स्वातंत्र्योत्तर काळातील परिचर्येचा विकास : १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने स्वतःची आरोग्य व्यवस्था उभारण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय परिचर्या व्यवसायाचा विकास अनियोजित प्रशिक्षणापासून ते अतिविशेषीकृत विद्यापीठीय शिक्षणापर्यंत झाला. आरोग्य सेवांचा विस्तार आणि गुणात्मक वाढ करण्यात भारतीय परिचारिका विकासातील आरोग्य समित्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे.

भारतातील आरोग्य समित्यांनी संरचनात्मक सुधारणांची शिफारस करून शिक्षणाचा दर्जा सुधारून आणि विशेषतः ग्रामीण भागात व्यावसायिक परिचारिकांची संख्या वाढवून परिचर्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भोरे (१९४६) आणि शेट्टी (१९५४) यांसारख्या प्रमुख समित्यांनी समुदाय-आधारित सेवेला प्राथमिक आरोग्य केंद्रांशी जोडून सार्वजनिक आरोग्य परिचर्येचा पाया घातला.

प्रमुख आरोग्य समित्या आणि परिचर्येवरील त्यांचा प्रभाव यांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे :

समिती आणि वर्ष परिचारिका विकासातील मुख्य भूमिका प्रमुख शिफारस / परिणाम
भोरे समिती (१९४३ ते १९४६) पायाभरणी आणि व्यावसायिकता §  एकात्मिक उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक सेवा देण्यासाठी “सामाजिक आरोग्य परिचारिका” (Public Health Nurse) प्रतिमानाची स्थापना.

§   परिचारिका, प्रसविका आणि आरोग्य सेविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करणे.

§   पुरुष परिचारिकांचा व्यवसायात समावेश केला. परिचारिका प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन सुरू करण्यात आले.

§   परिचारिका पदवी शिक्षणाची गरज ओळखून पदवी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या.

§  अधिक परिचर्या शाळा उघडणे.

§   त्यामुळे उत्तम सुविधा आणि पर्यवेक्षणासह परिचर्या प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली. वेल्लोर आणि दिल्ली येथे दोन परिचर्या महाविद्यालये स्थापन करण्यात आली.

शेट्टी समिती (१९५४) कामाची स्थिती आणि मानके §  परिचारिकांच्या कामाच्या स्थितीत, कामाचे तास, वेतन संरचना यांत सुधारणा करणे.

§  सर्व राज्यांमध्ये प्रशिक्षणाचे मानक समान ठेवणे.

§  रुग्णालयात सर्व साधनांची पुरेशी उपलब्धता व साहित्य साधनांचा एकत्रित साठा ठेवणे.

§   प्रत्येक राज्यात राज्य परिचर्या अधीक्षक (SNS) नेमणे.

§  परिचारिकांना रुग्णालयात निवास स्थान उपलब्ध करणे.

§  साहाय्यक परिचारिका आणि प्रसविका नेमण्याची शिफारस केली.

मुदलियार समिती (१९५९ ते १९६१ ) कर्मचारी संख्या आणि विशेषीकरण §  माता व बाल आरोग्यावर लक्ष केंद्रित करून प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट करणे.

§  परिचर्या पर्यवेक्षण सुधारणे आणि अधिक सार्वजनिक आरोग्य परिचारिका, महिला आरोग्य सेविका व महिला आरोग्य प्रचारकांची (LHV) नियुक्ती करणे.

§  सामाजिक आरोग्य परिचारिका, बालरोग तज्ञ, मनोरोग तज्ञ, शस्त्रक्रिया विभाग , पाठ्यनिर्देशिका, परिचारिका प्रशासक या विशेष व उच्च प्रशिक्षणाची व त्यानुसार पदोन्नतीची पदे नेमणे.

§  मनोरुग्णालये, सैनिकी रुग्णालये व पुनर्वसन केंद्रात पुरुष परिचारक नेमणे.

कर्तार सिंग समिती (१९७४ ) बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता §  साहाय्‍यक परिचारिका प्रसविका (Auxiliary Nurse Midwife; ANM) चे नाव बदलून ‘महिला बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता’ (MPW-F) असे केले.

§  समुदाय पोहोच सुधारण्यासाठी “बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी” ही संवर्ग सुरू केली, ज्यामुळे सहायक परिचारिका प्रसविका यांच्या भूमिकेची पुनर्व्याख्या झाली.

श्रीवास्तव समिती (१९७५) ग्रामीण आरोग्य सेवा §  समुदाय आणि डॉक्टर यांच्यातील दुवा म्हणून ‘आरोग्य मार्गदर्शक’ योजना आणि निम-वैद्यकीय (Paraprofessional) परिचारिका संवर्ग तयार करण्याचा प्रस्ताव दिला.

§  समुदाय-आधारित परिचर्या साहाय्याद्वारे वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामीण समुदाय यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने,  अर्ध-व्यावसायिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा एक नवीन संवर्ग तयार करण्याचा प्रस्ताव दिला.

बजाज समिती  (१९८६ ते १९८७ ) §  परिचर्या शिक्षणाला राष्ट्रीय आरोग्य गरजांशी संरेखित करण्याच्या उद्देशाने, आरोग्य मनुष्यबळ नियोजन आणि व्यवस्थापनावर भर दिला.
उच्चाधिकार समिती (१९८९) नेतृत्व आणि व्यवस्थापन §  परिचारिकांसाठी स्वतंत्र ‘परिचर्या संचालनालय’ (Directorate of Nursing) स्थापन करण्याची आणि त्यांना प्रशासकीय अधिकार देण्याची शिफारस केली.

