ॲटवुड, थॉमस (Attwood, Thomas) : (६ ऑक्टोबर १७८३ – ६ मार्च १८५६). इंग्लंडमधील एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि निवडणूक सुधारणा चळवळीतील एक अग्रणी. थॉमस यांचा जन्म इंग्लंडमधील हेल्सोव्हेन, व्हर्सेस्टरशर येथे झाला. त्यांचे वडील मॅथियस ॲटवुड हे कोळसा व लोखंडाचे व्यावसायिक होते; तसेच ते बर्मिंगहॅममध्ये बँक चालवत होते. मॅथियस यांना एकूण सात मुले होती, त्यांपैकी थॉमस हे तिसरे पुत्र. थॉमस यांनी हेल्सोवेन ग्रामर स्कूल आणि वॉल्व्हरहॅम्प्टन ग्रामर स्कूल या दोन ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर इ. स. १८०० मध्ये ते आपल्या वडिलांच्या ‘ॲटवुड्स अँड स्पूनर’ या बँकिंग व्यवसायात सामील झाले. नंतर ते एक राजकीय प्रचारक आणि संसद सदस्य होते. त्यांचे लग्न इ. स. १८०६ मध्ये एलिझाबेथ कार्लेस यांच्याशी झाले.

थॉमस यांची इ. स. १८११ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी शहराचे ‘उच्च बेलीफ’ म्हणून निवड झाली. यावेळी त्यांनी चलनविषयक प्रश्नांमध्ये वाढती रुची दाखवत हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मध्यम व निम्न वर्गातील लोकांना अधिक न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी प्रयत्न केले. इ. स. १८१२ मध्ये त्यांनी अमेरिकेशी व्यापार रोखणाऱ्या ‘ऑर्डर्स इन कौन्सिल’ विरुद्ध संसदेत याचिका दाखल करण्यासाठी बर्मिंगहॅममधून एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले; ज्यामुळे त्यांना बर्मिंगहॅमच्या कारागिरांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी इ. स. १८१३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा सनद नूतनीकरण करण्याच्या विरोधात मोहीम उघडली. थॉमस यांनी अल्प उपभोगाच्या दृष्टिकोणातून आर्थिक संकटाचे विश्लेषण करणारे इ. स. १८१६ मध्ये ‘रेमेडी’ आणि इ. स. १८१७ मध्ये ‘प्रॉस्पेरिटी रिस्टोर्ड’ व ‘लेटर टू व्हॅनसीटार्ट’ हे लेख लिहिले. त्यामध्ये त्यांनी आर्थिक मंदी व बेरोजगारीच्या समस्यांवर उपाय म्हणून सैल आर्थिक धोरण (अधिक कागदी चलन) आणि सरकारने निधी दिलेल्या सार्वजनिक कामांची मागणी केली. त्यामुळे इ. स. १८१६ च्या भीषण वर्षात ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीस आले. ॲटवुड बंधूंनी मदतीसाठी एक याचिका आयोजित केली; जी इ. स. १८१७ मध्ये हेन्री ब्रुअम यांनी संसदेत सादर केली. थॉमस यांचे ‘ऑब्झर्व्हेशन्स’ (१८१८) हे सर्वांत चिंतनशील कार्य आहे.

थॉमस यांचे मोठे भाऊ मॅथियास याने इ. स. १८१९ मध्ये ‘रॉटन बरो’मधून संसदेत निवडून आले. ॲटवुड बंधूंनी इ. स. १८१९ च्या पील समितीच्या चलन परिवर्तनीयता या पुन्हा सुरू करण्याच्या अनावश्यक निर्णयाला विरोध केला. त्यांनी चलन व्यवस्था, वाढती लोकसंख्या आणि गरिबी यांचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट केला आहे. थॉमस यांनी इ. स. १८१९ मध्ये लिहिलेल्या पत्रांमधून अधिक सार्वजनिकपणे या पुनरुज्जीवन कायद्याचा निषेध केला. त्यांनी इ. स. १८२१ मध्ये कृषी संकटावरील हाऊस समितीसमोर साक्ष दिली.

थॉमस यांनी संसदीय सुधारणा चळवळीत मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन शहरातील व्यापारी व कामगार वर्गांच्या गरजा लक्षात घेणारे राष्ट्रीय आर्थिक धोरण आणि जमीनदार वर्गांचे वर्चस्व हे संसदेद्वारे राबविले जाणार नाही, अशी ठामपणे भूमिका मांडली. याच उद्देशाने इ. स. १८२९ च्या उत्तरार्धात त्यांनी बर्मिंगहॅममध्ये निम्न आणि मध्यम वर्गांच्या लोकांचे राजकीय संघ’ (पॉलिटिकल युनियन ऑफ द लोअर अँड मिडल क्लासेस ऑफ द पीपल) स्थापन केला. हे संघटन सामान्य लोकांना राजकीय सुधारणा या मागण्यांसाठी एकत्र आणणारे होते. या कायद्यामुळे संसदीय प्रतिनिधित्वात बदल झाले. थॉमस यांनी या कायद्याच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन घडवून आणले. विशेषतः इ. स. १८२६ नंतरच्या व्यापक आर्थिक संकटामुळे जानेवारी १८३० मध्ये त्यांनी बर्मिंगहॅम येथे पॉलिटिकल युनियनची स्थापना केली; जी सरकारवर कायदा मंजूर करून घेण्यासाठी दबाव टाकणारी सर्वांत प्रभावी राजकीय संघटना मानली जाते. इ. स. १८३२ मध्ये संसदीय सुधारणा यशस्वी झाल्यानंतर थॉमस हे बर्मिंगहॅमचे पहिले खासदार म्हणून निवडून आले. युनियनच्या कार्यामुळे चलन सुधारणा सुरक्षित करण्यासाठी कामगार वर्गाच्या विरोधाला बळ मिळाले. या संघटनेची रचना आणि कार्यपद्धती देशाच्या अनेक भागांमध्ये लागू करण्यात आली. सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर थॉमस बर्मिंगहॅममधून संसदेचे सदस्य म्हणून निवडून येऊन इ. स. १८३९ पर्यंत पदावर होते.

