मिर्झा झुल्करनैन : (इ. स. १५९४-१६५६). मोगलकालीन भारतातील एक आर्मेनियन वंशीय व ख्रिश्चनधर्मीय उमराव. याचा पिता सिकंदर मिर्झा हा एक आर्मेनियन व्यापारी होता, तो सिरियातील आलेप्पोहून अकबराच्या कारकीर्दीत लाहोरला आला. तिथे त्याने मोगलांची चाकरी पतकरली व अकबराच्या निकटवर्तीयांपैकी एक बनला. अकबराच्या कुटुंबीयांच्या पदरी नोकरी करणाऱ्या अब्दुल हेय्य नामक एका आर्मेनियन गृहस्थाची ज्युलियाना नामक मुलगी अकबराने सिकंदर मिर्झाला दिली. ज्युलियाना ही अकबराच्या जनानखान्यात हकीम म्हणून काम करत असे. ज्युलियानाच्या पोटी झुल्करनैनचा जन्म झाला. त्याला झुल्करनैन हे नाव खुद्द अकबराने दिले. त्याचा अर्थ ‘दोन शिंगांचा’ असा असून प्राचीन ग्रीक सम्राट अलेक्झांडरचे ते एक बिरुद आहे. सिकंदर मिर्झा आणि अकबराचे संबंध चांगले असल्याचे समकालीन ऐतिहासिक साधनांतून समजते. अकबरानंतर राज्यारूढ झालेल्या जहांगीरशीही सिकंदरचे संबंध चांगले होते.

इ. स. १६१३ साली सिकंदर मिर्झा मरण पावला. तेव्हा झुल्करनैनचे वय एकोणीस वर्षे होते. बालपणी झुल्करनैन मोगलांच्या जनानखान्यातच त्याच्या आईसोबत वाढला. खुर्रम उर्फ शाहजहानसारखे राजपुत्र बालपणी त्याचे खेळगडी होते. जहांगीराच्या कारकीर्दीच्या चोवीसाव्या वर्षी, म्हणजेच इ. स. १६२९-३० मध्ये झुल्करनैन हा जनानखान्यात नोकरीला असून, दरबारातही उपस्थिती लावत असे. त्याच वर्षी त्याला सांभर सरोवराच्या मिठागराचा दिवाण बनवण्यात आले. त्यानंतर मोजक्या वर्षांचा अपवाद वगळता त्याच्या मरणाआधी दोनेक वर्षांपर्यंत झुल्करनैन त्याच पदावर आयुष्यभर राहिला. सांभरच्या मिठागरातून मिळणारे उत्पन्न ‘ऐन-इ-अकबरी’नुसार १६,१६,८२५ दाम इतके होते. येथील उत्पन्न अधिक असल्यामुळे ही जबाबदारी जोखमीची होती. काही काळाने झुल्करनैनला त्या प्रदेशाची फौजदारीही बहाल करण्यात आली. सांभरहून पांढरे, निळे व गुलाबी अशा तीन प्रकारचे मीठ उत्पादित होत असे व त्याच्या विक्रीतून सरकारी खजिन्यात दरवर्षी काही लाख रुपयांची भर पडत असे.

इ. स. १६३२ साली झुल्करनैन बंगालहून आग्र्याला आला तेव्हा त्याने तत्कालीन मोगल बादशाह शाहजहानला नजराणा म्हणून पाच हत्ती भेट दिले. मात्र यावेळेस त्याच्यावर शाहजहानची खप्पा मर्जी झाल्याची नोंद मिळते. याचे एक कारण म्हणजे त्याने त्याच्याकडील संपत्तीचे पूर्णांशाने विवरण न देता बरीच संपत्ती लपवून ठेवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला गेला, व सुमारे ८ लाख रुपये भरून मगच त्याची सुटका झाली.