विकासाचे टप्पे (थोडक्यात) :

  • सुरुवातीचा काळ : मूलभूत पायाभूत सुविधा आणि पदवी शिक्षणाची सुरुवात.
  • मध्यम काळ : ग्रामीण भागातील सेवा आणि माता-बाल आरोग्यासाठी विशेष कर्मचारी (ANM) तयार करणे.
  • आधुनिक काळ : परिचारिकांच्या प्रशासकीय अधिकारांवर आणि उच्च शिक्षणावर (Specialization) भर.

भारतीय आरोग्यसेवा प्रणालीतील परिचर्येची भूमिका : परिचारिका हा भारतीय आरोग्यव्यवस्थेचा मुख्य कणा आहेत.

  • थेट रुग्णसेवा : डॉक्टर औषधोपचार ठरवितात, परंतु त्यांची अंमलबजावणी आणि रुग्णाची २४ तास देखभाल परिचारिकाच करतात.
  • आरोग्य शिक्षण : लसीकरण मोहिमा, माता-बाल संगोपन, कुटुंब नियोजन आणि संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांची प्रतिबंधात्मक माहिती देण्यात परिचारिकांचे मोठे योगदान आहे.
  • व्यवस्थापन : रुग्णालयीन प्रशासन; औषध साठा व्यवस्थापन; रुग्ण सेवेव्यतिरिक्त रुग्णालयातील सर्व सहायक सेवा, उदा., स्वच्छता, सुरक्षा, अन्न व वस्त्र पुरवठा, जीववैद्यकीय शुश्रूषा व इतर तांत्रिक सेवांचे व्यवस्थापन करण्याची आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे नियंत्रण करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असते.

परिचर्या व्यवसायातील आव्हाने व संधी :

आव्हाने :

  • संख्यात्मक कमतरता : भारताच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांची संख्या आजही कमी आहे.
  • सामाजिक दृष्टिकोन : आजही काही समाजघटकांमध्ये परिचर्या व्यवसायाकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते.
  • अतिताण : रुग्ण-परिचारिका गुणोत्तर न राखल्यामुळे कामाचा ताण वाढून  औषधोपचार किंवा देखभालीमध्ये चुका होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे परिचारिकेच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य व  कार्यक्षमतेवर परिणाम होतो. कामाचे जास्त तास आणि कमी वेतन ही अनेक खाजगी रुग्णालयातील मोठी समस्या आहे.
  • प्रतिभा पलायन (Brain Drain) : उत्तम पगारासाठी भारतीय परिचारिका मोठ्या प्रमाणावर परदेशात (अमेरिका, यूके, आखाती देश) स्थलांतरित होत आहेत.

व्यावसायिक संधी : आधुनिक आरोग्यसेवेमध्ये परिचारिकांची भूमिका आता केवळ रुग्णांची शुश्रूषा करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. बदलत्या आरोग्य गरजा आणि तंत्रज्ञानामुळे परिचारिकांची भूमिका अधिक व्यापक, विशेष आणि जबाबदार झाली आहे

  • विशेषीकरण (Specialization) : अतिदक्षता विभाग (ICU), हृदयचिकित्सा, अर्बुदविज्ञान (oncology), न्यायवैद्यक (forensic) यांसारख्या परिचर्या क्षेत्रांत ‘विशेषज्ञ परिचारिका’ म्हणून प्रगतीच्या मोठ्या संधी आहेत.
  • तंत्रस्नेही आरोग्य (Digital Health) : दूरसंचार परिचर्या (tele-nursing) आणि कौटुंबिक आरोग्य सेवांमध्ये (family health care) तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन रोजगार निर्माण होत आहेत.
  • परिचर्या व्यावसायी (Nurse practitioner) : भारतात आता ‘परिचर्या व्यावसायी’ ही संकल्पना रुजत आहे, ज्यामुळे परिचारिकांना काही प्रमाणात औषधोपचार सुचविण्याचे अधिकार मिळत आहेत.

प्राचीन भारतातील ‘उपस्थाता’ पासून ते आजच्या आधुनिक ‘परिचर्या व्यावसायी’ पर्यंतचा प्रवास संघर्षाचा आणि सेवेचा आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीने परिचर्येला रोगनिवारणाचे आणि लोकांच्या शारीरिक वेदना कमी करण्याचे एक शास्त्र म्हणून मान्यता दिली होती. परंतु, एक सुव्यवस्थित शास्त्र आणि संघटित व्यवसाय म्हणून, याचा इतिहास तुलनेने अर्वाचीन आहे. भारताला आत्मनिर्भर आणि सुदृढ बनविण्यासाठी परिचर्या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे आणि या व्यवसायाला योग्य सामाजिक प्रतिष्ठा देणे काळाची गरज आहे.

पाहा : भारतीय परिचर्येचा इतिहास : स्वातंत्र्यपूर्व काळ 

संदर्भ :

  • Dhaulta, Jaiwanti P. Nursing administration and management, 2000.
  • The Trained Nurses Association of India, Nursing In India, 2006.
  • मोमीन, एस. एस. परिचर्या : शास्त्र, तंत्र, कला, २०१७.

समीक्षक : मराठी विश्वकोश संपादक


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.