थॉमस यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापार धोरणांविरोधात मोहीम राबवली; कारण त्यातून स्थानिक व्यापार व रोजगार यांवर परिणाम होत होता. त्यांनी चलनविषयक सुधारणा सुचवल्या, ज्यामध्ये पैशांचा पुरवठा वाढवून व्यापार व रोजगार वाढवावा, असा आग्रह होता. त्यांच्या कार्यामुळे जनतेकडून त्यांना ‘किंग टॉम’ असे टोपणनाव मिळाले होते.

थॉमस यांनी अंडरकन्सम्प्शनिस्ट ही विचारसरणी मांडली; ज्यामध्ये उत्पादन व व्यापार वाढविण्यासाठी लोकांच्या खरेदी क्षमतेला महत्त्व दिले गेले. इ. स. १८१५ मध्ये त्यांनी असा युक्तिवाद केला की, ब्रिटनमध्ये कागदी चलन असले पाहिजे, जे सोन्याशी जोडलेले नाही. सरकारने पैशाचा पुरवठा वाढवून आर्थिक मंदीचा सामना करावा, असे ते म्हणत. त्यांनी मांडलेला आर्थिक सिद्धांत बर्मिंगहॅममध्ये लोकप्रिय होता; परंतु ते सरकारला पटवून देण्यात अयशस्वी झाले. थॉमस यांनी चलन सुधारणा याचिकेवर सुमारे ४०,००० लोकांची स्वाक्षरी घेतली; परंतु ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि त्यांच्या सरकारने त्यांच्या प्रस्तावावर विचार करण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी हळूहळू असा दृष्टिकोण विकसित केला की, हाऊस ऑफ कॉमन्सला व्यावसायिक अनुभव आणि अर्थशास्त्राचे ज्ञान असलेल्या अधिक लोकांची आवश्यकता आहे. म्हणून ते बर्मिंगहॅमसारख्या मोठ्या उत्पादन शहरांना संसदेत प्रतिनिधित्व देण्याच्या मागणीत सामील झाले. चलन सुधारणा, घरगुती मताधिकार, त्रैवार्षिक संसद, खासदारांना पैसे देणे आणि मालमत्तेची पात्रता रद्द करणे या विषयांवर त्यांनी काम केले.

थॉमस यांनी जून १८३९ मध्ये पुन्हा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चलन सुधारणा यावर पहिली राष्ट्रीय याचिका सादर केली. त्यावरही लाखो लोकांनी स्वाक्षरी केली; परंतु कॉमन्सने ४६ विरुद्ध २३५ मतांनी ही याचिका फेटाळून लावली. सार्वजनिक दबावाला प्रतिसाद देण्यास संसदेच्या अनिच्छेमुळे आणि अनेक चार्टिस्ट नेत्यांना चलन सुधारणांबद्दल शंका असल्याच्या जाणीवेने थॉमस यांनी संसदेतून राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी परत राजकारणात कधीच भाग घेतला नाही. थॉमस यांचे कार्य ब्रिटनमधील लोकशाही सुधारणा व आर्थिक धोरणांमध्ये बदल घडवून आणणारे ठरले. त्यांनी सामान्य लोकांना राजकारणात आवाज मिळवून दिला आणि आर्थिक विचारसरणीत लोकांच्या खरेदी क्षमतेला केंद्रस्थानी ठेवले. त्यांनी आपल्या विचारातून देशातील आर्थिक संकटांची कारणे आणि ती दूर करण्यासाठी विविध उपाय सुचविले होते.

थॉमस यांनी पुढील महत्त्वाच्या ग्रंथांचे लेखन केले : प्रॉस्पेरेटी रिस्टोअर्ड, १८१६; ऑब्झर्व्हेशन ऑन करन्सी, पॉप्युलेशन अँड पॉपरिजम, १८१८; द स्कॉच बँकर, १८२७ इत्यादी.

थॉमस यांचे ग्रेट मॉल्व्हर्न, व्हर्सेस्टरशर येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Behagg, Clive, Politics and Production in the Early Nineteenth Century, London, 1990.
  • Moss, David J., Thomas Attwood : The Biography of a Radical, Kingston, 1990.
  • Wakefield, C. M., Life of Thomas Attwood, London, 1885.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.