पेशवे दरबारातील एक फ्रेंच अधिकारी. हा पुण्यास एका घोडदळाच्या तुकडीचा प्रमुख होता. त्याने पुण्याहून लिहिलेली पत्रे पाँडिचेरीच्या अभिलेखागारात असून ती इ. स. १७८८ ते १७९७ या काळातील आहेत. हा पेशव्यांकडे कधी रुजू झाला याची निश्चित माहिती मिळत नाही; तथापि ६ मार्च १७८४ रोजी मर्सिए या म्हैसूरमध्ये लष्करी पेशातील त्याच्या फ्रेंच नातेवाईकाने मोंतिनी या पुण्यातील फ्रेंच वकिलाला लिहिलेल्या एका पत्रात माँत्रोची शिफारस केलेली आढळते. हा त्याचा प्रथम उल्लेख होय. त्यावरून, इ. स. १७८४ नंतर कधीतरी, बहुधा इ. स. १७८८ पासून तो पेशव्यांकडे रुजू झाला असावा. इ. स. १७७४ च्या आधी काही काळापासून तो भारतात असल्याचे दिसते.

दि. २० मे १७८८ रोजी पाँडिचेरीतील एक अधिकारी मोरासां याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात स्वत:चे पैसे सुरक्षित ठेवण्याबद्दल विनंती केलेली आढळते. माँत्रोने स्वत:चे पैसे मोंतिनीकडे दिल्यावर मोंतिनीतर्फे हे पैसे पाँडिचेरीला मोरासां याच्याकडे जाणे अपेक्षित होते. सुरुवातीच्या पत्रात ही रक्कम ७,००० रुपये इतकी होती. कूलों नामक पाँडिचेरीतील एका व्यापाऱ्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात मोरासां याने माँत्रोची विनंती अमान्य केल्यास कूलोंने माँत्रोचे पैसे स्वत:जवळ सुरक्षित ठेवावेत, अशी विनंती आढळते. इ. स. १७८६ मध्ये मराठ्यांनी (बहुधा पेशव्यांच्या आरमाराने) पकडलेल्या ॲडलेड नामक जहाजाच्या दायो नामक कप्तानाला उद्देशूनही माँत्रोने बरीच पत्रे लिहिलेली आहेत. हा दायो मुंबईला असून माँत्रोने त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात मद्य, पुस्तके, आरसे, साबण, शाई, इ. वस्तूंची मागणी केली होती. शिवाय अजून एका पत्रात त्याने द लाले या फ्रेंच सेनापतीसंबंधातली माँत्रोकडची सर्व कागदपत्रे मोंतिनी याच्याकडे पुण्यात हस्तांतरित करण्याबद्दलही लिहिले आहे. द लाले याने माँत्रोला काही वर्षांपूर्वी कैद करून त्या जवळील मुद्देमाल लुटला होता, त्या घटनेसंबंधीची ही कागदपत्रे असावीत.

पेशव्यांच्या आरमाराने पकडलेल्या ॲडलेड जहाजाची मुक्तता करण्याबद्दल मराठ्यांशी वाटाघाटी करणे अवघड असल्याचे माँत्रोच्या एका पत्रात नमूद आहे. दायोला उद्देशून लिहिलेल्या एका पत्रात नाना फडणीसांचे पुण्यात पुनरागमन झाल्यावर त्यांच्याशी या संदर्भात वाटाघाटी करण्याची वाट पाहत असल्याचे माँत्रो सांगतो. याखेरीज हैदराबादला निजामाच्या पदरी रुजू असलेल्या पिरों नामक फ्रेंच अधिकाऱ्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात माँत्रोने पिरोंकडून हैदराबादची खबरबात सांगितल्यास त्याबदल्यात स्वत:कडून त्याला पुण्याची खबरबात कळेल, असे आश्वासनही त्याने दिलेले आहे.

मोंतिनीला उद्देशून इ. स. १७८८ मध्ये लिहिलेल्या इतर अनेक पत्रांत माँत्रो तऱ्हेतऱ्हेची बातमी कळवतो. मुंबईस इंग्रजांनी सुरू केलेली शिपाईभरती, यूरोपहून मुंबईला दहा जहाजे येणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तीनच जहाजे येणे, नागपूरकर भोसल्यांपैकी एकाचा मृत्यू, टिपू सुलतानाविरुद्ध इंग्रजांचा कल, इ. अनेक गोष्टींचा उल्लेख या पत्रांत आढळतो. टिपू सुलतानाचा व त्याविरुद्धच्या संभाव्य मोहिमांचा उल्लेख अनेक पत्रांत येतो. दायो फ्रान्सला जाण्याआधी त्याला उद्देशून अनेक पत्रे माँत्रोकडून लिहिली गेलेली आहेत. पुण्यातील इंग्रज वकील चार्ल्स मॅलेट व नाना फडणीस यांमधील गुप्त वाटाघाटी, महादजी शिंदे यांचा एका लढाईतील (बहुधा लालसोटची लढाई) पराभव, मोंतिनीने ८% व्याजदराने माँत्रोची संपत्ती पाँडिचेरीत मोरासां याच्याकडे ठेवलेली असणे, तसेच पेशव्यांकडे आलेल्या बातमीनुसार एका दरीत झालेल्या स्फोटामुळे टिपू सुलतानाचे अर्धे सैन्य नष्ट होणे, ॲडलेड या फ्रेंच जहाजाबद्दलच्या पुणे दरबाराशी रखडलेल्या वाटाघाटी, इ. गोष्टींचाही उल्लेख त्याच्या पत्रांत येतो.