इ. स. १६४० सालापर्यंत झुल्करनैन पुन्हा शाही कृपेस पात्र झाला होता. इ. स. १६४२ मध्ये त्याने शाहजहानकडे बंगालमध्ये शाह शुजा या बंगालचा सुभेदार म्हणून काम करणाऱ्या मोगल राजपुत्राच्या पदरी राहून काम करण्याची परवानगी मागितली. त्यानुसार त्याला ५०० जात व ३०० स्वारांची मनसब देण्यात आली. ही मनसब त्याला इ. स. १६४७-१६४८, इ. स.१६५६-१६५८ या काळाकरिता देण्यात आली. इ. स. १६४९ साली सांभरच्या फौजदारपदी पुन्हा त्याची नेमणूक करण्यात आली. शाह शुजा, दारा शुकोह यांच्याशी झुल्करनैनचे मैत्रीपूर्ण संबंध होते.

झुल्करनैनने स्वत: व्यापार केल्याचा उल्लेख मिळत नाही. मात्र, सांभर येथील खालसा नमकसार अर्थात मिठाशी संबंधित शाही विभागाचा प्रमुख असल्याने मोगल साम्राज्याच्या वतीने त्याला मिठाच्या व्यापारात लक्ष घालावे लागले. तो यूरोपीय व्यापाऱ्यांच्याही संपर्कात होता. इ. स. १६३६ साली जॉन ड्रेक नामक इंग्लिश व्यापाऱ्याला त्याने मोगल बादशहाला भेटण्याकरिता योग्य मध्यस्थ निवडण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्या वेळी यूरोपीय व्यापारी भारतात कैकदा आर्मेनियन लोकांना मध्यस्थ म्हणून नेमत.

झुल्करनैनला अनेक भाषा अवगत होत्या. तसेच तो कवी होता. खुद्द जहांगीरने त्याच्या काव्यकौशल्याची स्तुती ‘तुझुक-इ-जहांगिरी’ मध्ये केलेली आहे. ताव्हेर्ने झां बातीस्त हा सतराव्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच प्रवासीही त्याचा उल्लेख एक उत्तम कवी म्हणून करतो. ‘बादशाहनामा’ या ग्रंथातही झुल्करनैनच्या काव्यकौशल्याची स्तुती आढळते.

झुल्करनैन एक धर्मनिष्ठ ख्रिश्चन होता. त्याने आपल्या हयातीत चर्चला मोठमोठ्या रकमा दान केल्या. त्याने दान केलेल्या रकमेतून जेझुईट पंथीयांनी मुंबईजवळील साष्टी येथे काही जमीन विकत घेतली. त्याच्याच माध्यमातून आग्र्यातील जेझुईट कॉलेजचीही स्थापना करण्यात आली. त्याखेरीज तिबेटमध्येही एका ख्रिश्चन मिशनची स्थापना करण्यात आली, परंतु इ. स. १६४० साली ते नष्ट करण्यात आले. जेझुईटांसोबतच आर्मेनियन ख्रिश्चनांशीही त्याचे चांगले संबंध होते.

इ. स. १६५४ साली झुल्करनैनने त्याच्या जहागिरीवर पाणी सोडले व दिल्लीत राहू लागला. त्याचा मृत्यू इ. स. १६५६ मध्ये झाल्याचे काही तत्कालीन इतिहासकार नोंदवतात, परंतु इ. स. १६५७ व १६५८ मधील मोगल मनसबदारांच्या यादीत त्याचे नाव सापडत असल्याने याबद्दल निश्चित माहिती सापडत नाही. त्याच्या पत्नीचे नाव हेलेना असून इ. स. १६३८ मध्ये तिचा लाहोर येथे मृत्यू झाला.

संदर्भ :

  • Husain, Ruquiya K., ‘MIRZA ZULQARNAIN – An Armenian Noble’, Proceedings of the Indian History Congress, Vol. 59, pp. 260-265, 1998.
  • Seth, Mesrovb Jacob, Armenians in India From the earliest times to the present day, A work of original research, Calcutta. 1937.

समीक्षक : निखिल परांजपे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.