. मैत्तेय बुद्धांचा जन्म केतुमती (Ketumatī – सध्याचे वाराणसी) नावाच्या समृद्ध शहरात होईल. त्या काळातील चक्रवर्ती राजा शंख (Saṅkha) त्याच्या राजपाठाचा आणि सात रत्नांचा त्याग करून मैत्तेय बुद्धांचा अनुयायी होईल.

त्यांचाही गौतम बुद्धांसारखाच हजारो शिष्यांचा विशाल भिक्षुसंघ असेल, अशी माहिती सर्वप्रथम सुत्तपिटकातील दीघनिकायात ‘चक्कवत्ति सुत्तात’ भगवान बुद्धांनी स्वतः केलेल्या उपदेशात मिळते. भावी बुद्ध म्हणून मैत्तेय बुद्धांचा उल्लेख ‘बुद्धवंशात’ही येतो. ‘विशुद्धिमग्ग’ (Visuddhimagga) आणि ‘अनागतवंश’ (Anāgatavaṃsa) या ग्रंथांनुसार मैत्तेय बुद्धांचा जन्म ब्राह्मण कुळात होईल. त्यांच्या वडिलांचे नाव सुब्रह्मा (Subrahmā) आणि आईचे नाव ब्रह्मवती (Brahmavatī) असणार आहे. प्रव्रजित होण्यापूर्वीचे त्यांचे नाव अजित (Ajita) असेल, असे संदर्भ मिळतात.

भगवान गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध संघ थेरवाद (Theravāda) आणि महायान (Mahāyāna) अशा दोन मुख्य संप्रदायांत विभागला गेला. थेरवादात अर्हत पदाला प्राधान्य दिले जाते, तर महायानात बोधिसत्व आदर्श महत्त्वाचा मानला जातो. यातूनच महायान पंथाच्या प्रभावातून ‘महावस्तु’, ‘ललितविस्तर’ आणि ‘सद्धर्म पुण्डरिक’ यांसारख्या संस्कृत ग्रंथांमध्ये भावी मैत्रेय बुद्धांची विस्तृत माहिती आणि स्तुती मिळते.

मूर्तिकलेचा विचार करता, मैत्तेय बुद्धांची मूर्ती अत्यंत अलंकृत असते. त्यांच्या डोक्यावर राजेशाही मुकुट, अलंकार, रत्नजडित हार आणि मुखावर स्मित हास्य असते. ते सहसा सिंहासनावर अभयमुद्रेत किंवा प्रलंबपाद आसनात स्थित असतात. काही बोधिसत्वांच्या मूर्तींना मिशी देखील आढळते, विशेषतः ३ ऱ्या शतकातील गांधार कलाशैलीतील ग्रीक-बौद्ध मूर्तींमध्ये हे वैशिष्ट्य दिसते. स्वतःसाठी ‘निब्बान’ प्राप्त करणे हे एकमेव उद्दिष्ट न ठेवता, जोपर्यंत सर्व सजीव दुःखमुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मार्ग दाखवणे हे बोधिसत्वाचे ध्येय मानले गेले आहे. याच करुणामय भावनेमुळे चीन, जपान, तिबेट आणि कोरिया यांसारख्या महायान प्रभावी देशांमध्ये मैत्तेय बुद्धांना विशेष पूजनीय स्थान दिले जाते.

संदर्भ :

  • स्वामीशास्त्री, द्वारिकादास – “विशुद्धिमग्गो” (हिंदीअनुवाद), वाराणसी: बौद्धभारती, २००२. ६. डॉ. भदन्तआनंदकौसल्यायन – महावंश (मराठी अनुवाद), नागपूर.
  • Jones, J.J., The Mahavastu vol-3, London: Luzac& Company Ltd, 1956.
  • Miniyef, J., “Anagatavamsa”, London: Journal of Pali Text Society, 1886.
  • Sharma, R.C., Buddhist Art of Mathura, Delhi: Agam Kala Prakashan, 1984.
  • Walshe, Maurice. “The Long Discourses of the Buddha (Digha Nikaya Translation), Wisdom Publications.

समीक्षक : जाई परांजपे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.