यानंतर इ. स. १७९० मध्ये लिहिलेली पत्रे ज्ञात असून, त्यांतील एका पत्रात १७८८ मधील पत्राचा हवाला देऊन पाँडिचेरीतील मोरासां याच्याकडे १०,९९६ रुपये मोंतिनीतर्फे पोचवल्याचे सांगून माँत्रो तत्कालीन भारतातील राजकीय अस्थिरता खूप असल्याने तिथून निघून आपल्या संपत्तीसह फ्रान्समध्ये जाण्याची इच्छा नोंदवतो. मात्र मराठ्यांकडून त्याला सेवामुक्त न केले गेल्यामुळे नाईलाजाने अजून एकदोन वर्षे मराठ्यांसोबत राहू असेही तो इ. स.१७९१ मधील एका पत्रात नोंदवतो. यानंतरच्या एका पत्रात मोरासां याच्या पदरचे कैक लोक फ्रान्सला निघून गेल्यामुळे त्याच्याकडून पैसे परत घेण्याकरिताही त्याने बरीच खटपट केलेली आढळते. मोंतिनी याने १०,९९६ पैकी फक्त ५४० रुपये परत केल्यामुळे उर्वरित रक्कम ताब्यात घेऊन पाँडिचेरीस पोचवण्याकरिता मोरासां याला माँत्रोने बरीच गळ घातलेली आढळते.

श्रीरंगपट्टणजवळच्या पेशव्यांच्या छावणीतून त्याने पाँडिचेरीला मोरासां याच्या पदरच्या लोकांना उद्देशून इ. स. १७९२ साली लिहिलेलेले एक पत्र आहे. त्यात द लाले याचा वंशज द व्हिजी याने द लाले याची संपत्ती कुणाकडे ठेवली याची चौकशी आढळते व त्याखेरीज अनेक वर्षांपूर्वी द लाले याने माँत्रोला लुटले त्या रकमेची भरपाई करण्याबद्दलही विनंती आढळते. यानंतरच्या एका पत्रात त्याने त्याच्या कुटुंबाची चौकशी करणारे पत्र फ्रान्सला पाठवले होते. याआधीही त्याने अशी चौकशी करणारे पत्र इ. स. १७७४ साली पाठवले होते, परंतु दोन्ही पत्रांना उत्तर मिळाले नाही.

अखेरची दोन पत्रे इ. स. १७९७ मध्ये हैदराबादहून पुणे दरबारातील एक अधिकारी ओनोर याला उद्देशून लिहिलेली आहेत. या वेळपर्यंत माँत्रोने पुण्यातील आपली मालमत्ता विकून तो हैदराबादमार्गे कोरोमंडल किनारपट्टीवरील मच्छलीपट्टणमच्या दिशेने निघाला होता. त्याच्या तोफा कुणा रामाजीपंत नामक गृहस्थाने विकत घेतल्या होत्या.

यानंतर माँत्रोचे उल्लेख सापडत नाहीत. उपलब्ध कागदपत्रांवरून त्याच्या जीवनाचे व मराठ्यांशी आलेल्या संबंधांचे एक तुटक चित्र उभे राहते. शेवटीशेवटी त्याला फ्रान्समध्ये जाण्याची इच्छा प्रकर्षाने होत असल्याचे दिसते. दुप्ले, मोंतिनी इ. प्रबळ व उच्चपदस्थ फ्रेंच अधिकाऱ्यांच्या तुलनेत माँत्रो हा मध्यम फळीतील सरदार होता. त्याच्या पत्रांमधून तत्कालीन मध्यम फळीतील सरदार तसेच राजकीय गुंतागुंतीची थोडीफार कल्पना येते.

संदर्भ :

  • Hatalkar, V. G., Relations between the French and the Marathas, Published by University of Bombay, 1958.
  • Sen, S. P., ‘PRIVATE CORRESPONDENCE OF MONTREAU, A FRENCH OFFICER IN MARATHA SERVICE’, Proceedings of the Indian History Congress, Vol. 10, pp. 431-436, 1947.

समीक्षक : निखिल परांजपे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.